आई थेरं करते!

Question about the freedom of widow

#आई_थेरं_करते!

सुनीताईच्या मुलाने,विजयने नुकतच ठाण्यात घर घेतलं होतं. थोरला मुलगा अजय डोंबिवलीत रहात होता. सुनीताईचे यजमान गेल्यानंतर महिनाभरात अजयविजयने घरातच एक बैठक भरवली व त्यांनी आपापसात चर्चा करुन निर्णय घेतला की आई दोघांकडे सहा सहा महिने राहील व आताचं राहातं बदलापुरातलं घर हे बिल्डरला द्यायचं. बिल्डरशी तसं बोलणंही झालं होतं. 

बिल्डर त्या जागी टॉवर बांधणार होता व दोन टुबीएचके व ठराविक रक्कम देणार होता. ती ठराविक रक्कमही सुनीताईच्या नावाने बँकेत ठेवायची व महिन्याला येणाऱ्या व्याजात सुनीताईने घर चालावायचं असं लेकांच व सुनांच मत पडलं. सुनीताई शांत बसून ऐकत होती. लेकांनी आईचं मत विचारलं. सुनीताईने सफशेल नकार दिला. दोन्ही लेकांना राग आला. "आई,अगं या बंगल्याची निगराणी करायला जमणार आहे का तुला?" "सगळं जमून आलंय तर कसाला खोडा घालताय?" थोरली सूनबाई म्हणाली. 

धाकटा म्हणाला,"नाहीतरी आयुष्यभर घरातच राहिलीस. कधी नोकरीही केली नाहीस. तशी तुझी आर्थिकदृष्ट्या मदत काहीच नाही. आता चार पैसे मिळतील आम्हाला ते मिळूदेत. तुला नाही का वाटत आम्ही सुखी व्हावं? तुला व्याजही मिळेल महिन्याला"

सुनीताई म्हणाली,"अजय,कोणत्या आईला वाटेल आपल्या मुलांनी सुखी होऊ नये म्हणून? हो,कबुल आहे मला मी आयुष्यभर घरात राहिले पण तो सर्वस्वी आम्हा उभयतांचा निर्णय होता. माझ्या नवऱ्याला चाललं असतं मी नोकरी केलेली. त्यांची ना नव्हती पण मला नव्हती करायची नोकरी. तो माझा निर्णय होता व माझ्या नवऱ्यानेही तो मान्य केला होता. 

नोकरी करत नव्हते पण  घर सांभाळत होते. सकाळपासून ओट्यापाशी उभी असायचे. तुम्ही जायच्या वेळेला प्रत्येकाच्या वेळेनुसार,चवीनुसार प्रत्येकाला गरमगरम करुन खाऊ घालत होते." 

"नको तेवढे लाड केलेत," धाकटी सून म्हणाली.

 "असेल तसंही असेल पण मी स्वावलंबी बनवलय त्यांना. तुम्ही चार दिवस माहेरी गेलात,आजारी असलात तर ते स्वैपाक बनवू शकतात."

"मग तू ऐकत नाहीस तर,"अजय म्हणाला.

"हो,तुम्ही इथे येऊन राहू शकता कधीही." मुलं यावर काहीच बोलली नाहीत. नाराज होऊन निघून गेली.

सुनीताईने यजमानांच्या फोटोसमोर दिवा लावला. बघत बसली एकटक."काय करायला हवं होतं मी? अहो,तेव्हा तुम्हाला सांगत होते की मुलांसमोर काय तो निर्णय घेऊन टाका तर नाही म्हणालात. ही पोरं..आपल्याच हाडामासाची..तुम्ही वर्षभर अंथरुणावर पडून होतात तेव्हा पायधूळ झाडल्यासारखी येऊन जायची. कधी आई,तुला चार पैसे हवे का म्हणून विचारणं नाही आणि आता मला सांगताहेत तू घरात बसून राहिलीस म्हणून. घरात पडून होते का हो मी केराच्या टोपलीसारखी?

 सकाळी उठून प्रत्येकाच्या आवडीनुसार डबे,त्यांचा अभ्यास,शाळेत सोडणं,घरी आल्यावर सासूसासऱ्यांचा नाश्ता,मार्केटिंग,दुपारचं जेवण, त्यानंतर निवडणंटिपणं,शिवण परत संध्याकाळी ही यायच्या आधी यांना नाश्ता, रात्रीचं जेवण,भांडीकुंडी, कपडे धुणं,बिलं भरणं,आजारपणं काढणं..कमी का कामं केली आणि ही सरळ म्हणतात मी बसून होते. माझ्या कामाचं काहीच मोल नाही का? 
आधीआधी तर बाहेरचीच असं बोलायची पण नव्हतं तेव्हा विशेष वाटलं पण आपलेच बोल लावतात तेव्हा काळजात रुततं हो. किती म्हणून दुर्लक्ष करायचं! तुमचं बरंय ऐटीत बसलात फोटोत जाऊन नि मला ठेवलात खाली या दिवट्यांचे बोल ऐकायला. मीही त्यांना स्पष्ट नकार दिलाय. जागा म्हणे बिल्डरला देणार. माझ्या घरावर प्रेम आहे माझं. या भिंती निर्जीव नाहीत. या बोलतात माझ्याशी. इथला प्रत्येक कोपरा जिव्हाळ्याचा आहे माझ्या. बरं, चांगले सुखवस्तू आहेत पैशाची नड नाहीए त्यांना."

सुनीताई बोलून थकली. तिने डब्यातनं थोडं ज्वारीचं पीठ काढलं. परातीत घेऊन मळलं व एक भाकरी थापली व तव्यावर टाकली. पाण्याचा हात फिरवला. जराशाने परतली. भाकरी टम्म फुगली पण ती उलथण्याने उलथायचं भान नाही राहिलं तिला. ती परत भूतकाळात गेली. तिने तांदुळाचं पीठ काढलं यजमानांना तांदळाची भाकरी आवडते म्हणून पीठ परातीत घेतलं नि पाणी ओतणार तोच,"अगं बाई लक्षातच रहात नाही. गेले काही दिवस मुलं सोबत होती. सुनांनी किचन सांभाळल पण आता मलाच सांभाळायला हवं..सांभाळायला हवं की सावरायला हवं..कसं सावरावं..इतक्या वर्षांचा सहवास..सोप्पं का आहे सावरणं.. तव्याला चिकटलेली भाकरी तिने ताटात घेतली व थोडं दही घेऊन कशीबशी ती भाकरी संपवली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताईने झाडांना पाणी घातलं. इतके दिवस ती बागेत आलीच नव्हती. घरातच बसून असायची. गावठी गुलाब छान फुलला होता. तिने फुलं काढली. देवपूजा केली. देवाला व तसबिरीला फुलं वाहिली. फोटोतल्या यजमानांना सांगितलं,"बघा तुमचा लालगुलाबी गुलाब फुललाय कसा! मागच्या महिन्यातच कटींग केलेलंत ना! बरं,जरा ग्रंथालयात जाऊन येते. वेळच जात नाही. एकटीचा स्वैंपाक तरी असा कितीसा..आल्यावर खिचडी टाकेन,झालं."

सुनीताईने फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली. सैलसर अंबाडा बांधला. कपाळाला टिकली लावली. इतके दिवस काढून ठेवलेलं मंगळसूत्र गळ्यात घातलं व पर्स खांद्याला अडकवून बाहेर पडली. 

ग्रंथालयात तिने आधीचं पुस्तक दिलं व दुसरं घेण्यासाठी आतल्या रुममधे गेली. कोणतं बरं पुस्तक घ्यावं..ती पुस्तकांची नावं वाचू लागली. तिने कथासंग्रहाचं पुस्तक खेचलं तोच पलिकडूनही तेच पुस्तक नेमकं कोणतरी खेचतय असं तिला जाणवलं.

 सुनीताईने पुस्तक सोडलं व पलिकडे वाकून पाहिलं. लखकन प्रकाश पडला डोक्यात. अरे हा तर सुमित..काय बरं आडनाव..हां..सुमित घैसास..यानेच नकार दिलेला मला..काही कारण नसताना..तो पहिला नकार फारच लागलेला मनाला..नंतर यांच स्थळ आलं.. अरे हा तर माझ्याकडेच येतोय..ओळखलं वाटतं मला..बाई नकोच बघायला होतं..मीपण ना..सटकलेलं बरं..इतक्यात सुमित तिच्या पुढ्यात येऊन उभे राहिले..ओळखलत मला.

"अं..हो..तुम्ही सुमित घैसास ना."

"हो आणि तुम्ही मधुराणी काळे"

"हो आताची सुनिती पटवर्धन."

"आम्ही हल्लीच शीफ्ट झालोय बदलापुरला. सुनेचं कॉलेज उल्हासनगरला व मुलाचा दवाखाना आहे बदलापुरात. डेंटीस्ट आहे तो. म्हणून मग येण्याजाण्याच्या सोयीसाठी आलो इथे."

"बरं." 

"तुम्हाला पुस्तक हवं होतं का हे घ्या. मी घेतो दुसरं. माझ्याकडे वेळच वेळ असतो. सून,मुलगा आपापल्या कामाला गेल्यावर एकटाच तर असतो घरात. इथे येऊन रमतो पुस्तकांत."

"म्हणजे तुमची मिसेस.."

"दोन वर्षापुर्वीच गेली ती. आता मी एकटाच असतो पुन्हा बेचलर लाईफ एन्जॉय करतोय. इथे दोन पावलांवरच आहे माझं घर. येता का चहाला?"

"नको ओ पुन्हा कधीतरी."

"हो घरी कामं खोळंबली असतील नं. चालायचच."

"नाही हो मीही एकटीच. मिस्टर गेले महिन्याभरापुर्वी. मुलं थोडे दिवस राहून गेली आता सवय करायला हवी एकटेपणाची.." सुनीच्या लक्षात आलं..किती सहजपणे सगळं बोलून टाकतोय आपण.

सुनीताई सुमितचा निरोप घेऊन निघाली. बऱ्याच दिवसांनी असं कोणी आपणहून बोलल्याने बरं वाटलं तिला. दोन दिवस पुस्तक वाचण्यात गेले. आतासं जास्त वाचलं की डोळे थकतात,आपसूक मिटतात हे लक्षात आलं तिच्या. तरी ते बरं होतं सारखी सारखी नसलेल्या जीवाची आठवण काढून रडत रहाण्यापेक्षा. 

मंगळवारी ती मंदिरात गेली. देवाचं दर्शन घेतलं. थोडावेळ तिथेच भिंतीला लागून असलेल्या बैठकीवर बसली. सुमितही तिथे देवदर्शनासाठी आले होते. सुनीला पहाताच तिच्याशेजारी येऊन बसले.

"किती शांत वाटतं ना इथे!" सुमित म्हणाले.

"हो नं,कितीही वेळ यावं नि या हनुमंताकडे पहात बसावं. खूप धीर येतो याला पाहून. माझं आवडतं दैवत."

"खरंच श्रद्धा महत्त्वाची. मीही हल्ली येतो इथे. थोडावेळ जरी बसलं तरी मन कसं शांत,प्रसन्न.होतं. मुळात आपल्यापेक्षा वडील कोणतरी आहे,त्याचा क्रुपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे ही जाणीवच किती सुखकर असते!"

असेच एकदा रविवारी सुमित बागेत भेटले तिला. नातीला खेळायला घेऊन आले होते. किती गोड नात होती..कुरळ्या केसांची,गोबऱ्या गालांची..घेरदार फ्रॉकही छान शोभून दिसत होता तिला. सुमितने ओळख करुन देताच स्वीटी सरळ सुनीताईच्या मांडीवर जाऊन बसली व तिच्या गालांना मऊशार हाताने कुरवाळू लागली.

 सुनीला वाटलं..स्वीटी तिची गेलेली आजी शोधतेय का तिच्यात! स्वीटीने तिला घरी चल म्हंटलं. स्वीटीचा आग्रह सुनीताईंना मोडवेना. घरी कोणच नव्हतं. सुमितचा लेक दवाखान्यात गेला होता. काही ठराविक अपॉइंटमेंट दिलेल्या होत्या. त्याला मदत करण्यासाठी म्हणून स्वीटीची आईही गेली होती. सुमितने आलं ठेचून घालून चहा केला. स्वीटीने आजीला तिची बाहुली दाखवली. तिची भातुकली दाखवली,टेंट दाखवला. 

सुनी स्वीटीच्या गोड गप्पांत पुरती रमली. सुमित आजोबांनी स्वीटीला चहा खारी दिली पण स्वीटीने सुनीआजीनेच भरवलं पाहिजे असा आग्रह करताच सुनीआजीने तिला भरवलं. थोड्याच वेळात स्वीटीची आई,आर्या आली. स्वीटीने व सुमितने सुनीआजीची आर्याशी ओळख करुन दिली. 

सुनीला ते कुटुंब फारच आवडलं. सुनीला नात नव्हती. दोन्ही लेकांना एकेक मुलगा होता व बदलापूरला ती लोकं कधीतरीच येत असल्याने नातवांनाही सुनीआजीचा विशेष लळा नव्हता. सुमित व्यक्तीचित्र अप्रतिम काढायचे. त्यांनी सुनीताईंना आपली काही चित्रं दाखवली व एका स्पर्धेसाठी सुनीताईंच चित्र काढू शकतो का असं विचारलं. सुनीताई हो म्हणाली. सुमितने सांगितल्याप्रमाणे ती रोज त्यांच्यासमोर जाऊन बसू लागली. काही दिवसांत चित्र पुर्ण झालं. 

सुनीला खूपच आवडलं तिचं चित्र..चेहऱ्यावरचे बारकावे,भावना अगदी सहजतेने उमटले होते त्या चित्रात. सुमितच्या मुलाला,सुनेलाही ते चित्र फार आवडलं. आता सुनीचा त्या कुटुंबाशी चांगलाच घरोबा झाला. एकदा अशीच सगळी हसतखेळत असताना सुनीनेच आर्याला सांगितलं की सुमितने तिला नापसंत केलं होतं. सुमित मग सावरुन बसले व सांगू लागले,"तशी ही आवडली होती मला पण गुण जुळत नव्हते म्हणून मग.." सुनी हसत म्हणाली,"असो. एवढं काय लगेच स्पष्टीकरण नको द्यायला हं."

इकडे कुणाकरवीतरी अजयविजयला त्यांची आई कोणाच्यातरी घरी जाते म्हणून कुणकुण लागली. त्या मधल्या इसमाने अजयविजयचे कान चांगलेच भरले. आपली आई वहावत गेली याचा त्या दोघांना खूप राग आला. सुना म्हणू लागल्या..या वयात ही थेरं! आम्हाला समाजात रहायचं आहे. 

अजयविजय व त्यांच्या बायका सुनीताईकडे आल्या. दोन्ही मुलं येणार म्हणून सुनीताईने रात्रीच गीट्सचं पाकीट आणून गुलाबजाम बनवले. सकाळी उठून भरली वांगी,मसालेभात केला. नातूही येतीलच म्हणून त्यांच्यासाठी गीफ्ट्स आणली. बऱ्याच दिवसांनी आज ती  असं मुलांसोबत बसून जेवणार होती. 

दोन्ही मुलं आपापल्या बायकामुलांना घेऊन हजर झाली. सुनीने जेवणं वाढली. सगळीजणं जेवली. नातूही भरपेट जेवले. आजी,'यम्मी फुड' म्हणाले. 

सुनी म्हणाली,"बरं वाटलं रे. असेच येत रहा अधनमधनं. बरं वाटतं सगळ्यांसोबत जेवायला."

अजय म्हणायला,"आई,स्पष्टच बोलतो. तू चार वाजता दुपारी कुठे जातेस? तेही छान साडी नेसून..गजरा माळून?"

सुनीच्या लक्षात हळूहळू सारा प्रकार आला.

विजय म्हणाला,"आई,कोण आहेत ते आणि तुझे व त्यांचे काय संबंध?"

सुनी म्हणाली,"अरे स्नेही आहेत ते माझे. मित्र आहेत. बरं वाटतं मला त्यांच्याशी,त्यांच्या कुटुंबियांशी बोलल्यावर."

थोरली सून म्हणाली,"अहो आई, अजयच्या वडिलांना जाऊन महिना नाही झाला नि तुम्ही परपुरुषाच्या घरी जाता. त्याच्याशी बोलता..हसताखिदळता. कमाल आहे तुमची."

धाकटी सून म्हणाली,"याचसाठी तुम्ही हा बंगला विकू देत नाही अहात. ते घैसास फसवतील तेव्हा समजेल तुम्हाला. का त्यांना इथे रहायला आणणार अहात? आता मात्र सुनीताईंचा राग अनावर झाला. तिचे डोळे पाण्याने भरले. दारात सुमित व त्यांची फेमिली उभी होती.

आर्या पुढे आली. तिने सुनीताईला खुर्चीवर बसवलं. मेजावरचं फुलपात्र पाण्याने भरुन त्यांच्या तोंडाला लावलं.

मग  अजयविजय व त्यांच्या बायकांना म्हणाली,"अरे सुशिक्षित समजता न् तुम्ही स्वतःला आणि विचार इतके हलके! दोन म्हाताऱ्या जीवांची मैत्री नाही होऊ शकत का! तुम्हाला त्या मैत्रीत फक्त नर व मादी आणि त्यांच्यातले संबंधच दिसतात का? तसं असेल तर सुधरा स्वतःला. माझे सासरे व सुनीताई दोघांची मैत्री खूप सुंदर आहे. .आणि पुढे जाऊन त्यांना पतीपत्नी म्हणून रहावसं वाटलं तरी त्यांचा निर्णय मान्यच असेल आम्हाला. आई थेरं करते असं म्हणूच कसं शकता तुम्ही! 

अजयविजयने सुनीताईंना,सुमितना व आर्याला सॉरी म्हंटले. सुनाही सुनीताईंना सॉरी म्हणाल्या पण तरी सुनीताईच मन दुखावलं ते दुखावलंच. खरंच एका विशिष्ट वळणावर सुनीताईला पुरुषमित्र भेटला व नकळत त्याच्याशी,त्याच्या कुटुंबाशी तिचे मैत्रीबंध जुळले हे गैर होते का? सुनीताईचे यजमान गेल्यावर सुमितशी त्यांची मैत्री जुळली ही थेरं होती का?

सगळी निघून गेल्यावर सुनीताई यजमानांच्या तसबिरीसमोर उभ्या राहिल्या व म्हणाल्या,"तुमचा तरी आहे नं विश्वास माझ्यावर? त्यांना यजमानांचे डोळे हो म्हणताहेत असं जाणवलं.."मग झालं तर बाकीच्यांना  बोलुदेत काही. मी नाही घाबरत कोणाला.मी माझ्या मनाप्रमाणे जगणार." असं म्हणून त्यांनी तसबिरीसमोर तेवणारी वात जरा पुढे केली.

--------सौ.गीता गजानन गरुड.