मुंगी साखरेचा रवा!

Being small is always a reason to be happy.

गोष्ट छोटी डोंगराएवढी -(१९)
विषय- लहानपण दे गा देवा!


लेख शीर्षक - मुंगी साखरेचा रवा!

लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा!
वरील ओळी ऐकायला व वाचायला खूप छान वाटलं कारण सर्वांना या ओळी वाचल्या की बालपणीचा काळ सुखाचा ! असं आठवतं.

पण मनात विचार येतो की खरच बाळपणीचा काळ सुखाचा होता का?

तर मला असं वाटतं की बाळपणीचा काळ सुखाचा होता असं आपल्याला मोठेपणी वाटतं, मागे वळून बघताना ! कारण आता आपण जबाबदारांनी वेढलो गेलो आहोत आणि आता आपल्याला असं वाटतं की लहान मुलांना तशीच जिम्मेदारी, जबाबदारी, कमावण्याचा ताण नाही म्हणजे तो काळ मुक्त आणि सुंदर असतो असं.

पण खरंच लहान मुलांना लहानपणी असं वाटतच नाही की हा काळ सुखाचा आहे.

लहान असलेल्या मुलांना मोठं होण्याचं एक वेड असतं, त्यांना त्यांचे त्या स्तरावर टेन्शन्स व ताण असतात की.

आजकालच्या मुलांना तर आपल्यापेक्षाही खूप जास्त प्रेशर आणि ताण आहे असं मला वाट तं.

त्यामुळे तो काळ कसा सुखाचा हे कळत नाही पण सतत बंधनात ठेवणं मुलांना आवडत नाही.

त्यातल्या काही सुखवस्तू कुटुंबात बालपण सुखात जातही असेल, काही त्रासाविना व लाडाकोडात .
परंतु कितीतरी चिमुरड्यांना जेव्हा रस्त्यावर काम करताना पाहतो , झोपडपट्टीच्या बाहेर अनवाणी पायांनी खेळताना पाहतो, मळलेल्या व फाटक्या कपड्यात ,आईच्या कडेवर पाहतो तेव्हा मनात येऊन जातो बालपणीचा काळ सुखाचा ही म्हण यांच्यासाठी नाहीच!

कदाचित ते पुढे सुखी होतील किंवा नाही होतील देव जाणे , पण लहानपण इतक्या कष्ट जाणंही दुर्दैवच.

पण मुळात विषय म्हणून दिलेल्या वाक्यचा अर्थ केवळ बालपणीचा काळ सुखाचा किंवा बालपणीच्या सुंदर आठवणीच आहे असंही नाही.

मी या विषयावर जेव्हा खूप जास्त विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की "लहानपण देगा देवा" ही म्हण वेगळ्या अर्थाने म्हणलेली असू शकते.

म्हणजे तुकोबांनी जेव्हा हा अभंग किंवा भजन लिहिलं तेव्हा त्यांना काय अर्थ अभिप्रेत होता?

तुकोबा म्हणतात मनुष्याने सदैव नम्र असावे किंबहुना कमीपणाने वागले असता त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच मनुष्याने अंगी नम्रपणा बाळगला असता त्याचे आयुष्य कसे आनंददायी आणि सुखकर होते परंतु तोच व्यर्थ थोरपणा मिरविला तर ते कसे कष्टदायी होऊन तेच पुढे कसे मग नरकाची वाट देखील दाखवते.

स्वतःला मोठेपण घ्यायचा नाही म्हणजे पर्यायाने अहंकारी व्हायचं नाही.
जो माणूस स्वतःकडे कमीपणा घेतो, तो सुखी राहतो आणि जो अहंकारी असतो त्याला त्रास होतो.
त्यामुळे मग भांडण होवो की तंटा किंवा कुणाशी रागलोभ असो पण एक पाऊल माघार घेणं सुद्धा खूप मानाचं काम असतं.

एखादी गोष्ट कमी असणं आणि आहे त्यात समाधानी असणं असा सुद्धा त्या वाक्याचा अर्थ होतो होऊ शकतो असं मला वाटतं .

तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात की मला लहानाहून लहान बनव. कमी पणातही आनंदी राहिलं तर माणसाला मोठं होण्याची गरज रहात नाही.
मुंगी साखर खाते पण ती लहान आहे म्हणून कुणाच्या नजरेत येत नाही .
पण कुणी स्वतःला अगोदरपासूनच मोठा समजत असेल किंवा आकाराने मोठा असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट लोकांच्या नजरेत येते व तो मोठेपणा मिरवण्यासाठी त्रासातच जगतो. तो सुखा समाधानाने किंवा आनंदात राहू शकत नाही.

तुकाराम महाराजांची अभंगाची ओळ ही आजच्या काळातही तितकीच प्रासंगिक आहे.

बोला पुंडलिक वर दे ,
हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम!


चित्र- गूगलच्या सौजन्याने साभार.


लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी

दिनांक १३. ११. २२