हक्काचं माहेर

हक्काचं माहेर

#हक्काचं_माहेर

राधा,वयवर्ष बेचाळीस. सधन कुटुंबातली स्त्री. नवरा केशव,अगदी सामान्य कुटुंबातून वर आलेला,सध्या एका नामवंत कंपनीत डेप्युटी मेनेजर होता. दोन्ही मुलं चिराग व पराग कॉलेजात शिकत होते. 

राधा पुर्णवेळ ग्रुहिणी होती. खरंतर हे पद तिचं तिनं मनानेच स्वीकारलं होतं. लग्नाआधी करत असलेल्या नोकरीतून दोन मुलं झाल्यावर त्यांच्या संगोपनासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती व वयाच्या चोवीसाव्या वर्षापासून ते बेसाळीसीपर्यंत तिने अन्नपुर्णेचं व्रत इमानेइतबारे पार पाडलं होतं. 

मुलं लहान असताना त्यांचा ग्रुहपाठ,त्यांच्या पालकसभा,आता मोठी झाली तरीही त्यांच्या उमलत्या वयातल्या समस्या,नवऱ्याची सल्लागार,घरातली कामं,हे सगळं ती हौसेने करत होती खरं, पण आत कुठेतरी तिलाही वाटत.होतं..थोडा निवांत हवा यार.

त्यादिवशी राधाचं केशवशी थोडं वाजलं. केशवचं माझे पैसे,मी कमवतो म्हणणं तिला कुठेतरी खूप टोचलं. तिच्या आतापर्यंतच्या कामाची केशवच्या लेखी काहीच किंमत नव्हती. मुलांसोबत बोलायला गेली तर ती आपापल्या कामात बिझी होती. 

राधा रात्री शतपावली करण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. फिरताफिरता विचारांच्या तंद्रीत ती हायवेपर्यंत आली. केशवचं मी,माझं तिला फार लागलं होतं. तिला दोन वर्षापूर्वी गेलेल्या आईची फार आठवण आली नि अचानक तिचे डोळे भरुन आले. 

रस्त्यावर वाहनांची येजा चालू होती. रस्त्यावरच्या दिव्यांच्या तांबूसपिवळ्या प्रकाशात तिला पुढचं सगळं धूसर दिसू लागलं. तिने हातरुमालाने डोळे टिपले. भावाकडे जावं तर तिथे नात्याला एक कोरडेपणा आला होता. नुसतच हसणंखिदळणं,तुमचं छान आमचं छान,सगळचं गुडीगुडी,मुलामा दिलेलं दादावहिनीचं नातं. 

तिने मनातून तो विचार काढून टाकला व आपसूक तिची पावलं पुन्हा घराकडे वळली. इतका उशीर कुठे होतीस असंही केशवने तिला विचारलं नाही. तिने ओटा आवरला व निजायला गेली. रात्री बराचवेळ टक्क जागी होती. अंधारात स्वतःलाच शोधत होती. 

सकाळी मुलं व केशव आपापल्या कामांना गेल्यावर तिने ओटा आवरला. आंघोळ,देवपूजा झाल्यावर पेपर चाळू लागली. पेपरातल्या एका जाहिरातीने तिचं लक्ष वेधलं..'हक्काचं माहेरघर'. फी दिवशी पाचशे रुपये.  रहाण्याजेवणाची व्यवस्था,मायेचा स्पर्श. 

राधाने जाहिरातीतल्या फोन नंबरवर फोन केला. एक बाई बोलत होत्या. राधाने जाहिरातीविषयी चौकशी केली व येण्यास इच्छुक असल्याचं सांगताच त्या बाई म्हणाल्या,"कधीही ये. आम्ही वाट बघतोय." राधाने बँग भरली. संध्याकाळी मुलांना व नवऱ्याला  मी दोनचार दिवसांसाठी ट्रीपला जातेय. तुम्ही तुमचं मँनेज करा असं ठणकावून सांगितलं. 

केशव म्हणालाच,"तू कसली जातेस एकटी!" मुलं म्हणाली,"ए मम्मा उगाच थापा मारु नकोस." पण राधा उत्तरली,"मी जे सांगतेय ते खरं आहे. मला थोडा चेंज हवाय या रोजच्या रहाटगाडग्यातून. त्याचसाठी मी चालली आहे." 

राधाने खरंच पहाटे लवकर उठून सगळ्यांचे डबे भरले. स्वतःची बँग भरुन निघाली. तिने डाऊन ट्रेन पकडली. खिडकीजवळची सीट भेटली. खूप शांत वाटत होतं राधाला. तिने कालच्या जाहिरातील्या फोन नंबरवर फोन करुन ती येतेय असं सांगितलं. त्या काकूंनीही लवकर ये असं म्हंटल्यावर तिलाही हुरुप आला. 

गजरेवालीकडून तिने गजरा घेतला व वेणीत माळला. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यावर तिच्या बटा भुरभुरु लागल्या. मोगऱ्याच्या सुगंधाने तिच्या चित्तव्रुत्ती प्रफुल्लित झाल्या.

 इच्छित स्टेशन येताच राधा उतरली व तिने रिक्षा केली. रिक्षावाल्याला जाहिरातीतला पत्ता सांगितला. रिक्षावालाही मनमोकळं हसला. म्हणाला,"महिन्यातून चारपाचजणी तरी येतात या पत्त्यावर. निकमकाकाकूंनी काढलंय हे. एकुलतीएक मुलगी पुनम बाळंतपणात गेली. मुलही नाही वाचलं तेव्हा दोघंही काही महिने भरकटल्यासारखे झाले होते पण मग त्यांच्या मनाने उभारी चेतली व हा नवीन उपक्रम सुरु केला. रिक्षावाल्याचं म्हणणं ऐकताऐकता ती कधी निकमांच्या बंगल्याजवळ पोहोचली हे तिला कळलच नाही.

बंगल्यावर ठळक अक्षरात पाटी होती 'हक्काचं माहेरघर' अशी. गेट उघडताच दोन्ही बाजूंना सुरेख बाग होती. लाल,पिवळी कर्दळी,अनंता,तगर,सोनटक्का,मोगरा,क्रुष्णकमळ,कोरांटी,विविधरंगी गुलाब..ती फुलझाडं पाहून राधा अगदी हरखून गेली. लाल,निळीजांभळी फुलपाखरं इकडून तिकडे भिरभिरत होती. फुलांचा मंद सुगंध वाऱ्यासोबत दरवळत होता. इतक्यात निकमदाम्पत्य तिच्या स्वागताला आले. फोनवरुन राधाने त्यांना तिचं नाव व इतर माहिती दिलीच होती. 

पांढरा सदरा व बारीक चौकडची लुंगी नेसलेले तात्या निकम व गोऱ्या वर्णाच्या, बारीक नक्षीची लाल सुती साडी नेसलेल्या विजूमावशी राधाला ही जोडी फार आवडली. विजूमावशी नुकत्याच न्हाल्या होत्या. त्यांनी केसांना पांढरा पंचा गुंडाळला होता. ओलेत्या चेहऱ्यावर पावडर लावली होती व दोन भुवयांमधे गोंदलेली हिरवीगार तुळस,त्यावर टपोरं लालभडक कुंकु.

राधाला त्या दोघांत तिचे आईवडील दिसले. बाहेरच्या बालकनीत एक झोपाळा लावला होता. हॉलमधे अगदी साधी भारतीय बैठक, एक टिव्ही,चौरंगावर पितळी घंगाळं..त्यातील पाण्यात तरंगणारी बागेतली फुलं.. अगदी घरगुती,प्रसन्न वातावरण.

राधाने हातपाय धुतले व विजूमावशीच्या सांगण्यानुसार कपडे बदलले. आकाशी कुर्ता व लेगिंग्स घातली. हॉलमधे येऊन बसली. तात्या राधाला म्हणाले,"अजिबात अवघड वाटून घेऊ नकोस बाळा. अगदी तुझ्या आईच्या घरी रहायचीस नं तशी रहा. तुला जे आवडतं ते सांग, यथेच्छ खा,पी आणि हो तुझ्या मनातलं साचलेलं सगळं इथे बोलून मोकळी हो. काही मनात ठेवू नकोस. 
हा तात्या तुला शब्द देतो की तुझं सगळं बोलणं आम्हा दोघांपुरतच मर्यादित राहिल."

तितक्यात विजूमावशी कॉफी व इडलीसांबार घेऊन आल्या. अगदी गरम,लुसलुशीत इडल्या व तितकच चवदार सांबार व चटणी. विजूमावशी व तात्यांच्या गप्पांमुळे राधाचा सगळा थकवा,ताण निघून गेला. कॉफी तर अगदी अप्रतिम होती.

दुपारी राधाही विजूमावशीसोबत स्वैंपाकाला लागली. दोघींनी मिळून पुलाव,भरली वांगी केली,पापड तळले. जोडीला मुरलेलं लिंबाचं आंबटगोड लोणचं. संध्याकाळी तात्या ग्रंथालयात गेले,पुस्तक बदलायला. राधा व विजू मावशी नदीकाठी फिरायला गेल्या.

दोघी नदीच्या काठावर बसल्या. खूप शांत वातावरण होतं ते. आजुबाजूच्या विस्तीर्ण झाडांवर पक्षी घिरट्या घालत होते. विजूमावशीने राधाच्या पाठीवर हात ठेवत म्हंटलं,"राधा,कोण कोण असतं घरी?"

"मी,माझा नवरा केशव व दोन मुलं चिराग,पराग. सासूसासरे सुट्टीला येतात."

"बरं. आईकडे.."

"मावशी,माझे वडील मी लहान असतानाच गेले. त्यानंतर आईने वाढवलं, मला व माझ्या भावाला. दोन वर्षापूर्वी तिला स्तनाचा कर्करोग झाला. शेवटची स्टेज होती,नाही वाचली. 

कधीतरी जाते माहेरी पण आता ती ओढ नाही राहिली. वहिनी छान आहे पण तरी नाही जुळले आमचे बंध. माझ्या आवडी वेगळ्या तिच्या आवडी वेगळ्या. भांडणं वगैरे नाही होत आमच्यात पण एकमेकींना हितगुज सांगाव एवढी जवळीकही नाही. 

केशव माझा नवरा स्वभावाने खूप चांगला आहे. त्याने गरिबी जगलीय. लहानपणी एक वेळच्या जेवणाचे वांदे होते त्याचे. आता मात्र त्याच्या कष्टाने त्याने समाजात एक स्थान निर्माण केलंय. 

घरातही सगळ्या सुबत्ता आहेत गं मावशी पण तीच तीच कामं..तेच  भांड्यांनी भरलेलं बेसिन, तेच ते पोळीभाजीचे डबे,बाजारहाट..असं वाटतं काय नाविन्यच राहिलं नाही आयुष्यात. एखाद्या यंत्रासारखी कामं करते. बरं धुणीभांडीवाली लावेन तर आमच्या एरियात नाहीच मिळत. एखादी मिळालीच तर तिच्या दांड्याच जास्त."

विजूमावशी म्हणाली,"कामं कोणाला चुकलैत गं. कामं तर बाईच्या पाचवीला पुजलेत. माझ्याकडे बघ. आता वयाची पासष्ठी उलटली तरी कामं करते. लेक गेली गं माझी. त्यानंतर बरेच महिने डिप्रेशनमध्ये होते. मलाही व्यक्त होण्यासाठी जीवाभावाचं कोणी हवं होतं. एका पहाटे ही संकल्पना डोक्यात आली. यांना सांगितलं. हे म्हणाले,"तू बरी होणार असशील तर मला मान्य आहे. मग काय गेली दोन वर्ष कैक मुली माझ्याकडे माहेरपणाला येतात. मला माझी लेक भेटल्याचा आनंद होतो. खरंतर मोफत ठेवणार होतो इथली व्यवस्था पण पैशाचं ढोंग नाही करता येत नि फुकट दिलेल्या वस्तूला मोल नसतं बघ."

"मावशी,खरंच छान उपक्रम करत अहात तुम्ही. मुळात नं तुला तात्यांची साथ आहे बघ. आमच्याकडे केशवने स्वतःला सिद्ध करायला इतके परिश्रम घेतले आहेत की सतत ना एक प्रकारचा अहं डोकावतो त्याच्या वागण्याबोलण्यात. हे माझं,ते माझं,मी कमवतो..वगैरे वगैरे..मग मला वाटतं गेली चोवीस वर्ष मी घर सांभाळलं,मुलांच शिक्षण,अभ्यास,दुखणंखुपणं..सासूसासरे आले की त्यांचं पथ्यपाणी,डॉक्टरी उपचार..हे सगळं कवडीमोल आहे का!"

"मुळीच नाही गं राधे. अगं गरिबीतून वर आल्याने तुझ्या केशवचा स्वभाव थोडा तिरसट,रुक्ष बनला असेल पण तुझ्याशिवाय त्याचं पानही हलत नसणार. तू इथे आलीस ते खरंच बरं केलंस. माणूस सवयीचं होणंही काही वेळा अवघड होऊन बसतं. विरहाने प्रेम वाढतं. अधूनमधून अशी स्वतःसाठी ब्रेक घेत जा."

तितक्यात तात्या तिथे आले मग तिघं मिळून घरी परतले. दुपारचं जेवण होतच. सोबत दारातल्या ताज्या नारळाची सोलकढी केली. रात्री पत्त्यांचा डाव रंगला. विजूमावशी व तात्यांना लहान मुलांसारखं भांडताना पाहून राधा खळखळून हसली व आईची आठवण काढून विजूमावशीच्या कुशीत रडरड रडली. 

रात्रीही मावशीसोबत झोपली. केशवचा फोन आला तेव्हा मावशीने तिला खुणेनेच चार दिवसांनी येईन असं सांगायला सांगितलं. केशव विचारत होता,"नक्की कुठे गेली आहेस? टूर सेफ आहे ना." राधाने आल्यावर सांगते सध्या खूप मजेत आहे असं सांगून फोन ठेवला.

इकडे बायको घरात  नाही म्हंटल्यावर घराची सगळी जबाबदारी केशववर आली. एक दिवस मुलांनी ब्रेड आमलेट खाल्लं. दुसऱ्या दिवशी बाहेरच जेवू म्हणाले. संध्याकाळी केशव जरा लवकरच घरी आला व त्याने आमटीभात बनवला. मुलांनीही बाबाला चिडवत चिडवत पातळरसरुपी आमटीभात ग्रहण केला. चिरागने भांडी घासली. परागने ओटा पुसला. 

केशवने कपडे मशीनला लावले. खरंतर तो राधाला सांगायचा की आमचे बाहेर घालायचे कपडे मशीनला लावू नकोस,खराब होतील. राधा ते हाताने धुवायची. अगदी जीन्सही ती हाताने धुवायची. केशवला आता राधाची दमछाक कळत होती. सकाळी तो जरा लवकर उठून पोळ्या आणायला गेला. एक पोळी पाच रुपये प्रमाणे तिघांसाठी प्रत्येकी सहा पोळ्या घेऊन आला.

 कांदा कापताना चिरागचं बोट कापलं गेलं. त्यावर हळद लावली. मग केशवनेच फटाफट बेसनचे पोळे काढले. कोबीची भाजी शिजायला ठेवली व केर काढू लागला. जरा करपल्याचा गंध येताच धावत किचनमधे शिरत होता. नेमकं परागने बेसिनमधे हात धुताना साबणाचा फेस खाली टाकलेला. केशवचा पाय नेमका त्या फेसावर पडला. मुलांनी बाथरुमधून किचनमधे नाचून फरशी ओली केली होती. केशवचे दोन्ही पाय लादीवरून सुळक्कन पुढे गेले व त्याचं बुड,कंबर चांगलीच झेजरली. 

परागनेच मग तिघांचेही डबे भरले. रात्रीसाठी बिरयानी मागवली. दोन दिवसात केशव वठणीवर आला. माझं माझं करणं त्याला चांगलच भोवलं. 

पराग व चिरागला राधाने  रात्री तिचे तात्या व विजूमावशींसोबतचे फोटोज पाठवले. विजूमावशी मुलांशी व केशवशी व्हिडिओ कॉलवर बोलल्याही. विजूमावशीने तिचं घर पाहिलं. राधाने मुलांना विचारलच,"बाबांनी कंबरेवर हात का धरलाय रे असा. बरं वाटत नाही का त्यांना?"
मुलांनी सकाळची बाबाची गंमत राधाला सांगितली. राधाने लेकांवर डोळे वटारले व माझ्या नवऱ्याला त्रास देऊ नका असं दटावलं. 

विजूमावशी दुपारी भरतकाम करत बसली होती. राधा म्हणाली,"मावशी आम्हालापण होतं ग हे शाळेत. गव्हाचा टाका,साखळी टाका,..असं बेसिक होतं तेंव्हा जाम आवडायचं रेशमाच्या धाग्यांनी फुलं,पानं भरायचे. पिलोकव्हर,टेबलक्लॉथ असं कायकाय केलेलं."

विजूमावशी म्हणाली,"अगं तोच तुझा छंद तू पुन्हा जोपास बघू. हे बघ मी ही बेडशीट,हे रुमाल भरलेत तसं तुही कर गं. छंदाला वयाचं बंधन नसतं राधा."

विजूमावशीने राधाला काश्मिरीटाका,बटणहोल टाका..असे खूप सारे स्टीचेस दाखवले. तिला एक भरतकामाच्या डिझाइन्सचं पुस्तकही भेट म्हणून दिलं ज्यात बऱ्याच टाक्यांची सविस्तर माहिती लिहिली होती.

आमरसपुरी,थालिपीठलोणी,पिठलंभाकर,पातोळ्या..असं बरंच काही विजूमावशीने राधाला खाऊ घातलं. राधा तिला मदत करत होतीच.

 दर दिवशी राधा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा करायची,दोघींसाठी व देवासाठी. निघण्याच्या दिवशी विजूमावशीने राधाला काही काम करु दिलं नाही. स्वतः एकटीने मऊसूत पुरणपोळ्या,कटाची आमटी,वरणभात बनवला. राधाला जेवायला वाढलं. राधा पोटभर जेवली. मग तिने राधाची खणानारळाने ओटी भरली व मुलांसाठी बेसनाच्या लाडवांचा डबाही दिला. तात्या व विजूमावशीचा निरोप घेताना राधाचं ह्रदय भरुन आलं. तिने त्या दोघांनाही आपल्या घरी यायचं आमंत्रण दिलं. दोघांच्या पाया पडली. विजूमावशी व तात्या तिला गाडीवर सोडायला आले. 

राधा घरी पोहोचताच पराग व चिरागने तिच्या बँगेतला खाऊचा डबा घेतला व चार दिवस उपाशी असल्यासारखे पटापटा लाडू खाऊ लागले.

 केशवने सुट्टी घेतली होती. मुलांसाठी राधाने फटाफट पोळीभाजी बनवली. मुलं गेल्यावर केशव राधाला म्हणाला,"बरं केलस गं चार दिवस बाहेर गेलीस ते. मलाही तुझी घरातली किंमत कळली बघ. माझं माझं म्हणत असतो मी पण तुझ्याविना अधुरा आहे बघ. आतापासून मात्र सगळं आपलं आपलं म्हणेन," असं म्हणत केशवने राधाला मिठीत घेतलं.

----सौ.गीता गजानन गरुड.