Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

मुखवटा भाग ९

Read Later
मुखवटा भाग ९


कथेचे नाव : मुखवटा ( भाग ९)
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.


              २६ जानेवारीचा उत्साह आणि समोर दिसणारी वर्दीतील तिला पाहुन राणावत कुटुंब सुखावले होते. अर्जुन आपल्या वहिनीला पाहून, अर्णव आपल्या बायकोला पाहून, नितेश, नंदिनी आपल्या सुनेला पाहून तर आजी व आजोबा यांना आपल्या नातसुनेला पाहुन अभिमानाने ऊर भरुन येत होता. नवी आणि पार्थचे तर काही विचारूच नका. अनन्याला आज मेडल मिळणार होते तिने केलेल्या कामासाठी आणि त्याच समारंभासाठी पुर्ण राणावत कुटुंब तिथे आले होते. राणावत कुटुंबाला अनन्याचा सार्थ अभिमान होता कारण यावेळी तिच्यामुळे आपल्या देशावरचे खूप मोठे संकट टळले होते.

         २६ जानेवारीचा कार्यक्रम आटोपला आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व तिनही दलातील अधिका-यांना मेडल द्यायला सुरुवात झाली. प्रत्येक दलातील अधिका-यांचे कामाचा आढावा घेऊन त्यांना मेडल दिले जात होते. अनन्यानेही कसे तिचे कौशल्य पणाला लावले आणि आपल्या जवानांचे प्राण वाचवले हेही सांगितले गेले. अनन्याला मेडल दिले तेव्हा सर्व कुटुंब आनंदी होऊन टाळ्या वाजवत होते. इतर अधिका-यांना जसे मनोगत सांगण्याची मुभा दिली होती तशीच मुभा अनन्यालाही मिळाली आणि अनन्याने बोलायला सुरुवात केली.

" खरेतर हे श्रेय माझ्या एकटीचे नाही आहे. माझे सहकारी यांचा पाठिंबा, माझ्या कुटुंबाचा पाठिंबा यामुळे झाले आहे हे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती जिच्यामुळे मी हे कार्य योग्य पद्धतीने करु शकले.", अनन्या एवढे बोलून मंचावरून खाली उतरली आणि राणावत कुटुंबाजवळ जाऊन बसली. त्या सगळ्यांच्या डोळ्यात आपल्या घरातील सदस्याविषयी सार्थ अभिमान होता.

"अनु, कोणामुळे तु तुझे काम योग्य पद्धतीने केलेस? ", अर्णव.

" थांबा थोडे कळेलच! ", अनन्या गुढ हसत म्हणाली.

" सगळे मेडल देऊन झाले आहेत पण एक खास मेडल एका खास व्यक्तीसाठी आणि अधिका-यासाठी आहे आणि ते देण्यासाठी मी जनरल साहेबांना विनंती करतो. ", कार्यक्रम सादर करणारे व्याख्याते म्हणाले.

" मला सांगायला खूप आनंद होतो आहे त्या व्यक्तीविषयी. आज जिच्यामुळे हा दिवस आपल्याला दिसतो आहे नाहीतर आपला देश यादिवशी रडत बसला असता. रक्ताचे पाट वाहिले असते पण आज तिच्या धीरगंभीर आणि प्रामाणिक कामगिरीमुळे आपण आनंदात हा दिवस साजरा करत आहोत. ", जनरल मेजरने असे म्हणत तिचे कौतुक केले.

" सरांनी त्या व्यक्तीविषयी आपल्याला सांगितले आहे. मी आता त्यांना आमंत्रित करत आहे. आपल्या देशाची शान, देशभक्तीचे वारे रक्तात वाहुन नेत कसोशीने आपल्या देशाची सेवा करणारी धुरंधरा मैथिली रासगावकर. "..... व्याख्यात्याने नाव पुकारले तशी ती ऐटीत ऊभी राहिली.

         तिची ती उभी राहण्याची पद्धत, तिचा तो तोरा आणि तिच्या चेह-यावरील तो प्रचंड आत्मविश्वास. बघणा-याला एक वेगळीच मैथिली दिसावी अशी ती ताठ मानेने ऊभी होती. काही क्षण तशीच थांबून ती पुढे चालू लागली. मंचाजवळ जाताच तिने तिथल्या पाय-यांवर हात ठेवून नमस्कार केला. तिची ती कृती सर्वांच्या चेह-यावर एक गोड हसु देऊन गेली. पाय-यांवर नतमस्तक होत तिने मंचावर प्रवेश केला आणि सगळीकडे टाळ्यांचा गजर झाला.

       पुढे होत तिने तिचे मेडल स्वीकारले आणि सगळ्यांना अभिवादन करून ती मंचावरून खाली उतरली. खाली उतरून ती तिच्या जागेवर जाऊन बसली. काही वेळानंतर कार्यक्रम संपला आणि प्रत्येकजण आपापल्या लोकांशी बोलायला पुढे सरसावले. राणावत कुटुंब मैथिलीला शोधत होते पण मैथिली त्यांना कुठे दिसेना. मैथिलीने मेडल घेतले आणि ती तिचे उरलेले काम करण्यासाठी तातडीने तिच्या जागेवर गेली होती. हातातील काम संपवून सगळेजण आपापल्या मार्गावर जाणार होते. मैथिली सोबत अजून चौघेजण असल्याने त्यांनाही काही सूचना देणे गरजेचे होते त्यासाठीच ती पटकन निघाली होती. राणावत कुटुंबाला मैथिली भेटली नाही म्हणून खुप वाईट वाटले पण हरकत नाही ती कोण आहे ते कळल्याने सगळ्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. बाकी कार्यक्रम आटोपला तसे सर्वजण आपापल्या निवासस्थानी रवाना झाले.

        असाच एक आठवडा निघून गेला. अनन्याला दुखापत असल्याने ती तीन आठवडे सुट्टीवर होती त्यामुळे ती राणावत कुटुंबाजवळच होती. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मैथिली राणावत कुटुंबाच्या घरी पोहोचली. तिने बेल वाजवली आणि नेहमीसारखे एका नोकराने दार उघडले. बरेच दिवस मैथिली एक पाहुणी म्हणून तिथे बिनधास्त राहत होती परंतु आज ती पाहुणी नव्हती की अनोळखी नव्हती, आज ती तिच्या पुर्ण ओळखीच्या रुपात राणावत कुटुंबाच्या घरी आली होती. तिला त्या रुपात पाहून कोण कसे वागणार होते याची काहीच कल्पना तिला नव्हती तरीही आपली बाजू सांगण्यासाठी ती राणावत कुटुंबाला भेटायला आली होती.

        मैथिली आत आली तेव्हा सोफ्यावर आजोबा आणि आजी बसले होते. बाकीचे अजून खाली आले नव्हते. मैथिलीने पुढे होत आजी आजोबांना नमस्कार केला तसे दोघींनीही प्रसन्न हसत तिला आशिर्वाद दिला आणि आजोबांनी एका नोकराला बाकीच्या लोकांना बोलवायला सांगितले.

" तुझा खूप अभिमान आहे आम्हाला मैथिली. ", आजोबा.

" आजोबा, लाजवत आहात तुम्ही मला. ",मैथिली.

" नाही मैथिली, प्रसंगी आमचा रोष पत्करलास तु पण खरे समोर येऊन दिले नाहीस यामुळेच तुझे काम यशस्वी झाले. ", आजोबा.

" बरोबर आहे आजोबा, मलाही तुम्हाला सांगावे वाटत होते पण प्रश्न देशाचा होता. तुम्हाला समजले असते तर ठीक होते पण सगळीकडे तर भिंतीलाही कान असतात त्यामुळे यावर कोणत्याही पद्धतीने गोंधळ झाला असता तर त्याचा त्रास इतरांना झाला असता. ", मैथिली.

" अगदी, बरोबर बोलली तु मैथिली! ", कोणीतरी समोरुन म्हणाले आणि मैथिलीची नजर जिन्यावर गेली.
      
क्रमशः
विशाखा शिगवण
टीम पुणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vishakha Vishu

House Wife

Like Reading, Writing

//