पौगंडावस्थेतील मुले (पालक) वयात येताना...

About Adolescents
मुले वयात येताना....
कोणतेही नवजात बाळ किती गोंडस असते ना... त्याचे ते छान जावळ, तो निरागसपणा, तो धुरीचा सुंदर वास... लहान बाळांना कसे वाढवावे, त्यांचा आहार काय असावा याबद्दल आपल्याला आपल्या घरातले,आजूबाजूचे किंवा अगदीच कोणी नाही तर डॉक्टर तरी सल्ला देत असतात.. आणि हळू हळू अनुभवाने आपणही शिकत जातोच...त्यांची शाळा सुरू होते...पण आपल्यासाठी ती लहानच राहतात.त्यामुळे त्यांचे खाणेपिणे, अभ्यास, मित्रमैत्रीणी या सगळ्यांची जबाबदारी खासकरून आई आपल्यावर घेत असते..आणि अशातच ती लहान वाटणारी मुले हळूच पौगंडावस्थेत प्रवेश करतात... आणि सगळ्यांचेच जग बदलून जाते.. शांत, नम्र , अभ्यासू म्हणून नावाजलेला आपला मुलगा किंवा मुलगी अचानक आरडाओरडा का करतो / करते आहे हेच आईला कळत नाही.. इतके वर्ष शाळेतून कधीच तक्रार न आलेल्या पाल्याच्या शिक्षकांशी कसे बोलावे हेच आईवडिलांना समजत नाही.. त्यांच्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा याबद्दलचे त्यांचे ज्ञान तोकडे पडते.. भले ते कितीही शिकलेले असो किंवा कोणत्याही हुद्द्यावर असो.. गर्भसंस्कार किंवा लहान मुलांना वाढवताना असतात तसे crash course नसल्यामुळे किंवा असतील तरी ते जास्त प्रसिद्ध नसल्यामुळे त्या बिचाऱ्यांना काहीच अनुभव नसतो...अशा वेळेस आपल्या मित्रमैत्रिणींच्या सल्ल्यांवर त्यांना अवलंबून रहावे लागते..ते बिचारे आपल्या वकुबानुसार मुलांना वाढवत असतात. त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.. पण हा पणच थोडासा वाईट आहे... कारण त्या मैत्रीचा कधी गैरफायदा घेतला जाईल याची खात्री नसते..उदाहरणार्थ अभ्यासावरून ओरडले, तर take a chill माझा अभ्यास झाला आहे.. मला सगळे येते..बरे परिक्षेत मिळणारे चांगले गुण पाहून पालक काहीच बोलू शकत नाहीत.. ज्यांना चांगले गुण मिळत नाहीत त्यांचे आदर्श असतात सचिन तेंडुलकर, एडिसन, आईनस्टाईन.. बाकीचा इतिहास माहित नसला तरी अभ्यासात ढ समजल्या जाणाऱ्या आणि यशस्वी झालेल्यांची यादी मात्र पाठ असते.. त्यानंतर येतात मुलांना घ्यायच्या वस्तू.. त्यातही काही पालक असतात कि आम्हाला नाही मिळाले म्हणून जे जे शक्य आहे ते कसेही करून आम्ही मुलांना देतोच म्हणणारे.. काही पालक असतात ज्यांना माहीत असते कि कुठे हो म्हणायचे कुठे नाही. पण इथेच कधी कधी घोटाळा होतो.. माझ्या मित्राला/ मैत्रीणीला माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत तरिही तिचे आईबाबा तिला/ त्याला हे हे देतात आणि मी? बरे मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असल्यामुळे विरोधही करता येत नाही.. मग याच प्रेमळ संवादात अमुकतमुक कशी मित्रांसोबत फिरते, तो कसा सिगरेट ओढतो, त्याने कशी बियर try केली, ते कसे वय लपवून पबमध्ये जातात हे ऐकावे लागते.. मन कितीही हादरत असले तरिही तोंडावर हास्य ठेवून तू नाही ना असे काही करत असे विचारावे लागते.. आणि नाही हे ऐकल्यावर जीव भांड्यात पडणे म्हणजे काय असते याचा अनुभव घेता येतो.. त्यातही जर होकार आला तर , आता थोडे करिअरकडे , अभ्यासाकडे लक्ष दे.. प्रेम वगैरे बघू नंतर असे समजवावे लागते.. ऐकले तर ठीक नाहीतर आहेच..आहे ती relationship accept करायची.. त्यांच्या gf, bf ला घरातल्यासारखेच वागवायचे.. (मुलांचे वय.. १७,१८) त्यांना डबे द्यायचे, म्हणजे एका पालकांनी भाजी पाठवली कि दुसर्‍याने पोळ्या पाठवायच्या...पालकांचा एवढा समजूतदारपणा पाहून माझे डोळे पाणवायचे फक्त बाकी होते..
बरे त्यांच्याशी कडक वागायचे म्हटले तर मुले समोर उभीच राहात नाही..मार वगैरे देणे तर लांबची गोष्ट आहे.. त्यातूनही कोणी प्रयत्न केला तर मग पोलीस स्टेशनची पायरी चढायची सुद्धा तयारी ठेवावी लागते आजकाल...
खरेतर पौगंडावस्थेत होत असलेल्या भावनिक, शारिरीक बदलांमध्ये मुलांना आईवडिलांची बरीच गरज असते. कारण जर इथे नाते व्यवस्थित सांभाळले गेले तर आयुष्य भर ते छान राहते..पण कधी ती गरज आईवडिलांपर्यंत नीट पोहचत नाही.. तर कधी पोहचून सुद्धा कामामुळे किंवा अजून काही कारणास्तव त्यांना काही करता येत नाही.. अशा वेळेस जे सामोरे येईल त्याला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते...पण जेव्हा आपल्याच मुलांच्या वर्गातील मुलगी गरोदर आहे हे कळते तेव्हा पायाखालची जमीन सरकते...
आणि ह्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही ...
तुमच्याकडे आहे काही उपाय?
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ता.क. वरील लेखातील सर्व घटना खऱ्या आहेत आणि जवळपास घडलेल्या आहेत असे दुर्दैवाने सांगावे लागत आहे..