#आईच्या प्रेमाची तुलनाच नाही

आईचे अनमोल प्रेम आई झाल्यावरच समजते...

कोकणातलं माहेर म्हटले, तर रूबाब काही निराळाच असतो नाही माहेरवाशीणीचा ! माहेरहून दरवर्षी येणारा रानमेवा अगदी मनसोक्त उपभोग घेऊन शेजारीही दिला जातो.

रमा आमची कोकणातली. दोन मुलांची आई. आई-वडिलांची एकुलती एक लेक. अगदी लाडात वाढलेली. पुढे ती लग्न झाल्यानंतर मराठवाड्यात आली. कोकणासारखं हवामान नसलं तरी आपल्या जोडीदाराच्या नितांत प्रेमामुळे रमा औरंगाबाद शहरात अगदीच रमली होती. नवराही छान प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे रमाला  आता हे शहरही आपलसं वाटत होतं. दोन्ही मुलंही मोठी झाली होती. सगळं कसं छान मजेत चाललं होतं. पण ते म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात सुख दुःखांचा क्रम चालूच असतो. तसंच सर्वच भारतीयांच्या आयुष्यात कोरोना नावाचं ग्रहण अगदी दुःखाचा डोंगर उभा करू लागलं. टीव्हीवर हा हा म्हणता बातम्या पसरू लागल्या. कोरोना पेशंटची संख्याही वाढू लागली. त्यातच सुरू झालेली जिल्हाबंदी. नातेवाईकांकडून केवळ व्हिडिओ कॉल, फोन याद्वारे खुशाली कळू लागली. माणसापासून माणूस दूर जाऊ लागला. अगदी सख्खे शेजारी सुद्धा साधी शिंक किंवा खोकला ऐकताच अंतर ठेवून वागू लागले. अशातच रमाला कोरोना झाला. घरात अगदी भीतीचे वातावरण निर्माण झाले. रमाला बीपी आणि शुगर दोन्ही असल्यामुळे डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. क्षणाचाही विलंब न करता रमाचे पती रमेश यांनी रमाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मुलांचेही चेहरे पडले होते. शिवाय दवाखान्यात पेशंट जवळ नातेवाईकांना जाण्याची परमिशन नव्हती. पण रमेश यांनी हिंमत न हरता मुलांची ही योग्य प्रकारे काळजी घेतली. शिवाय रमाला स्वतःच्या हाताने केलेला काढा, नाष्टा आणि जेवण ते स्वतः दवाखान्यामध्ये घेऊन जात असत. एवढं करूनही रमाला एक घासही खावासा वाटत नव्हता. अन्नाचा घासही तिला नकोसा वाटत होता. रमाचा ऑक्सिजन सतत कमी जास्त होत होता. हे सर्व कोकणात असलेल्या रमाच्या आईला समजल्यावर त्यांना फार गहिवरून आले. त्या ढसाढसा रडू लागल्या.

"लहानपणापासून माझी लेक उन्हाळ्यात जेव्हा-जेव्हा आजारी पडायची तेव्हा माझ्या हातच्या आंब्याच्या रसाने ती ठणठणीत बरी व्हायची. तेव्हा मला तिच्याकडे घेऊन चला. मी बरं करेन माझ्या लेकीला." आई रमाच्या बाबांकडे आणि भावाकडे विनवणी करू लागली.

त्यांच्या मुलांनी आणि मिस्टरांनी त्यांना समजून सांगितले.पण रमाच्या आईनी सतत आपल्या लेकीचा ध्यास सुरू केला. देवापुढे साकडे घातले. अख्खी रात्र जागून काढली. आणि ईश्वराच्या कृपेने त्यांना औरंगाबादला येण्याची परवानगी मिळाली. सोबत त्यांनी लेकीच्या आवडीचा फळांचा राजा आणला होता. आजीने आणलेली आंब्याची पेटी पाहून मुलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. कारण आंबा आईचे आवडते फळ होते. पण आज आई हॉस्पीटलमध्ये होती. आजीने मुलांना जवळ घेतले.

"अरे काय झालंय रडायला?" आजी प्रेमाने म्हणाली.

"आई हॉस्पिटलमधून कधी येणार? तिला किती आवडतात आंबे." मुले रडत-रडत म्हणाली.

"अरे, काळजी नका करू. मी आलेय ना. मी करून देईन उद्या आईला हॉस्पीटलमध्ये आंब्याचा रस." आजी प्रेमाने म्हणाली.

मुलांनी आजीला प्रेमाने मिठी मारली. आजीने संध्याकाळच्या जेवणात आंब्याचा रस डब्यात घालून रमासाठी दवाखान्यात पाठवला.

आज कितीतरी दिवसांनी रमाला आंब्याचा वास कळला होता. आणि आईचं प्रेमळ स्पर्श असलेला डबा रमाने थोडा तरी संपवला होता. नर्सने रमाच्या पतींना हे बाहेर येऊन सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आता माझी रमा बरी होणार याची त्यांना खात्री वाटू लागली. आणि रोजच आईने प्रेमाने बनवून दिलेला तो  आंब्याचा रस हळूहळू रमाच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणू लागला. अखेर रमा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली. घरी आल्यावर सर्वांनी रमाच्या स्वागताची केलेली केलेली तयारी पाहून रमा खूप खुश झाली.

आईच्या प्रेमामुळेच आणि फळांच्या राजामुळेच आपला पुनर्जन्म झाला ही मागच्या वर्षीची गोष्ट मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेली यावर्षीही रमाला कोकणात जाऊन आंबे खाताना आठवली. आईच्या प्रेमाची तुलनाच नाही म्हणतात हे अगदी खरंय...

सौ. प्राजक्ता पाटील..