मम्माज बॉय भाग 1

Aai Ani Mulachi Gosht

"आई, तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे." परेश आपल्या आईला म्हणाला.


"वा..सुनेत्रा, तुझा मुलगा तुझ्या शब्दाबाहेर नाही! नाहीतर आमची मुले लव-मॅरेज करून मोकळी झाली. ना आम्हाला विचारलं, ना त्या मुलीच्या आई -वडीलांना." जमलेल्या भिशी ग्रुपच्या बायका सुनेत्रा ताईंना म्हणाल्या. 

"मग कोणी मुलगी आहे का पाहण्यात? म्हणजे आता आम्हालाही तयारीला लागायला बरं."

हे ऐकून सुनेत्रा ताईंनी देशमुखबाईंकडे एक नजर टाकली आणि काही न बोलण्याची खूण केली.

"रोज स्थळ येतात. त्यातलीच एक बघायची." असे म्हणत सुनेत्रा ताईंनी भिशीसाठी जमलेल्या आपल्या मैत्रिणींना निरोप दिला.

"अनिता, उद्याच तुझ्या मुलीला घेऊन ये घरी. मनात आलंच आहे तोपर्यंत पाहण्याचा कार्यक्रम करून टाकू. परेश काही माझ्या शब्दाबाहेर जायचा नाही."


दुसऱ्या दिवशी देशमुख बाई आपले पती, मुलगी सेजल यांच्यासह सुनेत्रा ताईंच्या घरी हजर झाल्या. सुनेत्रा ताई सेजल विषयी खूप ऐकून होत्या. सेजल मॉर्डन होती, तसेच रूढी, परंपरा, घर सांभाळणारी देखील होती. तशी ती याआधी घरी बऱ्याच वेळा येऊन गेली होती. पण आजचा तिचा एटीट्यूड काही वेगळाच होता. अर्थातच तो छान होता त्यामुळे सुनेत्रा ताईंना सेजल बघताच क्षणी पुन्हा एकदा आवडली.

आता आईला सेजल आवडली म्हणताना परेशला देखील आवडायला काही हरकत नव्हती. तसे आधीपासूनच दोघे एकमेकांना ओळखत होते. पण आत्ताची भेट वेगळीच होती. त्यानेही होकार दिला. तसे परेश आणि सेजलचे लग्न निश्चित झाले.

आपली लग्नाची सारी खरेदी परेशने आईच्या पसंतीने केली. सेजलला आश्चर्य वाटले, \"परेश आपल्या आईच्या शब्दाचा एवढा मान ठेवतो!\"


लग्न झाले आणि सेजल सून म्हणून घरी आली. चार-पाच दिवस अगदी आनंदात गेले. 

"आई, आम्ही हनिमूनला कुठे जाऊ?" परेश आपल्या आईला म्हणाला. हे ऐकून सेजल परेशला आपल्या कोपराने ढोसू लागली आणि हळूच म्हणाली, "हे आपण ठरवूया ना, त्यात आईला काय विचारायचे?" 

परेश आणि सेजलची हालचाल सासरेबुवांनी नेमकी पकडली. "अरे, ती म्हणते ते बरोबर आहे. हनिमूनला जाताना आई-वडिलांना विचारून जाणार का? तुम्ही दोघांनी आपापसांत चर्चा करून काय ते ठरवा."


"तसे नाही बाबा, या आधी आईचे आणि माझे या विषयावर बोलणे झाले होते म्हणून तिला विचारले." परेश पुन्हा आईकडे वळाला. "आई तू सांगतेस ना?"


"परवाचा आपण दोन-तीन ठिकाण निश्चित केली होती. त्यातलच एक बघ आणि सेजलला विचार. शेवटी तिची पसंती महत्त्वाची." सुनेत्रा ताईंनी आपलं मत सांगितलं.


अखेर सेजलच्या पसंतीने हनिमूनचे ठिकाण ठरले आणि दोघेही तिकडे रवाना झाले. 

तिकडे पोहोचल्या पोहोचल्या परेशने आपल्या आईला फोन लावला." आई आम्ही आत्ताच पोहोचलो आहोत. इथे रूमही अगदी छान आहे. सगळ्या सोयी आहेत." 


हे ऐकून सेजल चिडली. "परेश, प्रत्येक गोष्ट आईला सांगायलाच हवी का? वुई यार अडल्ट नाऊ..किमान आपलं लग्न झालंय हे तरी लक्षात घे."


"ते मला माहिती आहे. पण आईचं आणि माझं नातं खूपच वेगळं आहे. मी सगळ्या गोष्टी आईशी शेअर करतो आणि त्यात मला काही चुकीचं वाटत नाही.

"अरे, मीही बऱ्याच गोष्टी माझ्या आईशी शेअर करते. पण प्रायव्हसी नावाचा काहीतरी शब्द असतोच ना? इथून पुढे तो फक्त लक्षात ठेव म्हणजे झालं." सेजलने हा वाद तिथल्या तिथेच मिटवून टाकला. 


नंतर आठ दिवस दोघेही मस्त हिंडले फिरले. दिवसभर परेश आपल्या आईला विसरून जायचा. मात्र रात्र झाली की त्याला आपल्या आईची आठवण यायची. रोज रात्री न चुकता तो आपल्या आईला फोन करायचा आणि दिवसभर काय काय केलं याची माहिती पुरवायचा. हे पाहून सेजलला राग येत होता. पण तिने शांत राहण्याचा प्रयत्न केला. कारण हे आठ दिवस पुन्हा वाटायला येणार नव्हते.


तिथे सेजलने स्वतःसाठी जितकी शॉपिंग केली, तितकीच शॉपिंग परेशने आईला विचारुन आपल्या आईसाठी आणि बहिणीसाठी केली. कारण काय, त्यांना काही घेतलं नाहीतर दोघीही चिडतील म्हणून!


आठ दिवस कसे भराभरा गेले. सेजल आणि परेश घरी आले. 


"आई, उद्यापासून मी ऑफिस जॉईन करावे म्हणतो. यावर तू काय म्हणतेस?" परेश चहा पिता पिता आपल्या आईला म्हणाला.


"तुला जे योग्य वाटते ते तू कर. तुझ्या बायकोला विचार हवं तर." सुनेत्रा ताई सेजलकडे पाहत म्हणाल्या.


"माझे काय? तुम्ही दोघं ठरवाल तेच होईल. माझ्या मताचा आदर इथे आहे का कोणाला? मी चार दिवस माहेरी राहायला जाणार आहे. तसंही लग्न झाल्यानंतर जाणे झालेच नाही. अगदी आजच जाईन म्हणते." सेजल आवरायला आत पळाली.


"हिला असे अचानक चिडायला काय झाले? मी बोलते अनिताशी." सुनेत्रा ताईंनी आपल्या मैत्रिणीला फोन लावला. 


परेश रूममध्ये आला आणि त्याने तिथूनच आईला विचारले, "सेजलला सोडायला तिच्या माहेरी जाऊ ना?" 

हे ऐकून सेजलच्या डोक्यात तिडीक गेली.


"परेश, तू आईंच्या सांगण्यावरून मला सोडायला येत आहेस? तुला स्वतःला मनातून काहीच वाटत नाही ना? तुझ्या आयुष्यात फक्त आई आणि आईच..आम्ही कोणीच नाही का तुझे? तू मला सोडायला येण्याची काहीच गरज नाही. माझी मी जाईन." 

परेश विषयी आपल्या मनात राग ठेवून सेजल आपल्या माहेरी निघून गेली. 


क्रमशः





🎭 Series Post

View all