मोठी सून

Marathi katha

"हे घे नेहा, दूध पी. ही फळे रोज खात जा. आणि तुला काही हवं असेल तर मला सांग, मी लगेच बनवून देईन."


"नेहा, अगं हळू ऊठ. पुढे बघ नाहीतर पडशील हं बाळ."

"नेहा, हे घे गरम गरम शीरा, तुझ्यासाठी बनवलाय. दोन घास खाऊन घे. अशावेळी थोडं थोडं खायला हवं."

"अगं थांब. तू कशाला बाहेर आलीस? मला बोलवायचं ना. मी दिले असते काही हवे असेल तर."

नेहा सामंत. सामंत घराण्याची धाकटी सून. लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते. आता तिला दिवस गेले होते. म्हणून तिच्या सासूबाई तिची योग्य ती काळजी घेत होत्या.

सामंतांना दोन मुले. दोन्ही मुले शिकलेली. सगळे घरात एकत्रच राहत होते. मोठी सून घरात आली आणि तिने काही अवधीतच सर्वांना आपलंस करून घेतलं. सर्वांचे ती अगदी मनापासून करत होती. कोणाला काही हवे नको ते पाहत होती. घरात अगदी सुखशांती नांदत होती. मोठी सून मेघाला दिवस गेले. तेव्हा तर घरात सर्वजण आनंदीत झाले. पण हे सुख मेघाच्या वाट्याला फार काळ टिकले नाही. थोड्याच दिवसात समजले की, तिच्या बाळाची वाढ झाली नाही. ते बाळ तेव्हाच तिला सोडून गेले. त्या दिवसापासून उत्साहाचा खळखळता झरा असणारी मेघा शांत शांत राहू लागली. तिचे कशातच मन रमत नव्हते. थोड्या दिवसांनी मेडिकल चेकअप केल्यानंतर समजले की, ती कधीच आई होऊ शकणार नाही. तेव्हापासून मेघा एकांतात राहू लागली. तिला जगणे म्हणजे निव्वळ व्यर्थ वाटू लागले.

काही दिवसांनी तिच्या दिरांचे लग्न झाले आणि नेहा त्या घरात मेघाची लहान जाऊ म्हणून नांदू लागली. तिनेही काही कालावधीतच सर्वांची मने जिंकून घेतली. त्यावेळी जो तो नेहाचेच कौतुक करत होता, नेहाचेच गुणगान गात होता. तेव्हा मात्र मेघा एकटीच पडली. मेघाने केलेल्या कामाचे कोणी कौतुक करेना. ज्याच्या त्याच्या तोंडात नेहाचेच नाव होते. मेघा स्वतः दुःखात असतानाही तिने दिराच्या लग्नात आनंदाने सर्व कर्तव्ये पार पाडली, पण आता सर्वांना त्याचा विसर पडला होता.

नेहाला दिवस गेले होते, म्हणून तिच्या सासूबाई तिला खूप जपत होत्या. खूप म्हणजे त्याचे अती होतं होते. त्या मेघासमोर तर जास्तच करत होत्या. ते पाहून मेघाला खूप वाईट वाटू लागले. ती तिच्याही नकळत नेहाचा तिरस्कार करू लागली. \"सासूबाई हे मुद्दाम करत आहेत.\" असे तिला वाटू लागले. जसजसे दिवस जातील तसतसे तिला खूपच वाईट वाटत होते. तिच्याशी कोणीही काहीही बोलत नव्हते, त्यामुळे तिला आणखीनच वाईट वाटत होते. ती सर्वांपासून अलिप्त राहू लागली.

एक दिवस मेघा तिच्या नवऱ्याशी बोलताना तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
"अहो, मला मूल होणार नाही म्हणून खूप वाईट वाटत आहे. सासूबाई माझ्याशी व्यवस्थित वागत नाहीत. जाऊबाईंना दिवस गेलेत. नाही म्हणजे मी काही जळत नाही, पण त्यामुळे तिचे गोडकौतुक करताना मला माझ्यामध्ये असलेल्या कमीपणाची जाणीव होते. मी कधीच आई होऊ शकणार नाही याची खंत वाटते. माझ्यामुळे तुम्हीसुध्दा बाबा होऊ शकणार नाही याचे खूप वाईट वाटते. अशा परिस्थितीत मी काय करू? तुम्ही सोबत असता तेव्हा खूप बरे वाटते, पण तुम्ही घरात नसता तेव्हा खूप परकं वाटत ओ. अशावेळी मी तुम्हाला सोडूनही जाऊ शकत नाही आणि इथे राहू शकत नाही. काय करू? तुम्हीच सांगा." मेघाने तिचे मन मोकळं केले.

तेव्हा तिचा नवरा तिला धीर देत म्हणाला, "अगं मेघा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आपण दोघे एकमेकांसाठी आहोत ना. तू एक काम कर. आईकडे चार दिवस जाऊन ये. तुला बरं वाटेल."

"नको नको. आईकडे गेले तर काम सोडून मी गेले असे वाटेल. त्यापेक्षा इथेच बरी आहे." असे म्हणून मेघा भरल्या डोळ्यांनी स्वयंपाकघरात गेली. ती तिची कामे करू लागली. तिच्या नवऱ्याला ते पाहून खूप वाईट वाटले. तो त्याच्याच विचारात मग्न होता.

असेच दिवसामागून दिवस जात होते. आता नेहाच्या ओटीभरणीचा कार्यक्रम होता. घरचे सगळे आनंदाने तयारी करत होते. मेघासुद्धा कोणाला काही वाटू नये म्हणून आनंदाने सारं काही करत होती, पण हे तिच्या सासूबाईंना रूचले नाही. त्या काहीतरी कारण काढून प्रत्येक गोष्टीत मेघाची चूक काढत होत्या. ते मेघाला कळून आले. तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. ती रूममध्ये जाऊन रडू लागली. मेघा तर सारं काही हसत करत होती, मग तिच्या सासूबाईंना यात न रूचण्यासारखे काय होते? मेघाला खूप वाईट वाटले.

ओटीभरणीचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्या स्त्रीया ओटीभरण्यासाठी जमल्या होत्या, पण मेघा आपल्या रूममधून बाहेर आलीच नाही. कुणीतरी काहीतरी म्हणतील, लोकं काय म्हणतील? असे वाटून ती खोलीतच बसली. तिचा नवरा तर तिला सकाळपासून दिसलाच नाही. तो कामानिमित्त बाहेर गेला असेल अशा समजुतीने ती शांत बसली. बराच वेळ झाला होता. आता कार्यक्रम संपत आला असेल असे वाटून ती रूममधून बाहेर गेली. तिने पाहिले की, जाऊबाईचे खूपच गोडकौतुक चालू होते. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, ती सुंदर फुलांनी केलेली सजावट, सुशोभित केलेला झोपाळा आणि नटूनथटून बसलेली नेहा हे सर्व पाहून तिचे मन भरून आले.

\"अरेच्चा! ओटीभरणीचा कार्यक्रम तर आता सुरु होणार. मग इतका वेळ इथे काय सुरू होते? हे कोणाचीतरी वाट पाहत होते का? जाऊ दे, मी खोलीतच ठिक आहे.\" असे मनातच म्हणून मेघा परत रूममध्ये जाण्यासाठी वळली. इतक्यात तिला कोणीतरी बोलावल्याचा आवाज आला म्हणून तिने तिकडे पाहिले तर तो आवाज नेहाचाच होता.

\"ही का बोलावत असेल? या सर्व लोकांमध्ये माझा अपमान तर करणार नसेल ना?\" अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिच्या मनात थैमान माजले होते. त्याच तंद्रीत ती मेघाकडे जाऊ लागली. ती जात असताना सर्वांच्या नजरा तिच्याकडे होत्या. ते पाहून ती आणखीनच घाबरली आणि दबकतच जाऊ लागली. मेघा नेहाच्या समोर जाऊन उभा राहिली.

"ताई, माझी ओटीभरणी पहिल्यांदा तुम्ही भरा, मग बाकीचे भरतील." हे नेहाच्या तोंडून वाक्य ऐकताच मेघाच्या डोळ्यातून महापूर लोटला. तिने मान खाली घातली.

"अगं नेहा, मी कशी घालू शकेन? नको ग." तेव्हा तिची परिस्थिती समजून घेऊन नेहाने तिचा हात हातात घेतला आणि खणनारळ देऊन पदर पुढे केला. मेघाने आनंदाने तिची ओटी भरली. सर्वजण फक्त पाहतच बसले होते. तेवढ्यात मेघाचा नवरा आला आणि त्याचा हातात एक लहान मूल होते. तो आल्यावर सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. तो हळूहळू मेघाजवळ येऊ लागला. तिच्यासमोर येऊन त्याने त्या बाळाला तिच्या हातात दिले. बाळ हातात घेतल्याबरोबर मेघाने त्याला छातीशी धरले नंतर ती त्या बाळाचे मुके घेऊ लागली. हे सर्व करताना तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. बराच वेळ झाल्यानंतर तिने प्रश्न केला, "अहो, हे बाळ कोणाचे आहे? तुम्ही इथे का घेऊन आला आहात?"

"अगं, हे बाळ आजपासून आपले आहे. तू म्हणत होतीस ना की आपल्याला एक गोड मुलगी हवी, म्हणून ही मुलगी मी अनाथआश्रमातून आणली आहे. किती गोड आहे ना!" नवऱ्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताच तिचा आनंद गगनात मावेना. तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून सर्वांना समाधान वाटले. तिच्या सासूबाई देखील कौतुकाने पाहू लागल्या. अखेर तिच्या कष्टाचे चीज झाले.

कथा आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

प्रियांका पाटील.

19/2/22

8:02