रिटायरमेंट नसलेली नोकरी म्हणजे मातृत्व

Mother's Job Never Ends


रिटायरमेंट नसलेली नोकरी म्हणजे मातृत्व



तिचं लग्न ठरलं. अगदी पाहून-सवरुन, चहा पोह्यांचा कार्यक्रम करून, आई-वडिलांच्या संमतीने. ते दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप होते वय, शिक्षण, नोकरी, पगार अगदी दिसायलाही लक्ष्मीनारायणाचा जोडाच जणू.

तिच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली. नवरीच्या साड्या, दागिने, रुखवंत, ब्युटी पार्लरच्या सेटिंग्स, साड्यांवरचे ब्लाऊज शिवण्यासाठी टेलरच्या वाऱ्या, प्रत्येक कार्यक्रमाची वेगळी साडी, वेगळी हेअर स्टाईल, त्यानुसार मॅचिंग ज्वेलरी, नवरदेवाचे कपडेही नवरीच्या कपड्यानुसार अगदी अनुरूप.

इकडे रुखवतातले पापड,चटण्या,लोणची,सरबत करायला तिच्या घरी माम्या, मावश्या, आत्या, आज्या, काक्या साऱ्या जमल्या होत्या. घरात थट्टामस्करी आनंद आणि उत्साहाला नुसतं उधाण आलेलं होतं.

रुखवत सजवताना मात्र तिच्या आईचे डोळे सतत पाण्याने भरून येत होते. ते तिलाही कळत नव्हतं असं का होतंय? पण ती आईला तसं विचारत मात्र नव्हती. तिची आई बोलता-बोलता लेकीच्या बालपणाच्या आठवणीत रमून जायची आणि रमताना तिचा कंठ मात्र दाटून यायचा.

तिच्या आईला आठवत होतं ज्या दिवशीही सोनकळी तिच्या कुशीत आली त्या दिवशी त्या सोनकळीच्या बाबांना अख्या ऑफिसला पार्टी दिली होती. तिच्या बाललीला, बोबडे बोल, शाळेत जाताना रडून मारलेली घट्ट मिठी. ते सारं सारं लग्नाच्या त्या घाई गर्दीतही तिच्या आईला अगदी तपशीलवार आठवत राही आणि डोळ्यांच्या कडा अलगद ओल्या व्हायच्या.

लग्नाचा मुहूर्त, कुळाचार, देवीचा गोंधळ, हळद मेहंदी, सगळे कार्यक्रम अगदी निर्विघ्न पार पडले पण तिच्या आईची घालमेल मात्र वाढतच राहिली.

आणि मग लग्नाचा दिवस उजाडला. हॉलवर सर्वत्र फुलांच्या माळा लावल्या होत्या. रोषणाई केली होती. शहनाईच्या मंद स्वर लहरी वातावरणात उत्साह पेरत होत्या. मंगल संगीत वाजत होतं. प्रवेशद्वारावर सुवासिनी पाहुण्यांचं हळदीकुंकू लावून, अत्तराने स्वागत करत होत्या. लाल, पिवळ्या, हिरव्या अक्षदा वऱ्हाडाला देत होत्या. तिकडे मात्र तिच्या आईची नुसती उलघाल होत होती.

लग्न लागले, कन्यादान झाले, त्यावेळी मात्र आई-बाबा-लेक तिघांच्याही डोळ्यात पाणी तराळले. तिच्या बाबांनी जावयाला हात जोडून, "माझ्या मुलीला सांभाळून घ्या अशी विनंती केली." जावयाने ती नम्रपणे मान्य केली. पाठवणीच्या वेळी मात्र तिचा आणि तिच्या आईचा अश्रूंचा बांध फुटला.

हळूहळू आपल्या संसारात ती रुळत होती. सासूच्या सूचना, नवऱ्याची मर्जी, सासर्‍याची आवड, नंणदेच्या थट्टे ला मनापासून दात देत होती. आणि मग तिला लागले मातृत्वाचे डोहाळे. दोन्ही घरी आनंदी आनंद झाला. सासू ने मायने डोक्यावरून हात फिरवला आणि आईने छातीशी कुरवाळले.

ती पहिलट करीन होती. त्यामुळे तिची सासू तिला सतत सूचना द्यायची.

सासू -"हे बघ सुनबाई सुरुवातीच्या तीन महिन्यात काही गरम खायचं नाही. अननस, पपईला हात सुद्धा लावायचा नाही. कळलं का? जागरण करायचं नाही. उगाच गाडीवर अवांतर भटकायचे नाही."

असं म्हणून सासूने जणू तिला वागण्याची एक नवी शिस्तच लावली. नवरा ही अगदी नियमितपणे तपासणी करता तिला डॉक्टर कडे नेत होता. सासरे तिच्या आवडी-निवडी पूर्ण करत होते आणि नणंद तिचे डोहाळे पुरवत होती.

सातव्या महिन्याचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम छान पार पडला. गर्भारपणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर आले होते, पण तिचं शरीर आता जड झालं होतं. हालचाली ही मंदावल्या होत्या. रात्रीवर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना तिला बरेच प्रयास पडत आणि \"पाठीवर झोपायचं नाही\" असं डॉक्टरने सांगितलं होतं.

बाळंतपणासाठी माहेरी गेल्यावर तिने तिच्या आईला शेवटी विचारलंच…

ती -"आई हे बाळंतपण म्हणजे एक अवघड परीक्षा नव्हे प्रोजेक्टच वाटतं बाई मला. सुरुवातीपासून किती ते नियम! किती ते सल्ले! असं करा, का तसं करू नका,हेच खा, ते खाऊ नका. आता तर रात्रीची झोपही शांतपणे होत नाही. मध्येच जीव घाबरा होतो, असं वाटतं एकदाची लवकर सुटका व्हावी या गर्भारपणातून.

तिची आई मंदपणे स्मित करत म्हणाली..


आई -"अगबाई एकदा का बाई आई झाली की, जन्मभर तिची या नोकरीतून सुटका नाही. राजीनामा नाही, की रिटायरमेंट ही नाही, आणि आजारी रजा तर अजिबात नाही. आता तुला वाटेल एकदाची डिलिव्हरी झाली की, मी सुटले पण तसं नसतं ग राणी! बाळाच्या जन्मानंतर आईच विश्वच बदलून जातं.

बाळाच्या जन्मानंतर त्याला स्तनपान करणे, रात्रीची त्याची दुपटी, लंगोटी बदलणं, सु-शी साफ करणे आणि कळस म्हणजे रात्री आपल्याला झोप येत असताना त्याचं खेळत राहणं. कधी रडण्याचं कारण न समजण, मग आपणच ते रडण्याचं कारण शोधून काढण."


ती -"बापरे! बाळ का रडत आहे ते कसं काय शोधायचं आई?"

आई -"आईला बरोबर कळते बाळ भुकेसाठी रडले की, तिला पान्हा फुटतो पण कधी बाळाच्या पोटाला फुगारा असतो, कधी मुरडा असेल, कधी मच्छर चावला असेल तर, कधी पोटात गॅस अडकले असतील तरीही ते आईला समजायला हवं बरं का!

अन्नप्राशन झाल्यावर पौष्टिक, सकस, चवदार पदार्थ बाळाला खाऊ घालणे म्हणजे एक दिव्यच असतं. बाळ पाच वर्षाच होईपर्यंत सर्दी, ताप, खोकला आणि परत रात्रीची जागरण. मग अजून मोठी झाली की, त्यांचा शाळेचा अभ्यास, खेळातली प्रगती, पौगंडावस्थेतल्या समस्या आणखी वेगळ्या, कॉलेजच्या त्याहून निराळ्या. मग नोकरीतल्या जबाबदाऱ्या, लग्न त्यातल्याही काही समस्या आणि जबाबदाऱ्या. प्रत्येक वेळी मूल  आपली समस्या आईला सांगेनच असं नाही.  ती  समस्या आईला स्वतःहून समजून घ्यावी लागते  आणि  त्याचं उत्तरही स्वतःच शोधावं लागतं. संसारातही कधी कधी बायकोला नवऱ्याची आई पण व्हावं लागतं. म्हणूनच अगदी शेवटपर्यंत आई-पणातून बाईची सुटका होत नाही.

एकदा आपण स्त्रिया आई झालो ना की, मग शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ही नोकरी करावी लागते. रिटायरमेंट शिवाय, पगारा शिवाय, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आपण आपले मातृत्व जगत असतो जपत असतो. स्त्रीच्या ह्या मायेच्या, ममतेच्या, आई-पणातच जगण्यात आणि जपण्यात खरी गंमत असते."


आईचे हे प्रेमाचे बोल ती ऐकत होती आणि  आईच्या कुशीत ती गाढ झोपी गेली. अगदी निरागस बाळासारखी.


समाप्त.


©® राखी भावसार भांडेकर.

फोटो साभार गूगल.