मुरांबा भाग 12

मैत्रीच्या शोधतील निखळलेले दुवे आज जोडले जाणार.



मागील भागात आपण पाहिले की गौरी आणि माधवराव यांनी अनेक प्रयत्न करूनही मालतीबाईंपुढे त्यांचे काहीच चालले नाही. तरीही काहितरी शक्कल लढवून आपण इथून बाहेर सटकून जायचं अस दोघांच्याही डोक्यात शिजत होत.आता पाहूया पुढे.


इकडे सकाळपासून माधवराव अस्वस्थ झाले. त्यात कमलचा नातू सापडला असताना त्याला भेटायचं सोडून या कोण जाधव आणि कुलकर्णी येतायत त्यांना घ्यायला स्टेशनवर जायचं. विचार करूनच माधवराव अस्वस्थ झाले होते.काहीही झालं तरी स्टेशनवर जायचं नाही,त्यांनी मनाशी पण केला.

तेवढ्यात मालतीबाई आल्या,"स्टेशनवर जाणार नाही,असा पण वगैरे करू नका ह. नाहीतर मग तुमच्या मित्रांच्या अड्ड्याला आठवड्यात एकदा दिलेली परवानगी बंद."


माधवराव हादरले,"मनात बोललेलं कस काय ऐकू जात हिला? ते पण प्रत्येकवेळी."


मालतीबाई हसून म्हणाल्या,"मनातलं चेहऱ्यावर दिसता कामा नये जजसाहेब."

त्या गेल्यावर गौरीचा बाबा आला,"हे काय बाबा? तुम्ही अजून तयार नाही? लवकर आवरा."

माधवराव आवरायला घेणार एवढ्यात गौरीचा फोन आला,"काय यार आजोबा, पाठवा ना लवकर नंबर."


माधवराव या सगळ्यात गौरीला नंबर द्यायला विसरले होते. त्यांनी पटकन दिनेशला मॅसेज केला की नंबर थेट गौरीला पाठव. आता काय,\"आलिया भोगासी,असावे सादर\". असे म्हणत माधवराव तयार होऊ लागले.


तेवढ्यात त्यांच्या बहिणीचा फोन आला,"माधव अरे,आज मला दवाखान्यात जायचं आहे आणि नेमके हे घरी नाही."


हे ऐकून आनंदाने स्वतःशी गिरकी घेत माधवराव तिला म्हणाले,"लगेच निघतो ग ताई."


एवढे म्हणून त्यांनी फोन ठेवला. मालतीबाई लगेच म्हणाल्या,"आल्या ताईसाहेब मदतीला धावून,नेमकं माझं काम असलं की यांची काम कशी येतात."


तेव्हा गौरीचा बाब म्हणाला,"आई! मी आणि मानसी जातो त्यांना आणायला."


तसे माधवराव साळसूद चेहरा करत म्हणाले,"मी आलो असतो रे पण...." असे म्हणत माधवराव हसतच घराबाहेर पडले.


इकडे गौरी मॅसेजची वाट पहात होती. तेवढ्यात नोटिफिकेशन मध्ये दिनेशचा मॅसेज दिसला. तिने मॅसेज उघडला. कमल ग्रँडसन असा नंबर पाठवला होता.तिला हसायला आल. आता त्याच नाव पण नाही माहीत.फोन करून बोलणार कसे?


हा विचार करत गौरीने नंबर उघडला आणि....गौरी जोरात ओरडली,कस शक्य आहे?आजूबाजूच्या लोकांच्या माना वळल्या.साहजिक आहे ,"फर्ग्युसन रोडवर,वैशालीच्या बाहेर अस एवढ्या मोठ्याने ओरडतात? ते ही सकाळच्या वेळी. जेव्हा तमाम पुणेकर सिनियर आपले गुलाबी कॉलेज दिवस आठवत नाष्टा करताना. पण गौरीला बसलेला धक्काच एवढा मोठा होता. सोहम? आजोबांच्या मैत्रिणीचा नातू? सोहम देशमुख.



गौरीने लगेच फोन लावला,"सोहम कुठे आहेस? मला लगेच एफ सी रोडवर भेट,लोकेशन पाठवते."


पलीकडून उत्तर द्यायची उसंत न देता तिने फोन ठेवला. सोहमला काहीच कळेना.तरीही त्याने पटापट आवरलं आणि घरून निघाला.त्याला नंतर आजीकडे दवाखान्यात जायचे होते.तिला उद्या डिस्चार्ज होता.


दिलेलं लोकेशन पाहून तो हसला,येडपट. मला वैशाली माहीत नसेल का? इकडे गौरी अस्वस्थ.सोहम कधी एकदाचा येतोय अस तिला झालं होतं.पंधराव्या मिनिटाला सोहमने बाईक स्टँडवर लावली. गौरीने त्याला आत नेले.मस्त वडा सांबरची ऑर्डर दिली.


त्यानंतर मग सोहम म्हणाला,"बोल!काय झालं एवढं?"

तशी गौरी म्हणाली,"तुझ्या आज्जीच माहेरी दुसरं नाव होतं का?" तस सोहम हसत म्हणाला,"गौरी,अरे त्याकाळी नाव बदलणं अगदी कॉमन होत."


तशी गौरी चिडली,"तेवढं माहितीय मला,तू तिकडच नाव सांग आजीचं."


सोहम म्हणाला,"कमल सावंत."

तशी गौरी जोरात किंचाळली,"येसस्स! शेवटी शोध संपलाच."


तस सोहम म्हणाला,"गौरी नीट सांग.काय झालं नक्की?" गौरीने थोडक्यात सांगितलं आणि म्हणाली,"चल लवकर आजीला भेटूया."


इकडे मनोज आणि मानसी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. बरोबर दोन तास उशीराने गाडी आली.गाडीतून दोन ग्रेसफुल आज्जीबाई उतरल्या.त्यांनी मनोजला फोन केला आणि मग त्या एकमेकींना सापडल्या.


मनोज आणि मानसी पाया पडले.गाडीत सामान ठेवलं तस त्या दोघींची ओळख करून दिली,"मी सुमती कुलकर्णी पूर्वाश्रमीची जोशी,दुसरी लगेच म्हणाली,"मी नंदा जाधव पूर्वाश्रमीची पाटील बरं का."

सुमती बोलू लागली,"मी भोरवरून सरळ येणार होते रे ,पण ही नंदी ऐकेना.मग मी भोर व्हाया मुंबई अशी आलेय बोल."

सगळे स्टेशनबाहेर पडले.तशी सुमती म्हणाली,"पुणे किती बदललं नाही."


तशी नंदा म्हणाली,"बघ की,आपण इथून सायकलवर फिरायचो, आता बघ."


असे गप्पा मारत आणि मनोज,मानसीच्या कुटुंबांची चौकशी करत त्या घरी पोहोचल्या.मैत्रिणींना पाहून मालतीबाई प्रचंड खुश झाल्या.


सुमती म्हणाली,"वासे!आहे तशीच आहेस ग."


तशी नंदा म्हणली,"उगीच नाही हिच्यासाठी आपल्या मागे घोळके फिरायचे."


तशा मालतीबाई म्हणाल्या,"अग मुलं आहेत?"


तस मानसी म्हणाली,"आई,ह्या सगळ्या गप्पा आम्ही ऐकणारच आहोत."


तेवढ्यात नंदा म्हणाली,"वासे, अग नवरा कुठंय तुझा?"


तशी मालतीबाई म्हणाल्या,"भेटतील संध्याकाळी."



एवढ्यात सुमतीचे लक्ष भिंतीवरील फोटोकडे गेलं,"ती म्हणाली,"तू मिस्टरांना आमची नाव सांगितली का ग?"


तस मालतीबाई म्हणाल्या,"अग सांगितलं की,कुलकर्णी आणि जाधव अशा दोन मैत्रिणी येतायत म्हणून."


तशी सुमती हसली,"वसे!तू नाव सांगितली असतीस ना तर माधव एका पायावर धावत आला असता आम्हाला घ्यायला."



तशा मालतीबाई म्हणाल्या,"सुमे!अग माधव काय?"



तशी सुमती हसली,"वसे,तुझा माधव हाफ चड्डीत शाळेत जायचा तेव्हापासून ओळखते मी त्याला."



असे म्हणून सुमतीने सगळे सांगितले.तस या चौघांनी मिळून प्लॅन केला.सुमती आणि मालतीबाई म्हणाल्या,"आता येऊ दे घरी मग बघू."




इकडे गौरी आणि सोहम हॉस्पिटलमध्ये पोहोचले.गौरीला पाहुन आजीला खूप आनंद झाला.


तेवढ्यात गौरीने मोबाईल काढला आणि म्हणाली,"आजी हे फोटो बघ ना."


कमलने चष्मा लावला.फोटोकडे निरखून पाहिलं आणि म्हणाली,"अय्या,माधव,दिनू आणि सदा आहेत हे.आणि ही पुढच्या फोटोत वासंती कशी?"


तस गौरी पुढे होत म्हणाली,"आजी,मी गौरी म्हणजे तुमच्या माधव आणि वसूची नात बरं का.आणि हे त्रिदेव तुला एक महिना झाला शोधत आहेत.काल सोहमच्या बाबांकडून त्यांनी सोहमचा नंबर मिळवला."


तस कमल म्हणाली,"माधवला फोन लाव ना."तेव्हा गौरी हसली,"आजी तू सापडलीस हे आपण जरा धक्का देऊन सांगू या." तस आजी हसली,"बर, नाहीतरी हे तिघे खूप खोड्या करायचे.आता जरा वचपा काढू."


तेवढ्यात गौरीने घरी विडिओ कॉल केला.आजीने फोन घेतला,"आजोबांची जासुस,तुला नाही दाखवणार आम्ही माझ्या मैत्रिणी."


एवढ्यात कमल म्हणाली,"वसे,तिला नको पण मला दाखव की?"


तशी मालतीबाई ओरडल्या,"कमे, अग तुझ्याकडे यायचं होत,स्नेहमेळावा आहे ते सांगायला.पण तू पडलीस आणि राहूनच गेलं बघ.तुझा पत्ता मी मिळवला होता."



तेवढ्यात सुमतीला पाहून कमल ओरडली,"अय्या!नंदी आणि सुमी पण आल्यात का?ये सोहम डॉ ना विचार आजच सोडतात का.मी पण जाते गौरीच्या घरी."



तशी तिकडून सुमती ओरडली,"नको! तुला शोधणाऱ्या त्रिदेवांची गंमत करू जरा.त्याआधी हॉस्पिटल
कुठे आहे सांग."


असे म्हणत त्या गप्पा मारत होत्या. गौरीने आजीला हॉस्पिटलचा पत्ता पाठवला.गौरी म्हणाली,"बर आजी येते."


गौरी गेली तशी आजी बोलली,"गोड आहे नाही पोरगी." सोहम पटकन बाहेर गेला.


सुमती,नंदा आणि मालतीबाई यांनी पटापट सगळं आवरलं,गौरीचे आई बाबा आणि मानसीला सगळे समजावून सांगितले.तिघीजणी घराबाहेर पडल्या.कितीतरी वर्षांनी मैत्रिणींची भेट होणार होती.सगळ्याजणी खूप आनंदात होत्या.


इकडे गौरीने फक्त एवढा मॅसेज केला,नातू आज भेटला नाही.उद्या भेटू म्हणाला आहे.माधवराव मॅसेज वाचूनच नाराज झाले.


संध्याकाळी ताईला घरी सोडून माधवराव घरी जायला निघाले. दिवसभर फिरल्याने दगदग झाली होती.दिनू आणि सदाला उद्या तात्काळ भेटू असा मॅसेज करून ते कॅबमध्ये बसले.घरी आले तर घराला कुलूप.


त्यांनी दार उघडले आणि गौरीला फोन केला,"गौरी कुठेय तू ?


घरी कोणीच नाहीय." तस गौरी म्हणाली,"आजोबा आज सगळे बाहेरच जेवून येतील बहुतेक.मानसीआतु आणि आईबाबा मूवीला गेलेत.आजी तिच्या मैत्रिणींना घेऊन बाहेर गेलीय.मी सोहमसोबत आहे."


एवढं बोलून गौरीने फोन ठेवला.तसे माधवराव वैतागले, जा कुठेही जा.मला काय? मी मस्त खाऊन झोपून घेतो.असे म्हणून माधवराव किचनमध्ये गेले.


तिथे वरच मुरंब्याची बरणी पाहून ते अजूनच चिडले.आज तो मुलगा गौरीला भेटला असता तर .शिवाय उद्या मालतीबरोबर जावंच लागणार.तिच्या त्या मैत्रिणीपण आल्या असतील.जाऊदे आपण थोडं खाऊन झोपुया.



उद्याच्या स्नेहमेळाव्यात हा मैत्रीचा मुरांबा गोड होईल.आजवर कथेला दिलेल्या अलोट प्रेमाबद्दल रसिक वाचकांचे आभार.
पुढचा अंतिम भाग चुकवू नका.

🎭 Series Post

View all