मुलीच्या संसारात आईची भूमिका...... नाण्याची दुसरी बाजू

Now A Days A Why A Daughter's Mother Stand Firmly Behind Her Daughter In Her Daughters Married Life Crisis

मुलीच्या संसारात आईची भूमिका..... नाण्याची दुसरी बाजू


          मागच्या भागात आपण पाहिलं की शालिनी - नलिनी या दोघी मैत्रिणी, समाजातल्या, वर्तमान काळातल्या समस्यांवर चर्चा करणाऱ्या, समस्यांवर आपली बरं-वाईट मत मांडणाऱ्या. पण आज मात्र असं काहीतरी झालं आहे की नलिनीताईंना वाटतं त्यांचीच विचारसरणी योग्य आहे. \"आज कालच्या मुलींच्या आयाच आजकाल मुलींचा संसार मोडतात\" या आपल्या मतावर त्या आता अगदी ठाम झाल्या आहेत. पण शालीनीताई कडे तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेच ना! चला तर बघू या नाण्याची दुसरी बाजू आहे तरी काय?



शालिनी - "नलू का गं, काय झालं ?आज अगदी गप्प गप्प!"


नलिनी - "शालू मी तुला म्हटलं होतं ना की, आजकालच्या आयाच, आजकाल मुलींच्या संसारात नको तितकी लुडबुड करतात आणि मग अनेक मुलींचे संसार मोडतात."


शालिनी - "अग पण झालं तरी काय ? नीट सांग बरं काय झालं ते?"


नलिनी - "अगं मागल्या महिन्यात माझ्या भावाच्या मुलाचं लग्न जमलं. साखरपुडाही झाला. मी तुला सांगितलं नव्हतं का!"


शालिनी - "अरे वा छानच!"


नलिनी - "आज सकाळी माझ्या भावजयीचा फोन आला की, \"मुलगी लग्नाला तयार नाही\"."


शालिनी - "पण मुलगी लग्नाला का नाही म्हणते आहे? जबरदस्तीने लग्न ठरवलं होतं का ,तिच्या संमतीशिवाय? की आणखी काही वेगळं कारण?"


नलिनी - अगं किती प्रश्न विचारशील? जरा दम तरी घे."


शालिनी - "बरं बाई ! सांग सगळं सविस्तर."


नलिनी - "माझ्या भावाचा मुलगा समीर मंत्रालयात आहे."


शालिनी - "बर मग?"


नलिनी - "आणि संध्या- समीर ची होणारी बायको कंप्यूटर इंजिनियर." (नलिनी ताईने माहिती पुरवली. )


शालिनी - "अरे वा! छानच !"


नलिनी - "अगं पुढे तर ऐक, आजकाल मुलींच्या उच्च शिक्षणाने त्यांच्या आयांनाच शिंग फुटलेत."


शालिनी -"आता काय झालं ते सांगशील का पटकन?"


नलिनी -( उसासा टाकुन) "अगं चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला, मुला-मुलींची पसंती ही झाली आणि नंतर एक दोन दिवसात साखरपुडाही."


शालिनी- "बरं मग?"


नलिनी - "साखरपुडा झाल्यावर दोघही मुलगा- मुलगी एक-दोनदा बाहेर फिरायला गेले, बोलता-बोलता स्वयंपाकाचा विषय निघाला. आमचा समीर अगदी साधा सरळ तो संध्याला म्हणाला,\"माझी आई खूप छान स्वयंपाक करते, गोळा भात , सांभारवडी तर फक्त आईच्या हातची खावी. आणखी बरचं काही! आणि मऊ सूत लुसलुशीत पुरणपोळी माझ्या आईची खासियत. मला तर खूप आवडते पुरणपोळी. संध्या तू पण आईकडून शिकून घे हां पुरणपोळी कशी बनवायची ते."


शालिनी -"बरं मग?"


नलिनी - "संध्याने समीरला विचारलं, \"तुमची आई स्वयंपाकात एवढी सुगरण आहे तर मग, तुम्हालाही हे सगळं बनवता येत असेल ना?"


शालिनी -"बरोबर विचारलं संध्याने."


नलिनी - "अगं बरोबर काय? समीर बिचारा साधाभोळा तो म्हणाला, \"पुरुषांनी स्वयंपाक घरात आलेलं माझ्या आईला अजिबात आवडत नाही!\" झालं संध्याने घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना तिखट-मीठ लावून काय काय सांगितले देव जाणे? दुसऱ्या दिवशी संध्याच्या आईचा माझ्या भावजयीला फोन आला आणि त्यांनी माझ्या भावजयीला भेटायला घरी बोलावले. संध्याच्या घरी गेल्यावर संध्याच्या आईने माझ्या भावजयीला सरळच विचारलं, \"तुम्ही सगळा स्वयंपाक संध्या लाच करायला लावणार का? माझी मुलगी पन्नास- साठ हजार रुपये महिना कमावते, दिवसभर काम करून तिही थकते. आधी अभ्यास आणि नोकरी त्यामुळे स्वयंपाकाचं मीही तिला जास्त काही शिकवलेलं नाही. जर दोघेही नोकरी करतात ,दोघेही पैसे घरी आणतात तर स्वयंपाकही दोघांना यायलाच हवा. स्वयंपाकाची जबाबदारी एकट्या संध्याचीच नाहीये, बरं स्वयंपाकाचं जााऊद्या समीरला निदान चहा तरी करता येतो का?\". बापरे काय काय बोलली ती संध्याची आई? एवढं ऐकल्यावर माझी भावजयी उठली आणि सरळ घरी आली आणि लग्न मोडलं. काय बाई या बायकांचा आडमुठेपणा? तऱ्हेवाईकपणे तरी किती वागायचं? काय तर म्हणे स्वयंपाकाची जबाबदारी दोघांची! अजून काय म्हणाली आहे माहिती आहे?"


शालिनी - (शांतपणे) "काय म्हणाली?"


नलिनी - "आपल्या देशात ज्या तरुण-तरुणींचे विवाह होत नाही , ते मोठे मोठे राजकीय नेते होतात."


शालिनी - (आपले हसू आवरत, ) "हां, हे मात्र अगदी खरं आहे हं!"


नलिनी - "काय शालू तू पण ना! तू तर म्हणत होतीस की कुठलीही आई आपल्या मुलीचा संसार मोडत नाही, मुलीच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींना समर्थन देत नाही. मुलीच्या संसारात ढवळाढवळ करत नाही आणि हे सगळं समजून सांगण्यासाठी तुम्हाला एक दोन उदाहरणही दिलीत. पण माझ्या भावाच्या मुलाचा संसार सुरु व्हायच्या आधीच मोडला.आता याबाबत तुझं काय म्हणणं आहे ते सांग?"


शालिनी -"हे बघ नलु या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून बघ ना! मुलीकडच्यांनी लग्नाच्या आधी अटी घालणं………, आमची मुलगी स्वयंपाक करणार नाही असा हेका धरणे……….. आजपर्यंत कथा कादंबरी यांमध्येही मुलीच्या बाबाला लाचार होऊन दारोदार चपला झीजवतांना वाचलयं आणि प्रत्यक्षातही पाहिलंय. ही उलटी गंगा गेल्या दहा-पंधरा वर्षातच वाहू लागली आहे. त्यामुळे सध्या मुलींच्या आई-बाबांना त्यातही विशेषतः मुलींच्या आयांना खूप शिव्या पडत आहेत. हल्लीच्या आयाच मुलींना कशा शेफारून ठेवत आहेत, मुलींच्या वतीने त्याच कशा अटी घालत आहेत, मुलींना नुसतं डॉक्टर इंजिनीयर बनवतात पण साधी भाजी पोळी करायला हे शिकवत नाहीत, नाती सांभाळायला शिकवत नाहीत, ऍडजेस्टमेंट अजिबात शिकवत नाहीत….. वगैरे वगैरे…. आधी हेच सगळं उलट होतं, मुलांच्या सतरा अटी असायच्या, जास्तीत जास्त किती मुली बघितल्या आणि नाकारल्या तो आकडा त्यांच्या गौरवाचा, कौतुकाचा असायचा. शंभर मुलींचे फोटो मागवायचे, पत्रिका मागवायच्या, न्याहळुन बघायच्या, हीच नाकच लहान आहे, तिचे केस लहान आहेत, ही थोडी सावळीच आहे, ती थोडी उंचच आहे, हिला भाऊच नाही. (मग सासू-सासऱ्यांच करावा लागेल ना!) अशा क्षुल्लक खोड्या काढायच्या. मुलीच्या बापाला सतरा खेटे मारायला लावायचे, अजिजी करायला लावायचे, त्यातूनही पसंत केलीच एखादी तर मानपान, हुंडा, बैठकी, बोलणी यात मुलीच्या बापाला जीव नकोसा करायचा, हे सगळं सुरू होतं. तोपर्यंत सगळी व्यवस्था सोयीची वाटत होती. मात्र आता मुली अचानक शेफारल्या वाटू लागल्या, त्यांच्या आया नकचढ वाटू लागल्या, गंमत आहे सगळी…..


        तर झालं असं या मुलींच्या आया आपल्या नंतरच्या पिढीतल्या. या पिढीचं दोन पिढ्यांच्या मध्ये सँडविच झालंय. शिक्षण तर खूप घेतलं ,नोकऱ्याही केल्या पण सासरच्यांच्या अधीन राहून. सासरच्यांची उस्तवार करून ,दोरीवरची कसरत करून घर व नोकरी सांभाळूली, आर्थिक खस्ता खाल्ल्या, तरी मनासारखं स्वातंत्र्य मिळालं नाही, मनासारखं जगता आलं नाही, सतत हा काय म्हणेल? तो काय म्हणेल? सासू रागवेल, नणंद चिडेल, जाऊ नावं ठेवेल, शेजारीण गॉसिप करेल या भीतीतच राहिली ही पिढी. म्हणजे जाणीव जागृती झाली होती पण हिम्मत नव्हती. अगदी आवडीचे कपडे घालायची ही मुभा नव्हती या पिढीला.


          या आपल्या मुलींसाठी मात्र आता सावध आहेत. आपण जे भोगलं ते आपल्या मुलींना नको, त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळावं, मनासारखं आयुष्य कोणत्याही फालतू तडजोडी न करता मिळावं. करियर करायला मिळावं, छंद जपता यावेत, आपली मतं जपता यावीत, यासाठी त्या प्रत्यक्ष त्यांच्या मुलींपेक्षाही अधिक जागृत आणि आग्रही झाल्यात, सावध झाल्यात , त्यात नवल ते काय?


           मुली आणि त्यांच्या आया बदललेल्या आहेत. मात्र त्याच वेळी मुलगे आणि त्यांच्या आया अजून पारंपारिक पठडीतच वधू संशोधन करत आहेत. त्यांना अजूनही घरचं सगळं करून,तडजोडी करत, का अभावात आनंद मानणारी, नाती जोडत स्वतःचं मन मारणारी, करिअर ,छंद , सगळं सोयीप्रमाणे करणारी, सोयीप्रमाणे दूर सारणारी मुलगी हवी आहे. अशी मुलगी आता सहजासहजी सापडणं कठीण. ( ती फक्त टीव्ही मालिकातूनच सापडेल.) मुलाची वयाची पस्तिशी येते, त्यांना लग्नाची घाई होते, खानदानला वारस हवा म्हणून उलघाल होते, पण त्याचवेळी मुली मात्र निवांत आहेत. त्यांना वय वाढले याची चिंता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आपल्या वेळी बाविसाव्या वर्षी लग्न नाही झालं तर मुलगी घोडनवरी, प्रौढ कुमारिका म्हणून ओळखली जायची. आता मुलींना स्वतःलाच तिशी उलटली तरी लग्न नको वाटतं. मूल जन्माला घालायची आणि त्यात गुंतायची घाई नसते. मुलींनी इतर जातीत प्रेम लग्न केलेली काही प्रमाणात त्यांच्या आयांना अधिक चालू लागली.


           लग्न झालंच तर ठरलेलं लग्न मोडण्याचं, घटस्फोटाचा प्रमाणही प्रचंड वाढत चाललं आहे. त्यातही मुलींच्या आयांनाच शिव्या अधिक बसतात. या आया म्हणे, मुलींच्या संसारात लुडबुड करतात. हे ऐकल्यावर ही हसायला येतं. शेकडो वर्ष तमाम मुलांच्या आयांनी त्यांच्या संसारात लग्नाच्या पहिल्या दिवसापासून लुडबुड केली ,मुली जळून मेल्या, पिचून मेल्या, मन मारत मेल्या तोपर्यंत व्यवस्थेतल्या या उणिवा कोणाला दिसल्या नाहीत. मुलांच्या आयांची नव्हे तर, पार आते- मावस सासवांची ही संसारात लुडबूड चालायची, ती खटकली नाही कधी कुणाला.


       आता मुलींच्या आयांनाही एखादच मूल असते, त्यात एक मुलगी त्यांना जड नसते, मुलगी घरी परत आली तरी तेही सधन असतात, मुली ही कमवत असतात आणि जगाला भीक घालत भीण्याची सवय आता त्यांनी सोडून दिली आहे.


        काही लोकांना फारच काळजी असते हे लोक ना मुलाचे आईबाप असतात, ना मुलीचे. त्यांना काळजी वाटते विवाह संस्थेची, कुटुंब संस्थेची, ती कशी टिकणार ,लहान मुलांचे काय होणार, इत्यादी इत्यादी…..


        तर गाडी रूळ बदलते तेव्हा खडखडाट होतोच. व्यवस्थाही कात टाकत आहे खडखडाट तर होणारच. त्यात बदलाची तयारी ठेवली नाही तर अधिक त्रास होणार, आणि कोणतीही व्यवस्था 100% सुयोग्य नसतेच. त्याचे दुष्परिणाम याला ना त्याला भोगावे लागणारच. म्हणूनच मागची शेकडो वर्षे त्या मुलींच्या सासवांची………. तर आताची वर्षे या मुलांच्या सासवांची तेवढाच काय तो बदल."


        शालिनी ताईंच्या या सगळ्या विश्लेषणाचा नलिनीताई आणि आपण सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. कारण खरंच आता व्यवस्था बदलते आहे.


संदर्भ -समाज माध्यमावरील \"नाण्याची दुसरी बाजू\" या पोस्टवरून साभार

🎭 Series Post

View all