मृण्मयीची डायरी भाग १ला.

एका मीतभाषी मुलीची ही कथा आहे.
नमस्कार
वाचकांसाठी यावेळी मी वेगळ्या विषयावर कथा मालिका घेऊन आले आहे. हा वेगळा विषय वाचकांना आवडेल अशी आशा करते.माझं लिखाण आवडत असेल तर नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा ही विनंती
धन्यवाद.
##मीनाक्षी वैद्य.



मृण्मयीची डायरी. भाग १ला


मृण्मयीला जाऊन पंधरा दिवस झाले होते तरी घरात सगळ्यांना तिची प्रकर्षानी आठवण येत होती. मृण्मयी हयात असताना एवढी आठवण आपल्याला कधीच कशी आली नाही याचं वैजू ला आश्चर्य वाटलं.

मृण्मयी खूपच संवेदनशील मनाची होती. हेही घरच्यांना माहिती नव्हतं तिच्यावर अनेक घातक प्रसंग आले.पण घरच्यांना ते कधीच कळले नाही.

ते सहन करताना ती बोलणच विसरली. याचीपण घरात कोणाकडून दखल घेतल्या गेली नाही. घरच्यांना यत् किंचीत ही तिच्यावर आलेल्या प्रसंगांची माहीती नव्हती. कशी असणार?

ती तशीही मितभाषी होती. स्वतःला व्यक्त करणं तिला जमत नसे. शेवटी शेवटी काही वर्ष ती व्यक्त व्हायची पण स्वतःशीच. तेच तिचं वागणं घरात सगळ्यांना खटकू लागलं.

तिच्या अश्या असंबद्ध बडबडण्याची घरातल्यांना काहीच तर्कसंगती लागतं नव्हती. त्यामुळे निष्कर्ष तरी काय काढणार?

वैजू मृण्मयीची मोठी बहीण होती.तिला आज तिची खूपच आठवण येऊ लागली तशी ती मृण्मयीच्या खोलीत गेली.जाऊन तिच्या पलंगावर बसली आणि पलंगावरच्या चादरीवर हळूवार हात फिरवू लागली.हात फिरवता फिरवता मृण्मयीच्या आठवणींनी कधी वैजूचे डोळे पाझरायला लागले तिचं तिलाच कळलं नाही.

थोड्या वेळानी वैजूनी मृण्मयीचं कपाट उघडलं. त्यातील प्रत्येक ड्रेसमध्ये तिची आठवण होती.त्या कपड्यांना तिचा स्पर्श झाला होता.तो स्पर्श वैजू त्या कपड्यांमध्ये शोधत होती.शोधता शोधता कपड्यांवर तिनी फवारलेला सेंट दरवळला. इतके दिवस होऊनही त्या सेंटचा वास त्या कपड्यांनी अजून जपून ठेवला होता.

तोच सेंटचा वास वैजू मुक्तपणे हुंगत होती. त्याबरोबर मृण्मयी बरोबर घालवलेले अनेक दिवस, त्या दिवसांच्या आठवणी मोत्यांचा सर ओघळून अंगभर मोती घरंगळावेत तशाच त्या आठवणी वैजूच्या मनावर घरंगळून विसावल्या.

मृण्मयीच्या टेबलाकडे वैजूची नजर गेली.तशी चटकन तिनी त्यांचं ड्राॅवर उघडलं.त्यात तिला मृण्मयी ची डायरी सापडली.
वैजूनी थरथरत्या हातांनी ती डायरी उघडली.मृण्मयीला डायरी लिहीण्याची सवय होती हे तिला आत्ताच तिची डायरी बघून कळलं. डायरीवर किती छान पांढ-या शुभ्र सश्याचं चित्र होतं.

त्या चित्रावरुन हात फिरवताना वैजू स्वतःशीच बोलली "मृण्मयी या सशासारखीच कोमल होती, मनानी हळवी होती,भीत्री होती.

तिनी कधीच कोणालाच दुखावलं नाही. तिच्याजवळ कोमल शब्दच होते. कठोरता हा गूणच नव्हता तिच्याकडे पण आयुष्यात असं तिनी काय बघीतले की ही हळवी पोरं एकदम बावरली आणि गप्पच झाली.

घरच्यांना कधी कळलंच नाही.ती इतकी गप्प झाली की तासंतास तिच्या बोलण्याची आपण वाट बघीतली तरी ती बोलत नसे. "मृण्मयी काय झालं होतं ग तुला?इतकी गप्प का झाली होतीस?" रडत वैजू स्वतःशीच बोलली.

भावनावेग अनावर होऊन वैजूच्या डोळ्यातून घळघळा पाणी येऊ लागलं आणि ते डायरीवर टपटप पडू लागलं. वैजूनी हळूच डायरीवर पडलेलं पाणी पुसलं. डायरी उघडली.

पहिल्या पानावर मृण्मयीनं लिहीलं होतं.

\"माझ्या सगळ्या प्रेमळ कुटूंबासाठी...\"

हे का तिनी लिहीलं होतं हे वैजूला कळलं नाही.तिनी डायरीचं पुढचं पान उघडलं.

तारीख होती... ०२/०४/१९८८

वैजू तारखे खालचा मजकूर वाचू लागली.

त्यादिवशी म्हणजेच २तारखेला मी रमतगमत शाळेतुन येत होते.माझं कुणाकडे फारसं लक्ष नव्हतं. मी आपल्याच नादात चालले होते.एवढ्यात मागून एकानी माझ्या पार्श्वभागावर चापट मारली.

मी दचकून मागे वळले तर कोणीच दिसलं नाही मग मी पुढे बघीतलं तर एक मुलगा सायकलवर बसून हसत होता.माझ्या डोक्यात राग राग उसळू लागला.माझ्या रागाची पातळी इतकी वाढली की ओठातून नुसते आवाज बाहेर पडले.

तो मूलगा हसत हसत सायकलला टांग मारुन निघून गेला.मी रागानीच घरी आले.आईनी मी का रागावले हे न विचारताच मला राग कसा माणसासाठी वाईट असतो हा उपदेश केला.त्या ऊपदेशामुळे माझा राग अजून वाढला.

मी रागातच माझ्या खोलीत गेले.त्यादिवशी मला झोपच लागली नाही.त्या मुलाने भर रस्त्यात मला अशी चापट मारण्याची हिम्मत कशी केली.राग...राग नुसता राग येत होता.त्या रागात मी रात्री जेवलेच नाही तशीच झोपून गेले.

आईनेही दोन हाका मारण्यापलीकडे काही चौकशी केली नाही.
माझा खूप तळतळाट होतं होता.पण आईनी काहीच विचार केला नाही. त्यानंतरही तो मुलगा मला सारखा त्रास द्यायचा पण मी रागानी काहीच बोलू शकायचे नाही.

हळुहळू मला शाळेत जायला नको वाटायला लागलं.मी शाळा सोडली म्हणून आई-बाबांना राग आला.पण मी का शाळा सोडली हे कोणी कधीच विचारलं नाही.

दादा तर हसत म्हणाला "अगं आई ही मंद आहे.कशाला पाठवते शाळेत." मला दादाचा खूप राग आला का मला सारखं तो मंद म्हणतो.मी ढ नाही. हे वाचल्यावर वैजूला हुंदका आवरला नाही.

तारीख..४/४/१९८८

आजपण मी जेवली नाही. आईला काहीच वाटलं नाही."नेहमीचच झालंय हिचं" असं म्हणून आईनी सगळं आवरून ठेवलं. दादा ताई जेवले नाही की कशी त्यांच्या मागेमागे जेवणाची ताट घेऊन जाते.भरवू का विचारते. का?असं का करते आई? मीपण तिच्याच पोटातून आले नं.मग माझ्यावर ती प्रेम नाही करत का?

बाबा पण काही म्हणत नाही.ते सारखे आपल्यातच दंग असतात.त्यांचं ऑफीस,त्यांचे मीत्र,त्यांचा रमीचा अड्डा आणि दादा ताईशी बोलायला त्यांना वेळ असायचा. पण माझ्याशी बोलायला बाबांना वेळ कधीच नसायचा.

बाबा माझ्याशी बोलावे म्हणून मी किती धडपडायचे.त्यांच्या जवळ जाऊन बसायचे. पण बाबा आई, दादा, ताई यांच्याशीच बोलत. थोड्यावेळानी मला खूप वाईट वाटायचं.मी तिथुन ऊठुन निघून जायचे.तरी बाबा मला विचारायचे नाही. का चाललीस ग ? बेटा बस. बाबांच्या प्रेमळ वाक्याची मी रोज वाट बघते.अजूनपर्यंत बाबा असं मला म्हणाले नाही.

वैजूला हे वाचणं कठीण झालं होतं. तिच्या लक्षात आलं आपण सगळ्यांनीच किती मृण्मयीला दुखावलं.आपल्या कसं लक्षात आलं नाही.आपल्या बाबतीत आई-बाबा असं वागले असते तर आपण सहन करू शकलो असतो का?मीच काय सारंग पण सहन करू शकला नसता.ही पोरं तर आमच्यापेक्षा लहान होती.हळवी होती.का आपण हिला जपलं नाही.जपलं असतं तर आज मृण्मयी जीवंत असती.

मनावर दगड ठेऊन मृण्मयी ची सगळी डायरी वैजूनी वाचायचं ठरवलं.

तारीख...६/४/१९८८
आज डायरी लिहावीशीच वाटतं नाही.मनावर साचलेले दु:खाचं मळभ दूर व्हावं म्हणून मी डायरी लिहीते.पण आज काहीच लिहुनये वाटतंय. लिहावं न वाटणं हेपण दु:खच आहे. का म्हणून लिहु नये वाटतंय. आज इतकंच लिहीते. आज फार नाही लिहवत आहे. डायरीत शब्दच उतरत नाहीत.


माझ्यावर झालेला अन्याय मी माझ्या शब्दांवर नाही करणार. शब्दांनो तुम्हाला जेव्हा मनमुराद हुंदडायचं असेल नं तेव्हा या माझ्या डायरीत आणि मनसोक्त हुंदडा


६/५/१९८८
आज एक महिना उलटला डायरी लिहुन महिनाभर मनच स्वस्थ नव्हतं.माझं मन कधीच स्वस्थ नसतं असं आई येता जाता म्हणत असते. म्हणून मी आईला काही सांगणच सोडलं आहे.शांत बसते.

सगळ्यांना न्याहाळत असते. माझं मन स्वस्थ नसतं म्हणून आईनी दुकानात किंवा भाजीबाजारात पाठवणंपण बंद केलं. मी घरी मजेत असते. माझ्या खोलीत मी खूप आनंदात असते. माझ्या खोलीच्या भींती माझ्याशी बोलतात. खिडकीत बसलं की खूप काही मला बघता येतं. खिडकीतून मोकळं आकाश दिसतं.

त्या निरभ्र आकाशाकडे बघून मन खूप मोकळं होतं.मनावरचं दडपण दूर होतं.


तारीख...१०/६/१९८८

मनातलं काही कसं सांगावं कुणाला याचा नेहमीच प्रश्न पडतो.ऐकणारा भला असेल तर ठीक नाहीतर माझी कहाणी कॅश करायच्या प्रयत्नात माझ्या जीवनाची वाताहत होईल. म्हणून खूपदा ओठापर्यंत आलेलं बोलायला धजावत नाही.

समुपदेशकांना टिव्हीवर सांगतांना ऐकलंय "बोला मोकळेपणानी बोला" त्यांना काय जातंय बोला म्हणायला. इथे माझ्या आयुष्यात इतके अतरंगी प्रसंग घडलेत की मी स्वतः अजून त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. घरचे तर नाहीच विश्वास ठेवत मग दुसरे कसा विश्वास ठेवतील?

तारीख… ११/६/१९८८

जेव्हा समज नव्हती तेव्हाही खूप त्रास झाला. पण सहन केला. कोणालाच सांगीतलं नाही. हळुहळू मी माझ्याच कोषात जाऊ लागले.सगळं मला कळत होतं तरी मला हा कोष खूप सुरक्षीत वाटू लागला.

माझं जे असायला हवं होतं ते सगळं या जगात होतं. माझी डायरी,माझं पेन,माझी चित्रकलेची वही आणि क्रेयाॅन.हेच माझं जग झालय.

इतरांना मात्र मी अशी एकटीच जगतेय यावर काळजी असण्यापेक्षा कुत्सीतपणाच जास्त होता. मी त्याकडे लक्षच देत नव्हते. माझ्या जगात मात्र मी कुणा अगांतुकाला मुळीच प्रवेश देत नसे.

या पानावर लिहीलेले एवढंच होतं. वैजूला हे सगळं वाचुन स्वत:च्या नकळत झालेल्या चुका लक्षात आल्या. त्या चूका लक्षात येऊन आता उपयोग काय? त्या कशा सुधरवता येणार?

आपण आपल्याही नकळत खूप कृरपणे वागलो मृण्मयीशी .रडत रडत न राहवून मृण्मयी समजून वैजू त्या डायरीची पापी घेत सुटली.बराच वेळ तिची तंद्री लागली होती.तिचं डोकं काम करेनासं झालंय हे तिच्याकडे बघून कोणीही ओळखलं असतं.
------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all