मातृत्व ( भाग१ )

About Love Of Mother


मातृत्व ( भाग १ )


" अगं नीलम ,तुझ्या वहिनीला जुळी मुले झाली पण त्यातील एक मूल जन्मतःच गेले गं आणि दुसऱ्या बाळाची तब्येत पण नाजूक आहे त्याला एन आय सी यू मध्ये ऍडमिट केले आहे."

असे सुलभा वहिनीने नीलमला फोन करून सांगताच सुलभा रडायला लागली आणि तिला खूप वाईट वाटले .
वहिनीचे अगोदरही एकदोनदा गर्भपात होऊन जीवावरचे गेले होते.

भावाने वहिनीला सांगितले होते की " तुझ्या जीवाला त्रास होतो तर आपण मूल दत्तक घेऊ पण तू स्वतः चेच मूल हवे हा हट्ट सोड ."

तेव्हा वहिनी म्हणायची
" तुम्हांला माझी व्यथा नाही समजणार . स्त्रीचे खरे स्त्रीत्व हे बाळाला जन्म देवून आई होण्यातच असते.

आपल्या लग्नाला ५,६ वर्षे होत आली पण मी अजूनही आई झाले नाही याचे मला वाईट तर वाटतेच पण बायकांच्या टोमण्यांनी मनाला खूप त्रास होतो. "

नीलमला हे सर्व आठवू लागले होते आणि आता कितीतरी वर्षांनी वहिनी गरोदर राहिली होती डॉक्टरांची व्यवस्थित ट्रीटमेंट आणि वहिनीने घेतलेली व्यवस्थित काळजी त्यामुळे आतापर्यंत वहिनीची तब्येत वगैरे सर्व चांगले होते पण आज एक बाळ गेले आणि दुसऱ्या ची पण तब्येत नाजूक होती . त्यामुळे नीलमला खूप टेंशन आले होते . काय करावे ? हे ही सूचत नव्हते . मनात खूप सारे विचार येत होते
\" अशा परिस्थितीत माहेरी फोन केला तर ..पण ते कोणीही माझा फोन उचलणार नाही. माझ्याशी ते बोलत नाही. माझ्याशी त्यांनी सर्व संबंध तोडून टाकले आहेत .

कारण ही तसेच आहे म्हणा..
मी त्यांनी ठरविलेल्या मुलाशी लग्न न करता सचिनशी लग्न केले. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला ना..

पण मी तरी काय करू?

सचिनचे आणि माझे एकमेकांवर खूप प्रेम होते .
मला माहिती होते सचिन मला आयुष्यात सुखी ठेवणार पण माहेरच्यांना हे पटत नव्हते .
त्यामुळे त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केले .
सचिनबरोबर लग्न केले.

पण त्या दिवसापासून माझे माहेर मला पोरके झाले...

मी जरी सचिन बरोबर आनंदी असली तरी मला माहेरची आठवण येते,काळजी वाटते ... म्हणून तर मी माहेरच्या घराशेजारी असलेल्या सुलभा वहिनींकडून सर्व विचारपूस करत असते. त्यांचे आणि माझे अगदी जिव्हाळ्याचे संबंध... आम्ही एकमेकांच्या मैत्रीणीचं...

आजचा दुःखाचा प्रसंग ही सुलभा वहिनीमुळेच समजला ...

देवा, एक बाळ तर गेलं पण दुसऱ्या बाळाला तरी लवकर बरे कर ...
भावाला आणि वहिनीला आईबाबा होण्याचा आनंद तरी घेवू दे .\"

\"बाळ गेल्यामुळे घरातील वातावरण अगोदरच दुःखात आणि आपण फोन केला तर घरातील वातावरण अजून खराब होईल\" या विचाराने नीलम माहेरी फोन न करता सुलभा वहिनींकडून सर्व विचारपूस करत होती.

बाळ जन्मतःच गेल्याने वहिनीला डिलेवरीत त्रास झाला होता आणि तिची तब्येत ही बिघडतच चालली होती. ती आपल्या दोघी बाळांबद्दल विचारायची तेव्हा तिला भाऊ सांगायचा की
\" त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे . 4,5 दिवसांत सोडतील त्यांना. तू बरी झाली की सर्वांना घरी नेऊ \"

तिला बाळ गेल्याचे सांगितले नाही . अगोदरच तब्येत बरोबर नाही आणि बाळ जाण्याच्या दुःखात अजून तब्येत बिघडली असती .
तिची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर सांगणार होते.

नीलम जरी आपल्या घरी होती तरी तिचे मन माहेरीच धावत होते.वहिनीला, बाळाला लवकर बरे वाटावे म्हणून देवाला प्रार्थना करायची.रोज सुलभा वहिनीला फोन करून विचारपूस करायची.

असेच 4,5 दिवस गेले आणि सुलभा वहिनींचा तिला फोन आला .
" नीलम,तुझी वहिनी देवाघरी गेली गं ..."


हे ऐकून तर नीलमला खूपच मोठा धक्का बसला. तिला खूप रडायला येत होते.
\" किती अवघड परिस्थिती? एक बाळ गेले ,दुसरे हॉस्पिटलमध्ये आणि आता वहिनी सोडून गेली ...
भावाला काय वाटत असेल ? आई बाबांना किती वाईट वाटत असेल ?
वहिनीने तर बाळांना पाहिले ही नाही आणि बिचारे बाळ ...
त्याचा भाऊ ही गेला आणि आई ही ...
तो स्वतः ही हॉस्पिटलमध्ये...जगण्यासाठी संघर्ष करत आहे ..मृत्यूशी लढत आहे..

केवढा दुःखाचा प्रसंग ?

का वहिनीने हट्ट केला आई होण्याचा? त्यापेक्षा दत्तक घेतले असते बाळ... म्हणजे आज असा दिवस तरी आला नसता ना ? \"

असे अनेक विचार आणि प्रश्नांनी नीलम अस्वस्थ होत होती.

काही झाले तरी माहेरी जायचे ...अशा दुःखाच्या प्रसंगी आपण गेलेच पाहिजे असे तिच्या मनात आले आणि म्हणून ती माहेरी जाण्यासाठी तयार होते .सचिन ही तिच्यासोबत जातो.

तेथील परिस्थिती पाहून तर तिच्या अंगातील त्राणच नाहीसे झाले... काय करावे ? हेच सूचत नव्हते.. थकलेले आईवडील आणि या दुःखाने तर अजून खचले गेले होते ... बाळ व बायकोच्या जाण्याने दुःखी झालेला भाऊ ..
या सर्वांचे कोणत्या शब्दांत सात्वन करावे ? हेच समजत नव्हते.
अशी परिस्थिती कोणाच्या ही घरी येऊ नये असे तिला वाटत होते. बिचाऱ्या बाळाला तर आईची ऊबही मिळाली नाही.... जन्मतःच भावाला आणि आईला गमवावे लागले ..जन्माला येताच इतके दुःख?

वहिनीच्या अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक, आजूबाजूचे लोक नीलमकडे,सचिनकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते . आपआपसात कुजबुजत होते . पण अशा दुःखाच्या प्रसंगी कोणीही नीलमला काही बोलले नाही.
वहिनीला निरोप देताना नीलमला खूप रडू येत होते.

वहिनी आई झाली पण आपल्या बाळाला आईचे प्रेम न देताच गेली...

तिने आई होण्याची... तिच्या मातृत्वाची इच्छा पूर्ण केली पण तिला मातृत्व अनुभवता आले नाही...


अशा या दुःखाच्या प्रसंगी आपली नीलम मागचे सर्व विसरून माहेरी धावत आली. माहेराबद्दल असलेली तिची तळमळ,तिचे प्रेम पाहून तिच्या आईवडिलांना आणि भावाला अजून रडू येत होते. आपण तिच्याशी इतक्या कठोरपणे वागूनही तिला आपल्या सर्वांबद्दल प्रेम,आपुलकी असल्याचे दिसून आले.

"नीलम,आम्ही तुझ्याशी असे वागूनही तू आमच्या साठी आली आणि जावई पण आले ...आम्हांला वाटले तुम्हांला आमचा राग आला असेल ...तुम्ही कधीही आम्हांला माफ करणार नाही..."
आईबाबा नीलम ला म्हणाले.


नीलम - " आईबाबा,तुम्हांला त्यावेळी जे योग्य वाटले ते केले आणि मला जे योग्य वाटले ते मी केले.
माझा माझ्या सचिन वर आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता .माझी निवड चुकू शकत नाही .सचिन खूप चांगला व्यक्ती आहे. तेव्हा तुम्ही आमच्याशी असे वागूनही आज तो माझ्या बरोबर आला . त्यालाही तुमच्या बद्दल, या घराबद्दल काहीतरी आपुलकी वाटत असेलच ना ? म्हणून तर आला ना ? आनंदाच्या प्रसंगी तुम्ही आम्हांला बोलवले नसते आणि आम्ही ही स्वतः हून आलो नसतो ...
पण ...आताचा हा प्रसंग ..तुमच्या वर आलेले दुःखरुपी संकट ..
हे सर्व ऐकून मला यावेच लागले...
तुम्ही माझे आईवडील आहात ...लहानाचे मोठे केले ..प्रेम दिले ..संस्कार केले हे सर्व कसे विसरु मी ? माझा भाऊ दुःखात असताना मी तिकडे कशी राहू शकते ? "


" चुकले गं आमचे ...आम्ही जातपात, चालीरीती, समाज,नातेवाईक या सर्व गोष्टींच्या विचाराने तुला सचिन बरोबर लग्नाला परवानगी दिली नाही आणि आम्हांला आवडणाऱ्या मुलाशी लग्न करण्याची जबरदस्ती केली ..पण तू तुझ्या निर्णयावर ठाम होती...तू आम्हांला सचिन किती चांगला आहे हे पटवून सांगितले पण आमच्या डोळ्यावर तेव्हा वेगळीच पट्टी होती ..आम्हांला बाकीचे काही दिसतच नव्हते...
शेवटी तू सचिनशी लग्न करून तुमचे प्रेम यशस्वी केले.."

आईबाबा नीलम ला म्हणाले.

नीलम - " आई बाबा , मी जरी सचिन बरोबर लग्न करून आनंदी झाली असे तुम्हांला वाटत असले तरी ..
मला तुमच्या सर्वांची खूप आठवण यायची ...
तुमच्या सर्वांसोबत घालवलेले क्षण आणि क्षण ...
आईच्या हातचे जेवण , तुम्ही आमच्या साठी आणलेला खाऊ, दादाबरोबर केलेली दंगामस्ती, खेळणे,हसणे ...
या घरातील कोपरा न् कोपरा मला आठवायचा ...
आठवण आली की रडायची...कधी वाटायचे ...का लग्न केले मी ? म्हणजे माहेर तर तुटले नसते माझे ..."

आई - तुझी पण आम्हांला आठवण यायची गं ...मी आपली स्वयंपाकघरात रडत बसायचे...तुला लहानाची मोठी केली ...लहानपणापासूनच्या तुझ्या सर्व आठवणी आठवून मन भरून यायचे.."

बाबा - " तुझी आई तुझ्या आठवणींनी रडते आहे हे पाहून मला खूप वाईट वाटायचे ... मला ही तुझी खुप आठवण यायची ...मी पण गच्चीवर जाऊन एकटाच रडत बसायचो...
असे वाटायचे तुला फोन करावे,तुझ्या शी बोलावे ...."

" सचिनराव, तुम्हींही मन मोठे करून आमच्या घरी आलात ..तुम्हांला ओळखण्यात आम्ही चूक तर केलीच पण काही गोष्टी या काळानुसार, परिस्थितीनुसार स्विकारल्या पाहिजे. हे आम्ही समजलो नाही."

बाबा सचिन ला म्हणाले.

सचिन - " आईबाबा ,मला तुमचा कोणाचाही राग वगैरे नाही. या परिस्थितीत आम्हांला जे योग्य वाटले ते आम्ही केले ..."


हळूहळू बाळाची तब्येत सुधारत होती . डॉक्टरांनी बाळाला घरी नेण्यास परवानगी दिली .
\"आता आईविना बाळाला कसे सांभाळायचे ? \"
हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता.

नीलमची आई तर अगोदरच आजारी असायची आणि त्यात सून व नातू गेल्याच्या दुःखाने शरीराने आणि मनानेही खचून गेली होती. तिच्याकडून आईविना बाळाची व्यवस्थित काळजी घेणे शक्यच नव्हते.


क्रमशः