चित्रपट समीक्षण ( लापता लेडीज)

चित्रपट समीक्षण (लापता लेडीज)

विषय: चित्रपट समीक्षण (११ जून)

लेखनाची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी लेखकाला निरंतर सजग राहण्याची गरज असते असं मला वाटतं. त्यासाठी मग निरीक्षण क्षमता, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चित्रपट परीक्षण किंवा समीक्षण या गोष्टी मदतगार नक्कीच ठरू शकतात.

आमिर खान निर्मित, किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट नुकताच बघण्यात आला. अत्यंत साधे सोपे कथानक, नवोदित कलाकारांची उत्तुंग अभियानाची मांदियाळी, चित्रपटातील जिवंत दृश्ये तसेच घटनाक्रम आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.
दीपक कुमार आपल्या नवोदित वधूच्या ( फुल ) जागी जया नावाच्या दुसऱ्याच मुलीला आपली भार्या म्हणून घरी घेऊन येतो. हे उघडकीस आल्यानंतर दीपक कुमार तसेच त्याच्या कुटुंबीयांची होणारी घालमेल मनाला हुरहूर लावते. त्यातही दीपक कुमार या घटनेने ज्या प्रकारे कासावीस होतो ते पाहून आपले मन हेलावून जाते. एकनिष्ठता, पहिलं निस्सीम प्रेम, माया,आपुलकी याचे संमिश्र भावचित्र दीपकने( स्पर्श)आपल्या व्यक्तिरेखेद्वारे अगदी समर्पक पद्धतीने सादर केले आहे. त्याच्यासोबत चुकून आलेल्या जयाने त्याच्या कुटुंबीयांना आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत हे सर्व ज्या पद्धतीने सांगितले आहे ते पाहून असे वाटते की प्रत्येक खेडेगावातील घरात अशी एक जया नक्कीच असावी. नवऱ्यापासून अनावधानाने विलग झालेल्या फुलला लग्नानंतर चुल व मूल याच चाकोरीत आपल्याला राहावे लागेल याची कल्पना असताना त्या दोन-तीन दिवसांमध्ये आपणही साधे कलाकंद बनवून ते विकून स्वकमाई करू शकतो याची जाणीव होणे मनाला उभारी देऊन जाते. त्यातही दीपकचे जयाला संबोधून असणारे चित्रपटातील शेवटचे वाक्य
"सपना देखने के लिए माफी नही मांगते" मला विशेष भावले. चित्रपटातील इतर कलाकारही आपल्या अभिनयात २००% अव्वल ठरले आहेत..
एकूणच ग्रामीण भागातील स्त्रियांना आपल्या चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर काढून काहीतरी वेगळे करण्याची मुभा आपण द्यायला हवी ही टॅग लाईन असणारा हा चित्रपट सर्वांनी नक्की पहावा असाच आहे.
त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटाला ५ स्टार्स..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे