Oct 22, 2020
स्पर्धा

मृदगंध भाग ४

Read Later
मृदगंध भाग ४

© मधुनिता

© सुनिता मधुकर पाटील

मृदगंध - भाग ४

श्यामली लग्न होऊन अवधुतच्या घरी आली खरी पण श्यामला इतक्या सहजासहजी विसरणं तिला शक्य नव्हतं.
तिने सारं विसरून नवी सुरवात करण्याची जरी मनाची तयारी केली होती तरी मनात श्यामच्या आठवणी अजून ताज्या होत्या.

तिच्या पापण्यांवर अजुन त्याचीच स्वप्नं तरळत होती आणि 
ती सारी स्वप्नं तिच्या आजच्या क्षणांवर राज्य करत होती.

तिला तिच्या विचारांमध्ये,वेदनांच्या जाणिवांमध्ये सारं आयुष्य हे भयाण वाटत होतं. तो प्रेमाचा नाजुक धागा, हरवलेलं प्रेम सारं सारं तिला व्याकुळ करायचं. 

आणि अवधूत...अवधूत त्याला ही प्रेम झालं होतं... श्यामलीशी !!! love at first site.

तो प्रेम जगत होता. श्यामलीच्या सहवासात. प्रेम म्हणजे तरी काय हो !!!

एक अव्यक्त भावना ज्यात समोरच्याची काळजी घेणे , त्याचे दु:ख आपले मानणे. त्याच्यावर कधी दु:खाची सावली ही पडू न देणे. अवधुतने कधी आपल्या अपेक्षांचं ओझं तिच्यावर लादलं नाही. 

तो तिच्यावर इतका विश्वास ठेवायचा की हळुहळु ती ही  त्याचा  विश्वास जपायला लागली. म्हणतात ना !!! नात जितकं जपावं ते तितकंच खुलतं. पण ते जपताना हळुवार जपावं. अवधुतच तिला हळुवार जपणं तिच्या मनात त्याच्यासाठी जागा निर्माण करत होतं आणि हळुहळु ती मोडक्या स्वप्नांची जुनी कात टाकून नवं रूप ल्याली होती. अवधुतच्या प्रेमात रंगली होती.

तिनं श्यामवर प्रेम जरूर केलं होतं पण प्रेम कसं निभावायचं हे ती अवधुतकडून शिकली होती. सारं सुरळीत झालं होतं तरी कधीतरी जुन्या आठवणी समुद्राच्या लाटांप्रमाणे उचंबळून वर यायच्या आणि तिला हळवं करून जायच्या.

श्यामली अजूनही रडत होती. अवधूत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. 

" अवधूत...प्लिज अवधूत माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेंव्हा सुरवातीला सारं कठीण होतं पण तुम्ही माझ्या आयुष्यात अशा वळणावर प्रवेश केलात ज्या वळणावर मला स्वतःला सावरण फार कठीण होतं." 

" तुमचं आणि माझं नातं खरंतर मला ते शब्दांत मांडता येणार नाही. तुम्ही कोण आहात माझ्यासाठी? कसं सांगू तुम्हाला..."

" तुम्ही माझ्यासाठी एक अनमोल ईश्वरीय देणगी आहात. तुम्ही आलात माझ्या रणरणत्या आयुष्यात शीतल सावली बनून. माझं हक्काचं खुळ आभाळ बनून. जे आभाळ तृषार्त धरेला हळुवार स्पर्श करतं आणि त्या स्पर्शाने धरेचं त्याच्यात विरघळून जाणं, बेधुंद होऊन तिचं गंधाळणं, तिचा तो ओला दरवळ तो " मृदगंध "... मन मोहून टाकणारा. सारं विसरायला लावणारा."

" तुम्ही तुमच्या प्रेमाने मला जिंकलतं आणि माझा भूतकाळ मला विसरायला भाग पाडलतं."

" सासूबाईंनी आईच्या मायेने केलेली मायेची पाखरण आणि तुमचं निर्मळ, निरभ्र आकाशासारख्या स्वच्छ प्रेमाने मला आंतरबाह्य पूर्ण बदलून टाकलं आणि दुधात साखर विरघळावी तशी मी तुमच्या संसारात, तुमच्या प्रेमात विरघळून गेले." श्यामली खूप काकुळतीला आली होती.  रडल्यामुळे तिच्या तोंडातून शब्दही नीट बाहेर पडत नव्हते.

" हो श्यामली, अनुभवलंय मी तुझं स्वतःला विसरून संसारात रमण. सर्वगुणसंपन्न बायको, एक संस्कारी सुन, आदर्श आईच्या भूमिका अगदी चोख पार पाडणं. तु ही सगळी पात्र अगदी जीव ओतून प्रामाणिकपणे निभावलीस. पण ही सारी पात्र निभावताना खरी श्यामली मात्र कुठे तरी हरवून गेली होती. खरी श्यामली तर वेगळीच आहे."

" खरी श्यामली मला त्या डायरीत सापडली."

" एखाद्या अवखळ नदीप्रमाणे मस्तीखोर...स्वतःमध्येच रमणारी...स्वच्छंदपणे आकाशात स्वैर विहंगापरी विहार करणारी तु...सोनचाफ्यासारखी पवित्र..."

" फुला पानांमध्ये रमणारी, श्रावणातल्या झुलणाऱ्या झोक्यासारखी... स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झूलणारी तु... पहाटेच्या दवासारखी शुद्ध निर्मळ..."

" पुनवेच्या रातीला पडलेल्या टिपूर चांदण्यासारखी... काजळ रातीला रुप्यात न्हाऊ घालणारी तु... तर कधी नक्षत्रांचा साज ल्यालेली यामिनी..."

" अव्यक्त आणि अमूर्त भावनांना शब्दांचा मोरपंखी साज चढवून मूर्त रूप देणारी तु... दिव्याच्या मंद ज्योतीप्रमाणे आंतरबाह्य उजळलेली..."

" कधी अवखळ वारा, कधी खळखळ झरा
कधी विहंग स्वच्छंदी, स्वैर नभी रमणारा..."

" मी अनुभवलेली श्यामली तर चेहऱ्यावर एक मुखवटा ओढून जगत आलेली होती. हे मला ती डायरी वाचल्यानंतर समजलं."

" मला माहीतच नव्हतं, माझ्या श्यामलीच्या मनाच्या डोहात तर भूतकाळाची भुतं सदा सर्वकाळ नांदत होती. त्या गूढ, गढूळ मनाच्या डोहात खोल आत तळाशी आठवणींचा गाळ साठला आहे. जोराचा सोसाट्याचा वारा देखील त्या डोहात लाटांचे तरंग उठवण्यास असमर्थ असतील गं !!! कधीतरी कातरवेळी एखादी कोवळी झुळूक एखादा मंद तरंग उठवून अचानक अंतरात एखादा बुडबुडा आठवणींचा सडा घालत असेल."

" तुझ्या मनातील तो गढूळ, काळाशार, गूढ  डोह स्वच्छ, नितळ झालेला आणि चांदण्यांच लेणं लेवून लख्ख लखलखताना पाहायचा आहे मला."

 " डायरीतली ती अल्लड, अवखळ, श्यामली अनुभवायची आहे मला आणि त्यासाठी मनाला सलणारी ती वेदना, व्यथा कायमची वाहून जायला हवी. त्यासाठी संवाद महत्वाचा होता गं. व्यक्त होणं खूप गरजेचं होतं. प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं."

" गेली पंचवीस वर्षे तू भीतीच्या एका सावटाखाली जगत होतीस. त्या भीतीच्या सावटातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेतलेली श्यामली हवी आहे मला."

अवधूत एकीकडे बोलत होता तर दुसरीकडे त्याच्या पापण्यांचे काठ ओसांडून वाहत होते.

श्यामलीने त्याला अस रडताना कधी पाहिलं नव्हतं. नेहमी हसतमुख, उत्साही, अवधुतच तिने पाहिला होता. त्याला अस रडताना पाहून तिने त्याचे डोळे पुसले आणि अलगद त्याच्या बाहुत शिरली.

" श्यामली, याच जागेवर तुम्ही दोघे शेवटचं भेटला होता ना ? मनावर गोंदलेली दुःख विसरून, भुतकाळातल्या आठवणींना तिलांजली देऊन पुन्हा नव्याने याच जागेवरून नवीन सुरवात करशील का ? ती जुनी अवखळ, अल्लड श्यामली पुन्हा नव्याने जगशील का ? माझी फक्त माझी श्यामली मला परत देशील का ?" अवधूत तिच्या डोळ्यात पाहून तिला विचारत होता.

ती फक्त," हो अवधूत !!! " इतकंच बोलली, तिला काय बोलावं काही सुचत नव्हतं. ती फक्त अवधुतला अश्रूभरल्या नयनांनी न्याहाळत होती.

दोघांच्याही मनातील मळभ दूर झालं होतं आता फक्त स्वच्छंद विहार बाकी होता त्या मुक्त आकाशात, स्वप्नांच्या  पंखांनी. ह्या पुढचा प्रवास त्या मोकळ्या आभाळातला फक्त तिचा आणि त्याचा. अन साथ होती स्वप्नांना बळ देणाऱ्या मजबूत पंखांची.

उन्हाचे तप्त सोहळे आता सरले होते आणि कोवळ्या पावलांनी त्यांच्या आयुष्यात श्रावण बरसणार होता. त्याच्या हळव्या स्पर्शाने तृषार्त धरा मंद मंद दरवळणार होती. आणि त्या ओल्या मृदगंधात दोघेही गंधाळून जाणार होते.

" मृदगंध "

अपरिमित दाह अन
वर्षानुवर्षे 
गर्भस्थ दडपलेला
भावनांचा कल्लोळ
छळतो अविरत...
ऐकून उसासे 
रुजव्याच्या मातीचे
खुळ आभाळ
देतं दान ओल्या मोत्यांच
गहिवरतो श्वास अन 
मोहरतो कणकण
तेंव्हा कुठे
फुटतात प्रेमाचे धुमारे
हिरवेकंच
अन दरवळतो " मृदगंध "

समाप्त...

© सुनिता मधुकर पाटील

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

 

 

Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????