
सुनबाई हुशार हो माझी!
प्रांजलची सासू मालूताईचा किचनमधून टिपेचा आवाज येत होता. मी म्हणून टिकले या घरात दुसरी कोण असती तर कधीची पळून गेली असती.
प्रांजल व प्रतिक काल रात्रीच त्यांच्या मधुचंद्राहून परतले होते. मधुचंद्र उरकला तरी गुलाबी मिठीची परस्परांची ओढ काही केल्या कमी होत नव्हती. प्रतिक तर प्रांजलला अजिबात सोडू पहात नव्हता. गोडगुलाबी थंडी आणि त्यात मऊसर,कोवळी लुसलुशीत नवीनवेली हक्काची बायको..प्रतिकला तर स्वर्ग दोन बोटं उरल्यासारखं वाटत होतं.
बाहेर सासूचा आवाज ऐकून प्रांजलने प्रतिकला जोरात ढुशी दिली नि खांद्यापर्यंत रुळणारे केसं वरती बांधून हळूच बाथरुमच्या दिशेने ब्रश करायला गेली.
मालूताई तिच्या यजमानांना,वसंतरावांना चांगलच झापत होती.
"अहो,घरात सून आली आता. आत्तातरी पुरे कपडे घाला. एखादं टिशर्ट नि लेंगातरी घालत जा. बरं दिसतं का हे गंजीफ्रॉक घालून बसणं?"
"सवय नाही गं मला. ऑफिसात घालतोच नं कपडे."
"इथेही घालायचे. सासरे झालात. आता तरी जरा मोठ्या माणसासारखं वागा. सतरांदा डबे शोधायला किचनमधे यायचं नाही. प्रांजल काय म्हणेल..हावरट सासरा!"
"बरं बाई घालतो कपडे."
प्रांजलला ब्रश करताकरता त्यांच बोलणं ऐकून हसू येत होतं. तिला वाटलेलं आपण नवीन घरात कसं एडजस्ट होणार म्हणून ती नरव्हस होती पण इथे तर तिच्यापेक्षा तिचे सासूसासरे नरव्हस होते. प्रांजल न्हाऊन आली व चहा प्यायला डायनिंग टेबरवर बसली. समोरचा पेपर हातात घेऊन म्हणाली,"आई,चहा द्या ना." मालूने एक जळजळीत कटाक्ष प्रतिक व लसंतरावांवर टाकला व सुनेला चहा,पोहे आणून दिले.
प्रांजलने मालूकडे चहा मागणं हे तिला मुळीच आवडलं नव्हतं. प्रांजलचं खाऊन होताच तिने पोळ्या करायला घेतल्या. पोळीभाजी प्रतिकच्या डब्यात भरली. प्रतिक मोबाईल हातात घेऊन नुसता बसला होता. मालुताई त्याचं घड्याळ,कपडे,पाकीट सगळं त्याच्या पुढ्यात आणून ठेवत होत्या. इतकच काय त्याचे मोजेही सॉक्समधे त्यांनी घालून ठेवले.
वसंतरावांनी पेपर वाचून झाल्यावर पेपर तसाच टाकला होता. नाश्त्याची डिश,चहाचा पेला तिथेच टेबलवर पडून होता. प्रतिकला सगळं देऊन झाल्यावर मालुताईंनी वसंतरावांच्या पुढ्यातल्या डिश,कप उचलले व बेसिनमधे नेऊन विसळले. प्रतिकच्या पाकीटात सुट्टे पैसेही त्यांनीच ठेवले व बाथरुमकडे कपडे भिजत घालायला वळल्या तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की प्रतिकचा पास संपलाय परत त्यांनी प्रतिकला हजार रुपये नेऊन दिले व पास काढायची आठवण केली.
प्रांजल तिचं लग्न झाल्यापासून मालुताईची धावपळ बघत होती. दोन धडधाकट माणसं घरात असताना मालुताई एकट्याच राबत होत्या. तिने प्रतिकला याबद्दल विचारलं तर म्हणाला,"तू नको टेंशन घेऊस. आईला सवय आहे कामाची."
दुसऱ्या दिवशी तिने सासऱ्यांना यासंबंधी विचारलं तर म्हणाले,"अगं तीचं एवढं काय घेऊन बसलैस. कामं करते म्हणून हाडं मोकळी रहातात. बसून बसून गोळा होतो अंगाचा."
प्रांजलने सासऱ्यांच्या पोटावर नजर फिरवली नि मनात म्हणाली,"खरंच की पीठाचा गोळा."
सासरे म्हणाले,"मला काय म्हणालीस?"
प्रांजल तोंडावर हात धरून हसू दाबत आत पळाली.
वसंतराव सुस्कारा सोडत म्हणाले,"कठीण आहे."
प्रांजलने ऑफिसला दिड महिना सुट्टी घेतली होती त्यामुळे ती सध्या घरातच असायची. मालुताई म्हणाल्या,"प्रांजल,तुला माहेरी जावंस वाटलं तर जाऊन ये बरं. मग ऑफिस सुरु झालं की कसलं मिळतय जायला."
प्रांजलने मेहंदीचा कोन आणला व म्हणाली,"आई,हात पुढे करा."
"अगो बाई,खुळी की काय तू प्राजू. आता मेहंदी काढून घरातली कामं कोण आवरणार?" आणि हे वय आहे का माझं नटण्याथटण्याचं?"
"असं कितीसं वय असेल ओ आई तुमचं?"
"पंचेचाळीसी पार केली बघ."
"म्हणजे काय जास्त नाही ओ. करा हात पुढे."
आणि मग प्रांजूने मालुताईंच्या दोन्ही हातांवर नाचरे मोर काढले. मालुताई तिच्या आजोळच्या अंगणात गेल्या. तिथे मेहंदीचं कुंपण होतं. हवी तेवढी हिरवीगार पानं खुडून मालु ती मोठ्या काकूकडून पाट्यावर वाटून घ्यायची. काकूही न वैतागता अगदी आवडीने ते काम करायची आणि मग सगळ्या मुली आपापल्या हातांवर मेंदीचा गोल रचायच्या. दोन्ही हात एंगेज असल्याने प्रत्येकीची आई तिला जेवण भरवायची. हे सगळं आठवत मालूचा आपसूक डोळा लागला.
प्रांजलने किचन आवरलं. वरणभात केला. सासऱ्यांकडून मेथी खुडून घेतली. त्यांनाच ती धुण्याचाही आग्रह केला. लसणाची फोडणी देऊन मेथी परतली. वसंतरावांनाही जरा हालचाल केल्याने,सुनेशी बोलल्याने बरं वाटलं.
मालुताईंना बऱ्याच उशिरा जाग आली,अगदी चहाच्या वेळेला. प्रांजु त्यांना जेवायला उठवणार होती पण वसंतराव म्हणाले,"राहुदे गं. बऱ्याच दिवसांनी अशी गाढ झोपलेय ही. रात्रीचीही अंगदुखीने कुरकुर करत असते."
मालुताईंनी तोंड धुतलं व मेंदी धुतली. मेहंदी छान रंगली होती. अगदी त्यांना हवी तशी लालसर रंगाची..भगव्याच्या पल्याड नि मरुनच्या अल्याड अशी. तोंड पुसून झाल्यावर त्यांनी मेंदीचा सुगंध नसानसांत भरुन घेतला.
वसंतराव म्हणाले,"मजा आहे बॉ एका सासूची!"
इतक्यात प्रांजू सगळ्यांसाठी शिरा घेऊन आली. शिऱ्याच्या सुगंधाने मालुताईंची भूक प्रज्वलित झाली. मालुताई प्रांजलला म्हणाल्या,"कितीतरी वर्षांनी असा आराम केला गं मी. पुर्वी आईकडे गेले की असा आराम करायचे. आता तुला सुट्टी आहे म्हणून. एकदा तू कामावर जायला लागलीस की माझं नेहमीचं रुटीन सुरु होईल. कामाचा कंटाळा नाही गं मला पण पहिल्यासारखी कामं होत नाहीत माझ्याच्याने,मग वैतागते."
"अहो आई, आपण मदतीसाठी बाई ठेवुया की."
"नको गं बाई,मला मुळीच आवडत नैत बाईच्या हातची कामं. जरासं फडकं फिरवतात नि जातात. कोनाकोनातून केर काढला पाहिजे. त्यांना थोडीच जमणार!"
प्रांजलने मग तो विषय टाळला. असेच साताठ दिवस गेले. दोघी मिळून कामं करायच्या. प्रांजल प्रतिकला काही काम सांगू गेली तर मालुताई म्हणायच्या,"आमच्या घरात पुरुषमाणसं स्वैंपाकघरातली कामं करत नाहीत हो."
"अहो,पण आई स्वतः चं ताट स्वतः उचलणं,स्वतःसाठी ग्लासभर पाणी घेणं,स्वत:चे कपडे स्वतः घडी करुन ठेवणं यात चुकीचं काय?"
मालुताईंना रागच आला प्रांजलचा. रात्री वसंतरावांना म्हणाल्या,"जरा जास्तच बोलते हो प्रांजल. आता पासून एवढं तर पुढे काय? कधी नव्हे ते माझ्या प्रतिकने स्वतः च्या शर्टला स्वतः इस्त्री केली. पाकीट,रुमाल,चावी सगळं आपलं आपणच घेतलन. 'येतो आई' एवढंच फक्त बोलला. असंच चालू राहिलं तर प्रतिकला माझी गरजच रहाणार नाही. काही प्रतिसाद येईना म्हणून मालुताईंनी बाजूला पाहिलं तर वसंतराव मस्तपैकी तोंड उघडं टाकून घोरत होते. मालुताईंनी 'मी म्हणून टिकले' यांच्यासोबत म्हणत बाजुचा दिवा मालवला.
सकाळी त्यांच ओटीपोट जरा जास्तच दुखू लागलं. म्हणजे ते आधीही तसं दुखायचं पण मालुताईंनी लग्नाच्या गडबडीत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज मात्र त्यांना कळ सोसवेना. वसंतरावांनी प्रांजलला बोलवलं. प्रांजलने मालुताईंनाना कडक चहा करुन दिला. त्यांना जरा बरं वाटलं.
दुपारी दोघीजणी इस्पितळात गेल्या. डॉक्टरांनी लगेच टेस्ट केल्या.. म्हणाले लवकरात लवकर गर्भपिशवी काढावी लागेल. मालुताई घाबरल्या,रडू लागल्या. प्रांजल म्हणाली,"आई,आम्ही सगळे आहोत नं. मुळीच घाबरु नका तुम्ही. तासाभराचं तर असतं ऑपरेशन."
ऑपरेशन झाल्यावर सात दिवसानी मालुताईंना घरी आणलं. त्यांच्यासाठी प्रांजलने ढगळ गाऊन आणले होते,बारीक नक्षीचे. घरात वसंतरावांसमोर गाऊन घालायचा म्हणजे मालुताईंना कससच झालं पण शेवटी इलाज नव्हता. त्यांनी गाऊन घालायला सुरुवात केली.
मालुताईंनी पाहिलं,वसंतराव,प्रतिक व प्रांजलने घर छान सांभाळलं होतं. अगदी रद्दीही जागच्या जागी होती. प्रतिक प्रांजलला स्वैंपाकघरात मदत करत होता. वसंतराव बाजारहाट,भाजी निवडणे,कपड्यांची इस्त्री करणे,घडी करणे ही कामं अगदी आवडीने करत होते.
मालुताईला वाटलं..'उगाच म्हणत होते..मी आहे म्हणून टिकले. असं गोड बोलून या ठोंब्यांना आधीच कामाला.लावायला हवं होतं. सुनबाई हुशार हो माझी.'
-----सौ. गीता गजानन गरुड.