मुरांबा भाग 9

मैत्रीच्या शोधाचा अंतिम टप्पा. काय होईल पुढे?
मागील भागात आपण पाहिले की माधव,सदा आणि दिनू भोरला सुमतीच्या घरी पोहोचले. योगायोगाने सुमतीचे यजमान माधवचे वर्गमित्र निघाले. आता पाहूया पुढे.


श्रीनिवास आणि सुमती दोघेही गप्पा मारायला बसल्याने आता कमलचा विषय काढणार कसा? हा भलामोठा प्रश्न उभा राहिला. तिघेही एकमेकांना खुणावत असताना श्रीनिवासला एक फोन आला.

तो तिघांनाही म्हणाला,"माफ करा पण मला जरा बाहेर जावं लागतंय. तासाभरात परत येईन."

मनातला आनंद चेहऱ्यावर दिसू न देता माधव म्हणाला,"काहीच हरकत नाही,निवांत या."

श्रीनिवास बाहेर पडताच तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात चहा आला.

सुमती चहा देताना म्हणाली,"गोड चालत ना रे,की कोणाला गोडाचा रोग(मधुमेह)आहे."

सदा पटकन बोलला,"सुमे आपल्याला सगळं चालत या दिन्या आणि" तेवढ्यात माधवने सदाच्या पायावर पाय मारला.

चहा घेताना दिनकर म्हणाला,

"सुमती आम्ही आपल्या वर्गातील सर्वांना शोधतोय."


सुमती थोडं थांबून म्हणाली,"का रे? आता एवढ्या वर्षांनी."


तेव्हा माधव म्हणाला,"अरे सर्वांचा स्नेहमेळावा भरवायचा विचार आहे."

हे ऐकताच सुमती हात पुढे करत म्हणाली,"दे टाळी,अरे आमच्या कॉलेजच्या मैत्रिणी पण भेटणार आहेत लवकरच. आता वासंती येतच असेल बघ."

तिला थांबवत दिनू बोलू लागला,"सुमती,आम्ही सर्वांना शोधत असताना,कमल काही सापडत नाहीय."

कमल.... नाव ऐकताच सुमती काय बोलेल याची उत्सुकता तिघांना होती.

सुमती मंद हसली,"मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
"माधव न राहून बोललाच,"पण..तू आणि कमल..."
सुमती म्हणाली,
"सांगते,सगळं सांगते. तोवर भजी घ्या. तर चिठ्ठी फळ्यावर लावल्याचा प्रसंग तुम्हाला आठवत असेलच. त्या दिवशी संध्याकाळी आई मला कमलच्या घरी घेऊन गेली.

आम्ही दारातच थांबलो होतो तेवढ्यात कमलच्या काकांचा आवाज आणि मारल्याचे रडण्याचे आवाज येऊ लागले. तिचे काका अतिशय वाईट भाषेत तिच्याशी बोलत होते.तिचे शिक्षण थांबवणार असेही म्हणत होते. ऐकताच आई आत गेली.


तिने कमलच्या काकांना खूप सुनावले. आईला त्याकाळी किती मान होता तुम्हाला माहित आहेच.
तरीही कमलचे काका आईला म्हणाले,"मी एक दमडी सुद्धा देणार नाही. ईथुनपुढे हिचे शिक्षण माझी जबाबदारी नाही."

आई ताडकन म्हणाली,
"मला एक आणखी मुलगी आहे असे समजेल मी."

त्यानंतर घरी आल्यावर आई माझ्याशी एकही शब्द बोलत नव्हती. तो अबोला असह्य होत होता.

तेव्हा मी आईला म्हणाले,"आई हवं तर मला मार,शिक्षा कर पण अबोला धरू नकोस."

तेव्हा आई म्हणाली,सुमे!स्पर्धा असावी पण आज कमलचं आयुष्य पणाला लागलं.का? कशासाठी? आता जोवर कमल तुला माफ करत नाही मी तुझ्याशी बोलणार नाही."


त्यानंतर मी कमलची माफी मागायला तिच्या घरी गेले. तेव्हा कमल मावशीच्या जावेच्या मुलीला जेऊ घालत होती.


ती जाऊ तिला म्हणाली,"कमे बाळाच्या जेवणावर नजर ठेऊ नको,आमच्या मुलांचं जेवून झालं की मग जेवायचं."


मी कमलला बाहेरून हाक मारली.तिला आईने बोलावलं अस सांगून घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर मी फक्त कमलच्या गळ्यात पडून रडत होते.

त्यानंतर तर मी कमल साठी रोज डबा आणत असे व तिचा स्वाभिमान जपला जावा म्हणून मी आणि कमल स्टाफ रूम मध्ये जेवत असू.त्यानंतर आम्ही पुण्यात एकत्र होतो शिकायला.

हे ऐकताच सदा म्हणाला ,"तिचा पत्ता आहे का?"

सुमती हसली,"सदा अरे किती घाई तुला.पत्ता मी देईल पण एका अटीवर."

दिनू म्हणाला,"सुमती काय अट आहे?"

सुमती म्हणाली,"तशी फार मोठी नाही ,फक्त ती चिठ्ठी कोणी आणि कोणासाठी लिहिली ते सांगा."

माधवकडे पहात सदा म्हणाला,"ते आम्ही कमल भेटली की सांगूच.तू दे ना पत्ता."

शेवटी हो नाही करत सुमतीने कमलचा पुण्यातील पत्ता दिला. सगळे निघाले. तेवढ्यात श्रीनिवास परत आले.त्यांचाही निरोप घेऊन तिघे मित्र पुण्याला रवाना झाले.

सुमतीने दिलेल्या पत्त्यावर कमल सापडेल का? वाचत रहा मैत्रीचा आंबट गोड मुरांबा.

🎭 Series Post

View all