मूळ

अलक कथा
मूळ

काय सुंदर दिसतेस ग मीरा!
आत्ताच उमलत असलेली कळी मीराला म्हणाली. तु देखिल तर किती सुंदर दिसतेस! मीरानेही प्रतीसाद दिला.

मला हे सौंदर्य माझ्या आई कडुन मिळालेय! मीरा काहीश्या अहंकारात म्हणाली.

फक्त आई कडून? कळीने हसुन विचारले.

हो! आई कडुनच मिळालय! आणि तुला हे सुंदर रूप कोणाकडून मिळालय ग कळी ताई?

मला तर माझे हे रूप आई आणि वडील यांच्या कडून मिळालय! पण माझ दुर्दैव मी अजुन माझ्या वडिलांना पाहिलेले नाही. मात्र आई म्हणते वडिलांचा नेहमी आदर करावा! कळी हसून म्हणाली.

माझही काहीस असच आहे ग कळी ताई! मी देखिल माझ्या वडिलांना पाहिलेले नाही. कुठे तरी दूर देशात जमिनीखाली असलेल्या खाणीत ते काम करतात. आणि महिन्याला आम्हांला पैसे पाठवतात असं आई म्हणते. पण माझी आई त्यांचा फार तिरस्कार करते कारण ते आम्हांला भेटायला कधिच येत नाही. त्यामुळे मलाही त्यांचा खुप राग येतो! मीरा रागात म्हणाली.

मीरा ताई! माझेही वडील आम्हांला कधी भेटायला येत नाही. ते देखिल जमिनी खाली असच काहीस काम करतात. पण आई आणि मी त्यांचा कधीही तिरस्कार करत नाही. कळी हसून म्हणाली.


ते काहीही असो कळी ताई! मला घडवण्या मागे पुर्ण आईचा हात आहे. सगळी लोकंही नेहमी हेच म्हणतात. त्यामुळे हे पुर्ण श्रेय आईच आहे. मीरा रागात ..

बरोबर आहे मीरा ताई! जे दिसते त्यालाच समाज श्रेय देतो... जे दिसत नाही त्यांना कोणीच विचारत नाही!... कळी पुन्हा हसून म्हणाली...

- चंद्रकांत घाटाळ