मुलीची आई

How Peoplec Behave With Mother Of A Girl Child

लेखाला सुरुवात करण्याआधीच सांगायला आवडेल हा लेख मी माझ्या ओळखीच्या व्यक्तींने सांगितलेल्या तसेच माझ्या काही अनुभवांवर आधारित आहे.. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.. त्यातली ही आमची बाजू...
*मुलीची आई*
सध्याच्या जगातले सगळ्यात अवघड काम..
१. मुलीचा जन्म झाल्यावर लोकांच्या टिपिकल प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करणे..
२. मुलगी मोठी होत असताना, पहिली असेल तर होउन जाउ दे एखादा मुलगा.. वंशाला दिवा वगैरे.. एकाला दुसरे असावे कोणीतरी..
दुसरी मुलगी असेल तर अरे बापरे, दोन्ही मुली आता म्हातारपणी तुम्हाला कोण बघणार? यावर फक्त दुर्लक्ष करणे.
३. मुलीचे छान छान ड्रेस मध्ये फोटो काढले कि मुलींचे किती छान छान कपडे असतात, मुलांसाठी काहीच नाही..फक्त हसणे..
४.मुली वयात येत असताना त्यांच्यावर बुरी नजर टाकणाऱ्या मुलांपासून वाचवणे.
५. त्यांना थोडेफार काम शिकवण्याचा प्रयत्न करणे..झाली तर झाली आपल्याला मदत हा छुपा हेतू..
६. त्यांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे नाही पण आपल्या कुवतीनुसार जपणे..
७.मुलगी हुशार असेल तर, मुली काय बाबा हुशारच असतात..ढ असेल तर अरे देवा आता हिचे काय होणार अशा गोष्टींकडे कानाडोळा करणे.
८. मुलीच्या other activities मध्ये तिला प्रोत्साहन देणे, तिच्या वेळा सांभाळणे..
९. मुलीचे लग्न झाल्यावर ती जर कामाला जात असेल तर सासरच्या मंडळींचे ती घराकडे कशी दुर्लक्ष करते हे ऐकणे
१०. ती जर गृहिणी असेल तर ती कशी आरामात जगते , आमचा मुलगा किती कामे करतो हे टोमण्यात ऐकणे.
११. मुलीचे बाळंतपण करणे.. ते झाल्यावर तुम्ही बाळाला किती चुकीचे सांभाळलेत, आम्ही किती छान करतो त्याचे हे ही ऐकणे..
१२.. सगळ्यात बेस्ट म्हणजे मुलीचे आणि जावयाचे भांडण झाले कि तो सगळा आळ आपल्यावर घेणे वर मुलीच्या आईमुळे घटस्फोट होतात हे ऐकणे...
यादी संपतच नाहीये.. पण हि जर यादी करत बसले तर लेख मारुतीच्या शेपटीसारखा वाढतच जाईल..म्हणून इथेच यादी आटोपती घेते..
खरेतर बर्‍याचशा होणाऱ्या आईंना आपले बाळ प्रिय असते..अशा वेळेस मुलगी झाल्यावर लगेच एकाला दुसरे होउ दे हे वाक्य येतेच.. प्रमाण थोडे कमी झाले असेल पण बंद नाही.. पण हेच जेव्हा मुलगा होतो तेव्हा मात्र अरे वा.. किती छान लहान कुटुंब.. का? मुलाला बहिणीची किंवा भावाची गरज नसते? अशा वेळेस मुलीच्या आईने फक्त दुर्लक्ष करायचे. कारण बोलून फायदा नसतो.. पण त्या आईला अशा वेळेस वाईट वाटत आहे कि नाही याचा विचार कोण करतो.. आजकाल बर्‍याचशा आया working आहेत ,होत्या.. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाची माहिती आहे.. कोणाशी कुठे कसे वागावे हे माहित असते, हेच त्या आपल्या मुलांना, मुलींना शिकवत असतात.. किंवा आजकालच्या मुलांना जिथे मोबाईल पासून सगळे न शिकवता येते, त्यांच्यामध्ये हे गुण सुद्धा येतात. अन्याय सहन करायचा नाही, जिथे शक्य असेल तिथे दुसर्‍यांवर होणारा अन्याय दूर करायचा प्रयत्न करायचा हे शिकवणे चूक? पेपरमध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या अनेक बातम्या आपण वाचतो, त्यावर चूकचूक करून सोडून देतो. अजूनही दुसर्‍या मुलीचे आपल्या समाजात प्रेमाने स्वागत होत नाही.. तिसर्‍या मुलीचा तर विचारच सोडायचा आणि हे सगळे आजच्या काळात ही सुशिक्षित समाजात होत आहे.. अशा वेळेस जर एखादे जोडपे फक्त एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचे प्रेमाने संगोपन करत असेल तर कोणाला त्या आईवडील व मुलींच्या प्रेमाबद्दल बोलायचा हक्क आहे? एकतर्फी प्रेमप्रकरणात मुलींची होणारी हत्या , त्यांच्यावर होणारे ॲसिडअटॅक यांबद्दल वेगळे काही बोलायचे? बलात्कार करणाऱ्यांना सहा महिन्याच्या बालिकेपासून ७० वर्षांच्या बाईपर्यंत कोणीही चालते, अशा दुर्जनांपासून स्वतःच्या मुलींना वाचवणे हे फक्त तिच्या आईवडिलांनी जबाबदारीने करायचे? आजच्या काळातही स्त्रीने घर चालवायचे हे सगळ्यांना हवे असते पण किती घरात मुलांना स्वयंपाक शिकवला जातो? मुलींना जसे चल ग पाटपाणी घे असे सांगतो तसे मुलांना सांगितले जाते? आजच्या भरपूर संधी असलेल्या जगात प्रत्येकाला उडायचे असते.. आणि जसे प्रत्येक आई वडील आपली स्वप्ने आपल्या मुलांद्वारे पूर्ण करायचा प्रयत्न करतात.. तशी प्रत्येक आईही आपल्याला करिअर मध्ये , संसारात आलेल्या अडचणी आपल्या मुलीला येउ नये असा प्रयत्न करते मग ती वाईट का?
माझी आजी( वडिलांची आई) लहानपणी एक गोष्ट सांगायची ज्यात त्या सुनेची आई शेवटी गाढव होते. का कुणास ठाऊक हि गोष्ट तेव्हासुद्धा पटायची नाही. कारण माझी दुसरी आजी(आईची आई ) संधीवाताने आजारी असल्याने कुठेच बाहेर जायच्या नाहीत. आणि कोणालाच कधीही सासरच्यांशी भांड , वेगळी रहा असे सांगतानाही पाहिले नाही, तरिही असे का? असा प्रश्न मनात यायचाच . जुने किंवा नवीन चित्रपट पाहा, मालिका घ्या, बर्‍याचदा खलनायिका मुलीची आई , आणि वडील अगदीच शामळू.. असे किती ठिकाणी दिसते? सगळे जावयाला छळणार्या विनोदात मानाचे स्थान मुलीच्या आईला का? खरेतर अजूनही आपल्या समाजात जावयाचा मान असतो, त्यामुळे त्याच्याशी आदरानेच बोलले जाते , त्याचा योग्य तो मानपान राखला जातो.. त्यातही पुढाकार असतो सासूचा तरिही ती वाईट? Whatsapp University मध्ये मध्यंतरी एक video पाहिला, त्यात एक बाई जीव तोडून सांगत होत्या कि मुली त्यांच्या आईला सतत फोन करतात, सगळ्या गोष्टी सांगतात.. मग आई तिथून काय करायचे हे सांगते.. आजकाल जिथे सहा सात महिन्यांची मुले कोणते कपडे घालायचे हे आईला सांगतात तिथे 20,22 च्या पुढच्या मुली आईचे ऐकतील? आणि जर मुलगी बाहेर गेल्यावर आईला फोन करत असेल तर मुलाला कोणी अडवले आहे का घरी फोन करायला? त्यानंतर दुसरा मुद्दा मुली घरातल्यांचा आदर करत नाहीत. माझ्या एक खूप आवडत्या लेखिका आहेत. त्यांचे एकूण एक पुस्तक वाचायचा मी प्रयत्न केला आहे.. पण आताच्या त्यांच्या नवीन पुस्तकांमध्येही असते कि जास्त पैसे कमावणारी सून ही वाईटच असते, तिला पैशाचा माज असतो वगैरे वगैरे.. जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात तशी प्रत्येक माणसाचा स्वभाव ही सारखा नसतोच आणि यावर सगळेच सहमत असतील. आणि आपल्या आसपास अशा किती उद्धट मुली आपल्याला दिसतात? तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट social media वर video च्या रूपाने टाकता तेव्हा ज्यांना लिहिता वाचता येत नाहीत तेही ते बघत असतात त्यांच्या आकलनशक्तीनुसार समजून घेत असतात अशा वेळेस शब्द जपून वापरायला नको? एका video मध्ये असे म्हटले गेले कि काही झाले तरी माहेर कमी करा? का?? लग्न झाले कि आईवडिलांचे प्रेम संपते , त्यांच्याबद्दलचे कर्तव्य संपते? तुम्ही तुमचे प्रश्न माहेरी नेऊ नका? मग कोणाला सांगायचे? आणि मग गुजरात मध्ये त्या मुलीने केली तशी आत्महत्या करायची? मग तिच्या आई वडीलांनी काय करायचे? अजून एक मुद्दा त्या माहेरचे रितीरिवाज पाळतात.. यावर फक्त एक उदाहरण.. एक बाई वय वर्षे ८५.. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना माझी आई या सणाला हे करायची मीही तेच करते.. पण सुनेने माहेरचे काही केले कि कशा स्वतःच्या पद्धती आमच्या डोक्यावर मारतात असा सगळ्या नातेवाईकांकडे गळा काढायचा.. असो..किती आईवडिलांना मुलीचा संसार मोडावा असे वाटेल ? अगदी हजारात काही उदाहरणे असतील.. पण त्यामुळे बाकी लोकांना बदनाम करण्यात काय मतलब? शेवटी आपलं मुल , मुलगा किंवा मुलगी सुखी असले म्हणजे झाले नाही का? So please यापुढे तरी दुसर्‍या बाजूचाही विचार करायला लागा..
*सारिका*