Oct 27, 2020
स्पर्धा

मृदगंध भाग ३

Read Later
मृदगंध भाग ३

© मधुनिता

© सुनिता मधुकर पाटील

मृदगंध - भाग ३

" हो श्यामली, विश्वास आहे माझा तुझ्यावर आणि मला श्यामने ही काही सांगितलेले नाही." तो तिचे डोळे पुसत तिला सांगतो.

" तुला आठवतंय श्यामली? मी तुला नेहमी म्हणायचो आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या अँनिव्हर्सरीला मी तुला असं काही गिफ्ट देणार जे तुझ्या हृदयाच्या खूप जवळ असेल आणि मागील सहा महिन्यांपासून मी शोधात होतो की अशी कोणती गोष्ट आहे जी तुझ्या अगदी जवळ तुझ्या हृदयात घर करून आहे. मग मला आठवलं लग्नानंतर तु मला एकदा सांगितलं होतंस की तू कविता करतेस पण मी कविता, कल्पनेच्या विश्वात रमणारा माणुस नव्हतो. मी सरळ प्रॅक्टिकल माणुस मनापेक्षा बुद्धीने जास्त काम घेणारा. मी ते ऐकलं आणि त्या गोष्टीला जास्त महत्व न देता सोडून दिलं. त्यावेळी तु हेही सांगितलेलंस की तुझा स्वतःचा, तु लिहलेल्या कवितांचा  कविता संग्रह हे तुझं स्वप्न आहे. तु कवितासंग्रहाच नावही ठरवलं होतं पण ते मला त्या वेळी आठवत नव्हतं."

" मला आता कळालं होत तुला काय गिफ्ट द्यायचं ते. तुझा तु लिहलेल्या कवितांचा कवितासंग्रह यापेक्षा मौल्यवान भेट तुझ्यासाठी काही असूच शकत नव्हती म्हणुन मग मी तु लिहलेल्या कवितांचा शोध सुरू केला. मला हे सगळं तुझ्या नकळत करायचं होतं. त्याशिवाय तुला आश्चर्याचा धक्का कसा देऊ शकणार होतो मी. याच शोधत तुझ्या कवितांची डायरी तर मला सापडली पण त्यासोबत आणखी एक डायरी माझ्या हाती लागली. तुझ्या कवितांच्या डायरीवर मोठ्या अक्षरात " मृदगंध " असं लिहलं हॊत ते वाचुन मला समजलं की ही तुझी कवितांची डायरी आहे."

" या सगळ्या गोंधळात मी खुप सारा पसारा करून ठेवला होता, तो आवरता आवरता एका डायरीतुन एक फोटो खाली पडला. तो फोटो मी पाहिला तर तो मला प्रसिद्ध गायक श्याम यांचा आहे असा वाटला कारण फोटोतील श्याम थोडे तरुणावस्थेतील वाटत होते, पण नीट निरखून पाहता खात्री  पटली की ते श्यामच आहेत. मला वाटलं की तुला हे गायक आवडत असतील म्हणुन तु जपून ठेवला असशील त्यांचा फोटो. पण फोटोच्या पाठीमागे "  अविष्कार साने " हे नाव मला लिहलेलं दिसलं."

" अवधूत श्यामली कडे पाहत बोलत होता आणि श्यामली फक्त त्याच्याकडे पाहून रडत होती आणि तिला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत असं वाटत होतं."

" दोन दिवस माझ्या मनात विचारांचं द्वंद्व चालू होतं. कोण हा अविष्कार? श्यामच्या फोटोवर त्याच नाव का? काही केल्या माझ्या मनातून ते  विचार जात नव्हते. वाचावी का डायरी, पण दुसऱ्याची पर्सनल डायरी वाचणे ही गोष्ट काही माझ्या मनाला पटत नव्हती. पण जर एखादी गोष्ट आपल्याला अर्धवट माहिती असते ना, तेंव्हा त्याबद्दल आणखीन जास्त जाणून घ्यायची उत्सुकता नेहमीच वाढत असते."

" शेवटी काही गोष्टी मनाला पटत नसताना देखील आपण त्या करतो माझं ही तसच झालं. मन नको सांगत असताना, बुद्धी सांगत होती, वाच डायरी, त्यात काय एवढं... माझी उत्सुकता ही चांगलीच शिगेला पोहचली होती. त्यामुळे मी डायरी वाचायची ठरवतो."

" मी डायरी वाचायची ठरवलं खरं, पण अज्ञानात सुख असत असं म्हणतात ना त्याची प्रचिती क्षणोक्षणी मला येत होती. "

" श्यामली, तुला खरं सांगू का त्या डायरीतला एक एक शब्द  माझ्या हृदयावर असंख्य घाव करत होते. माझ्या काळजाच्या चिंधड्या...चिंधड्या करत होते गं. इतकी मोठी गोष्ट तु पंचवीस वर्षे माझ्यापासून लपवून ठेवलीस यावर माझा विश्वासच बसत नव्हता गं."

" प्रेम काय असत हे मला तुला पहिल्यांदा पाहिल्यावर उमगलं. तुला पाहताच असं वाटलं बस आता आणखी आयुष्यात काही नको. तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य त्या दिव्याच्या तेवत्या ज्योतीप्रमाणे तू उजळून  काढलंस. सुरवातीला तुझ्यातला अवघडलेपणा, संकोच, तुझं गप्प गप्प राहणं, अबोला छळायचा मला पण वाटलं नवं घर, नवी माणसं म्हणून असेल कदाचित. त्यामागे इतकं मोठं कारण असु शकतं अस कधी स्वप्नात देखील वाटलं नाही मला."

" माझं आयुष्य, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हे तुझं माझ्या आयुष्यात येण्यामुळे तुझ्या सहवासामुळे सुगंधीत झाला आहे गं. माझी प्रत्येक सकाळ तुझ्यासोबतच उगवते आणि प्रत्येक संध्याकाळ संगीताची पेरणी करत 'सूरमयी’ होते तीही तुझ्याच सोबतीने. माझा श्वास माझा नि:श्वास सारे तुझ्या अस्तित्वाच्या जाणिवा लेवूनच येतात. ज्याला मी माझे आयुष्य समजतो. माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला तो केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच.

" तुझी नजर जेंव्हा माझ्या नजरेत मिसळते ना आणि तुझे  हात जेंव्हा माझ्या हातात गुंफले जातात तेंव्हा माझे मन  माझे उरतच नाही ते तुझेच होऊन जाते. माझं स्वतःच म्हणावं असं माझं काही उरतच नाही गं. माझे सारे दिवसच काय मी संपूर्ण तुलाच समर्पित असतो . मी तुझ्यापासून निघून अखेरीस तुझ्यापर्यंतच येऊन पोहोचतो. हे सगळं का घडतं? असं जर कोणी विचारलं तर एकच उत्तर कारण तु असतेस माझ्यासोबत माझ्या श्वासात, माझ्या प्राणात, म्हणुन..."

" माझ्या आयुष्यात सगळीकडे तुच असताना, तुझ्या मनात मात्र दुसरं कोणीतरी असावं हा विचारच मला सहन होत नव्हता. दिवसरात्र फक्त तुझे आणि अविष्कारचेच विचार मनात घोळत रहायचे. खूप घुसमट व्हायची, मनाचा आक्रोश, आतल्या आत होणारी तडफड, चिडचिड, सार असह्य होत होतं."

" आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग आणि मनात दाटलेल्या  दुःखद भावना, मनाला सलणारे विचार अगदी सारखेच असतात, नाही का...? जस कधी कधी आकाशात मळभ दाटून येत...काळभोर, अंधारमय...त्या नभांची दाटी, तगमग, अगदी कासावीस करणारी असते...आणि मनाचं ही तसंच असतं ना ? मनात एक वेगळीच घुसमट, नकारात्मकतेची भावना, गृहीत धरल्याची, अपमानित झाल्याची भावना अगदी जीव नकोसा करून टाकणारी तगमग असते. जीव गेला तरच आपण सुटू यातून असे विचार ही मनात येतात. वाढत जाणारी मनातली घुसमट डोक्यात नकारात्मक विचारांची शृंखला तयार करते...माझ्याही  डोक्यात अशा नकारात्मक विचारांची शृंखला सुरु झाली होती."

" तुझ्यावर चिडू आणि रागवू ही शकत नव्हतो कारण तुला दुःखी करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. तुझ्या डोळ्यात मी अश्रूचा एक थेंब ही पाहू शकत नाही. या सगळ्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होऊ लागला. मी आतल्या आत कुढू लागलो, कशातच मन लागत नव्हतं परिणामी आपल्या बिजनेसवर ही परिणाम होऊ लागला." 

" तुला आठवतंय मागील चार महिन्यांपूर्वी मी चक्कर येऊन कोसळलो होतो. मला हॉस्पिटलाइज ही करावं लागलं होतं.
तु खुपदा मला खोदून खोदून विचारलेस की मी असे का वागतोय, मला काय होतंय. मी काय सांगणार होतो गं तुला. मी गप्प राहणंच योग्य समजलं. मन अगदी सैरभैर झालं होतं."

"एकदा बोलून तर बघायचं होत ना !!! सारं काही एकट्याने सहन करत राहिलात." श्यामली रडत रडत जाऊन अवधुतला बिलगते.

तो तिला जवळ घेत, डोळ्यात साठलेले अश्रू पुसत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि परत बोलायला सुरुवात करतो.

" तुला आठवतंय श्यामली, एक दिवस आपली सारा खूप रडत होती. तिला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले होते. जीव तोडून रात्रंदिवस तिने खूप मेहनत घेतली होती पण परीक्षेत काय झालं कोणास ठाऊक तिला कमी मार्क्स आले. त्यावेळी तु तिला किती छान प्रकारे समजावून सांगितलं होतंस... तू म्हणाली होतीस..."

" कमी मार्क्स मिळाले म्हणुन हताश होऊ नको बाळा. तू खूप मेहनत घेतलीस पण प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच घडतील असं होतं नाही ना. जे नाही मिळालं ते आपल्यासाठी नव्हतंच समजून पुढे चालत रहायचं. नियतीने जे दान आपल्या ओटीत टाकलेलं असत ना त्याचा आदराने स्वीकार करायचा. काय माहीत जे हरवलं आहे त्या पेक्षा काहितरी चांगलं तुझ्या नशिबात असेल म्हणून तुला हे मिळालं नाही. जे नाही त्यासाठी कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आदर करणं कधी ही चांगलं."

" तुझं हे बोलणं ऐकलं आणि माझी विचार करण्याची दिशाच बदलली. इथेही नकळत तूच मला सावरलंस. "

" मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यासोबत आहेस या पेक्षा सुंदर आणि सुखद भावना या जगात काही नाहीच पण तू... तुझं काय?  तू ज्याच्यावर प्रेम केलं होतंस तो तुला सोडून गेला होता. किती त्रास झाला असेल तुला. याचा अंदाज मी आता लावू शकत होतो. आता मी माझं दुःख बाजूला सारून नकळत तुझा विचार करायला लागलो होतो."

" तुला किती असह्य वेदना झाल्या असतील. तुझ्या मनाची व्यथा तु कोणाजवळ व्यक्त केली असशील. तुझी स्वप्न क्षणात काचेसारखी तडकली होती.  तुझं वेड मन तहानलेला पक्षी जसा पाण्यासाठी तडफडतो तसच स्वतःशी झगडत असेल. भंगल्या मनाची लक्तरे तु कशी साधंली असशील. प्रेमाच्या डावातील सारे फासेच उलटे पडले होते. हे सारं घडत असताना माझं तुझ्या आयुष्यात येणं."

" जुनं सार विसरून पुन्हा नव्याने सुरवात करणं, इतकं सोपं होत का गं हे तुझ्यासाठी." अवधूत बोलता बोलता भावविवश झाला होता आणि श्यामली ती फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहून कधीपासून रडत होती.

" सोपं काहीच नव्हतं अवधुत, खूप अवघड होतं सारं. काय होतंय कळत नव्हतं. डोळ्यातलं तळ ओसंडून वाहत होत. मनात एक जीवघेणी खळबळ माजली होती. कळत नव्हतं की मी कशाच्या मागे धावतेय. जे कधी माझं नव्हतंच त्याच्यासाठी चाललेला अट्टहास, जीवाचा आटापिटा सारंच जीवघेण होतं. हृदयात एक आग पेटली होती आणि त्या आगीच्या ज्वालांमध्ये मी होरपळून निघत होते."

" मनात खुप प्रश्न होते पण सारेच अनुत्तरित. खूप मोठयाने आक्रोश करावा. मोठमोठ्याने रडावं. अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी असं खूप वाटतं होतं. जिवंतपणी मरणयातना होत्या."

" आपण स्वतः पेक्षाही जास्त एखाद्यावर विश्वास ठेवावा, जीव ओवाळून टाकावा आणि समोरच्याने श्वास हिरावून घ्यावेत आणि आपण आगतिकपणे, असहायतेने फक्त त्याच्याकडे पहात रहावं."

" काहीतरी तुटत होतं आत. मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडाची अवस्था कशी असते ना तशीच अवस्था झाली होती माझी."

" माझी वेडी आशा... वेड मन मृगजळामागे धावत होतं पण त्याची धाव कुठवर असणार होती ? कुंपणापर्यंत !!! किती ही आकांत केला, आक्रोश केला तरी काहीच फायदा होणार नव्हता कारण तिथपर्यंत माझं पोहचण अवघड होतं."

" भ्रमिष्टा सारखी अवस्था झाली होती माझी आणि अशातचं घरच्यांनी माझं लग्न तुमच्यासोबत जमवलं. लग्नाआधी तुम्हाला सारं खर सांगावं खुपदा मनात आलं पण ते कधी मला जमलंच नाही. लग्नानंतर ही खुपदा प्रयत्न केला पण हिम्मत झाली नाही."

" नेहमी वाटायचं तुम्ही मला समजून नाही घेतलं तर... माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्याच नाही तर...मला माझ्या भूतकाळासोबत नाही स्वीकारलं तर..."

" आपण आपल्या आयुष्यात क्षणा क्षणांचे हार गुंफत जातो आणि त्या क्षणांच्या मालिकेलाच आपण जीवन म्हणतो.
हे आनंदाचे, सौख्याचे, दुःखाचे क्षणच आपल्या जीवनाला व्यापून असतात."

" म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगणे महत्वाचे असते. खरेतर आपण जीवनाला नाकारून नाही तर स्वीकारून जगणे मोलाचे आणि महत्वाचे असते. आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगाना आपण सामोरे जातो ,काही क्षण आनंद देतात तर कधी कधी काही गोष्टी दुःख देतात. कधी कधी भीती वाटते, नकोसा जीवघेणा तणाव निर्माण होतो. कोणताही प्रसंग असो त्याला हिंमतीने सामोरे जाणे म्हणजे धीरता आणि तीच धिरता मी माझ्यात एकवटत होते.

" परिस्थिती पासून दूर पळून गेले म्हणून वस्तूस्थिती बदलणार नव्हती. जी परिस्थिती आहे तिला एक चुनौती म्हणून स्वीकारुन त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला होता."

" पळून जाऊन प्रश्न सुटणार नव्हते आणि भीतीने घाबरून जाऊन प्रश्नाचे स्वरूप ही सौम्य होणार नव्हतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मलाच शोधायची होती."  

" नशीब, प्रारब्ध, नियती म्हणुन जे काही माझ्या समोर आलं होतं  त्याला नवीन आकार, नवीन रूप मलाच द्यायचं होतं. सारं विसरून..."

" म्हणुन आमचं नात तुमच्यापासून लपवून नाही तर ते नात मी स्वतः विसरून पुढे पाऊल टाकायचं त्यावेळी ठरवलं होतं पण तसं जरी ठरवलं असलं तरी पदोपदी एक भीतीच सावट होतचं. मी जरी सगळ्या गोष्टी विसरणार होते तरी कधी तुमच्या समोर हे सत्य आलंच तर..."

" माझं तुमच्याशी लग्न झालं आणि मी जुनं सारं मागं सोडून तुमच्या घरात श्यामली परांजपे म्हणुन गृह प्रवेश केला." 

सासरी आल्यानंतर श्यामली लवकर रुळली असेल का? अवधुतसोबत निभावून नेताना तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला पाहुयात पुढील भागात.

क्रमशः

© सुनिता मधुकर पाटील

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

 

 

 

 

 

 

 

Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????