मुलगी पसंत आहे! (भाग एक)

एका लग्नाची थोडीशी वेगळी स्टोरी....

'अनुज' एम.टेक झाला आणि प्रयत्नांती त्याला नोकरी मिळाली.पण दुसऱ्याच शहरात. आता विमलकाकूंनी म्हणजेच अनुजच्या च्या आईने त्याच्यासाठी वधू-संशोधन सुरू केले. विमल काकू म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यापुढे घरात कुणाचेच काही चालत नसे. अगदी त्यांच्या नवऱ्याचे सुद्धा.. आणि अनुजही त्यांच्या शब्दाबाहेर नव्हता. अनुजच्या लग्नासाठी विमल काकूंच्या बर्‍याच अटी होत्या. मुलगी शांत, सुशील, संस्कारी हवी, त्याचबरोबर शिकलेली असावी. पण तिने घर सांभाळावे. मुख्य म्हणजे नोकरी न करणारी असावी आणि आल्या गेल्यांचे सारे जातीने पाहणारी.. शिवाय सासूचे सारे काही निमूटपणे ऐकणारी असावी.. अशा बऱ्याच अटी होत्या त्यांच्या.

अनुजसाठी दर शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरत असे. अशी खूप सारी स्थळे पाहून झाली. मुलीकडील बरेच होकार आले, पण जवळ -जवळ सगळ्याच स्थळांना विमल काकू काही ना काही कारणाने नकार देत होत्या. त्यामुळे अशी कितीतरी चांगली स्थळे हातून निघून गेली होती. अनुज आणि त्याचे बाबा दोघेही या नकार घंटेला अक्षरशः कंटाळले होते. पण काकूंना खात्री होती की अनुज आपल्या शब्दाबाहेर नाहीच.. म्हणून अजूनही आपल्याच मनाप्रमाणे मुलगी मिळेल अशी आशा होती त्यांना. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरुच होते.
अनुज चे बाबा वैतागून कधी -कधी त्याला म्हणत असत..अरे बाबा..बघ एखादी ऑफिस मधलीच कोणीतरी.. आणि सोडव या शोधातून. हे ऐकून विमल काकू रागाने डोळे मोठे करत.. मग हा विषय इथेच थांबे.

बर्‍याच दिवसांनी विमलकाकूंना आपल्या अपेक्षेप्रमाणे तीन -चार स्थळे मिळाली होती. या स्थळांची सारी चौकशी करून त्यांनी दोन 'उत्तम' स्थळे बाजूला काढली आणि शनिवारी- रविवारी पाहण्याचे कार्यक्रम अगदी फिक्स करून टाकले. दर आठवड्याप्रमाणे या ही आठवड्यात पाहण्याचा कार्यक्रम झाला, पण विमल काकूंनी काहीतरी क्षुल्लक कारणाने या ही स्थळाला नकार कळवला. अचानक ऑफिसची महत्वाची मीटिंग असल्याने अनुजला परत जावे लागल्याने विमल काकूंनी स्वतःच दुसरे स्थळ पाहून घेतले.

'रूपा सबनीस ' ही काकूंच्या अपेक्षांमध्ये तंतोतंत बसणारी होती. खूप शिकलेली, शांत, समंजस आणि मुख्य म्हणजे घर सांभाळणारी होती. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलगी मिळाल्याने खुश होऊन विमल काकूंनी मुलीकडील मंडळींना जवळ -जवळ होकाराचा शब्दच दिला. अनुजला मात्र या गोष्टीची काही खबर त्यांनी दिलीच नाही.

ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये अचानक अनुजला बॉसनी प्रमोशन मिळाल्याचे जाहीर केले. अनुज साठी हा धक्का होताच. शिवाय अचानक त्याची कलीग' निरजा ' हिने त्याला लग्नासाठी मागणी ही घातली.. हा त्याहून ही मोठा धक्का होता. नीरजा ला अनुज आधीपासूनच आवडतो हे त्याला आत्ताच माहित झाले. खरं तर नीरजा मध्ये
नाकारण्यासारखे काहीच नव्हते. एकुलती एक नीरजा दिसायला सुंदर होती ,हुशार होती, शिकलेली होती..घर कामाची आवड जपणारी होती. ऑफीस मध्ये एकत्र काम करत असल्याने दोघांची छान ओळख ही झाली होती. शिवाय आत्तापर्यंत अनेक स्थळांना आईने दिलेल्या नकारामुळे, सतराशे साठ अटींमुळे अनुज वैतागला होता, आणि एखाद्या मुलीने आपण होऊन स्वतः मुलाला प्रपोज करावे हे अनुजला खूपच छान वाटले.. त्याने थोडा विचार करून नीरजा ला होकार दिला. आता काहीही होऊ दे आईला आपल्या लग्नासाठी तयार करायचेच.. अगदी भांडून, चिडून रडून का होईना... म्हणून त्याने सुट्टी दिवशी घरी जाण्याचे निश्चित केले.

एकदा का अनुज आला की पाहण्याचा नॉमीनल कार्यक्रम करू आणि लग्नाची बोलणी करून टाकू म्हणून अनुज येण्याचे निश्चित झाल्यानंतर विमल काकूंनी रूपाच्या घरच्या मंडळींना आपल्या घरी बोलावले. अनुज येताच मुलीकडील मंडळी हजर झाली. आईने सारे काही आधीच ठरवले आहे, मुलगी ही पसंत केली आहे हे कळताच अनुज भडकला.. स्थळाला स्पष्ट नकार तरी द्यायचा कसा म्हणून त्याने पाहण्याचा कार्यक्रम करून मुलीकडील मंडळींना दोन दिवसांत कळवतो म्हणून कसेबसे कटवले.. विमल काकू मात्र खूप नाराज झाल्या. त्यातच अनुज ने नीरजा विषयी सारे काही सांगितल्याने विमल काकूंचा राग अगदी अनावर झाला.राग -राग करून घर डोक्यावर घेतले त्यांनी.. आधीच काकूंनी सबनीसांच्या मुलीला होकार कळवला होता. आता अनुज ने परस्पर लग्नच ठरवून टाकले. पण काकू हट्टूनच बसल्या..मी म्हणेन तिथेच अनुजचे लग्न व्हायला हवे व माझ्या पसंतीचीच मुलगी या घरात सून म्हणून यायला हवी.

आता अनुज आईने पसंत केलेल्या स्थळाला होकार देईल, की काकू अनुज आणि नीरजा च्या लग्नाला परवानगी देतील? हे पाहू पुढच्या भागात...✍️

🎭 Series Post

View all