मुसाफिर

About Life Of Achyut Godbole Sir


मुसाफिर


\"वाचनाच्या गोडीमुळे
ज्ञान मिळत राहतं
आणि वाचनाच व्यसन
जीवनात चैतन्य आणतं\"


वाचन हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा विषय ! आणि आवडीचा छंदही ! आणि म्हटले तर एक चांगले व्यसनचं!
वाचनवेड्या लोकांना तर वाचन म्हणजे एक संजीवनीच वाटते.
अशाच वाचनवेड्या लोकांमधील मी ही एक !
लहानपणापासून वाचनाची आवड , त्यामुळे
अभ्यासाची पुस्तके वाचताना अवांतर वाचनाची सवय लागली. ज्यामुळे मनाला आनंद मिळतो, काहीतरी शिकण्यास मिळते,जगण्यास प्रेरणा मिळते असे सर्व वाचन करायला आवडू लागले.

\"पुस्तकांचे मूल्य रत्नांपेक्षा अधिक आहे,कारण रत्नांमुळे बाह्य रूप चमकते तर पुस्तकांमुळे अंतःकरण उज्वल होते.\"

असे महात्मा फुले यांनी म्हटले आहे , त्याचा प्रत्यय प्रत्येक वाचकाला येत असतो.
पुस्तके वाचून आपल्या जीवनाला आकार मिळतो, एक चांगली दिशा मिळते. आपले आचार-विचार बदलतात व आपले जीवन समृद्ध होऊन जाते.

वाचलेले प्रत्येक पुस्तक आपल्याला खूप काही शिकवून जाते.
अशी एक नाही तर अनेक पुस्तके आहेत की, त्यांच्याबद्दल लिहावेसे वाटते.त्यातील एक पुस्तक म्हणजे...\"मुसाफिर\" !

प्रखर सूर्य सर्वांना प्रकाश देतोच, पण एखादी पणती सुद्धा आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करून प्रकाश देतेच, त्याचप्रमाणे आपल्या लेखनीच्या ज्योतीने, अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे लेखक अच्युत गोडबोले.
आणि त्यांचे आत्मचरित्र म्हणजेच मुसाफिर !

मुसाफिर पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले यांचा जीवनप्रवास.
विद्यार्थीदशेपासून ते लेखका पर्यंतचा प्रवास.
पुस्तक वाचताना आपल्याला वाटते,जसे ते आपल्याशी प्रत्यक्षच बोलत आहेत की काय ? साधी,सरळ भाषा, सर्वांना समजेल अशीच. आणि वाचताना कंटाळा तर येतच नाही उलट उत्साहाने पुढे वाचत जावे इतके रंजक वाटते.

अच्युत गोडबोले यांचे बालपण सोलापूर इथे गेले. त्यांचे एकत्र कुटुंब होते. त्यामुळे घरातूनच त्यांच्यावर चांगले संस्कार घडत होते. इलेक्ट्रीशियने लावलेला उलटा पंखा, काकांचा शर्ट घालून आलेला धोबी, परीक्षा संपल्यावर वर्षातून रेस्टॉरंटमध्ये खायला मिळणारा डोसा,सुट्टीत पुण्यात जायला मिळणारा आनंद .अशा अनेक मजेशीर अनुभवांचे त्यांचे बालपण.

लहाणपणापासून त्यांना विज्ञान आणि गणित विषयांची आवड होती.त्यांच्यातले ते तज्ञ होते. संस्कार व अनेक विषयांशी निगडित वातावरण हे घरातूनच मिळत गेल्याने अभ्यासाबरोबरच संगीत, साहित्य आणि चित्रकला या विषयांची गोडीही लहानपणापासून लागली. त्यांच्या जडणघडणीत आईवडील,भाऊ,बहीण,घरातील नातेवाईक, शाळेतील शिक्षक यांचाही हातभार लागला.

I.I.T. ची प्रवेश परीक्षा पास करून मिळालेला प्रवेश , जणू एका जगातून दुसऱ्या जगात मिळालेला प्रवेशचं होता. होस्टेलचे जीवनातील गंमतीजमती अनुभवल्या.
शिक्षणाबरोबर मित्रांबरोबर अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे.
संगीत ऐकण्याची एवढी प्रचंड आवड होती की, एकदा एक राग ऐकायचा म्हणून भर पावसात प्रवास करून पहाटे तीन वाजता मामाच्या घरावर थाप मारणं आणि तरीही ती कॅसेट नाही मिळाली म्हणून बाजारातून आणून ऐकणं हे खरचं विस्मयकारकचं!

खाण्याचीही प्रचंड आवड होती. कोणाताही चांगला पदार्थ कुठे मिळतो. हे शोधून काढणे आणि तो पदार्थ खाण्याचा आनंद घेणे.
त्यांनी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला ,अनुभव घेतला.
त्यांना वाईट गोष्टींचे व्यसन ही लागले.
पण त्यांनी त्यावरही यशस्वी मात केली.
त्यांच्या आयुष्यात प्रचंड चढउतार आले.

पहिल्या नोकरीसाठी करावे लागलेले प्रयत्न. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉंलॉजी मध्ये केलेला प्रवेश. त्यात 32 वर्षे काम केले. सीईओ,मॅनेजिंग डायरेक्टर ,हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स च्या जागतिक कंपन्यांचे मुख्य म्हणून काम केले.
हे सर्व करत असताना अनेकांना नोकरीला लावून त्यांच्या आयुष्याचे कल्याण केले.
त्यांच्या मुलाला ऑटिझम असल्यामुळे, उपचारासाठी पैशांची गरज होती.गरजेपुरता पैसा मिळविणे हे योग्यच आहे.पण त्यांना आलिशान गाड्या, बंगले,परदेशवाऱ्या यात रस नव्हता.
\" मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी आणि समाजासाठी आपण काहीतरी करावं \"
या इच्छेने त्यांनी पुस्तकांच्या जगात प्रवेश केला. वाचक म्हणून तर त्यांची पुस्तकांशी मैत्री होतीचं पण एक लेखक म्हणून त्यांनी खूप यश मिळविले.
त्यांनी सर्व पुस्तके ही मराठीतूनचं लिहीली आहेत. संगणकाचे ज्ञान सर्व सामान्य लोकांना व्हावे यासाठी संगणकावरील पुस्तके मराठीतून लिहीली.

वार्षिक 2,3 कोटी रू. पगाराच्या नोकऱ्या सोडून, उपभोगण्यास मिळणारे प्रचंड वैभव परदेशवाऱ्या या सगळ्या दिमाखदार गोष्टी सोडून साधेपणाने राहून पूर्णपणे मराठी लिखाणाकडे वळणं हे सोपं नव्हतं.

प्रत्येक पुस्तकाची हजारोंच्या संख्येने विक्री झाली. \"पुस्तक आवडले\" असे सांगणारे वाचक लाखोंच्या संख्येत मिळाले.
हजारो चाहते ईमेल/ मेसेजेस पाठवतात.त्यांनी लिहीलेल्या पुस्तकामुळे आयुष्यात काय बदल झाला, ते वाचक आवर्जून सांगू लागू लागले.
आयुष्यातील नैराश्य गेले, करियरची दिशा मिळाली, आत्महत्येचा विचार मनात होता पण तुमच्या पुस्तकांमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. असे सांगणारे ही अनेक जण त्यांना भेटले.

शिक्षक,पालक,विद्यार्थीव्यावसायिक अशी सर्वच लोक त्यांचे चाहते झाले.

\" ज्ञान म्हणजे आणखीन काय असत ? विचारांची देवाणघेवाण असते. ती देवाणघेवाण चांगल्या,सोप्या आणि रंजक पद्धतीने झाली. तर त्यात आणखीनच मजा येते . \"

असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणात अचूकता, रंजकता, साधी सोपी भाषा असते.
ते स्वतः PhD नाहीये, पण त्यांच्या लिखाणावर लोक PhD करताहेत.

ते जात,धर्म, रंग,स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव करत नाही. नोकरी देतानाही त्यांनी कधी मुलगा- मुलगी असा भेदभाव केला नाही.
स्त्री- पुरुष समानता,जातीमू्ल्य समानता, धर्ममूल्ये समानता या सगळ्याच बाबतीत समान संधी निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन,विज्ञानवाद ,
विवेकवाद आणि माणुसकी ही तत्वं व मूल्यं ते पाळण्याचा प्रयत्न करत असतात. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
आणि या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणातून दिसते.

जवळपास प्रत्येक विषयांवरील त्यांची पुस्तके आहेत आणि प्रत्येक पुस्तकाला भरघोस प्रतिसाद मिळत असतो.
जे ज्ञान आपल्या जवळ आहे,ते इतरांना द्यावे. याच उद्देशाने त्यांचे लिखाण सुरू असते.
त्यांच्या मुलाच्या ऑटिझममुळे त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला,त्रास झाला. तो इतर पालकांना व मुलांना होऊ नये म्हणून त्यांनी \"आशियाना\" नावाची शाळा सुरू केली.


मुसाफिर वाचण्यापूर्वी मी त्यांना फक्त नावापुरती ओळखत होती. पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू कळाले. जीवन कसे जगावे? हे त्यांच्या कडून शिकावे.

\"तुला हे येत नाही.\" असे कोणी म्हटल्यावर,त्यांना वाईट वाटायचे आणि आपल्याला हे का येत नाही ? ते आपल्याला आलेच पाहिजे .आणि त्यासाठी ते भरपूर मेहनत घेत.
आणि त्या गोष्टीत ते पारंगत होत.
त्यांचा हा गुण ही मनाला भावून जातो.

\"आपल्याजवळ काय आहे यापेक्षा आपल्यात काय आहे,हे महत्त्वाचे.\"
त्यांचे हे वाक्य आपोआपच मनावर कोरले जाते.

असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, एक उत्तम वाचक ते यशस्वी लेखक, बुद्धीवंत, संगणकतज्ञ, विचारवंत, प्रतिभावंत , मराठी वर मनापासून प्रेम करणारे, सामाजिक बांधिलकची जाणीव असणारे अच्युत गोडबोले आणि त्यांचे आत्मचरित्र - मुसाफिर हे कित्येकांसाठी प्रेरणादायी स्थान ठरले.