Jan 26, 2022
कथामालिका

मुलगी पसंत आहे! -भाग दोन(अंतिम)

Read Later
मुलगी पसंत आहे! -भाग दोन(अंतिम)

अनुज चे बाबा विमल काकूंना समजावू लागले.. अनुज ला लग्न करायचे आहे म्हणजे त्याची पसंती आधी महत्वाची आहे.. नंतर आपली. नसता हट्ट सोडून दे आता, आजपर्यंत तुझ्या मनासारखे वागलो आम्ही दोघे...का? तर घरात उगीच वाद नकोत म्हणून. त्याचा परिणाम असा झाला की तू सारे स्वतः चे खरे करीत आलीस. आजवर तुला मुली 'पसंत' पडल्या नाहीत... म्हणून तू आलेल्या स्थळांना नकार देत आलीस. तरीही आम्ही काही बोललो नाही.. कारण उद्या तुझ्या मनाविरुद्ध घरात आलेल्या मुलीला तू काही त्रास दिलास तर?  सारे काही आपल्या मनाप्रमाणे होत नसते..विमल. मुलांचा संसार त्यांच्या आवडी-निवडी नुसार झाला पाहिजे.. त्यांना त्यातली मजा अनुभवता आली पाहिजे. सारखी आपण मोठी माणसे सल्ला द्यायला लागलो, आपले तेच खरे करायला लागलो, तर मुले दुरावतील आपल्यापासून.
इतके बोलून अनुजचे बाबा रागारागाने बाहेर निघून गेले.

इतक्यात मुलीकडील मंडळींचा फोन आला, आम्हाला मुलगा पसंत आहे म्हणून.. पुढची बोलणी कधी करुया?? हे ऐकताच अनुजने डोक्याला हात लावला. त्यांना नकार कळवायची जबाबदारी त्याने आई वर सोपवली आणि तो जाण्याची तयारी करू लागला.

पुढच्या आठवड्यात येताना सोबत नीरजाला घेऊन येईन. तू लग्नाला परवानगी दिलीस तर ठीक..नाही..तर आम्ही दोघे कोर्ट मॅरेज करू.असे सांगून अनुज निघून गेला. अनुज गेल्यावर विमल काकू विचारात पडल्या.. त्याने खरंच कोर्ट मॅरेज केले तर! आपल्याला "वर माई" म्हणून लग्नात मिरवायला देखील मिळायचे नाही.. बाई.

तो एकुलता एक मुलगा आहे माझा.. माझ्या सुनेच्या बाबतीत जशा अपेक्षा आहेत, तश्याच अनुजच्या ही असतीलच की आपल्या बायको विषयी..
मी पसंत केलेल्या मुलीसोबत अनुज नीट वागला नाही तर मुलीचे ही नुकसान होईल, दुखावली जाईल ती. शिवाय येणारी मुलगी इथे थोडीच राहणार आहे. अनुज जिथे नोकरीला असेल, तिथेच राहील ना ती. आज कालच्या या मुली काही ना काही काम करत असतातच.
मी जर तिला अशी बंधने घातली तर उद्या ती आपल्या आई-वडिलांकडे तक्रारही करू शकते. मग काय... सासूबाई सूनेबरोबर नीट वागत नाहीत असे म्हणायला सारे मोकळेच. त्यापेक्षा नीरजाला भेटून तरी घेऊ.. आणि तसेही पोरांनी एकमेकांची निवड केलीच आहे की.
असे म्हणत विमल काकूंनी अनुजला फोन लावला आणि नीरजाला नक्की घरी घेऊन ये असा निरोप दिला.
अनुज ने नीरजा ला आपल्या घरी काय -काय घडले याची थोडीफार कल्पना दिली असल्याने नीरजा विमल काकूंना थोडी घाबरुनच होती. पण विमल काकूंचा असा निरोप आल्याने दोघेही अनुज च्या घरी अगदी आनंदाने गेले. आईने घरी नीरजा चे अगदी छान "स्वागत "केलेले पाहून अनुजला आश्चर्याचा धक्काच बसला. थोडयाच वेळात दोघींची छान गट्टी जमली. नीरजाचा स्वभाव मोकळा होताच. पण विमल काकूंना मात्र थोडे कष्ट पडले.. आपल्याच विश्र्वातून बाहेर यायला. नंतर दोघींचेही एकमेकांशी मनमोकळे वागणे,बोलणे पाहून आई आपल्या लग्नाला नक्की होकार देईल याची अनुजला आता खात्री झाली. आईचे एकदमच बदलेले विचार, वागणे पाहून त्याला आनंदही झाला होता.

मनमोकळी नीरजा विमल काकूंना खूपच आवडली. आपण आधी कुठले जुनाट विचार डोक्यात घेऊन बसलो होतो याचे त्यांना वाईट वाटू लागले. मुलाचा आनंद तोच आपला आनंद.. म्हणून त्यांनी अनुज आणि नीरजा च्या लग्नाला होकार दिला आणि आधी स्वतः पसंत केलेल्या 'सबनीसांच्या 'मुलीस त्यांनी नकार ही कळवला.मात्र सबनीसांना आठवणीने काकूंनी आपल्या मावस भावाच्या मुलाची पत्रिका पाठवली आणि योगायोगाने ती जमली ही.

नीरजाने ही आपल्या घरी अनुज विषयी कल्पना दिली असल्याने तिचे आई-वडील विमल काकू आणि काकांना भेटण्यासाठी लवकरच त्यांच्या घरी आले. बसल्या बैठकीतच लग्नाची तारीख ही ठरली. अनुज आणि नीरजा चे 'लग्न 'अगदी धुमधडाक्यात पार पडले. विमल काकू "वरमाई" च्या वेशात खूपच उठून दिसत होत्या. सर्वांच्या संमतीने लग्न झाल्याने अनुज आणि नीरजा दोघेही खूप खुश होते.

लग्नानंतर काही दिवसांनी नीरजा सासू-सासर्‍यांना आपल्या सोबत राहण्यास आग्रहाने घेऊन गेली. आपल्या सुनेकडे पाहून विमल काकू खूप खुश होत्या. त्यांनी शोधूनही त्याला अशी मुलगी मिळाली नव्हती, म्हणून त्यांनी मनोमन अनुजची माफी ही मागितली. हल्लीच्या सासवा ही अगदी मॉडर्न झाल्या आहेत. सुनेशी छान जुळवून घेतात, सासू - सूना छान मैत्रिणी सारख्याच राहतात. मग आपण का मागे राहायचे? हे म्हणतात तेच खरे...मुलांचा संसार त्यांच्या आवडीनुसार होऊ दे. आपण मस्त 'सासूपण' एन्जॉय करू.. असे म्हणत काकू आता नातवंडांच्या स्वप्नात रंगून गेल्या..ते ही अर्थातच मुलांच्या मर्जीप्रमाणेच होऊ दे म्हणून.

समाप्त.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now