Jan 19, 2022
नारीवादी

मुलगी झाली हो

Read Later
मुलगी झाली हो

घरात आई, बाबा, आजी, आजोबा, काका आणि कविता, असं पंचकोनी कुटुंब !!कविता चे घरात सगळ्यात जास्त लाड कोणी करत असेल तर तो होता काका ! कविता जे मागेल ते कविताला आणून देणे, कार मधे मस्त गाणी लावून तिला फिरवून आणणे, तिला बागेत नेणे हे तिचे लाड काका अगदी प्रेमाने करायचा. आई, बाबा काही कारणाने तिला रागावले की कविताला वाचवणारा एकच व्यक्ती तो म्हणजे काका !!!

पुढे काकाचे लग्न झाले, तर काकूही कविताचे खूप लाड करायची. तिला गाणं शिकवायची, तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन द्यायची आणि मग स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळालं की काकूही कविताला बक्षीस द्यायची.आईशी कविताची नाळ जोडलेली असली तरिही काका, काकुंशी तिचं अगदी सुंदर नातं होतं.

आजी, आजोबांना हे असं नातं, घरातलं हे खेळीमेळीचं वातावरण बघून अगदी समाधान वाटायचं. पुढे काही वर्षांनी काकूला मुलगा झाला. कविता ला खेळायला एक सवंगडी मिळाला. कविताला वाटायचं की आता काका काकू आपले लाड नाही करणार पण तसं काहीही झालं नाही. काका काकू कविताचे तेवढेच लाड करायचे किमान त्यापेक्षाही जास्तच करायला लागले.

आता हळू हळू कविता मोठी होऊ लागली. शालेय संगीत, चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. एका स्पर्धेत तिने भाग घेतला आणि अतिशय मन लावून तयारी करू लागली. आई तिला विचारायची, कविता हे जे गाणं तू गातेय ते अर्थ समजून गातेस ना, तू अर्थ समजून गायलंस तर तुझं गाणं अजून सुंदर होईल. 

आज स्पर्धेचा दिवस, ती काका काकूंचा आशीर्वाद घ्यायला निघाली, तर तिच्या कानावर वाक्य पडलं, "दादाला कशाला हवा अर्धा भाग, त्याला तर एकच मुलगी आहे? शेवटी घराण्याचं नाव माझा मुलगाच पुढे चालवणार? कविता काय लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार? "

कविता बाहेरूनच निघून गेली आणि गाण्याच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक घेऊन घरी परतली. घरात सगळे खूप खुश झाले. पण कविता म्हणाली, काका आज या यशाचे सगळे श्रेय तुला देते. कारण तुझ्या "घराण्याचं नाव काय माझा मुलगा चालवणार? "या एका वाक्याने मला गाण्याचा अर्थ पूर्ण कळला आणि मी घराण्याचं नाव काढायचं ठरवलं. 

गाण्याचे शब्द होते, मुलगी झाली हो.... 

आनंद मानू की दुःख.... माझी सखी आली म्हणून आनंद.... पण घराण्याचं नाव कोण काढेल हा प्रश्न? 

खरं सांगा सख्यानो, आता काकानी केलेले लाड कविताला आठवतील की काकाचे ऐकलेले वाक्य? 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Trupti Likhite

Homemaker

I hav two daughters. Now wanted to explore myself