
माझा जगावेगळा भाऊ-भाग 1
प्रत्येकाला आपला भाऊ हा जगावेगळाच वाटतो ,पण पूर्ण कथा वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की ,मी असे शीर्षक का दिलंं, सगळ्यांना मूल होतात,तशी माझ्या आईवडिलांना आम्ही तीन मूलं ,मोठा भाऊ ,दोन नंबर मी आणि छोटी बहीण,आईवडील दोघेही शिक्षक,त्यामूळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची जास्त चण चण नव्हती.भाऊ चौथीला असेपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं ,अभ्यासातही तो खुप हुशार होता,पण कुणाचं आयुष्य इतकं जर सरळ सोपं असतं का ,म्हणूनच की काय एक दिवस त्याला खूप ताप आला आणि त्याच्या डोक्यात ताप गेल्याने त्याला फिट्स सुरु झाल्या. मग काय आईवडिलांनी त्याला पुण्याला नामांकीत हॉस्पिटल मध्ये भरती केले,तिथल्या उपचारानंतर त्याच्या पाठी गोळ्यांचा ससेमिरा जो चालू झाला तो अजुनही चालू आहे.
जस जसे पुढच्या इयत्तेत जायला लागला तसा तसा तो गोळ्यांच्या साईड इफेक्ट मुळे मागं पडत गेला.तो आणि मी एकाच शाळेत होतो, एकदा खेळाच्या तासाला त्याला फिट आली ,त्या सरांना समजेच ना काय करावे ,तितक्यात त्याचा एक मित्र म्हणाला,त्याची बहीण आपल्याच शाळेत आहे ,त्याने माझं नाव सांगितलं आणि म्हणाला,सर मी तिला बोलवू का,सर हो म्हणाले. तो माझ्या वर्गात आला ,ज्या सरांचे क्लास चालू होता त्यांना त्याने सांगितले, सरांनी आत येऊन मला सांगितले ,तू ह्याच्या बरोबर जा ,तुझ्या भावाला काही तरी झाले आहे, ते ऐकून माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले,त्या तंद्रीतच मी वर्गाच्या बाहेर पडले.तो म्हणाला ,पटकन चल,पप्पू कसा तरी करतोय ,त्याच्या तोंडातून फेस येतोय आणि एक पाय आणि हात उडतोय,त्याचं बोलणं ऐकताच मला कळलं की त्याला फिट आलीय ,धावतच आम्ही ग्राउंडवर पोहोचलो.
सगळ्या मुलांनी त्याच्या भोवती गराडा घातला होता ,काय होतंय हे पाहण्यासाठी .
तिथे पोहचल्यावर मी सरांना सांगितल, पहिलं या सर्वांना बाजुला करा ,त्याला हवा लागली पाहिजे.सरांनी मुलांना बाजुला व्हायला सांगितले ,त्याच्या मित्राला वहीने हवा घालायला सांगितली. कुणाकडे कांदा आहे का विचारलं,कुणाकडे नव्हता . त्याच्या तोंडात बोटे घालून पाहिलं तर दातखिळी बसली होती मग चप्पल काढून त्याच्या नाकाला लावली,दोन तीन वेळा शेवटी त्याची दातखिळी निघाली. हातपाय हलवण्ं बंद झाल, त्याला अशी फिट येऊन गेल्यावर त्याचं अंग खूप दुखत असे ,घरी असल्यावर तर तो आईला सारखा म्हणायचा ,माझं खूप अंग दुखतंय आणि रडायचा ,त्यावर ठरलेलं असायचं, आमच्या घरजवळचं आमचे फैमिली डॉक्टरांचा दवाखाना होता तिथं जाऊन त्याला पेन किलरच इंजेक्शन दिलं की त्याला झोप यायची आणि मग तरीही एखादं दिवस तरी घरातलं वातावरण वेगळं असायचं,हे सगळं आठवलं आणि सरांना सांगितलं ह्याला घरी घेऊन जाते.
शाळेजवळ्च घर असल्याने त्याच्या मित्राच्या मदतीने घरी आणलं आणि त्याला झोपवलं, मी त्याच्या मित्राला सांगितल माझं दप्तर माझ्या मैत्रिणीकडे पाठवून दे. ही शाळेत फिट येण्याची पहीलीच वेळ होती ,तेव्हापासून मी माझ्या दप्तरात नेहमी एक कांदा ठेवायची आणि सगळे शिक्षक मला पप्पूची बहीण म्हणून ओळखू लागले. आमच्या फैमिली डॉक्टरांनी भाऊला विचारले ,की तू काय करत होतास तेव्हा त्याने सांगितल,की उन्हात कवायती करत होतो, डॉक्टरांनी सांगितले की ,त्याला शक्यतो उन्हात फिजिकल एक्सरसाइज नका करू देऊ.
दुस-या दिवशी भावाच्या सरांनी मला बोलवून घेतलं,मग मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली ,डॉक्टरांनी जे सांगितल,तेही त्यांना सांगितल ,परत तसं काही झालं तर मला बोलवत जा.
जसे जसे दिवस जात होते तसं त्याचं फिट्सच प्रमाण वाढत गेले, मुंबईला जाऊन ही उपचार केले ,परदेशातून आलेल्या फेमस डॉक्टरांकडून उपचार केले ,पण यश काही आले नाही .
मात्र चालू असणा-या औषधांमुळे त्याच्या शिक्षणावर मात्र परिणाम झाला.त्याला डॉक्टरांनी पाण्यापासून लांब ठेवायला सांगितले होते,माझी मावशी दुस-या गावी राहायची , तिला भेटायला हा बहाद्दर पायीच निघाला आणि तेही घरी न सांगता,दिवसरात्र त्याला सगळे शोधत होते,त्यात पाटाला पाणी सोडले होते ,त्यामुळे सगळे इतके टेन्शन मध्ये आलेले,त्या गावाला जाताना मध्ये एक गाव लागते ,तिथल्या लोकांनी त्याला पाहिल्याचे सांगितलं,तो रात्रीचा सुध्दा कुठेही न थांबता सकाळी मावशीकडे पोहोचला. मावशीला एकट्याला पाहुन वेगळे वाटलं,म्हणून तिने घरी फोन करून सांगितलं की पप्पू इकडे आलाय,तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला नाहीतर सगळ्यांची पाचावर धारण बसली होती.
तो आजी आजोबांच पहिल नातवंड असल्याने सगळ्यां पेक्षा जरा त्याच्यावर त्यांचा जास्तच जीव होता. आजोळ घरापासून फक्त पाच मिनीटावर होतं,त्यामूळे तो जरा जास्तच लाडावलेला होता. त्याला फिट्स आली की,त्याचा त्याच्यावर कंट्रोल नसायचा ,त्यात त्याच्यात इतकी ताकत यायची की तो एकट्या माणसाला कधी आवरायचा नाही. मला चांगलं आठवतंय एकदा मी आणि माझी मैत्रिण घरात होतो,अचानक त्याला चक्कर आली,चक्कर आली की तो हातावर हात चोळायचा आणि त्यात कुठेही जायचा ,त्याच्याकडे पाहून मला जाणवलं,तो घराबाहेर पडला आणि रस्त्यावर गेला ,तसं मी त्याच्या पाठिमागे गेली. आमच्या घराच्या पाठिमागे शाळा होती आणि त्या शाळेला तारेच कुंपण होतं,ह्या सरळ सरळ चालत तिकडे निघाला,दोन मिनीट मला काही सुचलच्ं नाही, नंतर प्रसंगावधान दाखवून मी पटकन आमच्या घरात भाड्याने राहणा-या मामांना बोलवून आणले ,कसबसं पकडून आम्ही त्याला पाठी खेचले आणि घरी घेऊन आलो,त्याच्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे तो मला त्याच्या धुंदीत शिव्या देत होता,या गोष्टीची आम्हालाही सवय झाली होती. माझी मैत्रीण मात्र घाबरली होती ,त्यानंतर ती नेहमी मला बोलवायची ,ती माझ्याकडे येणं टाळायची हे माझ्या लक्षात आलं होतं,पण मी तिच्या कडे दुर्लक्ष केलं.
लहान असताना मामा त्याच्या बरोबर जेवताना स्पर्धा लावायचा,त्यामूळे त्याला जास्त खायची सवय लागली आणि त्यामूळे वजनही वाढलं होतं आणि शारीरिक कष्टाचे काम सांगितल की चक्कर यायची ,त्यामूळे कुणी त्याला काम सांगत नव्हते,मस्त राजासारखं जीवन जगायचा,फक्त मामाला घाबरायचा , अभ्यासात कमी मार्क मिळाले तरी कधी कुणी त्याला बोलायचं नाही,काय तर म्हणे त्याला मेंदूवर ताण पडता कामा नये,मला मात्र कधी कधी हेवा वाटायचा,किती छान आयुष्य आहे याचे ,पण फिट्स आल्यावर त्याचा त्रास पाहून मन हेलावून जायचे ,मग देवाला विचारायची माझा भाऊ सगळ्यांच्या भावासारखा का नाही.
माझी आजी माझी खूप छान मैत्रीणही होती ,तिला कळायचं माझ्या मनातले विचार,ती म्हणायची प्रत्येकात काही तरी स्पेशल असते ,आपण त्या गोष्टीकडे पाहायचं, मग मी त्याला नव्याने पाहू लागली ,त्याला माणसांची खूप आवड ,सगळ्यांची आवर्जून विचारपूस करणार ,कुणी घरी आलं की चहा पिऊन जा असं म्हणणं, कुणी नातेवाईक आले की ,त्यांची माहिती घेणार आणि ते परत आल्यावर ती माहिती सांगणे ,त्याला काही खायला दिलं की पहिलं सगळ्यांना दिलं की विचारणार आणि मग स्वत: खाणार.
असेच एकदा त्याला फिट्स आलेली त्यात वडील त्याला कुठे जाऊ देत नव्हते ,म्हणून त्याने लोखंडाचा खलबत्ता मारायला उचलत होता ,ते बघून तर काळजात धस्स झालं होतं,त्यानंतर वडिलही मनातून पूर्ण खचले होते,पण जेव्हा आईने त्याला सांगितले ,तेव्हा तो म्हणाला,मला काही कळतच नाही मी काय करतोय ते , मला बरं व्हायचं आहे. मग आजोबांनी जेव्हा वडिलांना सांगितलं की,तो जाणून बुजून नाही करत,आपण घरातले असून जर त्याला समजून नाही घेतले तर बाहेरचे लोक कसे वागतील.
बाहेरच्या लोकांशी तो प्रेमाने वागायचा,पण आमच्या वाडीत काही टारगट पोरांचा ग्रुप होता,ते नेहमी त्याला मागून पप्पू, पप्पू बोलायचे ,ह्याला जो राग आला त्यांच्या मागे दगड घेऊन लागला,त्या पोरांनी पळतच आप आपली घरे गाठली.
नंतर त्यांच्या आईवडीलांना घेऊन आमच्या घरी आले आणि म्हणाले ,तुमच्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे,त्याला मेन्टल हॉस्पिटलला टाका. वडिलांनी भावाला बोलवले,त्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे की ,तो कधी खोटं बोलत नाही . त्याला विचारलं काय झालेलं,त्याने सगळं सांगितल्यावर वडील त्या मुलांना म्हणाले,सांगा आता कुणाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे,त्या मुलांनी मान खाली घातली.
वडील त्यांना म्हणाले ,तुम्ही त्याच्याशी प्रेमानं वागलात तर तुम्हाला प्रेमच मिळेल, तुम्ही अशी त्याची खिल्ली उडवली तर तो चिडेल हे माहित असूनही तुम्ही तसेच वागता ,याचा अर्थ प्रोब्लेम कुणात आहे ,तुमच्यात की त्याच्यात.
नंतर परत कधीही त्यांनी त्याची खोडी काढली नाही ,उलट ज्या ज्या वेळी मदत करता आली तशी केली.
क्रमशः
रुपाली थोरात