मुकाबला भाग 4

Shivam started going to his shop and then something happened

मुकाबला :- भाग 4

बऱ्याच दिवसांनीं जवळपास 2 महिन्याने शिवम आज घराच्या बाहेर पडत होता, त्याला खूप उत्साही वाटत होतं आणि का कोण जाणे पण आपण खूप काही नवीन आहोत असेही जाणवत होते. जणू आज त्याचा नवा जन्म झाला आहे असेच!

त्याने रेश्मा गेल्यावर आवरले, अंघोळ केली- चांगले ठेवणीतले कपडे घातले, देवाला नमस्कार केला. 
आईने त्याला ब्रेकफास्ट दिला, आज पहिल्याच दिवशी बाईक नको,  म्हणून तो रिक्षाने दुकानाकडे निघाला.
आत्मविश्वास मनात ठेवून तो बाहेर पडला, त्याची बॉडी लँग्वेज सुद्धा बदलली होती. 
त्याने रिक्षातून रेश्मा ला फोन केला " हॅलो रेश्मा! मी निघालो आहे आज शॉप कडे."
"ग्रेट! तुझा दिवस छान  जाईल बघ आणि हो डायरी घेतलीस ना सोबत?"
"हो मॅडम! चल ठेवतो आता तुला वेळ मिळेल तसं बोलूयात, बाय" म्हणत त्याने फोन ठेवला.

दुकानात त्याने पाऊल ठेवले तसे त्याच्याकडे काम करणारे लोक जरा नवलाईने बघत होते कारण आज तो नेहमीसारखा गबाळा न वाटता स्मार्ट वाटत होता. त्याचा चेहरा कॉन्फिडन्ट होता...
 त्या अविर्भावताच त्याने आल्या आल्या सगळ्यांची चौकशी केली.
आज येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो नीट बोलला, काही तरी सारखे लिहीत होता आणि त्याला कशाचीच आठवण द्यावी लागत नव्हती. सगळ्यांना नवल वाटले....
घरी फोन करून तो आई शी बोलला. 

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रेश्मा आणि तिची मैत्रीण शॉप ला आल्या...तिच्या मैत्रिणीने त्या दिवशी काय केले हे त्याला तर काही आठवत नव्हते पण रेश्माने तिची नव्याने ओळख करून दिली आणि त्याला आणखी एक फ्रेंड मिळाली.
रेश्मा आणि तो सोबत घरी आले...घरी आल्यावर ते सगळे गप्पा मारत बसले.
"रेश्मा हे बघ" म्हणत त्याने डायरी दाखवली "मी आज सगळं लिहून ठेवले त्यामुळे मी काही विसरलो नाही" तो खूप उत्साहात बोलत होता.
त्याला तसं बोलताना - हसताना बघून सगळे खुश होते आणि रेश्माला मनापासून हलकं वाटत होतं. दिवसभराच्या गप्पा झाल्या सगळं आढावा झाला.
"रेश्मा खूप थँक्स!" तो म्हणाला.
"का रे?"
"तू माझी फ्रेंड झालीस आणि खूप छान गाईड केलंस मला. आज माझा दिवस छान गेला कोणी माझी चेष्टा केली नाही."
ती फक्त हसली तोवर त्याच्या आईने जेवण वाढले आणि रेश्मा सुद्धा तिथेच जेवली.
अंबाडीची भाजी, भाकरी, भाजलेल्या वांग्याचे भरीत , तिखट कांदा, कढी आणि गोळे भात असा मस्त मेनू जमून आला होता...

त्या दिवशी च्या जेवणानंतर शिवम ने रेश्माला सांगितले की मी आजच्या सारखाच प्रत्येक दिवस घालवेन आणि झाले ही तसेच....
पुढचा आठवडा एकदम छान गेला, त्याच्या हातून काहीच चुका  झाल्या नाही त्यामुळे कुठलाच गोंधळ ही मनात नव्हता...
 त्याचे बाबा समाधानी होते तर आई आनंदात.

रविवारी तिने काही फ्रेंड्स ला घरी बोलावले आणि त्याला सगळ्यात इनव्हॉल्व केले. त्याच्या नवीन ओळखी झाल्या तो आता खूप बदलत होता. 
आत्मविश्वासाने वावरत होता,  व्यवहार बघत होता आणि सगळं नीट लिहून ठेवत होता.

असाच एक दिवस तो दुकान बंद करून घराकडे निघाला होता..
आता त्याची गाडी त्याने वापरायला सुरुवात केली होती...
 रात्री बराच उशीर झाला होता... सगळीकडे सामसूम झाली होती. आज कॅश बरीच होती त्यामुळे  त्याने गुपचूप  कॅश दुकानाच्या  अडगळीत लपवून ठेवली. 
आणि तो निघाला, काही अंतर आला आणि फटकीने आवाज झाला आणि त्याची गाडीचे टायर फुटले. थोडी वेडीवाकडी होत गाडी पुढे गेली पण तरी त्याने गाडीला सावरले.
गाडीवरून उतरला तर त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी अंधारात  बाजूला वावरत होते..
अचानक टायर फुटणे कोणी वावरणे म्हणजे हे मुद्दाम केले आहे हे त्याच्या लक्षात आले. 
अचानक दोन जण समोर आले त्यांनी चाकु दाखवला आणि त्यांनी दरडावले "तुझ्याजवळ जे काही आहे ते सगळे आम्हाला दे!" 

"नाही माझ्याकडे काही नाही! फक्त माझी गाडी, मोबाईल आहे पैसे वगैरे काही नाहीत!" तो घाबरून म्हणाला.
एकाने त्याला एक फटका मारून ढकलले आणि दुसरऱ्याने त्याची झडती घेतली त्यात पाकीट निघाले.
"खोटं बोलतोस काय!" म्हणत त्याला अजून मारले आणि त्याची गाडी, पाकीट, मोबाईल असे सगळं घेऊन निघून गेले....

 इकडे हा घरी बराच उशीर झाला तरी आला नाही म्हणून घरचे काळजीत पडले.
न राहवून त्याच्या आईने रेश्मा चे दार वाजवले " रेश्मा, अजून शिवम आला नाही बघ. खूप काळजी वाटते आहे ग! त्याचा फोन पण लागत नाही आहे."
"काकू,  काळजी करू नका. आपण थोडा वेळ वाट बघू नाहीतर दुकानाकडे जाऊयात आपण सगळे." म्हणत ती खाली आली...
ती गेटच्या बाहेर फेऱ्या मारत बसली..

थोड्या वेळाने एक रिक्षा दारात थांबली आणि त्यातून शिवम उतरला पण त्याला बराच मार लागला होता.
रेश्मा धावत गेली आणि विचारले की,  काय झालं पण तो काहीच बोलेना! 
रिक्षावाला पैसे मागतो तरी हा देईना! शेवटी तीच पळत वर गेली आणि पैसे आणून दिले.

त्याला हाताला धरून ती घरात आली "अरे बोल तर शिवम काय झाले ते? तुझी बाईक कुठे आहे? तुला हे लागले कसे काय?"

तो काही न बोलता बसला फक्त त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागले....! 
सगळे काळजीत पडले शेवटी तिने काकांना इशारा केला आणि ते त्याला आत घेऊन गेले... त्याला आवरायला मदत केली आणि कपडे बदलवून त्याला बाहेर आले. 
गरम चहा तोवर आज रेश्मानेच बनवला कारण काकू पण स्तब्ध होत्या.

पाणी पिऊन, चहा घेऊन तो जरा तरतरीत झाला आणि त्याने त्याला जेवढे आठवत होते तेवढा किस्सा सांगितला....

"अरे इतकेच ना! बघ तू हुशारी दाखवून पैसे सोबत ठेवले नाहीत किती छान केलेस! बाकी जे गेले ते सोड... त्यात काही नाही आपण नवीन घेऊ." ती त्याला नॉर्मल करायला म्हणाली.

पण आज तो पुन्हा पूर्ववत शांत झाला होता. जास्ती चर्चा न करता त्याला जेवायला लावले आणि बेसिक औषध देऊन त्यांनी झोपायला लावले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ती खाली आली तर काका  काकू काळजीत दिसले... तीला पण रात्री झोप लागली नव्हती, शिवम मात्र औषधांमुळे तो झोपला होता.
"काकू आज मी जरा उशिरा जाते ऑफिस ला! बघू तर काय करता येईल ते."
त्यांनी मान हलवली करण त्यांना तर काही सुचत नव्हते....

 थोड्यावेळाने तो उठला पण त्याचे वावरणं हे भीत भीत होते..
 ती म्हणाली की पोलिसांकडे जाऊ तर तो नाही म्हणाला
 "मला ते लोक पुन्हा मारतील " म्हणत कोपरयात जाऊन बसला....

मोठ्या मुश्किलीने तिने त्याला दवाखान्यात नेले...
मग त्याला मोबाईल शॉप मध्ये जाऊन नवीन मोबाइल घेतला सिम चे काम केले आणि दोघे घरी आले...
पण तो एक शब्द सुद्धा बोलला नाही. जणू पुन्हा तो स्वतः मध्ये गुंतला होता.

"अरे शिवम काय होतंय तुला तू तर खूप स्ट्रॉंग आहेस ना..."
"खोटं बोलतेस तू! जर असं असते तर मी काल घाबरलो नसतो!माझ्या वस्तू दिल्या नसत्या! मला काही कळत नाही! मी दुकानात पण जाणार नाही आता!"

जसं तो हे बोलला तसं तिच्या काळजात धस्स झालं! 
मोठ्या प्रयासाने तिने त्याचा आत्मविश्वास जागा केला होता आणि परत तो त्याच्याच विचारात जायला लागला होता...
पण तिने मनाशीच, नाही असे मी होऊ देणार नाही असे म्हणत त्याला घरापर्यंत आणले.
ती ऑफिस ला निघून गेली पण तिचे मन अजिबात कामात लागत नव्हते.
तिने घरी फोन केला तर काकू पण म्हणाल्या की तो एकटाच विचारात बसलाय.

ती  संध्याकाळी घरी आली काकू शी काहीतरी बोलली आणि त्याला घेऊन तिच्या आवडत्या कॉफी शॉप ला आली.

तिथे तिने त्याचे आवडते व्हीट चीझ टोस्ट सँडविच ऑर्डर केले...मलबेरी, ग्रेप्स आणि ऍपल कट करून आले...सोबत फ्रेंच फ्राईज, आणि मस्त कॅपचिनो कॉफी!
आपले आवडते सगळं फूड बघून त्याची कळी जरा खुलली! 

" मला खूप भीती वाटते आहे ग रेश्मा! आता पुन्हा मला सगळे नावे ठेवणार!
सगळे चिडवणार की मी मार खाऊन आलो! 
तू माझ्याशी खोटं बोलत होतीस की मला सगळं जमेल." तो बोलत होता.

"हो का....मी खोटे बोलत होते का....बरं! 
असे कर...घरी गेलो की तुझी ती डायरी आहे ना तिला गॅसवर धर!" ती वेगळ्याच अविर्भावात म्हणाली.

"का असे करायचे?" घाबरून तो म्हणाला.

"तुला काही येत नाही ना! मग तू कशाला ओझं बाळगतोस? ज्या वस्तू कामाच्या नाहीत त्या फेकून द्यायच्या असतात...
आता तुला ती लागणार नाही...त्यात काही हिशोबाचे असेल म्हणून तू ती जाळून टाक!" ती म्हणाली.

"अगं पण मला त्याची खूप मदत झाली! मला पुढे काम करायचे असेल तर ती लागेलच ना! मी सगळं पुन्हा विसरलो तर?" तो म्हणाला.

"म्हणजे तुला काम करायचे आहे तर!  मला वाटले की आता तू घरीच बसणार सकाळी म्हणाला तसे!" जरा त्याला डीवचत ती मुद्दाम म्हणाली.

तो काहीच बोलला नाही....
थोडा वेळ शांततेत गेला मग ती म्हणाली 
" हे बघ मी तुला एक सांगते! आयुष्यात घटना घडतात, त्या कशा घ्यायच्या ते आपण ठरवायचे." म्हणत तिने बिल पे केलें आणि ते घराकडे निघाले.

त्याला सकाळपेक्षा बरे वाटत होते....पण तरीही तो खरच नॉर्मल येईल का लगेच की पुन्हा किती काळ असे वागेल या प्रश्न चिन्हात, त्या विचारात ती त्याला घरी सोडून वर तिच्या खोलीकडे निघाली.... जाताना काकुला हाताने काहीतरी खुणावून ती निघून गेली.

तो औषध घेऊन शांत गॅलरीत बसून होता तर ती वर बसून उद्या काय आणि कसे या विचारात झोपी गेली.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all