मुलीच्या संसारात आईची भूमिका

Mother Always Show's Right Way To Her Kids,How Could She Spoil Her Daughter's Married Life?

मुलीच्या संसारात आईची भूमिका



        आज-काल समाजात, आपल्या आजूबाजूला घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, त्याची कारणं व्यक्तिपरत्वे, घर परत्वे , कुटुंब परत्वे वेगवेगळी असू शकतात, पण आजकाल बऱ्याच ठिकाणी मुलीच्या घरच्यांना किंवा त्यातल्या-त्यात त्या मुलीच्या आईला बहुतेकजण दोष देतात. मुलीची आई मुलीच्या संसारात ढवळाढवळ करते, लेकीच्या संसारात नको तितकं लक्ष देते, लेकीला सासरच्या विरुद्ध भडकवते, मुलीच्या मनात नवऱ्याविरुद्ध विष पेरते वगैरे वगैरे….


         पण त्याचवेळी हे आरोप करणारे हे ही विसरतात की, आई आपल्या मुलीचं-लेकीचं कधीच वाईट चिंतणार नाही. आपली भारतीय कुटुंब व्यवस्था फार मजबूत आहे. त्यामुळेच आपल्या मुलीचा संसार मोडावा, तिचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं कुठल्याच आईला अगदी स्वप्नातही वाटणार नाही. जी आई आपल्या लेकरासाठी जीवाचं रान करते ती आपल्या पोटच्या गोळ्याचा संसार का मोडेल? एवढा सारासार विचार तरी मुलीच्या सासरकडच्या लोकांनी आणि मुलीच्या आईवर दोषारोप करणाऱ्यांनी करावा.



**********************************************


        नलिनी ताई आणि शालिनीताई त्या दोघी जणी एकाच सोसायटीत राहायच्या. शालिनी ताई या रिटायर्ड मुख्याध्यापिका होत्या तर नलिनीताई या बँकेतून सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यांच्या अपार्टमेंट्स जरी वेगवेगळ्या होत्या तरी फ्लॅटच्या खिडक्या मात्र अगदी समोरासमोर उघडत असल्याने, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी त्या खिडकीतून हाय हॅलो करायच्या, शिवाय रोज सकाळी सोसायटीच्या बगिच्यात फिरताना आणि इतर समवयस्क महिलांसोबत योग आणि प्राणायाम करता करता त्यांची मैत्री छान रंगली आणि बहरली.


       सकाळी त्यांचा व्यायाम झाला की , मग त्या दोघी छान गप्पा मारायच्या. गप्पांचे विषय मात्र अगदी वेगळे म्हणजे समाजातील सध्याच्या समस्यांवर त्या बोलायच्या. बेरोजगारी, वाढती व्यसनाधीनता, लिव इन रिलेशनशिप, समाजात वाढणारा भ्रष्टाचार, लोकसंख्येचा विस्फोट आणि कोरोना महामारी मुळे अनेकांची झालेली वाताहात हे त्यांचे बोलण्याचे विषय असायचे. सुनेचे तर्हेवाइक वागणे आणि मुलाचा सुनेला अबोल पाठिंबा असे घरगुती विषय मात्र त्या कटाक्षाने टाळायच्या. एकंदरीत समाजातल्या वर्तमान काळातल्या समस्यांवर त्या दोघींचा जास्त खल चालायचा.


            एकदा शालिनीताई आणि नलिनीताई अशाच गप्पा करत होत्या आणि बोलता-बोलता घटस्फोटांचं वाढलेले प्रमाण हा विषय निघाला.


शालिनी - "अग आजकाल समाजात घटस्फोटाचं प्रमाण किती वाढलंय नाही?"


नलिनी - "हो ना! जरा नवऱ्याशी पटलं नाही, सासरच्या मंडळींनीशी वाद झाला की, मुली तडक माहेर गाठतात. जरा समजून, जुळवून घेणे जमतच नाही बाई, या शिकलेल्या मुलींना, शिवाय आईची फूस."


शालिनी - "नलिनी हे मात्र तू चुकीच बोलते आहे. अगं कुठल्या आईला आपल्या मुलीचा संसार मोडावा असं वाटेल? प्रत्येक वेळी मुलीच्या- सुनेच्या आईला जबाबदार धरणं चूक आहे."


नलिनी - "पण बरेचदा सुनेची आई तिच्या संसारात नको तितकी लुडबुड करते."


शालिनी - "हो तुझं म्हणणं काहीअंशी बरोबरही आहे ,अगं ! पण आजकालच्या मुली फार शहाण्या आहेत. त्यांना जे आवडेल जे रुचेल तेवढंच त्या कुणाचंही ऐकतात, मग ती त्यांची आई का असेना! त्या केवळ स्वतःपुरतं बघतात."


नलिनी - "पण मुलीला समजुतदारीच्या चार-दोन गोष्टी तिच्या आईनेच सांगायला नको का?"


शालिनी - "सांगतात ग! पण आजकालच्या मुली ऐकतील तर ना! थांब मी तुला एक किस्सा सांगते."

       

              "माझ्या चुलत भावाची मुलगी नेहा. मागच्याच महिन्यातली गोष्ट….. तिच्या आईला फोन करून म्हणते कशी, 'आई मी घरी परत येते आहे. तिच्या आईला एक क्षण कळलेच नाही की, आपली मुलगी काय म्हणते आहे? माझ्या भावजयी ने मुलीला घरी बोलावलं आणि विचारलं, 'काय झालं?', तर मुलींनं सांगितलं, 'नवऱ्याने व्हॅलेंटाईन वीक मध्ये कुठलंच गिफ्ट दिलं नाही, शनिवारी रात्री सिनेमाला जाऊ असं ठरलं होतं, पण नवरा रात्री घरी उशिरा आला. आता बाहेर जायचं म्हणून नेहानं स्वयंपाकच केला नव्हता. सिनेमा चुकला आणि बाहेरच जेवणही हुकलं. रात्री अकरा वाजता स्वयंपाक करावा लागला म्हणून तिची सारखी धुसफूस. आठवडा संपला तरी तिचा राग शांत झाला नाही. आणि ओला टॉवेल नवऱ्याने पलंगावर टाकला या क्षुल्लक गोष्टीवरून भांडण झालं."



नलिनी - "मग नेहाच्या आईने कोणाची बाजू घेतली?"


शालिनी - "माझी वहिनी-नेहाची आई खूप समजूतदार आहे. तिनं नेहाला समजावलं, 'अगं तुझ्या नवऱ्याचं नुकतच प्रमोशन झालं आहे. शिवाय मार्च एंड पण जवळ आला आहे. त्याची ही बाजू तू जरा समजून घे. आणि आता तू काय सोळा सतरा वर्षाची अल्लड मुलगी आहे? सिनेमासाठी आणि बाहेर जेवणासाठी रुसायला? जरा अजयचा (नेहा च्या नवऱ्याचा ) विचार कर, किती दमतो! किती थकतो तो!! याशिवाय मागच्या वर्षीची गोवा ट्रिप आणि तिच्या वाढदिवसाला अजयने घेऊन दिलेली हिऱ्यांच्या अंगठीची आठवण करून दिली वहिनींनं. आणि प्रेमात एकमेकांना समजून घेणं हे जास्त महत्त्वाचा आहे हेही पटवून दिलं .मग काय नेहा परत गेली आपल्या नवऱ्याकडे."


नलिनी - "बरं झालं बाई! तुझ्या भावजयी ने पोरीला छान समजावलं."


शालनी - "अजून एक उदाहरण देते, माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं -प्रियाचं."


             "प्रियाच्या लग्नाला दहा बारा वर्षे झाली. पदरी दोन मुलं , मोठा मुलगा दहा वर्षाचा आणि लहान मुलगी पाच वर्षाची. तशी प्रिया ही फार स्वप्नाळू मुलगी. तिला फिरायला, शॉपिंग करायला, बाहेरच खायला फार आवडायचं. पण दिसायलाही आणि अभ्यासातही मात्र जेमतेम. तरीही माझ्या मावस बहिणीने तिला बी.ए. झाल्यावर बी. एड. करायला लावलं. एका चांगल्या होतकरू मुलाशी प्रियाच लग्न झालं. प्रियाच्या नवऱ्याचा दूध डेअरीचा व्यवसाय. शिवाय घरी आई- वडील ,लहान बहीण - भाऊ असं सगळं भरलं कुटुंब. त्यामुळे सुरुवातीला प्रियाला तिथे ऍडजेस्ट करायला जरा जड गेलं. पण प्रियाच्या सासूने आणि नवऱ्याने तिला छान सांभाळून घेतलं. यथावकाश नंणंद सासरी गेली, आता दिराचही लग्न झालं. पण दिर -जाऊ बाहेर फिरायला जातात, मला लग्न झाल्यावर घरचंच करावं लागलं, जाऊ घरकामाची जबाबदारी घेत नाही, आधी नणंद मला खूप बोलायची ,जाऊ मात्र मनमानी करते, तिला कोणी काही बोलत नाही. एक ना दहा कारण आणि खुसपट काढून प्रिया नवऱ्याशी रोज तणतणु लागली. आणि मग एकदा रागाच्या भरात नवरा म्हणाला, 'जा तुझ्या आईकडे'. प्रियाने आईला फोन केला , 'दोन्ही मुलं घेऊन मी परत येत आहे'. माझ्या बहिणीने तिला समजावलं, 'अगं प्रिया केवळ बाहेर फिरल्याने, हौस -मौज केल्याने का संसार सुखाचा होतो? एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं! आणि माहेरी येऊन काय करशील? तुझ्या मुलांचे शिक्षण, तुझा खर्च कोण करेल? तू नोकरी करून चार पैसे कमावू शकतेस का? नोकरीचा काही अनुभव आहे का तुला? महामारीमूळे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे पगार अर्ध्यावर आले, अनेकांचे व्यवसाय बुडाले आणि तू काय फालतू गोष्टीसाठी नवऱ्याशी भांडते? जावईबापू इतके काही वाईट नाहीत. स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे त्यांनी. बहिणीचं लग्न आणि लहान भावाचे शिक्षण त्यांनीच केलं आहे.सासरी रहा आणि मुलांच्या भविष्याचा विचार कर.


             आईच्या रागावल्याने आणि वास्तवाची जाणीव करून दिल्याने प्रिया काही माहेरी आली नाही. आता छान सुरु आहे प्रियाचं. तिची जाऊ पण आता तिला घरकामात मदत करते. प्रिया पण मुलांचा छान अभ्यास घेते आणि एका प्रायव्हेट शाळेत विषय शिक्षिका म्हणून पार्ट टाइम नोकरी पण करते.


             नलिनी ,प्रत्येक वेळी मुलीच्या आईला मुलीच्या संसारात ढवळाढवळ करते म्हणून दोषी ठरवणे योग्य नाही ग! एक आई आपल्या लेकीचं जेवढे हित चिंतू शकते तेवढं कुणीच नाही. जगातल्या कुठल्याही आईला असं वाटेल का की आपली लग्न झालेली मुलगी नवर्‍याचं घर सोडून माहेरी परत यावी? समाजाने आणि बाकीच्या लोकांनी तिला नावे बोटं ठेवावी?"


  नलिनी - "हो ग शालीनी! मलाही असंच वाटतं की, घरातल्या लहान मोठ्या कुरबुरींना मुलीच्या आईने पाठिंबा देऊ नये ,आणि योग्य तो सल्ला आपल्या मुलीला देऊन , मुलीचा संसार वाचवावा."

🎭 Series Post

View all