मृगजळ (भाग 6)

It is a story of s woman whose life revolves around her children.

#मृगजळ (भाग 6)

आयुष्य जरा कुठे स्थिरावतं आहे असं वाटलं की असं काही तरी मधेच धक्का देऊन जातं. माझं डोकं गरगरायला लागलं होतं. हिच्या आयुष्यात इतकं मोठं काही तरी घडतय आणि मला त्याची अजिबात कल्पनाही नसावी? आपल्या पिल्लांसोबत आपण छोटासं घरटं बांधू पाहतो आणि हे पिल्लं थोडे पंख फुटल्यावर असे भरकन उडून जातात. आपल्यालाच भिती वाटत राहाते पडण्याची, त्यांना दुखावण्याची. मी तशीच पलंगावर बसले होते. कोण, काय, कसं, कुठे असे अनेक प्रश्न घोंगावत होते डोक्यात. 

तेवढ्यात अभी तिथे आला. मी पटकन माझा हातातलं ते पाकिट माझ्या मागे लपवलं. तो त्याच्या धुंदीत होता म्हणा पण मलाच आपली भिती. 

“आई मी अर्धा तासात सच्याकडे जाऊन येतो ग..” त्यानी सांगीतलं आणि निघून गेला. 

चला आता बोलता तरी येईल अनूशी म्हणून मी त्याला जाऊ दिलं. मी तशीच बसले होते, हताश.. बाथरूमचा दरवाजा वाजला आणि माझी विचारांची तंद्री भंग झाली. अनू आली बाहेर. 

“हे काय आहे अनू?” मी तिच्याकडे रोखून पाहात म्हंटलं.

“आई तू कशाला हात लावलास ग माझ्या वस्तूंना?” तिनी मलाच प्रतिप्रश्न केला. आता मात्र माझा संताप होत होता. वाटलं दोन कानशिलात लगावून विचारावं तिला. पण आता मुलं मोठी झाली आहेत हे या निमित्ताने का होईना मान्य करायलाच हवं होतं. आपण मुलांना कितिही लहान लहान म्हणत राहिलो तरी ते सोईस्कररीत्या लहान मोठे होऊन जातात. आपल्या मात्र सदैव मोठेपणा घेउनच जगावं लागतं. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून मी स्वत:वर नियंत्रण ठेवलं. 

“अनू काय काय चाललं आहे नेमकं तूझं? कोणी त्रास देतय का तुला? की कुणी मुलगा आहे आयुष्य?” मी तिला विचारलं.
“आई त्रास कशाला देईल? माझं प्रेम आहे त्याच्यावर” अनू खूपच शांतपणे बोलत होती. 

“अगं पण मग मला का नाही सांगावसं वाटलं तूला? माझा स्वत:च प्रेम विवाह असताना मी तूला समजून घेईन असं नाही वाटलं का ग तूला? कोण आहे तो? नाव काय त्याच?” माझी प्रश्नाची सरबत्ती चालूच होती.

“पॉल... पॉल मॅथ्यू..” 

“अगं म्हणजे तूझा तो बॉस?” नाव ऐकून परत एकदा माझा काळजाचा ठोका चुकला. “अगं पण तो तर क्रिश्चन...”

“आई काय फरक पडतो आहे त्यानी? आमचं एकमेकांवर प्रेम आहे.. आम्ही समजून घेतो एकमेकांना.” ती मला मधेच तोडत म्हणाली.

“अगं तेवढं पुरेसं नसतं लग्नानंतर. त्यात त्याचा धर्मही वेगळा.. कसं निभावून नेशील तू हे सगळं?”

“पण आत्ता लग्न करायचच नाहीया आम्हाला..”

“अगं काय बोलते आहेस कळतंय का? तुम्ही दोघं इतकं समोर निघून गेल्यावर लग्न करायचं नाहीया म्हणतेस?” मी माझ्या हातातली गोळी तिला दाखवत जरा चिडूनच बोलले.

“आई आत्ता करायचं नाहीया असं म्हंटलं मी... आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि म्हणूनच एकमेकांच्या जवळ आलो आम्ही आणि त्यासाठी लग्नाची गरज नाही वाटत आम्हाला”

“अगं समाजाच्याही काही मर्यादा असतात. जर समाजात राहायचं असेल तर ती बंधनं पाळावीच लगातात. आणि काही कमी जास्त झालंतर मूलीलाच जास्त त्रास सहन कारावा लागतो बाळा” मी तिला समजवण्याच्या स्वरात म्हंटलं.

“म्हणूनच तर पुर्ण काळजी घेतो आम्ही आई” अनू म्हणाली. 
काय म्हणावं आता पोरीला “अगं आम्हीही प्रेम केलं पण हे असं नाही वागलो कधी.. आपण आपल्या मर्यादा ओळखूनच वागाया हवं..”

“मग भलं झालं का तुमचं सगळं? लग्नानंतर काय झाल पाहिलंच ना सगळ्यांनी?”

ही माझीच मुलगी बोलतेय ना आता याची शंका वाटायला लागली होती मला. तिनी माझ्या वर्मावर बोट ठेवून दुखावलं होतं मला. आपण मारे आपलं आपलं करतो पण माझं असं काहीच नसतं. या घरात एकत्र राहणारया आम्हा तिघांचही आयुष्य समांतर रेषेत चाललं होतं. ते एक आहे हा फक्त माझा भास होता. 

त्या दिवशी रात्री काही झोप लागली नाही. उलट सुलट विचार रात्रभर डोक्यात घुमत होते. आपली मुलगी एवढा स्वतंत्र विचार करून पुढेही निघून गेली, आणि आपण मात्र मागेच राहीलो. कधीच मोठ्या झालेल्या मुलांना लहान लहान म्हणून गोंजारत राहीलो. माझ्या स्वत:च्या सुखांपेक्षा आधी त्यांचा विचार केला पण त्यांच्या आयुष्यात मात्र मला स्फटिकाप्रमाणे स्थान आहे हा विचार मनाला चटका लावून गेला.

सकाळी उठले तेव्हा डोकं जड झालं होतं. मी अनूला ठणकावून सांगीतलं “त्याला घरी बोलाव. मला भेटायचं आहे त्याला. माझ्या आवाजात आज एक वेगळाच धाक जाणवला असेल तिला म्हणून नकार नाही देऊ शकली ती.

तेवढ्यात फोन वाजला गिरीशचाच होता. “अगं काय झालं? काल बोलता बोलताच कट झाला फोन? बरं मी काय म्हणत होतो...”
“गिरीश ऐक न.. मी तयार आहे आश्रम शाळेचं काम बघायला.. फक्त तुला मला थोडसं शिकवावं लागेल” मी त्याला मधेच तोडत म्हंटलं.

“अरे वा एका रात्रीतून मांजरीची वाघिण व्हावी तसाच बदल घडलेला दिसतोय.. काय confidence आहे राव”
मी नुसतीच हसले. काय सांगू त्याला हा आत्मविश्वास वगरे काही नसून स्वत:शीच पुकारलेलं बंड होता. कालच्या प्रसंगानी मला चांगलच भानावर आणलं होतं. आता मुलं मोठे झाले होते. त्यांच्या आयुष्यात आता माझी गरजा कमी होत चालली आहे हे काही मनाला पटत नव्हतं. 

“बरं तू उद्या पासूनच यायला सुरूवात कर. मी शाळाही दाखवीन आणि कामही समजावून सांगीन” तो बोलत होता पण माझं फारसं काही लक्ष नव्हतं त्याच्या बोलण्याकडे.

आज संध्याकाळी पॉल येणार होता घरी. तो कसा असेल, त्याच्या घरातले कसे असतील हीच धाकधूक होती मनात. माझा प्रेमाला मुळी विरोध नव्हताच. पण माझ्या वाट्याला जे भोग आले ते मुलांच्या वाट्याला येऊ नये इतकीच इच्छा होती. 

त्याचं नाव ऐकून तर असा काळा सावळा, कुरळ्या थोड्याश्या वाढलेल्या केसांचा, गळ्यात क्रॉस घातलेला, अल्लड असा मुलगा डोळ्या समोर येत होता.

पण प्रत्यक्ष दारात येउन जेव्हा तो उभा राहिली तेव्हा अगदीच विरूद्ध आकृती माझ्या समोर उभी होती. अगदी गोरा नसला तरी उजळ रंग, सुटाबुटातला, व्यवस्थीत चोपून भांग काढलेला एक माणूसच समोर उभा आहे असं वाटलं मला. माझी अनू त्याच्यापेक्षा बरीच लहान दिसत होती. तो किमान आठ दहा वर्षांनी तरी मोठा असावा. 

क्रमशः 

शलाका गोगटे बिनिवाले

कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.