Feb 26, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझी लाडाची गवर

Read Later
माझी लाडाची गवर

गौराई घरी येणार म्हणून प्रत्येक घरात गृहिणींची  लगबग सुरू असते. त्या साफसफाई करून घर लख्ख करुन ठेवतात. गणपती बाप्पा दोन दिवस अगोदर येतात त्यांना मोदक, लाडूचा नैवैद्य करुन ठेवतात. गणेशाचे आगमन होऊन स्थानापन्न झाला की लाडक्या गौराईच्या स्वागताची तयारी करण्यात गृहिणी मग्न होऊन जातात.

 

गौराईचा मुखवटा, नवी साडी, दागदागिने आणतात, तिच्या आवडीचे गोडधोड पदार्थ बनवतात. गौरीला करंजी आवडते म्हणून काम कितीही असो वेळात वेळ काढून करंजी बनवतात. तिच्या आवडीच्या सगळ्या भाज्या आणल्या जातात.

 

गौरी आगमनाचा दिवस उजाडतो आणि सगळ्या महिला सुवासिनी एकत्र जमतात आणि गौरी आगमनाचा सोहळा आनंदाने साजरा करतात.
 

"आली का गवर?"..
 

"आली"
 

"कशाच्या पायी"
 

"मुलाबाळांच्या पायी, सुख समाधानाच्या पायी"


"गाई गुरांच्या पायी"


"लक्ष्मीच्या पायी" म्हणून गौरीला घरात घेतात

शेवटी "कुणाच्या घरी आली" एक सुवासिन विचारते.
मग जिच्या घरी गौरी येते ती नवऱ्याचे नाव घेऊन

..... "रावांच्या घरी" म्हणते.

 

मग गौराईला सगळे घर फिरून दाखवले जाते  आणि नंतर तिची स्थापना करतात. माहेरपणाला आलेल्या गौराईला  प्रथम पाण्याचा तांब्या भरून दिला(ठेवला ) जातो.  नवी साडी नेसवून सजवून दागदागिने घातले जातात, आणि भोपळ्याचे फुलं डोईवर(केसात) ठेवले जाते.  गौराईच रुप सुंदर, सात्विक, तेजस्वी दिसू लागतं, ते रुप पाहून गृहिणी खूश होते. गौराईला फुलोरा वाहून गृहिणी  तिच्यासाठी भोजनाच्या तयारीला लागतात.

 

पहिल्या दिवशी जेवणात ज्वारीची भाकरी, शेपू, भोपळीची भाजी, पावटे,चवळी घालून केलेला मसालेभात, कोशिंबीर,आळूवडी, कोथिंबीर वडी आणि तळलेल्या दोन मिरच्या असं साधं जेवण गौरींना आवडतं. रात्री सगळ्या महिला एकत्र येऊन गौरीची गाणी म्हणतात.

 

रुणझुणत्या  पाखरा, जारे माझ्या माहेरा...

 

घाल गं गवरी झगडा, गवरी झगडा... पैंजणाचा पाय तुझा दिसतो उघडा...

 

अशी प्रत्येक दागिन्यांची नावे घेऊन गाणे म्हणतात. झिम्मा, फुगड्या, गाणी,  फेर धरले जातात, काय ते खेळ आणि काय तो उत्साह वर्णावा , खेळात दंग होऊन सगळ्याजणी भान हरपून खेळ खेळतात, आनंद ओसंडून वाहत असतो, आपसूकच व्यायाम घडतो.

 

    
दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो तिच्यासाठी पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो, पंचपक्वान बनवली जातात,चांदीच्या ताटात दुध भात दिला जातो, तांदळाची खीर,आंबील ,गोडधोड लाडू,करंज्या अशा नानाविध मिठायांनी भरलेलं ताट महाआरती नंतर गौरी भोजनासाठी ठेवलं जातं. सवाष्णी भोजन घालतात आणि संध्याकाळी नटूनथटून हौसेने हळदीकुंकू करतात तेव्हा त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

 

गौरीच्या केसातील गजरा , हातातील कमळ गौराबाईच्या सौंदर्यात भर घालतात. गौराबाई नुसती चमकत असते तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो आणि आनंदाने गृहिणी ओटीत  सौभाग्यासाठी वसा घेतात.

 

 

रात्रीचे जागरण गौरीला आवडते म्हणून सगळ्याजणी गौरीची गाणी म्हणतात, झिम्मा, फुगडी असे खेळ खेळतात, गौराई पहाटे प्रस्थान करणार असते म्हणून तिच्या निरोपाची गाणी म्हणतात महिला भावूक होतात.

 

गंगा, गवरी, गंगा गवरी कधी येशील गं....


पाऊस पडल गंगा भरलं येईन मी भादव्यात गं...

अशी गाणी म्हणतात . रात्री बारा, साडेबाराला भानोर वाजवला की गौराई च्या परतीचे वेध लागल्यामुळे महिला नाराज, हळव्या होतात, डोळे पाण्याने भरुन येतात. दोन दिवसांचे माहेरपण करुन गौराई सासरी परत निघणार म्हणून त्यांना गौरीचा चेहरा कोमेजलेला दिसू लागतो.

 

सकाळी दोरे घेऊन, गौराईला दहीभाताची शिदोरी दिली जाते आणि जड अंतःकरणाने गौराईला निरोप दिला जातो.

 

दोन दिवस माहेरपणाला आलेल्या गौरी तिसऱ्या दिवशी सासरी परतताना गृहिणींनी केलेल्या पाहुणचाराने  गौराई भरभरून आशीर्वाद देऊन जाते.

 

ही गौराई म्हणजे सासरी गेलेली प्रत्येक मुलगी, गृहिणींना वाटत असते आपली मुलगीच माहेरपणाला आली आहे.

 

गौरीच्या सणाला नवीन लग्न झालेल्या मुली माहेरपणाला येतात. दोन दिवस नाचतात,  झिम्मा, फुगडी घालतात, फेर धरतात,विविध खेळ खेळतात  त्यांचा आनंद ओसंडून वाहत असतो.

 

माळरानावरून फुलोरा घेऊन येतात तेव्हा त्यांची आई  माझी गौरी आली म्हणत अंगणात त्यांच्यावरून भाकरी-तुकडा ओवाळून, हातपाय धुवून, हळदकुंकू लावून मग घरात घेतात.

 

लेक माहेरपणाला आल्यामुळे घर कसं भरल्यासारखं वाटतं. गौरीच्या नैवैद्याला भाजी भाकरी करताना आपल्याही गौरीच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात आणि मायेने खाऊ घातले जाते.

 

दुसऱ्यादिवशी गोडधोड पंच्चावन्नाच जेवण जेवू घालतात.  ही गौरी, गौराई सारखे  तिसऱ्या दिवशी आपल्या सासरी जायला निघते तेव्हा आईचा उर भरून येतो.

 

दोन दिवस आनंदाने भारलेले घरं, तिच्या पैजणाचा  छुमछुम असा  मंजुळ आवाज करत घरभर हसत  बागडणारी लाडकी गौराई  सासरी जायला निघते तेव्हा आई तिला गोडधोड पदार्थांची शिदोरी देते. तिला प्रेमाने मिठी मारते,पापी घेते आणि हातावर दही साखर ठेवून पाठवणी करते तेव्हा ही लाडकी गौराई आनंदाने, प्रसन्न मनाने सासरी जाते.आपली लाडाची गौराई तिच्या घरी आनंदी मनाने सुखात राहावी अशीच अपेक्षा प्रत्येक आईची असते.


   © सौ. सुप्रिया जाधव
११/९/२२

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//