मृत्यूचे गूढ ( भाग ३ )

चांदनी नामक अभिनेत्रीची कथा


विषय - खेळ कोणाला दैवाचा कळला

कथेचे नाव - ( मृत्यूचे गूढ भाग ३ )

चांदनीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. त्यातच तिने \" मुकेश शर्मा \" यांच्याबरोबर लग्न करण्याचे घोषित केले. मुकेश शर्मा हे सिनेसृष्टीतील नावाजलेले निर्माते होते. मुकेश शर्मांची पहिली पत्नी हयात होती आणि तिच्यापासून त्यांना दोन मुले होती. तरीही चांदनीने त्यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयाने समस्त तिचा चाहतावर्ग नाराज झाला होता. चांदनीच्या जन्मदात्या आईला देखील चांदनीचा निर्णय मान्य नव्हता. आईचा विरोध पत्करून चांदनीने मुकेश शर्मा यांच्याशी लग्न केले.

मुकेश शर्मा यांच्याशी लग्न करून चांदनी संसारात गुंतली. दोन मुलींच्या जन्माने सिनेसृष्टीत काही काळासाठी तिने संन्यास घेतला. दोन मुलींच्या संगोपनात, संसारात तिने स्वतःला पूर्ण झोकून दिले. मुलींना चांगले शिक्षण, संस्कार घडावे यासाठी तिने आपले करिअर बाजूला ठेवले. चांदनीचे तिच्या पतीवर तितकेच उत्कटतेने प्रेम होते. आपल्या संसारासाठी बरीच वर्षे ती सिनेजगतापासून गायब होती. एक गृहिणी, पत्नी, आई अशा तिन्ही भूमिका तिने लीलया पेलल्या. चांदनी तिच्या खासगी आयुष्यात देखील आनंदी राहत असे. तिच्या बडबड्या आणि मजेशीर स्वभावाने तिचे पती तिला कौतुकाने \" जोकर \" म्हणत असत. मुलींची तर ती लाडकी सुपरमॉम होती.

जशा मुली मोठ्या होऊ लागल्या एक आई म्हणून चांदनी त्यांच्या भविष्याची काळजी करत असे. चांदनीला तिच्या आईच्या भूमिकेतून वाटायचे की आपल्या मुलींचे लवकर लग्न करून द्यावे म्हणजे त्या त्यांच्या आयुष्यात स्थिरावतील. पण नंतर तिच्याच विचारांचे तिला हसू येई. तिला तिच्या मुलींना आयुष्य जगण्यासाठी आत्मनिर्भर आणि सक्षम बनवायचे होते.

मुलींच्या आणि पतीच्या प्रोत्साहनाने चांदनीने तब्बल पंधरा वर्षानंतर सिनेसृष्टीत पुनरागमन केले. तिच्या पुनरागमनाने तिच्या चाहत्यांना अतिशय आनंद झाला. दर्जेदार अभिनयाने पुन्हा एकदा तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला. तिचे चित्रपट गाजले. पुन्हा तिला उत्तम भूमिकेसाठी पुरस्कार मिळाले. भारत सरकारतर्फे तिच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल \" पद्मश्री \" पुरस्कार देखील मिळाला.

चांदनीच्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या. चांदनीने मुलींना आधीच बजावून सांगितले होते की, जर त्यांना करिअर म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश घ्यायचा असेल तर पहिलं उच्चशिक्षण त्यांना घ्यावं लागेल. चांदनी मुलींना वाढवताना हळवी होत असे पण तिने मुलींना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. चांदनीच्या मोठया मुलीने सिनेसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. चांदनीने तिच्या मुलीच्या निर्णयाला प्रोत्साहन दिले. चांदनीच्या मुलीने सिनेजगतात प्रवेश केला. चांदनी तिच्या मुलीच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली होती. चांदनीच्या लेकीच्या चित्रपटाचे काम सुरू झाले पण लेकीला मोठया पडद्यावर अभिनय करताना बघण्याचे चांदनीचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. त्या आधीच चांदनी काळाच्या पडद्याआड निघून गेली होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all