मृगजळ (भाग 7)

It is a story of a woman whose life revolves around her children.

मृगजळ (भाग 7)

बोलून चालून मुलगा तसा बरा वाटला. पण आपल्या सारखीच दोन कुटुंब बघीतली तरी दोन्ही घरात अगदी खूप तफावत असते. तिथल्या पद्धती, चालीरिती, खाण्या पिण्याच्या तर्हा, आवडी निवडी अगदी सगळच वेगळं असतं. इथे तर धर्मच वेगळा होता. लग्न फक्त त्या मुलाशी किंवा मुलीशी नाही तर संपूर्ण कुटुंबाशी होत असतं. आम्ही शुद्ध शाकाहारी, ते मांसाहारी... एकूण काय तर परिस्थितीत खूपच तफावत होती. वयातलं अंतर हाही एक मुद्दा होताच. खूप समजावलं तिला. म्हंटलं अगं नऊ वर्षांनी मोठा आहे तुझ्यापेक्षा. तर म्हणाली तुमच्या वेळीही तर असायचं की इतकं अंतर. म्हंटलं अगं आमचा काळ वेगळा होता.. 

तर म्हणाली “हो ना? मग जसं आत्ता मान्य केलं तसं प्रत्येक वेळी का नाही मान्य करत हे वेगळेपण?”

मी निरूत्तर झाले होते. तिनी माझा हात हातात घेतला. म्हणाली, “आई, विश्वास ठेव माझ्यावर. मी जो निर्णय घेतला आहे ना त्याची पूर्ण जवाबदारीही माझीच असेल.” 

प्रश्न जवाबदारी घेण्याचा नव्हताच ग बाळा. ती येतेच आपोआप. पण जेव्हा संपुर्ण आयुष्य मन मारून, तडजोड करत जगावं लागता ना तेव्हा कळतं की किती कठीण असतं असं जगणं. 

मला फक्त माझी लेक आनंदी राहायला हवी होती. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मग मी नाखुशीनेच का होईना दिला होकार लग्नाला. मी फक्त एकच अट घातली की लग्न लवकरात लवकरच व्हायला हवं. आणि लग्न होत नाही तो पर्यंत आपल्या मर्यादा सांभाळायच्या. 

एकीकडे लग्नाची तयारी सुरू झाली तर एकीकडे मी आश्रम शाळेतही जाऊ लागले. जेव्हा गिरीश मला पूर्ण शाळा दाखवत होता तेव्हा ते जुने वाड्यातले दिवस आठवले मला. असच आम्ही वाड्यात तासन तास गोल गोल फेरया मारत बसायचो. गिरीशने खूप मदत केली मला सगळा कारभार समजून घेण्यात. छानच काम उभारलं होतं त्याने. मला कौतूक वाटलं त्याचं. हळूहळू मी त्या शाळेत रमत गेले. जमत होतं तसं मला सगळं. आणि काही अडलच तर गिरीश होताच की.

गिरीशचा मला खूपच आधार वाटायला लागला होता. हळूहळू मुलंही मोकळी होऊन बोलायला लागली त्याच्याशी. खूप दिवसांनी असं कुणावर तरी अवलंबून राहायला आवडायला लागलं मला. त्याचा नुसता आवाज ऐकला तरी वाटायचं, आहे कुणी तरी ज्याला हक्कानी हाक मारू शकतो आपण. शाळाही छान चालू होती. मला माई म्हणायची मुलं. खूप लळा लावला होता मुलांनी. 

अनुचं लग्नही साधेपणाने का होईना पण व्यवस्थीत पार पडलं. थोडी नाराजच होते मी. पण शेवटी मुलांचं सुख तेच आपलं सुख. शेवटी आयुष्यात आणखीन काय हवं असतं आपल्याला. अभीचही इंजीनियरिंग नुकतच झालं. तोही योग्य मार्गाला लागला. 

त्या दिवशी गिरीशनी मला विचारलं, चलतेस तलावपाळीवर? एक फेरफटका मारून येऊ सहजच. मीही निवांत होते. गेलो आम्ही. सुर्य मावळतीला आला होता. त्याचं छानस्ं प्रतिबिंब पडलं होतं पाण्यात. आम्ही तलावाच्या काठावर बसलो होतो. 

“प्रभू, आपल्याही आयुष्याची संध्याकाळ होत आली आहे आता.. पूर्ण जीवन खस्ता खाण्यात गेलं. आता ही संध्याकाळ तरी शांत, तेजस असावी असं वाटतं.” गिरीश म्हणाला.
“माझं ठिक आहे रे.. पण तुला काय झालं होतं खस्ता खायला? तू तर आपला एकटा जीव सदाशिव” मी गमतीतच त्याला म्हंटलं. 
पण आज तो गमतीच्या मूड मधे नव्हता, म्हणाला “रोज संध्याकाळी घरी गेल्यावर जेव्हा मलाच कुलुप उघडून दिवे लावावे लागायचे ना तेव्हा नको वाटायचं. ते रीकामं घर खायला उठायचं मला. मलाही वाटायचं आपलीही वाट बघणार्ं कुणीतरी असावं घरात. पण इथे मात्र रोज स्वत:च वाढून घ्या. आई गेल्यापासून कुणी मला दोन घास प्रेमाने भरवले नसतील. हे एकाकीपणाचं जीण तूला नाही समजणार.”

“मला नाही समजणार? मी ही एकटीच होते गिरीश. तुझं न ऐकण्याची खूप मोठी शिक्षा दिली देवाने मला. रोज तीळ तीळ मारायचे मी. रोज परिस्थीशी दोन हात करता करता थकायचे. दोन विसाव्याचे क्षण हवे होते मला फक्त. पण रडण्यासाठी एक हक्काचा खांदाही नव्हता माझ्याकडे. तू तर कुणीच नव्हतं म्हणून एकटा होता गिरीश. पण गर्दीतलं एकटेपण मी अनुभवलं आहे. फार भयानक असतं ते” मी सुस्कारा टाकत म्हणाले.

“निघून गेलेली वेळ काही परत येत नाही. आता या वयात आपल्या गरजा वेगळ्या आहेत प्रभू. फक्त काळजी करणारं, मनातलं बोलता येईल असं कुणीतरी सोबत असावं असं वाटतं. तू असशील ना ग माझ्या सोबत?” त्यानी माझा हात हातात घेत विचारलं.
मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या चेहरयावर पडली होती. त्या मंद प्रकाशात त्याच्या चेहरयावरच्या सुरकुत्या वयाची जाणीव करून देत होत्या. मनातील सगळे भाव चेहरयावर उमटलेत की काय असं वाटत होतं. मी हळूच माझा हात सोडवून घेतला, काहीच बोलले नाही. तो माझ्या बोलण्याची वाट बघत होता. 

म्हंटलं “चला निघूया अंधार होत आला आहे.” त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. पण मी निघाले. घरी आल्यावरही त्याचा विचार काही मनातून जात नव्हता. किती खरा वाटत होता त्याचा चेहरा आज. त्याच्या नुसत्या असण्यानेही आनंद मिळतो मला. आज खरं तर मलाही वाटलं होतं, घट्ट पकडावा त्याचा हात आणि सांगून टाकावं त्याला की हो मी आहे तुझ्या बरोबर. ईथून पुढे कायमची. पण हिम्मत झाली नाही. पण पन्नाशी उलटून गेली होती. या वयात कसला म्हातारचळ लागलाय म्हणायची लोकं. 

एवढ्यात अनू आली. ऑफिस मधून अशी कधितरी चक्कर टाकायची ती घरी. मी बोलत होते तिच्याशी पण माझं लक्ष नाहीया हे हेरलंच तिने. का कूणास ठाऊक पण त्या दीवशी तिच्या जवळ मन मोकळं करावसं वाटलं. जे घडलं ते सगळं सांगीतलं तिला. ती म्हणाली, “आई, खूप सोसलं आहेस तू. आणि आता जर तुला कुठल्या गोष्टींनी आनंद मिळत असेल तर ते तू करायलाच पाहिजे.” 

“लोक काय म्हणतील ग? इतके वर्ष सांभाळल स्वत:ला. कधी चुकूनही पाय घसरू दिला नाही. बिना नवरयाची बाई म्हंटल्यावर पुरूषी नजरा तर टपलेल्याच असायच्या. असे तात्पुरते आधारासाठी खांदे द्यायला तयार असणारेही बरेच होते. पण मी मात्र कधीच आपला तोल जाऊ दिला नाही. आणि आता हे असं का होतय मला कळतच नाहीया!”

“ कुठले लोकं आई? आपल्या अडचणीच्या वेळी कुणी आलं का ग धावून? स्वार्थ असल्याशिवाय कुणिही विचारलं नाही आपल्याला. तू आयुष्यभर खस्ता खालल्यास आमच्यासाठी. आम्हीही चुकलो बरेचदा पण तू नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. आता आमची वेळ आहे तुझ्यापाठी मागे उभं राहायची.” 

“आई, अगदी बरोबर बोलते आहे अनू” मागुन अभीचा आवाज आला. त्यानी सगळं ऐकलं होतं. दोन्ही मुलांना मी घट्ट मिठी मारली. खरच किती मोठी आणि समजुतदार झाली होती मुलं. 
मी देवा जवळ दिवा लावला. त्याला मनापासून हात जोडले. मनाशीच काहीतरी ठरवलं आणि गिरीशला फोन करून दुसरया दिवशी सकाळचं जेवायचं आमंत्रण दिलं. खूप हूरहूर लागली होती मनाला. मी उद्या बोलणार होते त्याच्याशी. ज्याला आयुष्यभर आपल्यामुळे एकटे रहावे लागले त्याच्याशी दोन प्रेमाचे शब्द तरी बोलायचे होते मला. रात्रभर त्याचा विचार मनात घोळत होताच. 
मी सकाळी उठले. आज एक वेगळाच उत्साह वाटत होता काम करतांना. मी त्याच्या आवडीची भरल्या वांग्याची भाजी केली. त्याच्या आवडता साजुक तुपातला शिरा भाजला. घरभर त्या खमंग भाजलेल्या शिरयाचा सुगंध दरवळत होता. मनाला एक वेगळीच हुरहूर लागून राहिली होती. खूप दिवस झाले कुणी प्रेमानं खाऊ घातलं नाही म्हणाला होता गिरीश. आज त्याची ही इच्छाही पूर्ण करू आपण, मी विचार केला. 

मी पोळया करायला घेतल्या. आतूरतेने वाट पहाट होते मी गिरीशची. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आला वाटतं गिरीश. मी पटकन आरशात बघून केस निट केले. पदर सारखा करून दार उघडायला गेले. आज त्याचा हात हातात घेऊन सांगणार होते मी त्याला की हो मी आहे तुझ्यासोबत, ईथून पुढे कायमची. 
मनात चलबीचल चालूच होती. तसच दार उघडलं. दारात गिरीशचं उभं असण अपेक्षीत होतं मला. पण दारात आश्रम शाळेतला चपराशी नामदेव उभा होता. त्याचा चेहरा उतरलेला होता. म्हटलं काय झालं नामदेव? काही निरोप दिला आहे का साहेबांनी? 

“काल रात्री त्यांचा फोन आला होता. त्यांची एक फाईल शाळेतच राहिली म्हणून. आज सकाळी ती त्यांच्या घरी नेऊन द्यायला गेलो तर दार आतुन बंद होतं. खूप वेळ वाट पाहिली पण कुणीच आलं नाही म्हणून खिडकीतून पाहिलं तर साहेब जमिनीवर पडलले दिसले. लोकांच्या मदतिनी दार तोडल्ं पण तो पर्यंत सगळच संपलं होतं.” 

पुर्ण खोली माझ्याभोवती फिरते आहे की काय असं वाटायला लागलं. मी तशीच खाली बसले. नियतीने मला परत एकदा पुर्वीच्याच ठिकाणी आणून उभं केलं होतं. हे असे जीवघेणे नीयतीचे खेळ आता मला नकोसे झाले होते. 

क्रमशः 

शलाका गोगटे बिनिवाले