भावनांची हत्या

Rip humanity, this article represent the heartbreaking story of innocent elephant and her baby.

      सन ३०२० उजाडलं.... पृथ्वी आता आजच्या सारखी राहिली नव्हती... प्राण्यांचा छान विकास झाला होता... माणसाला पृथ्वीवर स्थानच नव्हतं.... तो गेलेला कुठेतरी दूर... दुसऱ्या ग्रहावर... इथे पृथ्वीवर सगळे प्राणी गुण्या गोविंदाने नांदत होते.... जे प्राणी अनुभवी, उतार वयात आले होते त्यांच्या तोंडून माणसाच्या निर्घृण कृत्यांच्या कथा बाकी सगळे ऐकून होते! चर्चा करता करता विषय निघाला २०२० साली झालेल्या हत्येचा.... माणसाने एका हत्तीणीला खाऊ घातलेल्या फटाक्यांचा! हा विषय एरवी कधी काढला गेला नव्हता पण, आज अचानक पृथ्वी वर माणसाने आक्रमण केलं यात त्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढल्या गेल्या... 
        कृतघ्न माणसाला कसली जाणीवच नव्हती..... प्राण्यांनी केलेली प्रगती त्याला दिसलीच नव्हती.... पुन्हा प्रयत्न झाला प्राण्यांना जाळ्यात अडकवण्याचा.... सापळा रचला गेला त्यांच्या अखेरच्या श्वासाचा..... पण, प्राणी मात्र आता सावध होते.... असल्या भूलथापांना बळी पडत नव्हते.... माणसाला प्रश्न पडला... इतका वेळ झाला तरी अजून प्राणी जाळ्यात का नाही सापडला.... लपून सगळं पाहत असलेल्या एक जेष्ठ हत्ती बोलू लागला..... "विश्वास नाही राहिला आमचा आता! २०२० साली झालेल्या घटने नंतर संबंध संपला आपला....." माणसाची ही नवीन पिढी... पण, माणसाची जुनी सवय स्वतःची चूक झाकून ठेवण्याची म्हणूनच या बाबतीत त्याला काही कल्पना नव्हती.... गोंधळलेला चेहरा पाहून शेवटी हत्तीच म्हणाला; "आमच्या पणजी च्या बाबतीत घडलेली ही गोष्ट....२०२० साली नव्हतो आम्ही इतके विकसित.... तुम्ही आमच्या जंगलावर कब्जा केला म्हणून पोट भरण्यासाठी आम्ही तुमच्या नव्हे नव्हे, तुम्ही कब्जा केलेल्या आमच्याच वसाहतीत अन्नाच्या शोधात यायचो... पणजी पण तशीच आली समोर अननस दिसला... मनोमन खुश झाली.... माणसं किती चांगली आहेत असा गोड गैरसमज करून घेतला आणि डोळे झाकून विश्वास ठेवला... अननस तर पोटात गेला पण त्यातल्या स्फोटकांनी जीव घेतला... तोंड, जबडा सगळं रक्तबंबाळ झालं..... वेदनेने व्हिवळत होती बिचारी... पण कोणाला त्रास न देता तिथून निघून गेली.... ७२ तास नदीत मृत्यूशी झुंज देत उभी होती... काहींनी वाचवायचा प्रयत्न केला पण सगळं निरर्थक ठरलं! पणजी ने तर जीव गमावला पण तिच्याच पोटात वाढत असणाऱ्या एका निष्पाप जीव सुद्धा प्राणांना मुकला.... पणजीची चूक होती तुमच्या सारख्यांवर विश्वास ठेवला! पण त्या लहान जीवाची काही चूक नसताना त्याने मात्र जीव गमावलाच! एवढा काळ कदाचित झुंजली हि नसती... पण, पोटातल्या पिल्ला साठी कळवळत होती! आईच च हृदय ते बाळासाठी रडत होती."
        हत्ती बोलायचा थांबल्यावर बाकी प्राण्यांनी हल्ला करा यांच्यावर म्हणून एकच गोंधळ उडवला.... माणूस स्वतःच्या जीवाची भीक मागू लागला.... जेष्ठ हत्तीनेच सगळ्यांना शांत केलं... आणि म्हणाला; "आपणही असेच वागलो तर या दगडाच्या काळजाच्या माणसात आणि आपल्यात फरक काय? नका मारू त्याला.... सोडून द्या.... फक्त एक लक्षात ठेवा, माणसाबरोबर कधीही मैत्री करू नका.... एकेकाळी होतो आपण एकमेकांसाठी जिवाभावाचे... पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माणसानेच हत्या केलीये आपल्यातल्या विश्वासाची! आपल्यातल्या भावनांची!

(प्राणी कधीही स्वतःहून त्रास देत नाहीत... एकवेळ निसर्गात माणूस नसेल तरी चालेल उलट पृथ्वी अजून छान बहरेल पण, हे प्राणी आणि इतर घटक नसतील तर अनर्थ निश्चित आहे! उद्या ५ जून जागतिक पर्यावरण दिन आणि काल ही असली घटना! निसर्ग जो वर शांत आहे तो वर आहे एकदा जर त्याने मनात आणलं तर मानव जातीची खैर नाही! कितीही प्रगती केली तरी निर्सगाने मानवाला बनवलं आहे मानवाने निसर्गाला नाही एवढं ध्यानात असुदे! नाहीतर ती वेळ दूर नाही जेव्हा प्राणी माणसांवर कधीच विश्वास ठेवणार नाही! नुसतं शिक्षण असून उपयोग नाही तर नैतिकता ही आचरणात असावी लागते.)