मुक्ति

This story is about a woman who is confused, whether to resign from her job or not. Her friend guides her regarding this.

#मुक्ति... 
©अर्चना बोरावके"मनस्वी"
        थरथरत्या हातांनी नीताने त्या पेपरवर सही केली. तो पेपर पाकिटात घालताना मात्र इतका वेळ रोखून ठेवलेले अश्रू पापण्यांच्या भिंतींना न जुमानता बाहेर पडलेच! रेणूच्या नजरेतून हे सुटले नाही... धावतच ती नीताकडे गेली.
  " काय झाले नीता? आणि हातात काय आहे तुझ्या?"
रेणूने ते पाकीट उघडून बघताच, ती ओरडली, " राजीनामा? नोकरी सोडते आहेस तू? वेडी आहेस का? काय झाले मला नाही सांगणार का?"
         रेणू आणि नीता कॉलेजपासूनच्या मैत्रिणी... एकदम जीवश्य-कंठश्य! कॉलेज संपताच नोकरीही एकाच ठिकाणी! बारा वर्ष नोकरी करून आता नीता राजीनामा देत होती. शनिवारचा प्रसंग अजून डोळ्यांसमोर होता.
            राहूलच्या शाळेत ओपन-हाऊस होते.... नेहमी तीच जायची पण नेमकी महत्त्वाची मीटिंग असल्याने तिने जयला जाण्यासाठी राजी केले होते. त्याला ऑफिसला उशिरा जायचे असल्याने तो तयार झाला. संध्याकाळी ती घरी येताच जयचा पारा चढलेला होता , " लक्ष आहे का तुझं आजकाल मुलांकडे? राहुलला किती कमी मार्क्स मिळालेत या परीक्षेत.... दरवर्षी मार्क्स कमीच होत चाललेत.... शेजारचा गौरव बघ, दरवर्षी पहिला असतो. त्याची आई किती अभ्यास घेते त्याचा! तुला वेळ कुठे असतो मुलांसाठी? आपल्या पीयूला डान्स किती आवडतो.. तिला डान्सचा क्लास लावायचाय, पण तुझ्याकडे वेळ कुठेय? मुलांसाठी वेळ नसेल आईकडे, तर काय उपयोग अशा आईचा? मेहनत घ्यावी लागते मुलांवर, तेव्हा मुले हुशार होतात! तुला किती वेळा सांगितलंय, सोडून दे ती नोकरी.... माझं प्रमोशन झालंय... इतकं कमवतोय मी... काय गरज आहे तुझ्या त्या पगाराची आपल्याला आता? पण तू ऐकणार आहेस का? तुला घरापेक्षा ती नोकरी जास्त जवळची वाटते ना! "
         " अरे, जय असं काय बोलतोय तू ? राहुलच्या कायम खेळाच्या स्पर्धा चालू असतात..... प्रॅक्टिस आणि त्याच्या तयारी मध्ये, थोडा अभ्यास मागे पडतोय... पण तो हुशार आहे.... कमी वेळ अभ्यास करूनही चांगले मार्क्स मिळवतो तो.... आणि अजून लहान आहे... करेल ना थोडा मोठा झाल्यावर..... आणि पीयूसाठी आपण शोधू ना काहीतरी ऑप्शन.... त्यासाठी नोकरी कशाला सोडायची? "
    " ह्या दोनच गोष्टी आहेत का नीता? आईचा फोन आला होता मागे, ती म्हणत होती 'नीता सकाळी जेवण बनवून जाते, मुले तेच खातात शाळेतून आल्यावर....' मुलांना कधी गरम गरम अन्न मिळत नाही की डब्यात वेगवेगळे  पदार्थ नसतात.... पीयूही कायम सांगत असते, तिच्या मैत्रिणीच्या डब्यात रोज नवीन नवीन पदार्थ असतात..... घरी आल्यावर तिची आई तिला गरम-गरम पोळ्या करुन देते... तिच्याबरोबर खेळते... अभ्यास घेते... बाहेर फिरायला नेते. आणि आपल्याकडे काय? मुले शाळेतून आल्यापासून एकटी असतात... तेच सकाळचं खातात.... आपण दोघेही ऑफिसला जातो... तूही दमते. घरी आल्यावर मला वाटतं, माझी बायको फ्रेश असावी.. तू माझ्याजवळ बसावं... पण तू कायम कामात असते नीता! आपल्याला खरंच गरज नाहिये तुझ्या नोकरीची आता....आपली मुलेच आपले भविष्य आहे... तू त्यांच्याकडे चांगल लक्ष दे.... एक आदर्श पत्नी आणि आई होणं तुझं कर्तव्य नाही का? "

रेणूपासून नीता काहीच लपवून ठेवत नसे. रेणूला मागच्या काही वर्षांपासुन जाणवत होते की, नीताच्या मनात अपराधीपणाची भावना वाढत आहे.... तीला कायम वाटत असायचं की, ती तिच्या मुलांना आणि नवर्‍याला  हवा तसा वेळ देऊ शकत नाही.... आणि ही भावना बळकट करण्यासाठी तिचा नवरा जयही कारणीभूत होत आहे. मैत्रिणीला या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर काढण्यासाठी रेणू पुढे सरसावली.
   " नीता, तू स्वतःला दोष का देतेस गं? तू एक उत्कृष्ट गृहिणी आणि आदर्श माता आहेस. आठव दहा वर्षांपुर्वीची परिस्थिती! लग्न होऊन एक वर्षच झालं होतं तुझं...... जयची नोकरी अचानक गेली... त्यात तुला दिवस गेलेले... डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला होता... पण तू संसाराची जबाबदारी तुझ्या शिरावर घेतली.... पूर्ण नऊ महीने  पूर्ण होईपर्यंत नोकरी करून घर चालवले .... पोटातल्या बाळाच्या काळजीने तुला झोप येत नसायची.. पण तू ती तारेवरची कसरत केली... नंतरही तीन महिन्यांच्या बाळाला सोडून नोकरीवर रुजू झाली.... जयला नोकरी मिळाली होती तोपर्यंत.... पण घराचे हप्ते भरण्यासाठी तुला नोकरी करणं भाग होतं...... काय वाटत असेल त्या आईच्या काळजाला, जी आपल्या हृदयाचा तुकडा, आपल्या अंगावरचं लेकरू असं सोडून जात होती.... ऑफिस सुटताच घरी पोहोचण्यासाठी तुझ्या जीवाची घालमेल मी पाहिलीये नीता! दिवसभर आडवलेला पान्हा, बाळाला बघताच कसा अनावर होऊन जायचा.... ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय गं!....
                 दोन्ही मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी तू काही कमी केलेले नाहीस. त्यांच्या सुखासाठी दिवसभर तर पळत  असतेच ना! आणि आपण कितीही केले तरी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही नीता! आपण करत जातो आणि अपेक्षा वाढत जातात... आणि सगळे परफेक्ट आणि आदर्शवत् करण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवुन बसतो गं! तू घरात राहून चारीठाव स्वयंपाक  करत बसशील, मुलांच्या आणि नवऱ्याच्या पुढे-पुढे करत राहशील, तर ते आळशी होतीलंच पण... त्यांच्या अपेक्षाही वाढत जातील..... त्यांना तुझी किंमत उरणार नाही.... आपल्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन म्हणुन ते तुझ्याकडे बघतील . बनूदे ना त्यांना स्वावलंबी... शिकूदे मुलांना स्वतःचा अभ्यास करायला... खाऊदे सकाळचं अन्न दुपारीही..... कारण पुढेही त्यांना असं गरम गरम थोडंच मिळणार आहे? मग कशाला त्यांना सवयी लावतेस नको त्या? आणि स्वतःची दुसर्‍या बायकांशी तुलना करणं सोड... तू बेस्ट आहेस, आणि तसंच रहा. नोकरी तुझी मानसिक गरज आहे... तुला त्यामुळे स्वतंत्र असण्याची उमेद मिळते, तुझ्या नोकरीच्या पैशाची तुझ्या घराला आता गरज वाटत नसली तरी ही नोकरी तुला तुझ्या स्वत्वाची जाणीव करून देते. तुझं एक वेगळं अस्तित्व या नोकरीमुळे आहे.. तू तुझ्या पायांवर उभी आहेस... स्वावलंबी आहेस... आणि तुझं स्वातंत्र्य तू असं गमावू शकत नाही नीता! बाकी राहिला प्रश्न तुझी धावपळ कमी करण्याचा.... तर त्यासाठी किती तरी ऑप्शन आहेत या काळात ....घे ना मदत त्यासाठी! मग देता येईल ना तुला वेळ घरासाठी? .... आणि क़ायम हे लक्षात ठेव, संसाराची जबाबदारी तुझ्या एकटीची नाहिये.... नवऱ्याला पण करू दे ना मुलांसाठी थोडे काही..... तूच का सगळी जबाबदारी घ्यायची? "

      रेणूच्या ह्या बोलण्याने नीता भानावर आली..... अपराधीपणाच्या भावनेने किती चुकीचा निर्णय ती घेत होती हे तिला पटलं...... तिची नोकरी तिची भावनिक, मानसिक आणि आर्थिक गरज आहे..... 
तिच्या मनावरच्या बेड्या गळून पडल्या ..... आता ती मुक्तपणाने श्वास घेऊ शकत होती..... 'माझे निर्णय मी घेऊ शकते' .... असं म्हणून तिने तो राजीनाम्याचा पेपर फाडून टाकला.... कागदाचे तुकडे हवेत पसरले..... आणि तीचं मनही हलकं झालं त्या तुकड्यांसारखं...... मुक्तपणे तेही आता आनंदाच्या लहरींवर विहरू लागलं....
©अर्चना बोरावके"मनस्वी"
आवडल्यास कृपया नावासह शेअर करा.
माझे सर्व लेख वाचण्यासाठी माझ्या "मनस्वी" या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या. मला like आणि follow ही करू शकता.