विषय - खेळ कोणाला दैवाचा कळला
कथेचे नाव ( मृत्यूचे गूढ भाग ४ अंतिम )
चांदनी आपल्या भाच्याच्या लग्नाकरिता परदेशी आपल्या परिवारासह गेली होती. भाच्याच्या लग्नाच्या संगीतच्या कार्यक्रमात परिवारातील सदस्यांबरोबर तिने खूप धमाल केली, मनसोक्त नाचली. लग्नसोहळा पार पडेपर्यंत स्वतः हिरीरीने मंगलकार्यत सहभागी झाली होती. लग्नसोहळा अतिशय सुंदररित्या पार पडला. चांदनी त्या सोहळ्यात आनंदाने वावरली. लग्नसोहळा पार पडल्यावर वऱ्हाड मायदेशी परतले. चांदनीचे पती आणि दोन मुली देखील मुंबईत परतले पण चांदनी लगेचच आपल्या मायदेशी परतली नाही. परदेशातील उत्कृष्ट हॉटेलमध्ये तिने वास्तव्य करण्याचे ठरविले होते. थोडे दिवस तिथे फिरायचे ठरवले होते. त्यामुळे चांदनी तिथेच राहिली.
चांदनीचे पती मायदेशी जाऊन पुन्हा ती परदेशात ज्या हॉटेलमध्ये होती तिथे तिला सरप्राईज द्यायला म्हणून पुन्हा गेले.
दोन - तीन दिवसांनी अचानक एक वाईट बातमी ऐकू आली की, चांदनीचा बाथटबमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोणालाही ह्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. सगळ्या तिच्या चाहत्यांना वाटत होते की, मुद्दाम कोणीतरी ही अफवा पसरवली आहे. पण दुर्दैवाने ती बातमी खरी होती.
चांदनीचे शव परदेशातून तीन दिवसांनी शहानिशा करून मुंबईत आणले गेले. तिच्या अंतिम दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तिच्या चाहत्यांचा जणू महासागरचं लोटला होता. अवघा जनमानस दुःखाच्या सागरात बुडाला होता. चाहत्यांच्या हृदयावर आपल्या अभिनयाच्या जोरावर अधिराज्य प्रस्थापित केलेल्या एका अभिनेत्रीचा अशाप्रकारच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. चांदनी कायम बोलायची की, तिचा मृत्यू झाल्यावर तिचा मेकअप वगैरे करून, पूर्ण सजवून मगच तिच्यावर अंतिम संस्कार करायचे. ह्या तिच्या अखेरच्या इच्छेमुळे तिला सौभाग्यलंकाराने सजवण्यात आले होते. तिच्या चाहत्यावर्गांच्या डोळ्यांतील पाणी थांबत नव्हते. तिच्या निधनाचे वृत्त ऐकून तर कित्येकांनी आपले उर बडवून घेतले. अवघे चोपन्न तर वय होते तिचे.
तिच्या चाहत्यांना तिचा अशा प्रकारे आलेला मृत्यू पचनी पडत नव्हता. चांदनी काही सर्वसामान्य व्यक्ती नव्हती की ती पहिल्याप्रथमचं बाथटबमध्ये उतरली असेल आणि त्यात तिचा बुडून मृत्यू झाला असेल. तिला कुठलाही असाध्य रोग असला असता तरी तिच्याकडे पैशाची चणचण नव्हती. तरी तिचा असा अकाली मृत्यू का व्हावा ? की चांदनीचे आयुष्यच तितकेचं होते म्हणून तिचा काळ आला होता ? की तिच्या मृत्यूसाठी खरंच काही कारण हवे होते ? खरोखरंच दैवाचा खेळ कोणालाही समजत नाही. जे विधिलिखित असते तेच होते.
तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या हॉटेलच्या रूममध्ये तिचे पती होते. त्यांच्या डोळ्यांदेखत चांदनीचा मृत्यू झाला होता. चांदनीच्या अशा अकाली मृत्यूचे गूढ मात्र तिच्यासमवेतचं निघून गेले.
( समाप्त )