मुलांचे बोरन्हाण

Mulache bornhan

        मुलांचे बोरन्हाण                                                                                                       मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. बोरन्हाण हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.                                                                                                          बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक, तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन्हाण घातले जाते. त्यात चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते.                                                                                                      बोरन्हाण घालताना लहानग्या उत्सवमूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो. मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. काळा रंग उष्णता शोषून घेतो. हिवाळ्यात शरीर उबदार राहावे, म्हणून आपण काळे कपडे वापरतो. त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या श्रुंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते.या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो. तीळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते. गप्पा, गोष्टी, गाणी, नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात, आनंदात पार पडतो. या आठवणी आयुष्यभराच्या असतात.                                                                                                 ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुखावतो, त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीकडे व्हावे, यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे. यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाही. यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरात घडीभर आनंदाचा शिडकावा व्हावा, हीच या सोहळ्याची गंमत!