Oct 22, 2020
स्पर्धा

मृदगंध भाग १

Read Later
मृदगंध भाग १

© मधुनिता

© सुनिता मधुकर पाटील

मुदगंध - भाग १

श्यामलीने उगाचच पुन्हा एकदा स्वतःला आरशात नीट न्याहाळलं. नाकात नथ, भरजरी पैठणीत तीच रूप आणखीच खुललं होतं. कपाळावरचं कुंकू एकसारखं करत," जरा जास्तच मोठं कुंकू नाही लावलं का आज आपण?" असा स्वतःलाच प्रश्न करत ती खोलीतून बाहेर आली. बाहेर सगळे तिची वाट पाहतच होते.

अवधूत तिचा नवरा तर तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. "आज लग्नानंतर पंचवीस वर्षांनीसुद्धा किती गोड दिसते ही." तो मनातल्या मनातच बडबडला आणि तिचा हात हातात पकडला. दोघे जोडीने बाहेर हॉल मध्ये आले.

घर माणसांनी गच्च भरलं होतं. आज श्यामली आणि अवधूत दोघेही उत्सव मूर्ती होते कारण आज त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस होता. साऱ्या आलेल्या पाहुण्यांच लक्ष फक्त ह्या दोघांवरच होतं. सारा आणि अक्षतने म्हणजेच त्यांच्या मुलांनी मोठ्या कौतुकाने हा सगळा कौतुक सोहळा आयोजित केला होता. देखण्या आणि रुबाबदार अवधूत सोबत नितांत सुंदर श्यामली जणू लक्ष्मी नारायणाचाच जोडाच.

" दृष्ट लागेल गं कोणाची तरी माझ्या लक्ष्मी नारायणाला," असं म्हणत श्यामलीच्या सासूने दोघांनाही जवळ घेतलं आणि श्यामलीच्या कानामागे काजळाची तीट लावली.

अवधुतने श्यामलीसाठी एक सरप्राईज प्लान केलं होतं. कितीतरी दिवसापासून तो तयारी करत होता. तो ते तिला पार्टीतच देणार होता. तिची उत्सुकता त्याने चांगलीच ताणून धरली होती. लग्नाच्या वाढदिवसासाठी त्याने खूप लोकांना आमंत्रित केलं गेलं होतं.

आपण सारे ह्या आयुष्यात किती खुश, आनंदी आहोत, ह्याच हे प्रदर्शन चालू आहे असं तिला राहून राहून वाटत होतं. अशा पार्ट्यांमध्ये तिचं मन कधीच रमत नव्हतं.पण आता लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर तीला हे चांगल जमत होतं. मोठ्या चतुराईने ओठावर हसू आणून अवधूतच्या बाजूला थांबून सगळं किती गोड आणि सुंदर आहे हे ती भासवायला सराईतपणे शिकली होती.

पूर्ण पार्टीत श्यामलीला जाणवत हो की अवधूत सारखा सारखा मेन गेटकडे पाहतोय, नक्कीच तो कोणाची तरी वाट पाहत होता. शेवटी तो हातात माईक घेऊन अनाऊन्समेंट करतो, Now it's a time to reveal the surprise."

अवधूतने नजरेनेच सारा आणि अक्षतला खुणावताच ते दोघे एक छान सजवलेला बॉक्स घेऊन आले.

अवधुतने तो बॉक्स उघडला आणि त्यातून एक छानसं कवितासंग्रहाच पुस्तक बाहेर काढलं आणि ते पुस्तक श्यामलीच्या हातात देत तो म्हणाला," तू लग्नाआधी कविता लिहीत होतीस आठवतंय तुला? लग्नानंतर तुझा तो छंद घरच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कधी कुठे हरवून गेला हे तुला स्वतःलासुद्धा समजलं नाही, म्हणून म्हटलं चला आपणच तुला आठवण करून द्यावी." तू लिहलेल्या कवितांचा हा कवितासंग्रह, " मृदगंध " तुझं स्वप्न...

" मृदगंध " तिचं स्वप्न हातात पकडताना श्यामलीचा हात थरथरत होता. तिचं स्वप्न अशाप्रकारे एक दिवस पूर्ण होईल आणि एक सुखद, गोड धक्का तिला देऊन जाईल याची तिने कधी कल्पनाच केली नव्हती. तिच्या नजरेत अवधुतबद्दल आदर ओसांडत होता आणि इतक्यात अवधुतचा फोन वाजला.

" हो...हो मी पाठवतो कोणालातरी." इतकंच बोलून त्याने फोन कट केला.

त्याने अक्षतला कानात काहीतरी सांगितलं आणि अक्षत तातडीने बाहेर निघून गेला. श्यामलीला कळत नव्हतं हे काय चाललय बाप - लेकाचं पण ती अजुन " मुदगंध " मध्येच गुंगली होती.

" हा तर, ladies and jentalmen आता आणखी एका सरप्राईजसाठी तयार रहा, प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करा मिस्टर श्याम यांचं." अवधुतने अनाऊन्समेंट करताच सगळयांच्या नजरा त्याने हात केलेल्या दिशेने वळाल्या. समोरून श्याम आणि त्याची पत्नी रेवा अक्षत सोबत येत होते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून श्यामच स्वागत केलं. तिथे त्या पार्टीत क्वचितच कोणी असेल जो श्यामला ओळखत नसेल. तो एक बऱ्यापैकी प्रसिद्ध गायक होता. सगळे त्याला ओळखत होते.

श्यामच नाव ऐकताच श्यामलीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती कावरीबावरी होऊन अवधूतकडे आश्चर्याने पाहू लागली.

अवधूत श्याम सोबत श्यामली जवळ गेला आणि तिची श्यामशी ओळख करून दिली, " मिस्टर श्याम ही माझी पत्नी श्यामली परांजपे...तुम्हाला आमंत्रण, हे माझ्या बायकोसाठी खास सरप्राइजेस मधील एक गोड सरप्राईज आहे बरं का !!! तुमच्या गायकीची ही खुप मोठी फॅन आहे म्हणुन तिच्यासाठी तुमच्या गीतांच्या मेजवानीशिवाय आणखी चांगली भेट काही असूच शकत नाही."

श्यामने एक नजर श्यामलीकडे पाहिलं आणि तो जागीच थबकला. तेच सुंदर, गहिरे, धारदार डोळे, क्षणभर तिच्या डोळ्यात तो हरवला आणि नंतर स्वतःला सावरत त्याने तिला नमस्कार केला. त्याने आपल्या बायकोची अवधूत आणि श्यामलीशी ओळख करून दिली.

पार्टी चांगलीच रंगात आली होती. श्याम दुरूनच तिला पाहत होता. ती परत कधी जीवनात आपल्याला भेटेल याची त्याने कधी कल्पनाच केली नव्हती. किती वर्षे झाली तिला पाहून पण तिच्यात कणभरही बदल त्याला जाणवत नव्हता. जवळपास पंचवीस वर्षानंतर तो तिला पाहत होता तरीही कालच भेटल्यासारखी ती वाटत होती, अगदी तशीच. केसांवर वयोमानानुसार चांदीचा वर्ख चढलेला होता पण तो लपवण्याचा काडीमात्रही प्रयन्त तिने केला नव्हता. तेच मोठे, बोलके डोळे, चेहऱ्यावरचं तेज अजूनही तसंच बरकरार होतं, ते काळजाचा ठाव घेणार कातिल हसू... तो वेड्यासारखा तिला न्याहाळत होता पण ती एक नजर उचलूनही त्याच्याकडे पाहत नव्हती. आता त्याला अगदी चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागलं होतं.

" मिस्टर श्याम होऊन जाऊ दे एक छानसं, फक्कड गाणं." अवधुतने श्यामला विनंती केली आणि श्याम भानावर आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याच स्वागत केलं.

त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि हसत गायला सुरवात केली... शकील बदायुनी यांनी लिहलेलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत जे तो नेहमी तिच्यासाठी गायचा.

चौदवीं का चाँद हो, या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम, लाजवाब हो
चौदवीं का चाँद हो...

जुल्फें हैं जैसे काँधों पे बादल झुके हुए
आँखें हैं जैसे मय के प्याले भरे हुए
मस्ती है जिसमें प्यार की तुम, वो शराब हो
चौदवीं का चाँद हो...

चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कँवल
या ज़िन्दगी के साज़ पे छेड़ी हुई ग़ज़ल
जाने बहार तुम किसी शायर का ख्वाब हो
चौदवीं का चाँद हो...

होठों पे खेलती हैं तबस्सुम की बिजलियाँ
सजदे तुम्हारी राह में करती है कहकशां
दुनिया-ए-हुस्नो-इश्क का तुम ही शबाब हो
चौदवीं का चाँद हो...

त्याने गायला सुरवात करताच तिच्या काळजात एक वेदनेची लकेर उमटून गेली आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. इतका वेळ त्याला दुर्लक्ष करत त्याच्याशी आपली नजरानजर होऊ नये म्हणुन चाललेला तिचा अट्टहास आता मोडीत निघू पाहत होता. आतून सगळं ढवळून निघत होत. सार काही आता उचंबळून बाहेर येऊ पाहत होत. जास्त वेळ तिला मनाला लगाम घालता आला नाही आणि शेवटी तिने अधीर होऊन एक चोरटा कटाक्ष त्याच्यावर टाकलाच.

आजही तो तसाच दिसत होता, देखणा रुबाबदार...जेंव्हा तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेंव्हा दिसायचा तसाच.

" आविष्कार साने " B.com सेकंड ईयर, त्याला पहिल्यांदा पाहताच ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. श्यामली त्याच्या प्रेमात पडली होती ते त्याच गाणं ऐकून. आविष्कार छान गाणी गायचा. एकाच कॉलेजमध्ये दोघे शिकत होते. तो एक वर्ष सिनियर होता आणि श्यामली बी.ए पहिल्या वर्षात होती. कॉलेजच्या कोणत्याही  कार्यक्रमात दोघेही उत्साहाने भाग घ्यायचे. दोघे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. दोघांची ओळख झाली. त्या कार्यक्रमात त्याने आनंद बक्षी यांचं किशोर कुमारच्या आवाजातील गाणं गायल होतं...

एक अजनबी हसीना से
यूँ मुलाकात हो गई
फिर क्या हुआ, ये ना पूछो
कुछ ऐसी बात हो गई
एक अजनबी हसीना से...

वो अचानक आ गई, यूँ नज़र के सामने
जैसे निकल आया घटा से चाँद
चेहरे पे ज़ुल्फ़ें, बिखरी हुई थीं
दिन में रात हो गई
एक अजनबी हसीना से...

जान-ए-मन जान-ए-जिगर, होता मैं शायर अगर
कहता ग़ज़ल तेरी अदाओं पर
मैंने ये कहा तो, मुझसे ख़फ़ा वो
जान-ए-हयात हो गई
एक अजनबी हसीना से...

खूबसूरत बात ये, चार पल का साथ ये
सारी उमर मुझको रहेगा याद
मैं अकेला था मगर, बन गई वो हमसफ़र
वो मेरे साथ हो गई
एक अजनबी हसीना से...

त्याचं गाणं ती मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती आणि भान हरपणं म्हणजे नक्की काय असतं हे तिला तेंव्हा  उमगलं होतं.

दोघे वरचेवर भेटू लागले, एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी  कळू लागल्या. दोघेही सारखेच होते म्हणून तर सूर जुळत गेले आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. श्यामली छान कविता करायची तिचं एकच स्वप्न होतं, तिच्या कवितांचा कवितासंग्रह..." मृदगंध "

ती अविष्कारच्या सहवासात रमू लागली. तो त्या अल्लड ढगाप्रमाणे आपल्या प्रेमसुरांनी तिच्यावर बरसायचा आणि ती ही त्या प्रेमसरींमध्ये चिंब न्हाऊन मृदगंधासारखी दरवळायची, बेभान व्हायची.

अविष्कार तिला नेहमी म्हणायचा की, मी जेव्हा मोठा गायक होईन ना तेंव्हा श्याम या नावाने गाणं गाणार. तू " श्यामली " आणि मी तुझा " श्याम ". तु कविता लिहलेस ना तेंव्हा तु माझ्यासाठी गाणं लिहायचं आणि मी ते गायचं. दोघांनी मिळून सुंदर स्वप्नांचे मनोरे उभे केले होते.

दोघांचंही कॉलेज पूर्ण झालं, श्यामलीच्या घरच्यांना तिच्या लग्नाचे वेध लागले. वर संशोधनही सुरू झालं. चांगली दोन तीन स्थळं तिला सांगून आली होती. एक दोन चांगल्या स्थळांना तिने नकार दिला पण जास्त वेळ ती ही गोष्ट ताणून धरू शकेल अस तिला वाटत नव्हतं.

" श्याम, तू लग्नाबद्दल काय ठरवलंय, मी घरच्यांच्या दबावाखाली किती वेळ तग धरू शकेल ठाऊक नाही रे." ती आतापासूनच त्याला श्याम म्हणू लागली होती.

" तुला तर माहीतच आहे ना गं मला गायक बनायचं आहे, नोकरी, बिजनेसमध्ये माझं मन नाही लागणार आणि आता तुझी जवाबदारी उचलण्याच्या लायक मी नाही. थोडा वेळ दे मला. माझे प्रयत्न चालूच आहेत, नक्कीच यश मिळेल."

तो हातपाय मारत होता पण कुठूनच आशेचा किरण त्याला दिसत नव्हता.

एक दिवस परत श्यामलीने लग्नाचा विषय काढला. कारण या वेळेस एक चांगलं श्रीमंत स्थळं तिला सांगून आलं होतं.  नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती आणि त्यामुळे घरचे काही यावेळेस तिचं ऐकतील अस तिला वाटत नव्हतं.

" तुला कळत नाही का गं, मी प्रयत्न करतोय तुला दिसत नाही का? सारखं लग्न...लग्न. तू आणि लग्न याशिवाय ही काही महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. जा तू आणि तुला कोणासोबत करायचं आहे त्याच्यासोबत कर लग्न. मला काही फरक पडत नाही. माझी काही स्वप्न आहेत आणि ती पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही."
इतकं बोलून तो तिथून तरातरा निघून गेला. त्याने मागे वळून एकदाही तिला पाहिलं नाही.

ती अवाक होऊन त्याला पाहतच राहिली. किती सहजतेने तो म्हणाला होता, तुला कोणासोबत करायचं आहे त्याच्या सोबत कर लग्न म्हणून.

ती रात्र तिने रडतच जागून काढली. दुसऱ्या दिवशी ती त्यांच्या नेहमीच्या भेटण्याच्या जागी गेली पण तो काही तिथे आला नाही. ती महिनाभर रोज तिथे न चुकता जायची पण तो एकदाही तिकडे फिरकला नव्हता.

इकडे घरच्यांनी तिचं लग्न अवधूतशी जमवलं.

" अवधूत परांजपे " सुंदर गुणी, देखणा, रुबाबदार अवधुतला श्यामली एका नजरेतच आवडली आणि मोठ्या थाटामाटात त्या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि तिने अवधुतच्या घरी मिसेस श्यामली परांजपे म्हणून गृहप्रवेश केला.

ती लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आतुरतेने वाट पाहत होती. अस नव्हतं की अविष्कारला तिच्या लग्नाबाबत काही माहीत नव्हतं. त्याला त्यांच्या कॉलेजच्या मित्रांकडून तिच्या लग्नाबद्दल कळालं होत पण त्याने त्या विषयात कसलाच रस दाखवला नव्हता. तिचं लग्न कोणासोबत होतंय हे जाणून घ्यायचा साधा प्रयत्न देखील त्याने केला नव्हता.

गाणं छान रंगल होतं आणि टाळ्यांच्या कडकडाटाने श्यामली भानावर आली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि जुनं सारं आठवून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती तिच्या वैवाहिक आयुष्यात इतकी समरसून गेली होती की कित्येक महिने तिच्या डोळ्यात अश्रू तरळलेच नव्हते. आयुष्यातील असेच काही बेसावध क्षण आपल्याला हळवं, व्याकुळ करतात. चेहऱ्यावर तेच नेहमीच कातीलाणा हसू आणत ती अवधुतसोबत त्याच्याकडे जायला वळली.

अवधुतला श्यामली आणि श्यामबद्दल काही माहिती असेल का? पाहुयात पुढील भागात

क्रमशः

© सुनिता मधुकर पाटील

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????