माझा आवडता पक्षी

My favourite nirdosh.

माझा आवडता पक्षी

मला ना लहानपणी माझी आज्जी चिऊताईची गोष्ट सांगायची. ती ओ चिऊताई चिऊताई दार उघडं असं तो  कावळेदादा म्हणतो ना. नाही आठवलं. 

ती बघा तिची सुरुवात अशी होती,चिऊचं घर होतं मेणाचं,कावळ्याचं घर होतं शेणाचं..हां तीच मग आज्जी म्हणायची एकदा काय झालं,खूप मोठा पाऊस आला कावळ्याचं घर गेलं वाहून. 

कावळेदादा गेला चिऊताईकडे नि तिचं दार ठोठवू लागला,'चिऊताई चिऊताई दार उघड' मग ना ती चिऊताई आतून बहाणे सांगायची थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते,पाऊ लावते,टिट लावते वगैरे तेंव्हापासून मी स्वतःला कावळा नि आमच्या स्कुलबसमधल्या घाऱ्या डोळ्यांच्या,गोबऱ्या गालांच्या,नकट्या नाकाच्या ठकूला चिऊ समजू लागलो होतो फक्त मी दादा,ताई उडवून टाकले होते. 

ठकी माझी आवडती चिऊ बनली होती. 
पण मग चिऊच्या बाबांची बदली झाली नि चिऊ भुर उडून गेली पार दिल्लीला. मी हळूहळू चिऊला विसरलो म्हणजे अजुनही आठवते थोडीफार पण ते तितकंच ते.

सुट्टीत मी माझ्या मामाच्या गावी गेलो होतो. तिथे तुरेवाला कोंबडा होता. लाल,पिवळ्या,तांबूस,काळ्या पिसांचा. उजाडताना कसली बांग द्यायचा तो. मग मी सगळ्या कोंबड्यांना सोडून घालायचो. 

कोंबडा ऐटीत बाहेर पडायचा जणू सगळ्या पिलावळीचा म्होरक्या,त्याच्या जोडीला दोन कोंबड्या बाहेर पडायच्या नि त्यांची मोठी,बारीक पिल्ल. 

केळीची बाग आहे माझ्या मामाची. तिथे कोंबडा डौलात जायचा नि आज्जीने टाकलेलं धान्य,उष्टं टिपू लागायचा मग त्याच्यापाठोपाठ त्याच्या ठेंगण्याठुसक्या बायका नि पिल्लं  तिथे न्याहारी करायची. 

कोंबड्यांना खाण्यापेक्षा तिथली माती आपल्या नख्यांनी वरखाली करण्यात लय इंटरेस्ट. बहुदा त्या पिलांसाठी किडेरुपी मांसाहाराची सोय करत असाव्यात. बोलूनचालून ग्रुहिणीच त्या.

 कोंबडा मात्र शेजारच्या घरातल्या कोंबड्या कधी बाहेर पडताहेत याकडे टक लावून असायचा. एकदोन बांगा अधिकच्या खास त्यांच्यासाठी द्यायचा तो. काय आहे ना,त्यांच्यात एकपत्नीत्व वगैरे नसतं. त्यांच्या बायकांना चालतं ते. 

आपल्या माणसांत तसं नसतं ते. मला काय माहिती विचारताय,दुपारी आई,काकू यांच्या ओटीवर गप्पा चाललेल्या. मी तिथे चांदोबा वाचत होतो तेंव्हा माझ्या कानावर गेलं,दामू शिंप्याने बेण्यांच्या लती का फतीला फुकट झंपर शिवून दिला हे कळताच दामूच्या बायकोने कडाक्याचं भांडण केलं. आता झंपर तो केवढुसा,तो दिला शिवून फुकट त्या लतीला तर एवढा गहजब करण्याचं कारणच काय ना. आता दामूची बायको दामूला काडीमोड देणार असंही म्हणत होत्या. त्यापेक्षा या कोंबड्या बऱ्या. असो. आपण कशाला एवढा विचार करा त्या दामूचा! 

आम्ही मुंबईस येताना त्याच कोंबड्याचं सुकं करुन आज्जीने दिलेलं जावयासाठी भेट म्हणून. मला त्या झापातल्या कोंबड्यांची नि शेजारच्या कोंबड्यांचीही खूप दया आली. मी सांगत होतो मामाला त्याला मारु नको पण मामा नुसताच हसला. लय जून झालं काय चिकन खायला वातड लागतं म्हणाला. 

मी काय त्या चिकनला हात नाही लावला. माझ्या डोळ्यासमोर तो बांग देणारा,डौलात चालणारा कोंबडा येत होता. 

शाळा सुरु झाली तसा तो विषय मी विसरलो. गुरगुटे बाई माझ्या सुंदर हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हणायच्या. मी मग माझ्या अक्षराशी,कोंबडीच्या पायांची तुलना करायचो पण मला काडीमात्रही साम्य आढळायचं नाही. काडीमात्र,काडीमोल..एक काडी घेऊन किती शब्द तयार केलेत ना या लोकांनी.

 बाई शिकवत असताना मी असे काडीवरुन सुरु होणारे शब्द आठवू लागलो आणि बाईंनी माझा कोंबडा केला. नाही माझा आक्षेप नाही शिक्षा करण्याला पण मुलींसमोर शिक्षा करतात ते मला अजिबात मान्य नाही. त्यात शाळेत घालतो ती हाफपँटही तोकडी होत चाललोय. वाढीला पडलोय ना मी. बाईंना कुठे कळायचं एवढं सगळं, माझी मन की बात. 

दिवाळीत आमच्या चाळीत कार्यक्रम असतात. त्यात समोरची जिग्ना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली' या गाण्यावर नाचणार होती. ती जोडीदार शोधत होती. मी हो म्हणायला शिंद्यांचा निषाद पुढे झाला. पुढे पुढे करायची सवयच आहे त्याला. मला काहीही करुन जिग्नासोबत नाचायचं होतं. मी आदल्यादिवशी निषादला चायनीज भेळ खायला न्हेलं.

 माझ्या पप्पांची पेटसाफची गोळी ते दर शनिवारी घेतात नि शौचालय रविवारी अडवून ठेवतात तर मी त्यातल्या दोन गोळ्यांची पूड केली नि निषादला जिग्ना येतेय असं म्हंटलं,तो त्या वाटेकडे बघू लागताच मी माझा कार्यभाग साधला आणि ती पेटसाफ गोळीच्या भुकटीयुक्त भेळ आमच्या निषादने मिटक्या मारत खाल्ली.

 मग काय विचारता दुसऱ्या दिवशी निषाद नामक कोंबड्याचा गिळगिळीत उंदीर झाला होता. जिग्ना मला विचारायला आली,जोडीदार होशील का म्हणून. मी जरा आढेवेढे घेतले मग हो म्हणालो. कसला डान्स केला आम्ही लंगडी घालत! वन्स मोर पडला आमच्या कोंबडी पळालीला. बेस्ट जोडीचं बक्षीसही मिळालं. दुसऱ्या दिवशी निषाद बरा झाला. 

हल्ली मी मोठा होत चाललोय. आमच्या वर्गात न्यू एडमिशन आलीय एक नागपूहून प्रेमलतिका मोरे,नाव तिचं. तुम्हांला सांगतो तिचं नाव ऐकल्यापासनं मला मोर हा पक्षी आवडू लागलाय.

 माझ्या पुढच्या बेंचवर बसते ही प्रेमलतिका मोरे. माझं लक्ष तिच्याकडेच असतं. ते गाणं आठवतं मग मला मोरनी बागा में डोले आधी रात माँ छनननछन चुडीयाँ बजे साथमा. मला मग प्रेमलतिका बागेत रात्रीच्या वेळी नाचताना दिसते आणि माझा लांडोर होतो. जमदग्नी सरांचं माझ्याकडे लक्ष जातं नि ते माझ्यावर खडू फेकून मारतात. ये दिल मांगे मोर म्हंटलं की पण  प्रेमलतिका मोरेचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर तरळते.

तर असं हे माझं पक्षीप्रेम. एकाच पक्ष्यावर प्रेम करण्याइतक्या संकुचित व्रुत्तीचा मी नाही. जसजसा मोठा होता जाईन तसतशी माझ्या पक्षीप्रेमात वाढ होत जाईल यात यत्किंचितही शंका नाही.

रघू पोपटराव पक्षीमित्रे
इयत्ता चौथी फ
मु.पो. मोराची वाडी.