Jan 19, 2022
नारीवादी

सासूसुनेचं मेतकूट

Read Later
सासूसुनेचं मेतकूट

सासूसुनेचं मेतकूट

आमच्या निशांतच लग्न ठरलं. स्थळ त्याच्या आत्यानेच आणलं. आत्याच्या सासरकडची मंडळी आहेत.मुळ गाव भुसावळ. ठाण्यात बंगला आहे, वडिलोपार्जित. वडील उपजिल्हाधिकारी आहेत तिचे. आजोबाही मुख्याध्यापक होते. एकुणच सुशिक्षित घराणं दिसतय. आई ठाण्याच्या म्युन्सिपालटीत कामाला आहे. तीही हेडक्लर्क आहे.

निधी नाव मुलीचं. निधी श्रीकांत रोखे. आत्याच्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेय म्हणे. निशांतच्या आत्याचा निशांतवर फार जीव. एकवेळ आम्ही चुकू त्याच्यासाठी मुलगी बघण्यात पण ती नाही चुकणार. सुट्टीत आत्याच्या सासरी,भुसावळला जाऊन रहायचा तो आत्यासोबत. आत्याचे मिस्टरही फार लाड करतात त्याचे. आत्याची मुलगी, सखी तर दिवसातून एकतरी फोन करतेच त्याला.

माझा मुलगा,निशांत वयवर्षे अठ्ठावीस. बीकॉम झाल्यावर एमबीए केलं त्याने पण नोकरी काही मिळाली नाही. दोन वर्ष घरीच होता. आजुबाजूची लोकं विचारायची,"काय मग निशांत काय चाललय..नोकरी की पुढचं शिक्षण! हा कानकोंडा व्हायचा. तोंड पाडून रहायचा. मला म्हणायचा,"डोक्यात जातात गं आई ही लोकं." मग मग तर दाराची बेल वाजली की टिव्हीवर आवडीची मँच पहात असला तरी टिव्ही बंद करुन थेट आतल्या खोलीत पळायचा. 

मला सांगायचा,"माझ्याबद्दल कोणी विचारलं तर बाहेर गेलाय म्हणून सांग." मी देवाजवळ एकच प्रार्थना करायचे,"माझ्या लेकाच्या तोंडावर मला हसू दिसुदे बास. बाकी काही नको मला." हल्लीची मुलं देव मानत नाहीत वगैरे म्हणतात पण खरं सांगू,ती ना एक फेज असते त्यांच्या आयुष्यातली. स्पर्धा इतकी वाढलेय..सहजासहजी जॉब मिळत नाही,मनासारखे गुण मिळत नाहीत, अपयश..यांसारखी अनेक कारणं असतात ओ त्यामुळे या मुलांचा देवावरचा विश्वास उडतो पण तात्पुरती अवस्था(टेम्पररी फेज) असते ही. आपल्या आवडत्या माणसावरच आपण रुसतो ना. हेही तसंच. थोडे मोठे झाले की येतात लायनीवर. मनातली श्रद्धा कुठे जात नाही. शेवटी संस्कार असतात हो आपले. तेच जिंकतात.

निशुला जॉब लागला हे मला त्याने फोनवर सांगितलं तेव्हा मी देवाला आधी साखर ठेवली व नमस्कार केला. माझ्या भावना देवाला शब्दांतून सांगण्याची गरज मला लागली नाही. तो तर सगळच जाणतो. निशुच्या वडिलांनी येताना त्याच्यासाठी कंदीपेढे आणले. हो तेच आवडीचे त्याच्या. अगदी पाव किलो कंदीपेढे एकटा खाईल बसल्या जागेवर. 

निशांत घरी आल्यावर मी त्याला देवासमोर पेढे ठेवून नमस्कार करायला लावलं. किती दिवसांनी पेढे आले होते आमच्या घरात! म्हणजे तसे पेढे काय हो कायम भेटतातच दुकानात पण एखाद्या शुभ घटनेच्या पेढ्यांची चव काही आगळीच. 

निशांतने मला व त्याच्या बाबांना पेढे दिले व साताठ पेढे आपण खायला घेऊन बसला. मी म्हंटलं,"सोसायटीत वाटून ये रे." तर म्हणाला,"काही नको. जाम पकवलय या लोकांनी दोन वर्ष. मी खाईन निवांत सगळे." 

मी म्हंटलं,"असं बोलू नये रे राजा. तूझ्यावरच्या मायेपोटीच विचारतात ते." तर म्हणाला,"हो तर ही माया,प्रेम रिझल्टच्यावेळीच उतू जाते. नसत्या चौकश्या करतात." 

मग त्याचे मित्र आले आणि गेले सिनेमा बघायला. कसले इंग्लिश सिनेमे बघतात. असो. तर बघा विषय काय होता ते राहूनच गेलं. मी आता सासू होणार म्हणजे प्रमोशन होणार ओ माझं. आयुष्यात कधी नोकरी केली नाही त्याकारणाने नोकरीतलं प्रमोशन/बढती काही वाट्याला आली नाही माझ्या. निशांतच्या बाबांची बढती झाली की मी माझ्या गाऊनची नसलेली कॉलर टाईट करायचे. या सगळ्यांच्या सुखातच आनंद मानत आले. 

अगदी गुडी गुडी अशी नाही ओ मी, त्या सिरीयलमधल्या आयांसारखी. मलाही राग येतो. चिडचिड होते. हल्ली तर मेनोपॉज क काय म्हणतात त्या काळात जरा जास्तच होते. म्हणजे नुकती सुरुवात आहे. हा मेनोपॉज म्हणे पाच ते दहा वर्ष असतो एका स्त्रीच्या आयुष्यात. मुड स्वींग्स, घाम येणं,पोट साफ न होणं..असे बरेच प्रकार होतात म्हणे या कालावधीत. स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवलं की जास्त त्रास होत नाही म्हणे. सगळी माहिती मिळते आजकाल गुगलवर. सतर्क रहाता येतं त्याने.

मला धास्ती आहे ती निधीच्या आगमनाची. आधी चिंता असायची निशू पास कधी होणार..मग निशूची मुलाखत चांगली जाईल ना याची हुरहूर.. निशूला चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल का याची हुरहूर..निशूला सुविद्य,सुशील पत्नी मिळेल का याची हुरहूर. बघा या हुरहुरी काय पिच्छा सोडत नाही माझा.  चार दिवसांपुर्वी आम्ही  निधीचं घर बघून आलो. 

तिचे वडील उपजिल्हाधिकारी असल्याकारणाने बंगलाही तसा प्रशस्त आहे. दुमजली बंगला आहे. मागच्या बाजूचं,पुढच्या बाजुचं अंगण,दारात दिमतीला दोन गाड्या,ड्रायव्हर. दिवाणखाना तर बघतच रहावं असा सजवलाय. पोळीभाजीला बाई,कपडेभांड्याला बाई..सगळं अगदी अपटुडेट. 

त्यातुलनेत आमच्याकडे पहायचं झालं तर हा आमचा टुबीएचके, पै पै जमवून घेतलेला. अजुनही कर्ज फेडतोय घराचं.  सगळंच काम मी एकहाती करत आले आत्तापर्यंत. नोकरचाकरांची तशी गरज वाटली नाही कधी.  निधीला जमेल का असं रहायला? 

दुसरं म्हणजे त्यांच किचन अगदी लख्ख तर मी  जमेल तशी भांडी घासते. अगदी घासूनघासून त्या भांड्यांचा नि ओघाने हाताचाही जीव काढणं माझ्याच्याने होत नाही. निधीला आवडेल का माझं असं थोडसं पसरलेलं किचन?

 मी अगदी साधीसुधी..निधीच्या मम्मीसारखी भारी ड्रेसेस वगैरे घालत नाही. साधे कॉटनचे ड्रेस तेही वर्षाला दोन ते चार त्याच्यापुढे नाही. माझा वॉर्डरोब तो कसला. हा माझा वॉर्डरोब बघून निधी काय म्हणेल? अशा बऱ्याच प्रश्नांची गर्दी झालेय मनात. 

उद्या निधी आमच्याकडे यायची आहे. मी तिला वॉट्सअपवर मेसेज पाठवलाय त्यात ह्या वर लिहिलेल्या सगळ्या शंका विचारल्यात. कायकी मला मनात काही ठेवायला नाही आवडत आणि नात्यात आधीच शंकाकुशंका असल्या तर ते नातं तरी कसलं!

काल मी निधीला वॉट्सएपवर मेसेज केला खरा पण छातीत उगाच धडधडायला लागलं. म्हंटलं,माझं असं बोलणं तिला आवडलं नाही तर? ती मला समजून घेईल का? रात्री बराच वेळ याच विचारांत जागी होते. हे मस्त घोरत होते. यांना कसलं टेशन नसतं. सगळी टेंशनं मेली माझ्याच डोक्यावर. 

सकाळी हे कुठे मित्राकडे गेले आणि निशांतला ऑफिसमधे अतिरिक्त(एक्स्ट्रा) काम होतं तो लंचला येतो म्हणून सांगून पळाला. मी तरी म्हंटलं दोघांना की निधी यायची आहे तर दोघंही तुम्ही गप्पा मारा सांगून पसार. मी माझं घर घेतलं आवरायला. केर काढू लागले..इतक्यात दाराची बेल वाजली. 

आताच तर दूधवाला येऊन गेला. हां, वॉचमन जिना धूत असावा. त्याला बादलीभर पाणी द्यावं लागतं म्हणून मी दार उघडत 'लाती हूँ' म्हणणार इतक्यात दारात निधी हजर. व्हायोलेट टॉप व व्हाईट थ्रीफोर्थ,खांद्यावर रुळणारे कुरळे केस कोण बरं ती कप साँग म्हणते ती हां मिथिला पालकर अगदी तिच्यासारखी. तसेच बोलके डोळे,गालावरची खळी,दाट कुरळे केस आणि चेहऱ्यावर सुंदर स्माईल. 
मावशी,असं बघतच रहाणार मला! आत घे की. या तिच्या वाक्यावर मी भानावर आले. 

"अगं निधी ते सगळा पसाराय बघ. आताच निशू गेला कामावर. केर काढायला घेतलेला इतक्यात आलीस. तू बस हं मी पाणी आणते तुझ्यासाठी नि फटाफट आवरून घेते मग बोलू निवांत."

"निधीने माझ्या हातातला झाडू घेतला. मला म्हणाली,"तू ओटा बघ. मी केर काढते. पटापट आवरू. अहोजाहो करु का गं तुला? "

"नको गं बाळा,अगंतुगंच बरं वाटतं बघ. त्या अहोजाहोत जरा परकेपणाच जाणवतो."

मी निधीला पाणी आणून दिलं. ओटा,भांडी आवरली. तोवर निधीने केर काढला. झाडांना पाणी घातलं. लादी पुसत होती. मी म्हंटल,"अगं कालच पुसलेय. इतकी काय धूळ येत नाही राहुदे."

मग आम्ही स्वैंपाकाकडे मोर्चा वळवला. मेथीची जुडी नीट करता करता या गोड पोरीने माझ्या मनातील शंकाही दूर केल्या. मला म्हणाली,मावशी तुझ्या भिडस्त स्वभावाची कल्पना मला निशूने व आत्याने दिली आहे.

 आय मिन मीच त्यांच्याकडून तुम्हा दोघांचे स्वभाव जाणून घेतले. आम्ही मेनेजमेंटची मुलं एखाद्या प्रोजेक्टची पुर्वतयारी करतो मग लग्न ही तर माझ्या आयुष्यातली किती मोठी गोष्ट आहे,किती सुरेख वळण आहे हे आयुष्याच्या टप्प्यावरचं!

सपोज आताप्रयत्न मी एका कारमधून प्रवास करत आले आहे,ते माझं माहेर. या टप्प्यावर मात्र मी गाडी चेंज करणार व तुमच्या गाडीत येणार जे माझं सासर असेल. नवीन गाडीतल्या माणसांनी मला सामावून घेतलं पाहिजे ही माझी अपेक्षा असणं चूक नाहीच ना. 

सपोज मी पुढच्या सीटवर ड्रायव्हरशेजारी आणि ड्रायव्हर कोण तर निशू. मी निशूशी गोड बोलले की लगेच तुझा निशू काही ताटाखालचं मांजर,बुगुबुगुवाला बैल होणार नाही. ती शंका तुझ्या मनात असेल तर ती काढून टाक. दुसरं म्हणजे गाडीतल्या मागच्या सीटवरचे प्रवासी म्हणजे तुम्ही दोघंही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे असणार. मी तुमच्याशीही सुसंवाद साधणार.

 जर माझं काय चुकत असेल तर नक्की माझा कान पिरगाळ पण काही सासवा पुढं गोड बोलतात व पाठीमागून शेजाऱ्यांत किंवा इतर नातेवाईकांत सुनेची निंदानालस्ती करतात मग सासूसूनेत विश्वासाला तडा जातो. माझी खात्री आहे तू तसं करणार नाहीस. 

मी माझ्या आधीच्या गाडीतील माणसांशी तुमची तुलना करणार नाही विशेष करुन माझ्या मम्मीशी तुझी तुलना करणार नाही. मम्मी मम्मीच्या जागी व तू तुझ्या जागी. माझ्यासाठी तुम्ही दोघीही प्रेशिअस आहात. 

मावशी,तुला वाटत असेल की पहिल्याच भेटीत किती बोलते ही मुलगी पण मला आधीच असे डाऊट्स क्लीअर करायला आवडतात.

आता आम्ही भाजी नीट करुन किचनमधे गेलो होतो. मी भाजी स्वच्छ धुतली व निधीने ती चिरायला घेतली. मी तिचं म्हणणं ऐकत होते. झऱ्यातून निर्मळ पाणी झरझर वहावं तसा तिचा आवाज व तेवढंच परिणामकारक बोलणं.

 निधी म्हणाली, मावशी,मी आपल्या या घराची माझ्या माहेराच्या घराशी तुलना करणार नाही. ते घर किती मोठ्ठं असा टेंभा मिरवणार नाही कारण घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसतात तर त्याहीपलिकडे जाऊन त्यातील माणसांचा सहवास,त्यांना एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी असं बरंच काही असतं. हे ठाऊक आहे मला.

 तुझं स्वैंपाकघर,त्यातील तुझी भांडीकुंडी ही जशीच्या तशी रहातील. मी तुझ्या भातुकलीत माझी मॉडर्न चुलबोळकी समाविष्ट करेन एवढंच. 
तुलाही काही प्रेमळ सूचना,तुला माझं एखादं वागणं आवडलं नाही तर त्याबद्दल तू मलाच विचारायचं.

 माझ्या त्या गाडीतील लोकांनी म्हणजे माहेरकडच्यांनी मला हेच शिकवलं का वगैरे तू म्हणायचं नाहीस. नातूच हवा किंवा लवकरात लवकर हवा असा वेडा हट्ट करायचा नाही. 
आपल्या दोघांतले गैरसमज व भांडणं आपण वेळोवेळी क्लीअर करत जाऊ म्हणजे नात्याच्या प्रवाहात गाळ
 साचून रहाणार नाही. 

तू गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेस हे कळलं मला आत्याकडून. मावशी,तू तुझा रियाज परत चालू कर. मला आवडेल तुझी गाणी ऐकायला आणि तुलाही बरं वाटेल बघ. 

माझ्या मम्मीला भरतकामाचा छंद आहे. मी दाखवेन तुला तिने पडद्यावर चितारलेला मोर,राधाक्रुष्ण.

माझ्या आरोग्याइतकीच तुमच्या आरोग्याचीही मी काळजी घेईन. त्यासाठी तुला रोज माझ्यासोबत व्यायाम करावाच लागेल. एव्हाना मी भाजीला फोडणी घातली व निधीने भाकरीचं पीठ मळलं. मी भाकऱ्या थापल्या व भाजून काढल्या. थोडा वरणभाताचा कुकर लावला.

 एका बाजूला निधीने कॉफी बनवायला घेतली. आम्ही दोघी टेरेसमधील झोपाळ्यावर बसून कॉफी पिऊ लागलो. कॉफीचे सिप घेताघेता माझ्या लक्षात आलं की ह्या मुलीने  किती सुंदररित्या मला समजावलं. काही सूचनाही गोड शब्दांत माझ्या गळी उतरवल्या. आता मला त्या मेनोपॉजचीही भीती नाही. मला निधीच्या रुपात एक गोड मैत्रीण मिळालेय. ती काळजी घेईल माझी. 

खरंच आपण टिव्हीवरील सिरीयलमध्ये बघतो तितकी आजची नवी पिढी वाया गेलेली नाही. त्यांची अशी खास मतं आहेत आणि जुन्याजाणत्यांनी आपलच मत पुढे न रेटता नवव्याजुन्याची सांगड घालायला हवी. निधीच्या हातावर मी माझा हात ठेवला. तिनेही तिचा दुसरा हात माझ्या हातावर ठेवला. एका सुंदर,निर्मळ नात्याचा आम्ही दोघी प्रारंभ करणार होतो.

निधीच्या काय मनात आलं,ती हॉलमधे आली. तिने म्युझिक लावलं  व नाचू लागली. आमच्या घरातल्या भिंतीही खूष झाल्या या नव्या सुनेच्या चाहुलीने. 

इतक्यात दारावर बेल वाजली. हे आले, मग यांच्याशीही तिने मनमोकळ्या गप्पा केल्या. अर्थात मला न डावलता. मलाही गप्पांत सहभागी केलं. 

थोड्या वेळाने निशू आला.  तो माझ्या डोळ्यांत पहात होता. बऱ्याच गोष्टी त्याला माझ्या डोळ्यांतून कळतात म्हणे. आताही तसंच कळलं त्याला की मला निधी आवडली आहे व माझं नि निधीचं मेतकूट जमलं आहे.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now