

" काय झालं काय माहित रूहीला, सारखी रडतेय!"
" बर,थांब हेमा मी बघते."
" हो चालेल सासूबाई.मला असा अपघात झालाय,त्यामुळे मला तीला उचलून घेता येत नाही."
" अग, आम्ही काय परके आहोत का ? मला सांग तुला काय हवे नको ते."
"याच का त्या सासूबाई,ज्या मला सारखं उणे दूने बोलत त्रास द्यायच्या?",असा विचार करत हेमा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली.
" शांत हो रुही बाळ. मम्मा आजारी आहे ना थोडी म्हणून तुला घेता येत नाही तिला. ओ ओ ..."
कधीही रूहीला याआधी इतक्या प्रेमाने त्यांनी घेतले नव्हते .मग आज अचानक सासूबाईंच्या कुशीत रुही शांत झाली. हे पाहून हेमाला सासूबाईंना घट्ट मिठी मारावी वाटली.एरवी हेमा सासूबाईंना मनातल्या मनात खूप वाईट बोलायची. पण हेमाचा अपघात झाला आणि त्यांचा स्वभाव एकदम बदलला.
" रुही,ये बेटा इकडे. ते बघ तिथे काय आहे? तुझी कार!"
" येस आजोबा. मी आलेच."
तसेही रुहीला तिच्या पप्पांचा,आजोबांचा लळा होता.त्यामुळे ती खुश असायची.पण हेमाचा अपघात झाला आणि रूही जास्तच आई,आई करायला लागली.हेमाला बरच लागलं असल्याने, रुही पासून डॉक्टरांनी तिला लांब राहायला लावले होते,कारण हेमाच्या जखमांचे इन्फेक्शन लहानग्या रूहीला सहन होणारे नव्हते.
हेमाला तेव्हा प्रश्न पडला होता की," रुहीचे कसे होणार?"
सासूबाईंनी मात्र हेमाला इतके समजून घेतले की आधीचे हेवेदावे विसरून त्या तिला लेकीप्रमाणे जीव लावत होत्या.
" प्रत्येकाचे मरण तर अटळ आहे,मग उगाच एकाच घरात का असे वागायचे? शेवटी सारे आपलेच आहेत ना.सून,मुलगा,नातवंडं साऱ्यांना आपले माना,घरात सुख नांदेल, भरभराट होईल."
असे टीव्ही वरील कीर्तन एक दिवस सासूबाई ऐकत होत्या.हेमा लगेच आत गेली,अन् तिने सासूबाईंसाठी छान चहा केला.
"कधीही आपल्यासाठी असा चहा न बनवणारी हेमा आज कशी अशी बदलली? "असे सासूबाईंना वाटले.
" सासूबाई, चहा.."
" हेमा राहू द्यायचं ना तू! तुला काही हवय का? कशाला चहा बनवत बसलीस? मी दिला असता ना?"
" अहो सासूबाई.तुम्ही किती करताय माझ्यासाठी.माझ्या मनात उगाच तुमच्याबद्दल खूप गैरसमज होते."
" अगं,कीर्तन प्रवचने ऐकून माझ्यात हा बदल मी घडवला.किती कटकटी, कुरबुरी असायच्या ग आपल्यात? मला ना विट आला होता अगदी.हे बघ उद्या काही झालं तर तू मला आणि मी तुला.कोण दुसरा येणार आपल्या मदतीला? मग मी माझे वागणे, नाते तुझ्याशी बदलले अन् घरात शांती,आनंद नांदू लागला."
हेमा व सासूबाई एकमेकींच्या गळ्यात पडल्या,अन् त्यांचे एकमेकींविषयी बदललेले नाते घरात एकोपा,शांतता घेवून आले.
खरच आहे! बदल स्वतःपासून घडवला तर समोरचा आपोआप बदलतो.घराघरात असे नाते बदलले तर सासू सुन हे नाते, आई नी मुलगी यांच्यात बदलू शकते.नाही का?
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे