Mar 02, 2024
सामाजिक

मुरळी

Read Later
मुरळी

*मुरळी*
     आटपाट गावातील पाटलांच्या घरातल्या एकुलत्या एक मुलाचं यशवंताचं स्थळ गरीब शेतकरी दामोदर जाधवाच्या लेकीसाठी दामिनीसाठी आले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.
     दामिनीने नुकतेच सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते. दहावी शिकलेली दामिनी दिसायला नक्षत्रासारखी होती. गव्हाळ कांतीला तिचे टपोरे डोळे खूप साजेसे वाटायचे. बाप म्हणेल तीच पूर्व दिशा म्हणून ती बोहल्यावर उभी राहिली. राजबिंड्या यशवंताचा आणि नाजुक दामिनीचा जोडा लक्ष्मी-नारायणासारखा दिसत होता. लग्नानंतर दामिनी लगेचच घरात रूळली. पण सासूचा स्वभाव खाष्ट आणि नवरा जरा रागीट म्हणून ती जरा जास्तच अबोल झाली होती. 

   लग्नाच्या दोन वर्षानंतर दामिनीला दिवस गेले होते. माहेरी नीट सोय होऊ शकणार नाही म्हणून तिचे बाळंतपण सासरी करायचे ठरले. सासू कितीही खाष्ट होती तरीही सुनेला खूप जपत होती. तिचे खाण्यापिण्याचे डोहाळे पुरवत होती.  अखेरीस दामिनीचे दिवस भरत आले. घरातल्या बाळंतीणीच्या खोलीतच दामिनीची व्यवस्था केली. गावातल्या एक सोडून दोन-दोन सुईणी आल्या होत्या तिच्या बाळंतपणासाठी....! इकडे दामिनी कळा सोसत होती तसे यशवंतराव बाहेर येरझारा घालत होते.
     
   खोलीत बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला आणि यशवंतरावांनी ही सुटकेचा निश्वास टाकला.   प्रसुतीच्या प्रचंड कळा सहन करून दामिनीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.  डोळे आईसारखे असले तरी नाक मात्र बाबांसारखे तरतरीत घेऊन जन्माला आलेली. दामिनीच्या आनंदाला पारावार नव्हता. आई होण्याचं सुख पहिल्यांदा अनुभवत होती. तितक्यात बाळंतिणीच्या खोलीत तिचे पती आणि सासूबाई येतात आणि चेहर्‍यावर कोणताही भाव उमटला नव्हता.

     दामिनी कौतुकाने बाळाला देते तेव्हा सासूबाई काहीच न बोलता आपल्या लेकाला यशवंतला इशारा करून जातात. लगेच यशवंत बाळाला खाली ठेवून बोलतो, " दामिनी हे बघ आपल्या पाटलांच्या घरात पहिला जन्म मुलाचाच झालाय. आपण देवाला नवस बोलू की आपल्याला मुलगा होऊ दे आणि ही मोठी झाल्यावर हिला देवाचरणी देऊ." ह्याचा अर्थ असा की बाळाला मुरळी देऊ असा आहे हे तिला कळून चुकले कारण यशवंतला एक धाकटी बहिण आहे,  पण तिला  पण मुरळी  म्हणून सोडली होती.  यशवंतराव आई गेली हे बघून बाळाला स्वतःच्या छातीशी कवटाळले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तिच्या गळ्यात घातली. आणि बाहेर नातेवाईकांना दाखवायला म्हणून बाळाला घेऊन गेले.

     नवर्‍याला उलटून बोलणे तिच्या संस्कारात बसत नव्हते. बाप लेकीला जीव लावतो पण कारण नसताना लेकीला नको त्या दलदलीत टाकतोय हे ठाऊक असूनही दामिनी शांतच होती. यशवंतरावांनी लाडाने टिव्ही मालिकेत असतं तसं मुलीचं नाव संजीवनी ठेवलं. संजीवनी दोन वर्षांची झाली तेव्हा पुन्हा एकदा घरात पाळणा हालला. ह्या खेपेला मुलगा झालेला. त्याच्या येण्याने सगळे आनंदी झाले म्हणून त्याचे नाव दामिनीने हट्टाने आनंद ठेवले. हळूहळू दोघेही मोठे होते आणि यशवंतरावांच्या डोक्यातून मुरळी देण्याचा विचार निघून गेला होता. नातेवाईक जेव्हा तिला देवाचरणी देण्याचा सल्ला देत होते तेव्हा यशवंतरावांनी ते त्यांच्या लाडकीला मुरळी म्हणून देणार नाहीत ते निक्षून सांगितले.  संजीवनी आणि आनंद दोघेही अभ्यासात हुशार होते. संजीवनी अभ्यासाव्यतिरिक्त खेळात पारंगत होती. यशवंतराव गंमतीत बोलायचे, "माझी जीवी तेंडुलकर होणार आणि हा आनंद होईल मोठ्ठा चित्रकार होणार.." त्यावर दामिनी काही न बोलता त्या बापाच्या डोळ्यातला आनंद बघून मनातून सुखावली.

     त्या दिवशी आनंदाचा अकरावा वाढदिवस होता. त्या दिवशी दुपारी शेतात खेळत असताना आनंदला साप चावतो. गावात चांगला दवाखाना नव्हता. नीट उपचार न मिळाल्याने आनंद दगावतो. घरावर मोठा डोंगर कोसळला. आनंदच्या तेराव्याच्या दिवशी गावात आणि नातेवाईकांमध्ये कुजबुज सुरू झाली की एव्हाना संजीवनीला देवाला सोडली असती  तर  बरं झालं असतं. आनंद मेला नसता. नेमकी ही गोष्ट यशवंतराव आणि तिच्या सासूबाईंनी ऐकली. सगळे सोपस्कार पार पाडले आणि घरात बैठक घेऊन संजीवनीला देवाला सोडून द्यावं असा निर्णय घेतला. दामिनीला काही बोलताच नाही आले नवर्‍याच्या रागासमोर. गोंधळाचा दिवसझ उजाडतो. दोन दिवस आधीपासूनच यशवंतरावांची बहिण जनाई पण आलेली. तिला नकळत संजीवनीचा लळा लागला होता. जेव्हा संजीवनीला तिची ओळख जनाईशी करून दिली तेव्हा एका मायेच्या ममतेने ती जनाईला बिलगली. जनाईला संजीवनीमध्ये तीच दिसत होती. तिला दुसरी जनाई होऊ द्यायचे नव्हते; पण तिलाही कुठलाच मार्ग दिसत नव्हता

   

पुजेसाठी म्हणून संजीवनीला बोलावलं तेव्हा ती कुठेही सापडली नाही अन् दामिनी पण दिसत नव्हती.

 

जनाईने दोघींना तिथून पळून जायला समजावून सांगितले आणि बाहेर पडायला मदत केली . तिला संजीवनीला दुसरी जनाई होऊ द्यायचे नव्हते. दिवस सरत होते. सगळे जण दोघी मायलेकींचा पाठलाग करून दमले होते तरी त्या कुठे सापडल्या नाही. दुसरीकडे दामिनीने संजीवनीला घेऊन मुंबई गाठली. चार घरची धुणीभांडी करून, दहावीपर्यंत शिकली होती म्हणून एका शाळेत काम करून संजीवनीला शिकवत होती. ती संजीवनीच्या अभ्यासाच्या बाबतीत खूप कडक होती. तिला घरकाम आणि खेळ सोडून फक्त अभ्यासात गुंतवणे दामिनीला तिच्या हिताचे वाटले. अशीच दहा वर्षे पूर्ण झाली.


     दामिनीची एवढीशी लेक संजीवनी पूर्ण युनिव्हर्सिटीत पहिली आलेली आणि एक डाॅक्टर झाली. नंतर  वर्षभराच्या आतच पुन्हा आटपाट नगरात जाऊन जिथे गोरगरिबांसाठी नवीन मोफत दवाखाना उघडला तिथे रूजू झाली.  उद्घाटनाच्या आटपाट नगरातील काही सारे ग्रामस्थ  उपस्थित होते, पण संजीवनीची नजर ज्यांचा मागोवा घेत होती ते तिचे बाबा मात्र नव्हते. कदाचित आटपाट नगर खूप मोठे झाले असल्याने माणसांच्या आपुलकी  आणि विश्वासातला दुरावा इथेही विरतो हे तिला प्रकर्षाने जाणवले.
    
       असेच दिवस जात होते.  संजीवनी  तिच्या कामात रूळली होती; पण आईने एकदाही बाबांचा उल्लेख केला नाही हे तिला खटकले होते. लहानपणापासून ते आत्तापर्यंत बाबांना वाईट बोललेले आईला चालायचे नाही. आता स्वतःहून आईसमोर बाबांचा विषय काढला तरी आई टाळत होती.
     एके दिवशी रात्री  emergency आल्याने 12 वाजताच संजीवनीला दवाखान्यात जावे लागले. दवाखान्यात एक नऊ वर्षांच्या मुलाला साप चावला आणि तो सबंध पाय निळा पडतो. त्या मुलाची आई संजीवनीला गयावया करत होती. खूप शर्थीचे प्रयत्न करून संजीवनी त्या मुलाला वाचवते. रात्रभर जागी असल्याने संजीवनी खूप उशीरा दवाखान्यात जाते. "तुमचे खूप आभार डाॅक्टर ताई. माझ्या लेकाला वाचवलंत ओ काल तुम्ही. तुम्ही नसता तर आज तो नसता. तुमच्यासारख्या डाॅक्टर असते तर माझा आनंदपण वाचला असता". आनंद नाव ऐकून पाठमोरी उभी असलेली संजीवनी वळते तर समोर तिचे बाबा उभे असतात.  त्यांच्या तोंडून एकच शब्द आला "जीवी"! ज्या नावाने ते तिला लहानपणी हाक मारायचे.  तेवढ्यात त्या मुलाची आई येते आणि बोलते, " पोरी काल माझा संजय तुझ्यामुळे वाचला गं. संजयचे बाबा काल घरी पण नव्हते. " सगळं ऐकून संजीवनी जागच्या जागी स्तब्ध होते.

       " अगं ऊर्मिला , ही माझी पोर आहे संजीवनी. जी मला सोडून गेली होती. आता बघ आली परत बापासाठी. शेवटी बापाला लेकीशिवाय कोण जास्त समजू शकतं."  यशवंतराव बोलले. "हे बघा मी तुमची कोणीच नाही. माझी इतकी काळजी असती तुम्हाला तर तुम्ही मला मुरळी देण्यासाठी हट्ट धरला नसता. माझ्यासाठी माझा बाप माझी आईच आहे.  तुम्ही येऊ शकता." संजीवनी उत्तरली.

       हे ऐकून दोघे बाहेर पडणार तितक्यात समोरून दामिनी संजीवनीसाठी जेवणाचा डबा घेऊन आलेली असते. काहीही न बोलता यशवंतराव मान खाली घालून त्यांच्या बायकोसह निघून जातात. दोन दिवसात संजय ठणठणीत बरा होतो. त्याला संजीवनीचा नकळत  लळा लागला होता. संजीवनी त्याची डाॅक्टर या नात्याने सुश्रुषा करत होती पण त्याच्याशी संभाषण करणं टाळत होती. डाॅक्टर ताईने माझा जीव वाचवला आणि ती आपली बहीणच आहे हे त्याच्या बालमनावर ठसले होते. शेवटी डिस्चार्ज झाल्यावर संजय संजीवनीजवळ येऊन बोलतो, "ताई मला कळलं तू माझी बहीण आहेस ते. तुला माझ्याशी बोलायचे नसेल तर नको बोलू चालेल मला. पण मी मोठा झालो तर तुझ्यासारखाच डाॅक्टर होईल आणि गरीबांची सेवा करेन. "
     हे ऐकून उपस्थित सारे भारावून गेले.खरं तर दामिनीने संजीवनीला मुरळी म्हणून सोडलेली पण देवी सरस्वतीच्या चरणी तेही  जगात गोरगरिबांच्या सेवेसाठी !

~ऋचा निलिमा
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//