मुरांबा भाग 10

कमलच्या शोधत आता आणखी नवे कोणते शोध लागणार?


मागील भागात आपण पाहिले की सुमतीच्या घरी बऱ्याच गोष्टी समजल्या. आपण लिहिलेली एक चिठ्ठी कमल आणि सुमतीच्या आयुष्यात किती बदल घडवून गेले. एवढे सगळे घडेल असे वाटलेच नव्हते. आता कमलचा पत्ता हातात होता आणि सुदैवाने ती पुण्यातच रहात होती.

आता माधव आणि त्याच्या मित्रांचा शोध अंतिम टप्प्यात होता. एवढ्यात गौरीचा फोन आला,

"आजोबा,कुठेय तुम्ही? लवकर या."

माधव हळूच म्हणाला,"ए सी पी आला का?"

तिकडच उत्तर ऐकून फोन ठेवला. दिनूचा चेहरा पाहून माधव म्हणाला,"अरे ए सी पी म्हणजे सखू!मालती इथे नसताना तिला माझी आणि गौरीची प्रत्येक हालचाल कळवते."


पुण्यात पोहोचल्यावर उद्या कमलच्या घरी जायचं अस ठरवून सगळे निरोप घेतात.

इकडे गौरी अस्वस्थ होऊन हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होती. एवढ्यात माधवराव आत शिरले. गौरीने झटपट बॅग हातात घेतली. मधवरावांनी चप्पल काढली व आत आले.


" काय हे आजोबा,आता सखू आली असती ना तर.."गौरी तणतणत म्हणाली.


माधवराव शिळ घालत म्हणाले,"सखू को मारो गोली! मी फ्रेश होतो पटकन."


हे ऐकून गौरी अचंबित होऊन म्हणाली,"म्हणजे कमल???"


माधवराव पुढे बोलणार एवढ्यात सखू आत आली. आत येताना तिने कमल एवढचं ऐकलं.


आत शिरल्या शिरल्या ती म्हणाली,"आगो बाय....ही कमल कोण? नवी कामवाली शोधली का काय दोघांनी? पण आजी मला सोडायची नाय."

हे ऐकून गौरीने कपाळावर हात मारला. माधवराव काहीच न बोलता आंघोळीला गेले.

सखू थोड्या वेळाने चहा घेऊन आली,"बेबी,खायला काय करू?"

माधवराव आणि गौरी एकदम म्हणाले,"मस्त चमचमीत कर काहीतरी." सखू हसली,"बरं! थालीपीठ आणि मस्त मसालेभात बनवते."

एवढ्यात सखूची नजर कोपऱ्यात गेली,"आजोबा! चपला मळलेल्या कशा एवढया?"

गौरीला ठसका लागला. ती पटकन म्हणाली,"बागेत! बागेत काम केलं ना आज."

सखू आत गेल्यावर गौरी रागावली. एवढ्यात तिला काहीतरी आठवलं,"आजोबा! दुपारी एक फोन आलेला,एक आजोबा विचारत होते,वासंती आहे का?" माधवराव म्हणाले,"जाऊ दे चल मस्त जेवून घेऊ."


दुसऱ्या दिवशी गौरी आणि माधवराव उशीराने उठले. दोघेही डोळे चोळत हॉलमध्ये आले. बघतात तर काय? मालतीबाई पेपर वाचत बसलेल्या.

दोघेही पटकन आपापल्या बेडरूम मध्ये पळाले. जरा वेळाने बाहेर आल्यावर दोघे खायला बसले.

एवढ्यात मालतीबाई गोड आवाजात म्हणाल्या,"मला तुम्हाला काहितरी सांगायचंय."

हा गोड स्वर येताच गौरी आणि माधवराव सावध झाले. तरी गौरी म्हणाली,"बोल आजी! काही काम आहे का तुझं?"

मालतीबाई हसल्या,"काम अस नाही ग, तुला माहीत आहेच आमचा स्नेहमेळावा आहे पुढच्या आठवड्यात."


माधवराव सावध होत म्हणाले,"बरं मग?"


तशा मालतीबाई हळूच म्हणाल्या,"त्यासाठी माझ्या काही खास मैत्रिणी आदल्या दिवशी येणार आहेत."


हे दोघे हसले,"एवढंच ना!"


मालतीबाई म्हणाल्या,"एवढंच नाही,त्या आपल्याकडे राहणार आहेत."

हे ऐकून दोघे एकत्र ओरडले,"काय?"

मालतीबाई शांतपणे म्हणाल्या,"हो! सखुशी बोलणं झालं आहे,त्या आल्यावर गौरी आणि तुम्ही एका बेडरूममध्ये असणार आहेत. दोघांनी नीट वागायचं आहे."

यावर उलट उत्तर देणे म्हणजे धोका. दोघेही हो म्हणाले.

माधवराव दुपारी वामकुक्षी घेऊन मग कमलच्या शोधत निघणार होते.

एवढ्यात सदाचा मॅसेज आला,"सावधान वादळ येत आहे."

मॅसेज वाचत असतानाच मालतीबाई आत आल्या. अहो! ऐकलत का?

माधवराव उसनं हसत,"बोल की."

मालतीबाई म्हणाल्या,"कुमुद आणि मला काही खरेदी करायची आहे. तुम्ही ,सदाभाऊजी आणि गौरी बरोबर येताय."

एवढ्यात गौरीचा मॅसेज,"हो म्हणा माझ्या आई पप्पांकडून सक्त ताकीद आहे."

आता कमलचा पत्ता कसा शोधणार?

एवढ्यात त्यांनी दिनूला मॅसेज केला. दिनू जायला तयार झाला. कुमुद आणि सदा आलेच.

आता खरेदी तीसुद्धा तुळशीबाग आणि साड्या व लक्ष्मीरोड. गौरीच डोकं दुखायला लागलं. सदा गाडी चालवत होता.

कुमुद म्हणाली,"मालू! आधी पेशवाईत जाऊ या का?"

मालतीबाईंनी लगेच होकार दिला,"हो ग इरकल आणि पैठण्या घेऊ."

हे ऐकून गौरी म्हणाली,"कम ऑन यार आजी! तू मला का आणलं आहेस या खरेदीला?"


तसं मालतीबाई हसल्या,"गौरे आम्हीसुद्धा कधीतरी तरुण होतो. साडी हा संध्याकाळी घालायचा पोशाख आहे. सकाळची थीम रेट्रो लूक आहे."


हे ऐकताच गौरी किंचाळली,"काय सांगतेस काय आजी. मग आपण मस्त प्लाझो,स्कर्ट आणि ऍक्सेसरी घेऊ."

हे ऐकून सदा आणि माधव पेटले होते.

पेशवाई,तथास्तु,स्वामिनी झालंच तर मॉल्स हे सगळं पाच सहा तास फिरून सगळी खरेदी झाली.

तेव्हा गौरी म्हणाली,"आजी आता जेवण बाहेरच." एवढ्यात दिनूचा मॅसेज आला,\"पत्त्यावर जाऊन आलो,कमल सध्या दवाखान्यात आहे. दोन दिवसांनी घरी सोडतील. तेव्हा भेटता येईल. पत्ता बरोबर आहे. काळजी नसावी.


कमल भेटल्यावर काय होणार? पुढील भागात कमल भेटणार का? वाचत रहा आंबट गोड मुरांबा.

🎭 Series Post

View all