मुरांबा भाग 7

शालेय जीवनातील कोणती घटना बदलून टाकेल सगळं काही
मागील भागात आपण पाहिले की कमलच्या शोधत हे मित्र सुमनला जाऊन भेटले. त्यानंतर कमलबद्दल फार माहिती मिळाली नाही. मात्र कमलचा पत्ता देऊ शकेल अशी वयक्ती या मित्रांना सापडली. त्या वयक्तीचे नाव ऐकून त्यावर विश्वास मात्र बसत नव्हता. असे काय झाले होते? ज्यामुळं सुमती आणि कमल असे समीकरण होऊच शकत नव्हते. पाहूया आजच्या भागात.


सुमती जोशी...गोरापान रंग, अपर पण चेहऱ्याला शोभणार नाक,लांब केस आणि अभ्यास,खेळ,नृत्य सगळीकडे पुढेच.
एकूण काय तर जनता विद्यालयातील सर्वात लोकप्रिय विद्यार्थिनी. सौ कुमुद जोशी बाईंची लाडकी कन्या. सुमती शाळेत सगळ्या गोष्टीत पुढे असे. कोणत्याही कार्यक्रमासाठी सुमतीचे नाव प्रथम क्रमांकावर असे.

पण...या सगळ्यात बदल घडला. इयत्ता दहावीत कमल सावंत शाळेत आली. सुंदर गोरा रंग, काळेभोर डोळे, चाफेकळी नाक, रेशमी केस. शिवाय अभ्यासात हुशार. पहिल्यांदा सुमतीसाठी प्रतिस्पर्धी उभा राहिला. शाळा सुरू होऊन पंधरा दिवसांनी शाळेचा वर्धापन दिन असे. त्यानिमित्त शाळेत वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा होत. गेली तीन वर्षे वक्तृत्व सुमती आणि निबंध म्हणजे माधव असे समीकरण होते. स्पर्धा संपल्या. संध्याकाळी बक्षिस वितरण होते. आधी निबंध स्पर्धेचे नंबर जाहीर झाले. सर्वांनी माधव..माधव चा गजर लावला. मात्र पहिल्या क्रमांकाचे नाव जाहीर झाले. कु.कमल सावंत. इकडे सुमतीला मात्र खात्री होती जिंकणार मीच. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक....घोषणा होताच सुमती उठुन चालू लागली. तेवढ्यात नाव जाहीर झाल. कमल सावंत. आज सर्वत्र कमल ह्या एकाच नावाची चर्चा होती.

सुमती बक्षीस घेऊन जात असताना,

गोदावरी फणकाऱ्याने म्हणाली,"आता सवय लावून घे हो! दुसरा नंबर येण्याची."हा पहिला प्रसंगच सुमतीच्या मनात स्पर्धेचे आणि इर्षेयेचे बीज रोवून गेला.


त्या प्रसंगानंतर सुमती कायम कमलबरोबर स्पर्धा करत असे. एकदा जोशी बाईंनी कमलच्या हस्ताक्षराच कौतुक केलं. संध्याकाळी बाई वह्या तपासायला घेऊन आल्या. दुसऱ्या दिवशी कमलच्या वहिवर प्रत्येक पानावर शाई ओतलेली.कमल रडायला लागली. बाईंनी तिला नंतर भेटायला सांगितलं.


बाई म्हणाल्या,"
कमल अग वही खराब झाली तर दुसरी घेता येईल, आणि मी खात्री देते की यामध्ये कोण सहभागी आहे ते शोधून मी शिक्षा करेल."

कमल डोळे पुसत म्हणाली," बाई!त्यामुळं माझी वही परत येणार नाही ना. माझी आई गेल्यावर मावशीने मला इकडे आणलं. तीसुद्धा सासुरवाशीण आहे." जोशी बाईंनी कमलला मायेने जवळ घेतलं. त्या दिवसानंतर बाईंची कमलशी जवळीक वाढू लागली. तितकाच सुमती कमलचा तिरस्कार करत असे.


ही छुपी स्पर्धा वाढतच गेली. कमलच्या नम्र,मायाळू आणि सर्वांशी मिसळण्याच्या स्वभावामुळे ती सर्वांना हवीशी वाटत असे. शिवाय सुमतीकडे असलेला थोडासा मी मी करणारा स्वभाव. त्यामुळं अनेकांना कमल जास्त आवडू लागली. सुमतीचे हे सगळं कळायचं वय नव्हतं. किशोरवयीन स्पर्धा असतेच.
बघता बघता तीन महिने झाले. तिमाही परीक्षा आली.आजवर सुमती आणि माधव हे दोघे पहिल्या दोन क्रमांकाचे दावेदार असत. यावेळी सुमतीने आणखी जिद्दीने अभ्यास सुरू केला.

ते पाहून एकदा आईने हटकल,

"सुमती ! एवढं कसलं ग अभ्यासच टेन्शन,तू हुशार आहेस बाळा."

सुमती म्हणाली,"नुसतं हुशार नको आई,पहिला नंबर यायला हवा."
बाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला,"सुमती अग फक्त परीक्षेतील नंबर म्हणजे आयुष्य नव्हे." पण सुमतीला सध्या फक्त आणि फक्त पहिला नंबर दिसत होता.

परीक्षा सुरू झाली आणि संपलीदेखील. निकालाची उत्सुकता सर्वांना होती. वर्गशिक्षक आत आले. त्यांनी एक एक क्रमांक जाहीर करायला सुरुवात केली. पहिले तीन नंबर शेवटी जाहीर होणार होते. आता तिघेच उरले होते. सुमती,माधव आणि कमल. सरांनी तृतीय क्रमांकाचे नाव घेतले,"तृतीय क्रमांक कु.सुमती जोशी." सुमतीचे डोळे पाण्याने आणि मन उद्वेगाने भरले. सुमतीने प्रगतीपुस्तक घेतले. दुसरा क्रमांक माधव आणि प्रथम क्रमांकाची मानकरी आहे...कु कमल सावंत.

सगळा वर्ग कमलच अभिनंदन करत होता. सुमती नीट जेवलीसुद्धा नाही. घरी आल्यावर आदळआपट चालूच होती. आईने जवळ घेऊन विचारलं,"काय झालं? कोणी काही बोललं का तुला? एवढा वेळ घातलेला बांध फुटला. रागाने धुमसत सुमती म्हणाली,"ती कमल प्रत्येकाशी गोड बोलते,पुढं पुढं करते म्हणून काय पहिला नंबर द्यायचा का तिला.
एवढे बोलायचा अवकाश आईने सुमतीला एक जोरदार मुस्कटात ठेवून दिली,"सुमती खबरदार! अग स्पर्धा मी समझु शकते. पण एवढा द्वेष? ती मुलगी खरोखर हुशार आहेच. शिवाय सर्व शिक्षकांवर आरोप करतेय तू."
सुमतीने फक्त कमलसाठी आईने आपल्याला मारलं एवढंच लक्षात ठेवलं. काही झालं तरी कमलला धडा शिकवायचा हा निश्चय तिने केला. तशी संधी लवकरच तिला मिळाली.

सदाच्या सांगण्यावरून माधवन कमलला चिठ्ठी लिहिली. फॉर्म परीक्षा नुकतीच झालेली. सरांनी माधव,कमल आणि सदाची कानउघडणी केली आणि चिठ्ठी जोशी बाईंकडे दिली. जोशीबाई शाळेच्या कामाच्या रगाड्यात हा प्रसंग विसरल्या.पण....एक दिवस ही चिठ्ठी सुमतीला सापडली.

सुमती आता काय करेल? नक्की काय झालं असेल? कमल आणि सुमतीच्या नात्याचा तिच्या शोधात अडथळा होईल की उपयोग. वाचत रहा मुरांबा.


🎭 Series Post

View all