मुरलेलं लोणचं (संवाद कथा)

मुरलेलं लोणचं (संवाद कथा)

मुरलेलं लोणचं

संवाद कथा

गिरीधर: "हेलो हेलो,मी गिरीधर बोलतोय."

दुर्गा: "होय ओ कळलं मला. सांगावं का लागतं रोज! नाहीतरी या वेळेला मला म्हातारीला कोण करतय फोन!"

गिरीधर:  "कशी आहेस दुर्गे,बरीएस नं."

दुर्गा:  "गुडघे धरलेत जरा. चालायचंच."

गिरीधर:  "कामं झाली?"

दुर्गा:  "कामं..कसली कामं! सकाळी बाई येते नि भाजीपोळी करुन जाते. त्यातल्याच संध्याकाळी गरम करुन खायच्या. बरं ताज्या करुन खाईन तर मग सगळ्यांच्याच माझ्या गळ्यात मारतील. मला नाही हो पुर्वीसारखं जमत गेसजवळ उभं रहायला. सूनबाई,तिची आई आली की मात्र तिच्यासाठी स्वतःच्या हाताने पोळ्या लाटते,भाकऱ्या थापते,दोसे करते. माझ्यासाठी दोन पोळ्या बनवायला नसतो ओ वेळ."

गिरीधर:  "तू नको गं मनाला लावून घेऊस. उगा बीपी वाढायचा." 

दुर्गा:  "छे! मी बर्फाची लादी ठेवली आहे डोक्यावर,अगदी लग्न झाल्यापासून. तुमची आई का कमी छळ करायची माझा! भाजीत मीठाचा अधिकचा खडा घालून ठेवायची नि मला तोंडघशी पाडायची अगदी. एवढी मुंबईस खोली होती ती धाकट्याच्या नावावर करुन दिली. खर्चासाठी मात्र सदैव आमच्याकडे. बबूवन्संची ,राधावन्संची लग्ने, त्यांच्या मुलांची बारसी ..नुसतं देत राहिलात. दानशूर कर्ण ना तुम्ही."

गिरीधर:  "आत्ता कशी माझी दुर्गी शोभलीस बघ."

दुर्गा:  "जवळ असताना नाही म्हणालात कधी दुर्गी. अगं ए..म्हणून साद घालायचात."

गिरीधर: "नाही गं जमलं मला ते. पण आत्ता फोनवरून बोलतो नं दुर्गी."

दुर्गा:  "ऐकायला खूप गोड वाटतं हो,तुमच्या तोंडून माझं नाव."

 गिरीधर:  "लाजलीस.."

दुर्गा:  "इश्य!"

गिरीधर: "तुला सांगतो दुर्गे,आत्ता मला पश्चाताप होतोय. दोन्ही लेक मोठी घरं घेणार म्हणाल्यावर त्यांना होतं नव्हतं ते डबोलं देऊन बसलो. ते पुरेना म्हणून कष्टाने काडीकाडी गोळा करुन विकत घेतलेलं घरही विकलं. ते पैसेही त्यांना वाटून दिले  नि लेकांनी आपली फाळणी केली गं. आपलेच दात नि आपलेच ओठ काय बोलणार! तू तिथे थोरल्याकडे मुंबईस नि मी हा इथे धाकट्याकडे पुण्याला. कधीतरी सहा महिन्यांनी आपली भेट घडवून आणतात,झालं."

दुर्गा: "त्या भेटीत त्यांचंच गेट टुगेदर चाललेलं असतं. आपल्याला एकांतात बोलायला वेळ मिळतो कुठं! एका नातवाला आज्जीच्या हातचं पन्हं हवं असतं तर दुसऱ्याला मनगणं. मलाही नातवंडांना करुन घालायला आवडतच हो,पण आपली अशी प्रायव्हसी नको का त्यांनी द्यायला आपल्याला? सगळं बोलूनच दाखवायचं का!"

गिरीधर: "दुर्गे,काल मी आपल्या नातवाला, क्रीशला गार्डनमधे खेळायला घेऊन गेलो होतो. मी जरा सावलीत बसलो. तळमजल्यावरच्या नेन्यांशी बोलत होतो. तितक्यात एकच कोलाहल ऐकू आला. आपला क्रीश हळूच गार्डनच्या गेटबाहेर पळाला होता. त्याने घरात मिळालेलं पाचचं नाणं खिशातून आणलं होतं आणि त्याचं चॉकलेट घेण्यासाठी तो रस्ता ओलांडत समोरच्या दुकानाकडे पळत होता. कुणाचीतरी गाडी अगदी त्याच्या इंचभर अंतरावर येऊन थांबली..ब्रेक दाबल्याने केवढातरी मोठा अनर्थ टळला होता.
संध्याकाळी सूनबाई घरी आली. तिला झालेला सगळा प्रकार नेन्यांच्या सुनेने तिखटमीठ लावून सांगितला होता. सूनबाई नुसती धुमसत होती. नवरा आल्यावर तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आजकाल माझी अडचण होतेय गं दोघांना. तू तरी घरकाम करतेस. माझी फक्त बँकेत  पासबुकावर एन्ट्री करुन आणणं,वीजेची बीलं भरणं..एवढीच मदत. वीजेची बीलंही हल्ली त्यांची ती भरतात म्हणा."

दुर्गा: "नका हो मनाला लावून घेऊ. सुनांच्या राज्यात हे चालायचंच पण आपले मुलगे तरी काय कमी आहेत? आईवडिलांना सांभाळणं,त्यांची विचारपूस करणं ही मुलांचीही जवाबदारी आहेच की. हल्ली आपला धाकटा बंड्या फारसा बोलत नाही माझ्याशी. पुर्वी जेवून चूळ भरली की तोंड पुसायलाही माझा पदर लागायचा त्याला..आत्ता आला की मोबाईल हातात घेऊन बसलेला असतो. सुनबाईही तशीच. मी वरणभाताचा कुकर लावून ठेवते,भाजी करते पण आई,भाजी छान जमलेय हो असं कधी हिच्या तोंडून येत नाही. उलट अळूचं फतफतं करावं ते आमच्या आईनेच असा शाब्दिक बाण सोडते. तुम्ही किती आवडीने खायचा हो माझ्या हातचं अळूचं फतफतं."

गिरीधर: "दुर्गे,तुझ्या हातची चव चाखायला जीव आसुसालाय माझा. म्हणूनच मी एक खोली भाड्याने घ्यायची ठरवलेय. आपला शिरसाठ रहातो ना जनता चाळीत..तिथली एक खोली रिकामी आहे म्हणे. तशा दोनचार एफड्या आहेत माझ्या. मोडू एखादी आणि पुन्हा थाटू नव्याने दोघांचा संसार."

दुर्गा: "अय्या खरंच!"

गिरीधर: "हो गं,अगदी खरं. या येत्या पाडव्यालाच जावू जोडीने रहायला."

समाप्त

सौ.गीता गजानन गरुड.