Login

मुरांबा (अंतिम भाग)

मैत्रीच्या मुरंब्याचा गोड शेवट नक्की वाचा

मागील भागात आपण पाहिले की,सोहम हाच कमलचा नातू आहे हे गौरीला समजलं.इकडे सुमतीला सुद्धा वसुंधराचा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून माधव आहे हे समजले.आता या तिघी मिळून कमलला भेटायला गेल्या.इकडे माधवराव घरी येऊन रागातच झोपायला गेले.आता ह्या मित्रांची भेट कशी होतेय.पाहूया अंतिम भागात.


दवाखान्यात कमल डॉक्टर यायची आतुरतेने वाट पहात होती.डॉक्टर आलेले पाहून ती सोहमला म्हणाली,"सोहम जा लवकर,डॉक्टर आलेत.डिस्चार्ज आजच हवा म्हणावे."

तसे सोहम चिडवत म्हणाला,"आज्जी,माधव आजोबांचे लग्न झालेय बर का!"


कमलने पाठीत एक धपाटा घातला,"माझ्याच मैत्रिणीशी झालं आहे,विसरलास की काय?"


सोहम आजीजवळ बसला,"आजी,एक प्रश्न विचारू? तुला खरच आवडायचे का ग ते?"


कमल खळखळून हसली,"माधव फक्त माझा मित्र होता रे,आणि मी एक आश्रित म्हणून रहात होते.तेव्हा इतर कसला विचार मनातही शिवला नाही."


सोहमने हसत आजीचा हात दाबला आणि बाहेर गेला.गौरी घरी पोहोचली.आजोबांची तगमग पाहून तिला हसू येत होते.


माधवराव गौरीला म्हणाले,"गौरी,एकदा फोन लावूया का त्या मुलाला."


गौरी हसू दाबत म्हणाली,"आजोबा,आता रात्रीचे दहा वाजून गेलेत.एवढ्या उशिरा अनोळखी माणसाला फोन कसा करणार?उद्या भेटते मी त्याला."


एवढे बोलून गौरी उठली.एवढ्यात माधवराव म्हणाले,"आजीच्या मैत्रिणी आल्या का?"


गौरी हसली,"दुपारीच आल्यात,आता त्या खरेदी आटोपून उशिरा येतील.तुम्ही झोपा."



इकडे मालतीबाई, सुमती आणि नंदा रात्री उशिरा घरी आल्या.सकाळी लवकर उठायचे होते.स्नेहमेळाव्यात सकाळची थीम मेट्रो स्टाईल होती.


तिघीही गौरीला सांगून आल्या,"लवकर उठ गौरे,उद्या आम्हाला थोडी मदत कर."


गौरी आजीला चिडवत म्हणाली,"वसू तुझ्या माधवची विकेट जाणार उद्या."


तसे सुमती हसत बोलली,"नाहीतर काय."


इकडे माधवराव विचार करत होते,उद्याच्या कार्यक्रमाला दांडी मारायला काय कारण शोधावे?

ह्या मैत्रिणी पहाटेच उठल्या.गौरीचा मोबाईल वाजत होता.गौरीने नाराजीने डोळे उघडले,पहाटे पाच वाजता आजी कशाला फोन करतेय काय माहित?

तिने फोन उचलला,"आजी काय झाले?आता कुठे पाच वाजत आहेत."

मालतीबाई म्हणाल्या,"गौरी लवकर बाहेर ये,आम्हाला तिघींना तयार होऊन आठ वाजता हॉलवर जायचे आहे."

गौरी डोळे चोळत बाहेर आली.तिघीजणी बाहेर दत्त म्हणून उभ्या. गौरीने गाडीची चावी आणली,"आजी पलीकडे ती पार्लरवाली आहे,घरीच बोलवायचे तिला."


सुमती हसली,"अगदी आजोबावर गेलीस ग.माधव असाच कुरकुर करायचा."


मालतीबाई हसल्या,"खरय सुमे,सगळ्या पाच नातवंडात हीच लाडकी आजोबांची.पण गौरे,आज फितूर होऊ नकोस."

गौरी चिडली,"काय यार आजी,एकतर मी कसेतरी लपवत आहे सगळे.चला आता लवकर."


माधवराव सकाळी उठले.लवकर बाहेर पडायचे त्यांनी ठरवले होते.एवढ्यात मनोज हजर झाला,"बाबा,आईने तुमचे कपडे काढून ठेवलेत,तुम्हाला दहा वाजेपर्यंत पोहोचायचे आहे."


माधवराव चिडले,"हा आईचा चमचा घरात आहे,विसरलोच होतो."


त्यांनी फोन हातात घेतला तर सदाचा मॅसेज,"कार्यक्रमाला जात आहे,सौ ने रात्रीच तंबी दिली होती."


तेवढ्यात मालतीबाईंचा फोन आला,"अहो,ऐकताय ना!तुमच्या मित्रांची लग्न मीच जमवलीत,विसरू नका.तेव्हा गुपचूप तिघेही इथे या."


माधवराव चिडले,"ह्या सद्या आणि दिन्याला सांगत होतो,नको हिच्या मैत्रिणी. पण माझ्या लग्नातच स्वतःच जमवून बसले.आता भोगा आपल्या कर्माची फळे."


चिडचिड करत माधवराव आंघोळीला गेले.गौरीने सोहमला फोन केला,"कधी येतोस,आजी उठली का?"


सोहम ओरडला,"उठली का?पोहोचली पण हॉलवर."


मनोज आणि मानसीने मधवरावांकडे बारीक लक्ष ठेवले होते.तितक्यात नाश्ता आला.मधवरावांनी गौरीला खुणावले.गौरी हसत ,"आज भेटते."हळूच म्हणाली.



माधवराव नाईलाजाने तयार झाले.एकतर ते कॉलेजला मुंबईत होते. स्नेहमेळावा स.प.चा.त्यांची अजिबात इच्छा नव्हती.त्यात कमलच्या नातवाला भेटायचे सोडून इकडे यावे लागले होते.माधवराव कसेबसे हॉलमध्ये आले.मागे उभे राहिले.त्यांना अक्षरशः 1960 च्या वर्गात उभे आहोत असे वाटले.अनेक देव, दिलीप,राज दिसत होते.



तेवढयात त्यांना मालतीबाई दिसल्या.मस्त केसांचा पफ,पोलका डॉट टॉप आणि प्लाझो,माफक मेकअप अगदी मुमताजच.


ते पुढे होणार एवढ्यात पुढे उभे दोघेजण बोलत होते,"वसू बघ ना! काय दिसते अजूनही.कॉलेजमध्ये कितीजण मागे होते.पण हे दैवी सौंदर्य कोणा वकिलाच्या पदरी पडले."


आजोबांना राग आला होता.एवढ्यात पुढे उभे दोघेजण आजीशी बोलू लागले.आतातर आणखी चिडचिड होत होती.तेवढ्यात दिनू आणि सदा दिसले.तिघांनी एक कोपरा पकडला आणि गप्प बसले.



पुढच्या रांगेत चर्चा चालूच होती.\"वसुचा सगळा ग्रुप आलाय.सगळ्या काय भारी होत्या.\"


तेवढ्यात एक सुंदर ग्रेसफुल आजी मधवरावांकडे आल्या.त्यांना पाहताच माधवराव हसले,सदू आणि दिनाला म्हणाले,"ह्या सौदामिनी कदम,द फेमस हायकोर्ट लॉयर."


सौदामिनी हसली,"माधव,अगदी तसाच आहेस अजुन.पण तू इथे कसा?"


तेव्हा माधवराव म्हणाले,"माझी मिसेस आहे."


सौदामिनी म्हणाली,"हो का!मी खरतर दोनच वर्ष होते इथे.नाव काय तुझ्या मिसेसचे."


तेवढ्यात मागून आवाज आला,"सौदामिनी!"


या तिघांनी आवाजाकडे पाहिले तर सुमती.सौदामिनी ओरडली,"अय्या सुमे,तुसुद्धा आलीस.किती वर्षांनी भेटतोय?आणि वसू कुठेय?"


सुमती हसत म्हणाली,"माधवला विचार,काय रे?कुठेय आमची वसू?"


आता हे तिघे शॉक झाले होते.सुमतीला पाहून बोलायला सुचेना .तेवढ्यात सुमती सौदामिनीला घेऊन गेली.आता सदा चिडला,"सुमी यांची कॉलेजची मैत्रीण आहे,आपल्याला कधीच सांगितले नाही."


माधवराव हसले,"कधी सांगतील रे?आपण तरी विचारले का ?"सदा आणि दिनू दोघेही चिडले होतेच.इतक्यात तिघांच्या बायका एकत्र येताना दिसल्या.



मालतीबाई तिघांना म्हणाल्या,"कसे वाटले सरप्राईज?सुमी तुमची मैत्रीण आहे हे मलासुद्धा माहीत नव्हते हो."


तितक्यात सदाची बायको म्हणाली,"हो ना,सुमीमुळे शाळेतल्या सगळ्याच भानगडी समजल्या."


सदा चिडला,"भानगडी?कसल्या भानगडी?"

तेव्हा दिनूची बायको बोलली,"गेले महिनाभर काय चालू आहे,आम्हाला माहीत नाही का? तिघे सुमीच्या घरी कशाला गेला होतात?"


मालतीबाई म्हणाल्या,"जाऊ द्या ग,तसेही सुमी सांगणार आहेच संध्याकाळी."


एवढे बोलून या तिघी निघून गेल्या.सदा चिडला,"माधव मी सांगत होतो,नको जायला बाहेर."


दिनू म्हणाला,"नाहीतर काय?"


माधवराव चिडले,"गप बसा,तुम्हाला सुद्धा कमलचा शोध घ्यायचा होता."


तेवढ्यात गौरीचा फोन आला,"आजोबा,तो देशमुख भेटायचे नाही म्हणाला."



माधवराव चिडले,"नाही कसे म्हणू शकतो तो?"तेवढ्यात गौरीने फोन ठेवून दिला.



माधवराव हताश होऊन म्हणाले,"कमलचा नातू नाही म्हणाला भेटायला."


सदा चिडला,"नाही का म्हणाला?आपण सरळ घरी जाऊ."

दिनू ओरडला,"गप्प बसा,आधी सुमतीला शोधा."


सुमती दिसताच सदाने तिला जवळपास ओढतच बाजूला घेतले.सुमती ओरडली,"सदा काय हे?"


माधव म्हणाला,"हे आम्ही तुला विचारायला पाहिजे.मालती तुझी मैत्रीण आहे,सांगितले नाहीस."


सुमती चिडली,"मी म्हणाले होते,वासंती येणार आहे.आता तुला बायकोचे माहेरचे नाव आठवले नाही त्याला मी काय करू?"


दिनू म्हणाला,"सुमे,आता पुढचे काहीच सांगणार नाहीस तू."

सुमतीने फक्त खांदे उडवले आणि निघून गेली.


तेवढ्यात माईकवर मालतीबाई आणि त्यांचा एक मित्र बोलू लागले.समोरच्या आज्या कुजबुजल्या,"चंद्रकांत किती झुरायचा वसुसाठी. आजही किती छान जोडी दिसतेय दोघांची.


"दुसरी म्हणाली,"पण वसू कधी असल्या भानगडीत पडली नाही.किती हरहुन्नरी होती.पण बहुतेक करिअर केले नाही पुढे."


माधवराव सगळे ऐकत होते.त्यांना लग्न झाल्यावरच्या मालतीबाई आठवल्या,आपण मालतीला समजून घेतले नाही का?


इतक्यात चंद्रकांत बोलू लागला,"मला आणि वसुला अनेकदा एकत्रित निवेदन करताना तुम्ही पाहिलं,पण यामागे असणारी लेखिका अज्ञात राहिली.आपल्या एकांकिका गाजल्या आणि नाटके गाजली.लेखक अज्ञात.ह्या अज्ञात नावाने दरवर्षी आपल्या वार्षिक अंकात कथा कविता येत.आपल्या सर्वांना हा किंवा ही अज्ञात कोण? हा प्रश्न आजही सतावत असेल."


तर आज आपल्यासमोर ह्या प्रश्नाचे उत्तर देत आहोत.अज्ञात म्हणून लिहिणारी.हो,लिहिणारी आपली मैत्रीण."मालती बोलत होती.


पुढे चंद्रकांत बोलू लागला,"या अज्ञातचा सर्वाधिक गाजलेला लेख कोणता?"खालून सगळे एकसुरात ओरडले,"मुरांबा."


मालती पुढे बोलू लागली," अगदी बरोबर,तर आपल्या समोर येत आहेत मुरंबाच्या लेखिका.जोरदार टाळ्यांनी स्वागत करा."सर्वांच्या नजरा स्टेजच्या डावीकडे विंगेत वळल्या.


माधव,सदा आणि दिनू पहातच राहिले.गौरी आणि एक उमदा देखणा तरुण तिला घेऊन येत होते.तिला पाहताच तिघे जोरात ओरडले,"कमल!"


कमल स्टेजवर आली.मालतीबाई पुढे बोलू लागल्या,"मुरांबा कथेतील गूळ, कैरी,इलायची,सगळेजण आज इथे आहेत.मैत्रीचा तो मुरांबा आपण कथेत कॉलेजला असताना वाचला त्यातील सर्व पात्रे प्रत्यक्षात आहेत."



चंद्रकांत एकेक करून माधव,सदा,दिनू आणि सुमतीला स्टेजवर बोलवत होता.मैत्रीचा आंबटगोड मुरांबा आता मुरला होता आणि अधिकच रुचकर बनला होता.



मालतीबाई, सोहम आणि गौरी एका कोपऱ्यातून हा मैत्रीचा घट्ट बंध पहात हळूच डोळे पुसत होते.

कथेचा शेवटचा भाग लिहिताना भावुक व्हायला होते.मनात,हृदयात वसलेली पात्र संपणार म्हणून हुरहूर वाटते.ह्या कथमालिकेचा प्रत्येक भाग वाचणाऱ्या,मनापासून प्रतिक्रिया देणाऱ्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

लवकरच भेटू नवी कथामालिका आणि नवा विषय घेऊन.

©®प्रशांत विश्वनाथ कुंजीर.

🎭 Series Post

View all