सीड मदर : संघर्ष तिचा भाग ३

A Story Of A Woman Who Honoured With Padmashree

सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ३

ते वाघरु पळून गेल्यावर दोघींच्या पायातलं अवसान गळालं आणि दोघी एकदम शांत बसल्या. थोड्या वेळाने त्यांना परत आवाज आला. कसला आवाज येतोय ते बघायला सखू उठली आणि तिला बिरजू दिसला. तो दोघींसाठी पाणी घेऊन आला होता. त्याच्या हातातून पाणी घेताना त्याच्या जखमा बघून इतका वेळ दाबून ठेवलेला उमाळा सखूला सहन झाला नाही. ती एकदम रडायला लागली. तिला बायजा आणि सर्जा कसंबसं समजावून शांत करत होते. तिचं रडू थांबल्यावर बायजाने तिला पाणी दिलं.

असा बराच वेळ गेला आणि परत खसफस आणि गुरगुर सखूच्या कानावर आली. आता ती चिडली होती. डोळ्यातलं पाणी जाऊन तिथे आता संताप दिसत होता. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने परत शेकोटीतलं जळतं लाकूड उचललं आणि ती सरसावली.

" आता ह्येला काय जित्ता ठ्येवत न्हाई म्या. माजं टक्कुरं खसकलं आता " सखू म्हणाली.

तिचं बोलणं संपतंय तोच ते वाघरु तिला दिसलं. दोघे अगदी समोरासमोर होते. त्या वाघाच्या नजरेतली धमकी, त्याचा संताप तिला इथूनही तिला जाणवत होता. ते जनावर दोन पावलं मागे सरकलं आणि त्याच्या झेपेचा अंदाज सखूला आला. त्याने तिच्यावर एकदम झेप घेतली आणि सखू अत्यंत चपळाईने बाजूला झाली. त्याचा अंदाज चुकला आणि ते अगदी शेकोटीजवळ पडलं. ती संधी साधून सखू भिंगरी फिरावी तशी फिरून वाघामागे आली. जीव खाऊन एकच लाथ तिने त्याच्या पोटात मारली. खरं तर तिचं वजन, तिचा जोर त्याच्यापुढे काहीच नव्हता. पण तिची भावना इतकी प्रबळ होती, की आपोआप तो जोर तिच्यात आला.

तिच्या लाथेने ते वाघरु शेकोटीत पडलं आणि किंचाळत पळून गेलं.

" मसण्या म्येला, आता न्हाई येत त्यो. जलम भराचा धडा शिकीवलाय म्या त्याला", ती संतापाने थरथरत म्हणाली.

तिचं हे रूप बघून बायजाने तिच्या कानशीलवरून कडकडा बोटं मोडली, तिची अलाबला घेतली. पुढे उरलेली रात्र दोघी सावधपणे बसूनच होत्या. पहाट झाली, उजाडलं तशा दोघी घरात आल्या आणि सर्जा, बिरजू गोठयात जाऊन बसले. रात्रभरच्या जागरणाच्या आणि संतापाच्या भाराने दोघीही शिणल्या होत्या. सखू पटकन आत गेली आणि तिनं चहा टाकला. कोंबडं आरवलं , तसे पाटील खाली आले. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा पत्ताच नव्हता. बायजा आणि सखूचा अवतार बघून ते तिथेच थबकले. सखू उठली आणि ती बाहेर जाणार, एवढ्यात पाटलांनी तिला थांबवली. ती अगदी कोपऱ्यात जाऊन खाली मान घालून अंग चोरून उभी राहिली. रात्रीची धाडसी सखू ती हीच हे आता कोणाला सांगूनही पटलं नसतं.

पाटलांनी काही विचारायच्या आताच बायजाने त्यांना सखूच्या धाडसाचं रसभरीत वर्णन केलं. पाटील अवाक होऊन सखूकडे बघतच राहिले. त्यांचा विश्वासच बसेना. बायजाने पुन्हा पुन्हा सांगितल्यावर ते भानावर आले. बोटातलं सोन्याचं वळं त्यांनी पटकन बायजाकडे दिलं आणि तिला ते सखूला द्यायला सांगितलं. सखू पार कावरीबावरी झाली. तिला कळेना एवढं काय केलं तिने ते. तो भोळा जीव झालेल्या कौतुकाने बावरून गेला होता.

सकाळची सगळी कामं आटोपल्यावर दोघी जरा स्वयंपाकघरातच लवंडल्या. अर्धा तास झाला असेल नसेल तोच पाटलांची परत हाक ऐकू आली. बायजा दचकून उठली. पटकन पदर सारखा करून बाहेर गेली, तोच पाटलांचा हुकूम झाला. " ह्ये बगा, आत्ता सर्जा देवीला कौल लावनार हाय. तेव्हा बकरं बळी द्यायचं हाये. वशाट रांधा आज. अन त्ये मी त्येला देवीला आजून येक कौल लावाया सांगनार हाये". पाटील दुसरं वाक्य अगदी हळू आवाजात म्हणाले.

बायजाने जणू त्यांच्या मनातलं ओळखलं होतं. ती म्हणाली, " धनी, म्या बी ह्येच सुचिवनार व्हते. पोरीची कूस उजवायला होवी. फार गुनाची पोर हाये. तिला आय न्हाय, पर म्या तिचं समदं करीन. मला तर ती माही लेकच वाटते".

पाटील तिच्याकडे बघतच राहिले. सर्जाची हाक आली तसे ते बाहेर गेले. बाहेर सर्जा एक झोळी घेऊन उभा होता. पाटील बाहेर आले आणि बिरजूला हाक मारली. बिरजू एक बकरं घेऊन आला आणि पाटलांच्या हाती त्याने त्याच्या गळ्यातली दोरी दिली. आणि तो म्हणाला, " मालक, म्या हितंच थांबतो, परत काही व्हायचं. त्ये जनावर जखमी हाय, चिडलं असेल त्ये" .

नुसती मान हलवून पाटील बकरं घेऊन सर्जापाठोपाठ निघाले. देवीच्या देवळाच्या आवारात येऊन दोघांनी वहाणा काढल्या. तिथंच एका खुंटीला बकरं बांधलं, हातपाय धुतले आणि दोघं देवळात शिरले. गावची देवी शिरकाई देवी शांत चेहऱ्याने गाभाऱ्यात उभी होती. सगळीकडे प्रसन्न वाटत होतं. सर्जा पुढे झाला आणि त्याने देवीची पूजा केली. एक पांढऱ्या रंगाचं आणि आणि एक लाल रंगाचं फूल घेऊन सर्जाने देवीला कौल लावला. तो घुमू लागला. मध्येच वळून पाटलांना म्हणाला , " पाटील लाल फूल पडलं तर दुष्काळ जाईल म्हनतीय शिरकाई माय". असं म्हणून तो उच्चारवात देवीचा जयघोष करायला लागला. तेवढ्यात लाल फूल खाली पडलं आणि पाटलांनी देवीचा जयघोष करून तिला साष्टांग दण्डवत घातला. सर्जानेही देवीला नमस्कार केला. तेवढ्यात पाटील म्हणाले, "अजून एक मागनं हाय देवीकडे. माझ्या बिरजूला मूल न्हाई. सखू माह्या पोरीसारकी हाय. तिची कूस उजवावी म्हनून गाऱ्हानं घाला की पावनं येकडाव परत".

सर्जाने परत देवीची पूजा करून गाऱ्हाणं घातलं आणि लाल, पांढरं फूल वाहून कौल लावला. आणि एका क्षणात लाल फूल खाली पडलं आणि सर्जा म्हणाला, " पाटील, म्होरल्या साली पोरीची कूस उजवेल. "पोरगी व्हईल. अन ती समदं पांग फेडील. नक्षत्र यील तिच्या पोटी". पाटील समाधानी दिसले. देवीला नमस्कार करून दोघं बाहेर आले.

पाटील म्हणाले, " दुर्गा कुटं हाये? ती येनार का न्हाई? सांगा अदुगर".

" यील ती पाटील, नगा इच्चार करू". सर्जा म्हणाला.

काय काम होतं पाटलांचं दुर्गाकडे? सखूची कूस उजवणार का? दुष्काळ नाहीसा होणार का? ह्याची उत्तरं उद्याच्या भागात.


क्रमशः

🎭 Series Post

View all