माझा जगावेगळा भाऊ-भाग 2

Beautiful bonding of brother and Sisters

माझा जगावेगळा भाऊ-भाग 2

आता आम्हाला नेहमीच झालं होतं,त्याला जास्तच फिट्स यायला लागल्या होत्या,त्यामूळे त्याला फिट्स आली की ,

आमची रवानगी दुस-या रूममध्ये करण्यात यायची. आठवीत दोन वेळा नापास झाल्यावर त्याला शाळेत जाण्याची इच्छा होत नव्हती,मग आईवडीलांनीही जास्त फोर्स केला नाही. असं सगळं चालू असताना आजोबांना लोक  सांगायचे बाहेरच काही असेल, ह्या देवलशाकडे जा ,त्या बाबाकडे जा ,ह्या देवस्थानांत जा ,जिथं सांगतील तिथं आजोबा त्याला घेऊन जायचे,कधी कधी तर एखाद्या रानावनातील माणसाकडे घेऊन गेलेले जिथे एक तास चालत जावे लागले होते,वयाच्या मानाने त्यांना जमत नव्हतं,पण नातवाच्या प्रेमापोटी त्यांच्यात बळ यायचं. 

या सगळ्या गोष्टीमुळे पैसा खूप खर्च व्हायचा,वडीलांचा या सगळ्या गोष्टीवर बिलकूल विश्वास नव्हता ,पण त्यांचे आई पुढे आणि आजोबा समोर काही चालायचे नाही . माझे आजोबा म्हणजे वडिलांचे मामा पण होते,मामाच्या मुलीशी लग्न केलं होतं आणि लहान पणा पासून मामाकडेच राहत होते कारण त्यांचे  वडील ते लहान असतानाच स्वर्गवासी झाले होते, त्यामूळे ते जास्त विरोध करत नव्हते. वडील आईला काही बोलले की ती लगेच भावनाविवश  होवून रडायला लागायची,मग वडीलांना शांत बसण्याशिवाय पर्याय नसायचा.

किती तरी लोकांनी किती तरी बाबा लोक आणले ,त्यांना किती तरी देणग्या ,किती तरी नवस ,धान्य काय ,ती लोक घरी आल्यावर जेवणाच्या पंगती काय हे सारखेच चालू होतं,पण पप्पू वर मात्र कशाचाही परिणाम होत नव्हता . शाळेत जात नसल्या मुळे चक्करच प्रमाण अधिक झालं होतं,डॉक्टर म्हणाले ,तो बिझी राहिला पाहिजे असं काही तरी करा.

मग काय आईवडिलांनी ठरवलं त्याला एखादा व्यवसाय काढून देऊ,वडीलांची इच्छा होती ,त्याने स्वत:च्या पायावर उभे राहून निदान स्वत: पुरतं काही तरी कमवावं ,वडीलांनी लगेच एक गाळा भाड्याने घेतला,गोळ्या बिस्किटांच दुकान सुरू केलं, कधी कधी आम्हांला पण जाव लागायचं ,कारण शक्यतो आम्ही त्याला एकटं सोडत नव्हतो. काही दिवसातच लक्षात आलं की,नफा काही होत नाही आणि बारिक लक्ष दिल्यानंतर लक्षात आलं,मूलं  चॉकलेट न्यायला आली की,त्याला पैसे द्यायचे आणि स्वत:च्या हाताने बरणीतली चॉकलेट काढून घ्यायचे की जे दिलेल्या पैशांच्या तुलनेत जास्त असायचे,आणि पप्पू शेठ मात्र उठायला न लागल्यामुळे खूष असायचे. हे सगळं तो एकटा असला की व्हायचं हे आमच्या लक्षात आलं . सारखं तिथं बसून राहणं शक्य नसायच्ं कारण आम्हाला आमची शाळा आणि आईवडिलांना त्यांची शाळा असायची,अरे बापरे तुम्ही असा विचार तर नाही केला ना की ते ह्या वयात शाळेत कसे जायचे,ते शाळेत जायचे म्हणजे ते शिक्षक होते ना म्हणून.

मग दुसरा व्यवसाय करायचं ठरवलं,पुण्याला जाऊन वडिलांनी झुंबर,लटकन,तोरणे बनवायच्ं सामान आणलं,आता बनवणार कोण ,अर्थात आम्ही , मग काय आम्ही आमची कल्पना शक्ती वापरुन बनवली ,दुकानात लागली ,पण भाड्याच्या प्रमाणात त्याचा काही खप होईना ,मग त्याला जोडधंदा काहीतरी,राखी पौर्णिमा जवळ आलेली ,वडीलांनी राख्या आणल्या , त्यांनी पण एवढ्या आणल्या की ,त्या संपल्याच नाही आणि नफ्याचे पैसे मालातच अडकून पडले,तितक्यात गणपती येणार होते ,गणपतीच्ं नाव घेऊन सजावटीच सामान आणण्यात आले,

आम्ही ही लक्ष घालायचो ,पण परत तेच सामान बरचस शिल्लक राहिले, मग दिवाळी आली ,फटाके आणले ,त्यातले बरेचसे तर त्याला आवडतात ,म्हणून सकाळी सकाळी लवकर ऊठून वाजवायचा आणि ते पण सगळे बॉम्ब. या गोष्टीचं इतकं आश्चर्य वाटायचं की,याला याची का नाही भिती वाटत,आमच्या घरजवळ जुना हापसा होता,त्याला आता काही पाणी नव्हते ,त्यात ठेवून वाजवायचा ,आम्ही मात्र लवंगी, फुलबाजा,

भुईचक्र,पाऊस यात खुश असायचो. दिवाळीतही खुप सारे फटाके उरले ,मग काय आम्हाला एकच काम,उरलेल्या वस्तूंची छान पैकिंग करायची आणि माळ्यावर ठेवायच्या. माझा आतेभावाला पंक्चर काढता यायची सायकलची,आम्ही लहान असताना सायकलचा जमाना होता ,भाड्याने सायकल मिळायच्या , तो वडिलांना म्हणाला आपण सायकलचा दोघां मिळून व्यवसाय सुरू करू.वडील बिचारे या आशेवर की ,काही तरी करु दे ह्याने . मग काय सहा लहान सायकली आणि सहा मोठ्या सायकली आल्या ,भाऊच काम होतं किती वाजता सायकल नेली आणि परत किती वाजता आणून दिली ते चेक करायचं आणि पैसे घ्यायचे आणि तो दादा पंक्चर काढून त्याला त्याचे पैसे,तिथेही पोरं त्याला म्हणायची ,अरे आम्ही सायकल एकच तास वापरली,हा ही काही न बोलता एक तासाचे पैसे घ्यायचा. दिवसेंदिवस सायकली खराब झाल्या त्यांच्या दूरुस्तीचा खर्च वाढला तसं तेही बंद करून टाकलं,भाड्याचे दुकान बंद केले आणि सर्व सामान माळ्यावर सायकली कमी किमतीत विकून टाकल्या. त्याच्या पुढच्या वर्षी, आम्ही म्हणजे मी आणि वडीलांनी मिळून रस्त्यावर दुकान लावून विकून टाकलं,त्याने स्वत: काही नाही केलं पण आम्हास मात्र व्यवसाय करायला शिकवलं,कधी वेळ आली तर व्यवसाय करायची लाज वाटणार नाही ,राख्या विकण्यासाठी जेव्हा रस्त्यावर दुकान मांडले,तेव्हा मला असं रस्त्यावर बसायची लाज वाटत होती ,कारण माझी मित्र मैत्रिणी तिथेच आजू बाजूला राहायचे . वडील मला म्हणाले ,कोणतही कष्टाचे काम करण्याची माणसाची तयारी असावी आणि तुम्ही मेहनतीने पैसा कमवता ही अभिमानाची बाब आहे ,त्यात लाज वाटण्या सारखं काही नाही. त्यानंतर मला कधीही काही वाटले नाही,जेव्हा माझ्या मैत्रिणीचे आईवडील त्यांना माझं उदाहरण द्यायचे ,मला खूप छान वाटायच .

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all