संगीतमय जीवन

How I Enjoyed My Musical Journey
उगाचच काहीतरी
हवेत छान गारवा आहे, डोळ्यात खूप झोप आहे.. आणि अशा वेळेस कानावर पडायचे ,*सुप्रभात सकाळचे सहा वाजले आहेत, आकाशवाणीच्या या या केंद्रावर आपले स्वागत आहे, आता ऐकूया बातम्या*.. मग त्यांच्या कार्यक्रमानुसार आमचा दिवस सुरु होई.. म्हणजे या बातम्या संपेपर्यंत ब्रश, दुसर्‍या बातम्या संपेपर्यंत अंघोळ, गाणी सुरू होऊनही आम्ही जर घरात असू तर याचा अर्थ भरपूर उशीर झाला आहे.. शिक्षेची मानसिक तयारी करून शाळेत जायचे.. पहिले ते पाचवी सकाळची शाळा असल्याने दिनक्रमात काही बदल नाही.. आणि तेव्हा वेळसुद्धा अशीच कळायची..त्यानंतर दुपारची शाळा सुरू झाल्यानंतर ओळख झाली *प्रपंच* या श्रुतिकेची... आणि त्यानंतर लागणाऱ्या मराठी भक्तीगीतांची...आशा भोसले यांनी गायलेले *कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावियले वेडे* , बाबूजींची सगळीच गाणी त्यातही *माना मानव वा परमेश्वर मी स्वामी सकलांचा* भीमसेनजींचेही सगळेच अभंग चालूच असायचे.. त्यानंतर लागायची नवीन हिंदी गीते.. आणि बरोबर दहा वाजता ती गाणी संपली कि आईचा सकाळी सहा वाजता सुरू झालेला रेडिओ बंद व्हायचा.. आणि त्या गाण्यांच्या ठेक्यावर सुरू असलेला माझा गणिताचा अभ्यास.. पदवी मिळेपर्यंत मी गाणी ऐकत गणिते सोडवली आहेत.. आणि त्यानंतर वाचन... ( जाता जाता सांगायला हरकत नाही कि हिच सवय माझ्या मुलीला मी न लावता लागली आहे.. फरक फक्त एवढाच कि मी मराठी , हिंदी गाणी ऐकायचे, ती हिंदी, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन या सर्व भाषांतील ऐकते) असो.. त्या काळात टिव्हीचे वेड जास्त नव्हते तरिही केबलवर नवीन गाणी लागायची... त्यातही मंगळवारी *अष्टविनायका तुझा महिमा कसा* हे तर पाहिजेच.. आणि माझे हे गाणे चुकू नये म्हणून माझा मानलेला भाऊ चार जिने उतरून पळत सांगायला यायचा. बरोबर साडेबारा वाजता परत मराठी गाण्यांचा कार्यक्रम रेडिओवर सुरू व्हायचा...संध्याकाळ झाली कि बिल्डिंग मध्ये जोरजोरात गाण्यांची स्पर्धा सुरू होई.. अनेकजण वाटत नसले तरी संगीतातले जाणकार असत आणि बरीच दुर्मीळ न ऐकलेली गाणी तिथे ऐकायला मिळत.. बर्‍याचदा रात्री सगळे शांत झाले कि आम्ही दुकानात जायचो.. तिथे वडिलांचा रेडिओ चालू असायचा..( जो अजूनही सतत सुरू असतो) रस्त्यावर , आजूबाजूला पूर्ण शांतता आणि हळू आवाजात येणारे लता, रफी , मुकेश अशा अनेक जणांचे स्वर्गीय स्वर..लग्ना आधीचे बरेचसे आयुष्य सुंदर सुंदर गाणी ऐकण्यातच गेले.. त्यातही सगळ्यात आवडता गायक होता किशोर कुमार आणि त्याचे दर्दभरे गीत.माझ्याकडे त्याची एक कॅसेट होती किती तरी वेळा *जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मुकाम* ,*मेरा जीवन कोरा कागज कोरा हि रह गया*, *दिल ऐसा किसी ने मेरा तोडा अमानुष बना कर छोडा* हि गाणी परत परत ऐकली आहेत. . *सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या* आणि *सख्या रे घायाळ मी हरिणी* ह्या बद्दल तर काही बोलायचेच नाही.. हम आपके है कौन ची कॅसेट तर ऐकून ऐकून खराब झाली???
साधारण 20 वर्षांपूर्वी Philips top 10, फिल्मी चक्कर असे गाण्यांवर आधारित कार्यक्रम असायचे.. त्यातले एक नंबरचे गाणे ऐकायला वेड्यासारखे धावत क्लासमधून घरी पळायचे.. वेड्यासारखे गाण्यावर प्रेम केले आणि करताना कधीही हिंदी मराठी , प्रेम गीते, अभंग असा भेदभाव केला नाही... फक्त गाण्याचा आनंद घ्यायचा.. कोणे एके काळी सर्व भेटल्यावर गप्पांची मेहफिल जमायची.. त्यात कोणी नकला करायचे, कोणी जोक सांगायचे.. माझे एक काका भीमसेनजींची गाणी गायचे, त्यातही *इंद्रायणी काठी देवाची आळंदी* हे तर एक नंबर.. असायचे.. आता तर त्या मेहफिलीही गेल्या.. आता कुठेही जा फक्त कधी आणि कुठे बसायचे हाच प्रश्न असतो.. असो.. आशाताईंची *कम्बख्त इश्क*, *रंगदे* असो किंवा सुखविंदरसिंगची *छय्या छय्या* हि तर पिकनिकमध्ये मस्ट असणारी गाणी.. *अब मुझे रात दिन तुम्हारा हि खयाल है* हे गाणे ऐकून सोनू निगम वर फिदा होते आणि *छुई मुई सी तुम लगती हो* हे ऐकून मिलिंद इंगळे आवडत होता.. लग्नानंतर आयुष्य 180 degrees मध्ये फिरले.. गाणी ऐकणे खूप कमी झाले.. खूप वर्षांनी गाणी ऐकली ती चारधामला..समोर पसरलेला हिमालय... बाजूला वाहणाऱ्या नद्या रात्रीची शांतता आणि कानात आवडती गाणी... one of the golden moments.. त्यानंतर *घेई छंद मकरंद* किंवा *अरूणी किरणी* ही गाणी लेकीमुळे ऐकली.. जमेल तेव्हा *ऋणानुबंधांच्या* ऐकायला विसरत नाही...
असेच एकदा अष्टविनायक करून परत येत होतो.. 31 डिसेंबरची रात्र होती.. आमच्या ड्रायव्हर दादांना गाडी घेऊन परत जायचे होते.. त्यामुळे ते खूपच जोरात गाडी चालवत होते.. एका बाजूला अजय अतुल *लल्लाटी भंडार* गात होते.. दुसरीकडे आम्ही जीव मुठीत घेऊन बसलो होतो.. शेवटी अगदीच छोटा अपघात झाल्यानंतर त्यांनी गाडी व्यवस्थित चालवली.. पण आजही ते गाणे लागले कि तो प्रवास आठवतो..
गाण्यांचा उपयोग करून लिहिलेले दोन लेख बर्‍याच जणांना आवडले पण काही जणांचे म्हणणे होते कि हिंदी गाण्यांचा उल्लेख टाळायचा होता.. अहो पण जिथे आमचे बालपणच हिंदी मराठी गाण्यांवर पोसले आहे तिथे अशी टाळाटाळ कशी करता येणार? तर त्या लेखाचे मूळ हे इतकी वर्षे ऐकलेल्या गाण्यात आहे?
कधी कधी वाटते थोड्या वेळासाठी का होईना एकांत मिळावा.. आणि आरामात चहा घेत छान गाणी ऐकावीत.. कधी तरी देवदयेने अशी संधी मिळते.. आणि मी त्या गाण्यात रंगून जाते....
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई