वात्सल्यसिंधु आई

Love Of Mother

\"आई म्हणोनी कोणी।आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेची हाक माते।मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी
ही न्युनता सुखाची ।चित्ती सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आई विना भिकारी।\"
कवी यशवंतांनी किती छान शब्दांत आईची थोरवी गायली आहे.
खरचं ज्यांच्याजवळ आई आहे,ज्यांना आईचे प्रेम मिळते ते खरे श्रीमंत!
आणि ज्यांच्या जवळ जगातील सर्व सुखे असतील पण आईचे प्रेम नसेल तर ते भिकारी !
\"आई\" हा शब्द मानवी भावनांशी निगडीत असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या दोघांचा संगम म्हणजे आई!
\"मातृदेवो भवः\" ही आपली संस्कृती.
आई म्हणजे ईश्वराचे वसतिस्थान. मंगल,उदात्त ,उत्कट भावकल्पांचे उगमस्थान. आई म्हणजे ईश्वराचा अवतार, आई म्हणजे दैवत!
माय,माता,माये,माऊली, मातोश्री, जननी, जन्मदात्री असे अनेक शब्द आईसाठी उच्चारले जातात.
जगातल्या सर्वच संस्कृतींनी बाळाला जन्म देणारी आई हे सृष्टीचे सर्व श्रेष्ठ रूप मानले आहे.विश्वात जे जे मंगल,उदात्त, पवित्र, भव्य, दिव्य ते ते सर्व मातृरूप घेऊन प्रकट होते.
स्त्री जेव्हा बाळाला जन्म देवून मातृत्वाचा आनंद घेते. हा आनंद म्हणजे तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ! नऊ महिने आपल्या गर्भात वाढविलेल्या जीवाला ती या जगात आणते.त्याला आपल्या शरीराचे एक अंगच समजते.
बालकाच्या कोमल मनाची जाण ठेवूनचं आई त्यावर संस्कार घडवत असते.
तुकाराम महाराज म्हणतात -
\" बालकाचे चाली। माता जाणुनी पाऊल घाली।।\"

मुलांची सर्वांत पहिली गुरू आईचं असते.खाणेपिणे, बोलणे, चालणे हे सर्व तर बाळाला आईचं शिकविते.आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, चांगल्या सवयी लागाव्यात ,त्यांना कोणताही त्रास होऊ नये,त्यांचे जीवन सुखी असावे यासाठी ती कष्ट घेत असते.स्वतः ची काळजी करणार नाही ,स्वतः च्या सुखांना तिलांजली देईल पण आपली मुले यशस्वी झाली पाहिजेत असेचं तिला वाटत असते.

" प्रेमस्वरूप आई,वात्सल्यसिंधु आई।\"

कवी माधव ज्युलियन यांनी आईला मायेचा सागर म्हटले आहे.
सागराचे पाणी कधी कमी होत नाही, कधी आटत नाही तसे चं आईचे प्रेम ही अथांग असते ,आई जगात असली किंवा नसली तरी तिचे प्रेम मुलांजवळ कायम राहते.

\"माता म्हणजे पावित्र्याचे आगर !
ममतेचे माहेरघर!!\"

आईचे प्रेम हे निःस्वार्थ असते.ती मुलांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करीत असते.मुलांनी सुखात रहावे हीच प्रार्थना ती देवाजवळ करीत असते.आजारपणात मुलांची सेवा करते,मुलांच्या आवडीचे पदार्थ बनविताना कधी कंटाळत नाही. स्वतः उपाशी राहील पण मुलांना स्वतः खाऊपिऊ घालते.स्वतः आजारी असली तर तिला स्वतः पेक्षा घराची काळजी असते.मुले आणि वडील यांच्या तील ती दुवा असते.दोघांना सांभाळून घेते.
आई मुलांना रागवते पण मुलांच्या भल्यासाठीचं !
आई मुलांच्या चेहऱ्यावरून त्यांचे मन ओळखते,ते सुखात आहे की दुःखात तिला समजते.
मुलांच्या यशामागे आईचा वाटा मोलाचा असतो.
जिजाबाईंनी शिवाजी राजांना घडविले ,साने गुरुजींना घडविणारी त्यांची आईचं होती..
आपण दिलेले संस्कार,आपण दिलेली शिकवण,त्यांच्या साठी घेतलेला त्रास आणि मुलांचे गुण ,त्यांची मेहनत यामुळे मुले जीवनात यशस्वी झाली तर आईला आपल्या मातृत्वाचा खरचं अभिमान वाटतो.तिला स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो.
पण एखाद्या स्त्रिचे मुले जेव्हा वाईट संगतीत जातात. आईसमोर त्यांचे आयुष्य वाया जात असते तेव्हा आईला खुप त्रास होत असतो.आपल्या मुलांचे वागणे आवडत नसले तरी ती त्यांच्या वर प्रेम करीतचं असते.त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असते.एका आशेवर आयुष्य जगत असते की मुले चांगल्या मार्गावर येतील.
यातही ती स्वतः ला दोषी मानीत असते.आपण कोठेतरी कमी पडलो,आपले काहीतरी चुकले,आपले प्रेम कमी पडले असा विचार करीत असते.

आईची महती सांगताना फ.मु.शिंदे म्हणतात,

\"आई ही लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधावरची साय असते,
अनाथाची नाथ असते,
लंगड्याचा पाय असते.\"

\" आई ही जन्मभराची शिदोरी असते,जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही\"

आईची महती जाणून आईची सेवा करणारे, तिला सुखात ठेवणारे मुले म्हणजे ती आई खरचं भाग्यवानं..
पण काही असतात आईचे उपकार विसरणारे,आईला सुख न देता दुःख देणारे ,स्वार्थी मुले जे आईला तिच्या आजारपणात, म्हातारपणात सांभाळीत नाही. तेव्हा त्या आईला किती त्रास होत असेल....

\"फुलामध्ये फूल । हुंगावे जाईचे
सुख भोगावे आईचे। बालपणी।
माऊली माऊली । कल्पवृक्षाची साऊली
तान्हेबाळा लागी दिली। देवाजीने\"

जसे आई आपल्या मुलांना जीव लावते,त्यांची काळजी घेते तसेच प्रत्येक आईच्या मुलांचे कर्तव्य असते की आपल्या आईला ही सुखात ठेवावे,आईच्या उपकारांची जाणीव ठेवावी.
असे म्हणतात आपल्या कातडीचे जोडे बनवून आईच्या पायात शंभर जन्मी,शंभर वेळा घातले तरी आईच्या दुधाची,तिच्या प्रेमाची किंमत फेडू शकत नाही.

आईची थोरवी,महती किती ही सांगितली तरी कमीचं आहे,कितीही लिहीले तरी शब्द अपुरे पडतात....
शेवटी एवढेचं लिहावेसे वाटते

आई असते
ईश्वरी अवतार
आई असते
मायेचा सागर....


जिच्या मूळे जगात येतो
ती असते आई
आयुष्याला आकार देते
ती असते आई....