मोरपीस

उद्या चिऊचा आठवा वाढदिवस. मिनू म्हणाली होती, जर रात्री बारा वाजता मनापासून देवाला प्रार्थना के

मोरपीस     

  उद्या चिऊचा आठवा वाढदिवस. मिनू म्हणाली होती, जर रात्री बारा वाजता मनापासून देवाला प्रार्थना केली कि, आपली इच्छा पूर्ण होते. बारा वाजून गेले आणि चिऊला तिच्या स्वप्नात एक परी भेटली.

म्हणाली, "चिऊ... ये चिऊ बाळा... बोल आज तुझ्या वाढदिवसाला काय देऊ तुला?"

चटकन चिऊ म्हणाली, "मला माझा बाबा देशील का गं?"

परी विचारात पडली. "अगं... इतर मुलं किती खेळणी, खाऊ, पुस्तके, वगैरे वगैरे मागतात. मग तुला बाबाच का हवाय? दुसरं काही तरी माग."

"नाही.... पण मला माझा बाबाच हवाय....", चिऊ हट्टाने म्हणाली.

"नाही गं चिऊ... असं नाही करता येणार... तू दुसरं काहीतरी माग."

"नाही... नाही... नाही... मला माझा बाबा हवाय. प्लिज, परिराणी आजच्या दिवशी तरी नाही म्हणू नकोस ना!"

परिराणीने श्रीकृष्णाला विचारले, "देवा... तुम्हीच सांग आता काय करायचं?"

श्रीकृष्ण म्हणाले, "तिला सांग कि, आजच्या दिवसचं तुला तुझा बाबा येईल भेटायला. चालेल?"

परिराणीने तिला सांगितलं आणि म्हणाली,

"पण चिऊ, एक लक्षात ठेव. आजच्या दिवसच फक्त तुला तुझा बाबा भेटेल."

"पण हा... कुणाला सांगायचं नाही. आणि निरोप देताना बाबाकडे हट्ट करायचा नाही हं."

"हो परिराणी... थँक यु..."

       जगाचा पालनकर्ता. श्री कृष्ण! आज मोठी परीक्षाच होती. चिऊच्या बाबाच्या रूपात त्याला आजचा दिवस जगायचं होतं. लहान मुल होणं आणि त्यांचा बाप होणं काय असतं? हे त्याच्या शिवाय दुसरं कोण चांगलं जाणणार.

        आज सकाळी चिऊ लवकरच उठली. आज तिला तिचा बाबा भेटणार म्हणून खुश होती. सगळं स्वतःच स्वतः आवरलं. आईला जरा आश्चर्यच वाटलं. आईने बनवलेला डबा घेतला. देवघरातल्या श्रीकृष्णाला नमस्कार केला. जवळच ठेवलेल्या मोरपिसावरून हळुवार हात फिरवला. बॅग घेतली आणि शाळेला निघाली.

        शाळा जवळ येऊ लागली होती. मुलं शाळेच्या गेटमधून आत जाताना दिसत होती. चिऊचा आनंद हळू हळू मावळू लागला. डोळ्यांत पाणी दाटू लागलं. परिराणीने आपल्याला खोटंच सांगितलं. आपला बाबा नाही भेटणार आता. देवाघरी गेलेलं कुणी असं भेटत का? ती आपल्याच विचारात चालली होती.

"चिऊ ए चिऊ...."

फुटपाथवरच्या बाजूच्या बाकावर बसलेल्या व्यक्तीने तिला हाक मारली. आवाज ओळखीचा होता. तिने चमकून बाजूला पाहिलं. तिचा बाबा तिला हाक मारत होता.

"बाबा....", पळत जाऊन तिनं स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.

"बाबा... कुठे गेला होतास रे? किती दिवस झाले? तुला आमची आठवणही येत नाही का रे? "

"नाही रे बाळा... खूप आठवण येते तुमची..."

"मग का रे येत नाही पुन्हा?"

"चिऊ... असं रडायचं नाही बरं..."

"चल... फिरायला जाऊ..."

"आणि शाळा???"

"मी सांगितलं आहे तुझ्या टीचरला."

"पण कुठे?"

"तिथेच जिथे आपण नेहमी जातो."

"वाह... घाटावर... मज्जा...."

दोघेही नदीच्या घाटाच्या दिशेने चालू लागले. जाता जाता बागेसमोर भेळवाला दिसला. बाबाने भेळ घेतली.

"चल... थोडा वेळ बागेत जाऊन येऊ..."

चालता चालता चिऊ म्हणाली,

"बाबा का रे आम्हाला सोडून गेलास. आईला किती काम पडतं आता. सगळ्यांचे बाबा शाळेत सोडायला येतात. मला एकटीलाच जावं लागतं."

"अगं वेडाबाई... त्यांना त्यांच्या बाबाची गरज आहे."

"आणि मला...?", ती केविलवाण्या नजरेने बाबाकडे पाहत म्हणाली. डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाला,

"तू खूप जिद्दी आहेस. धीराची आहेस. तुला कुणाचीही गरज नाहीये चिऊ. स्वतःच्या हिमतीवर तू तुझा मार्ग शोधशील."

        दोघेही बागेत एका बाकावर बसले होते. समोरच्या झुडपावर जाईच्या वेलीला लगडलेल्या फुलांचा सुगंध दरवळत होता. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभरत होती. दोघेही भेळ खात होते. खाताखाताच चिऊ म्हणाली,

"बाबा... कित्ती सुंदर आहेत ना हि फुलपाखरं...!"

"चिऊ... तुला माहितंय का, कि फुलपाखरांचं आयुष्य फक्त एकाच दिवसाचं असतं?"

"खरं का रे बाबा?", जरा उत्सुकतेने चिऊने बाबाला प्रश्न केला.

"जेव्हा कोषातून सुरवंट बाहेर येतो. त्या क्षणापासून फुलपाखरांच्या आयुष्यला सुरुवात होते. त्याला माहिती नसतं कि, त्याचं आयुष्य एकाच दिवसाचं आहे. तरीही ते मुक्त फिरतं, बागडतं, फुलांच्या मधुकणांचा आस्वाद घेतं. जीवनाचा आनंद लुटत असतं."

"किती सुंदर ना बाबा...! फुलपाखरांचं आयुष्य! मुक्त फिरायचं, बागडायचं. कसलीही काळजी नाही, शाळा नाही, काम नाही."

"पण चिऊ... ते एका दिवसाचं आयुष्य मिळवण्यासाठी त्याने कोषातून बाहेर येण्यासाठी अपार कष्ट केलेले असतात. धडपड केलेली असते. जीवनासाठी संघर्ष केलेला असतो. कधी कधी तर प्रसंगी जीवालाही मुकावं लागतं."

"पण मग, आईला, मला किती कष्ट, कामं पडतात. सगळ्यांचे बाबा असतात. मग तू आमच्या सोबत का नाहीस?"

"अगं... चिऊ... आई, आजी तुला कृष्णाच्या, पांडवांच्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगते ना! त्यांचे बाबा होते का त्यांच्या सोबत? शिवाजी महाराजांना काय त्यांच्या वडिलांनी दिली का कायम साथ. स्वतःच राज्य स्वतः निर्माण केलं. अथक परिश्रम केले. कष्ट घेतले, मेहनत घेतली तेव्हा कुठे स्वराज्य निर्माण केलं."

"पण बाबा... मी किती लहान आहे."

"बाळा... लहान... मोठं... असलं म्हणून कर्म कुणाला चुकत का? आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं आहेत. ज्यांना दोन वेळेच्या जेवणासाठी दिवसभर कष्ट करावे लागतात. लहान लहान मुलं सुद्धा कामं करतात. कुणाला तर शाळाही शिकता येत नाही. फुटपाथवर, सिग्नलवर लहान लहान मुलं खेळणी, फळं, फुलं विकताना दिसतात."

"पण बाबा... अजून माझी शाळाही संपली नाही. पुढे खूप शिकायचं आहे. पण मग एवढ्या लवकर हे आमच्या वाट्याला का?"

"चिऊ... आयुष्यामध्ये प्रत्येकाचे येण्याचं एक प्रयॊजन असतं. त्याचं त्याचं काम झालं कि, तो निघून जातो. तो गेला म्हणून आपण आपलं आयुष्य थांबवायचं नसतं. त्या प्रसंगातून, त्या व्यक्तीकडून शिकायचं असतं. ते अनुभव भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला मदत करणार असतात."

"मग बाबा... का मग काही लोकांना कमी तर काहींना खूप कष्ट, संघर्ष करावा लागतो."

"हे बघ चिऊ, जे खूप विशेष असतात, असामान्य असतात! त्यांनाच जीवनात कष्ट, संघर्ष करावा लागतो. आणि पुढे जाऊन यश, ध्येय मिळतं. आणि तेच पुढे जाऊन जगासमोर एक आदर्श निर्माण करतात."

"चिऊ... लक्षात ठेव, भंगारामध्ये लोखंड विकलं जातं, सोनं नाही. पण सोन्याला सुद्धा झळाळी येण्यासाठी, चमकण्यासाठी भट्टीमध्ये स्वतःला वितळवून घ्यावं लागतं. कष्ट सोसावे लागतात. तेव्हाच त्याला दागिन्यांचं महत्व प्राप्त होत."

        बोलता बोलता दोघेही नदीच्या दगडी घाटावर येऊन पोहोचले. पायऱ्यांवर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसले. पायाला नदीचं थंड पाणी स्पर्श करून जातं होतं. शरीराला शितलता मिळत होती. आजूबाजूला असलेल्या झाडांच्या दाट सावलीमुळे ऊन असं जाणवतच नव्हतं. दोघेही चणे फुटाणे खात बसले होते.

"चिऊ... घरी आई, आजी नेहमी कृष्णाची पूजा करतात कि नाही! तुला जेव्हा जेव्हा एकटं वाटेल, माझी आठवण येई तेव्हा तेव्हा कृष्णाच्या मूर्तीकडे पाहायचं. एखाद्या मंदिरात जाऊन बसायचं. डोळे मिटून त्याची आराधना कर. तुझ्या मनाला शांती मिळेल. मी तुझ्या जवळच असल्याचा आभास होईल. आईला त्रास द्यायचा नाही. तिला आता खूप काम पडतं ना! हट्ट करायचा नाही. मन लावून अभ्यास कर मोठी हो. तुझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर"

        गुडघाभर पाण्यात चिऊ पाण्याशी खेळत होती. बाबाच्या अंगावर पाणी उडवत होती. ओंजळीत घेऊन वर उडवत होती. खेळता खेळताच ती बाबाला म्हणाली,

"पण बाबा. इतरांचे बाबा कसे त्यांना आधार देतात. मग तू...?"

"अग वेडाबाई... असं का वाईट वाटून घेतेस! मी नेहमी तुझ्या सोबतच असेन. इतरांची ओळख त्यांच्या बाबामुळे असते. पण तू तुझी ओळख स्वतःच्या हिमतीवर, जिद्दीवर मिळवशील. आणि तुझ्या ओळखीतच मी सदैव जिवंत असेन. तुझ्या सोबत असेन."

"पण बाबा... देव का रे लोकांना त्याच्याकडे बोलावून घेतो?"

"बाळा... जी माणसं चांगली असतात ना! देवाला ती आवडतात आणि मग देव त्यांना बोलवून घेतो त्यांच्याकडे."

"पण मग तूच म्हणतोस ना, कि लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. लहान मुलं देवाला खूप आवडतात. मग मला पण का नाही देव बोलावून घेत?"

बाबा बनलेल्या श्री कृष्णाला काय बोलावं कळेना! डोळ्यांत आपसूकच पाणी तरळलं.

"चिऊ... जरा डोळे मीट बरं....!"

"का रे बाबा?"

"कर तर ...", चिऊने डोळे बंद केले.

त्याने त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या पिशवीतून एक मोरपीस बाहेर काढलं. तिच्या समोर धरत म्हणाला,

"हं आता उघड..."

"अय्या... कित्ती सुंदर रे बाबा...", मोरपीस हातात घेत चिऊ म्हणाली, "मला खूप आवडतं..."

"हो गं चिऊ... तुझ्यासाठीच तर आणलंय. जपून ठेव तुझ्याजवळ. नेहमी असू देत. जेव्हा जेव्हा मन उदास होईल, निराशा येईल तेव्हा तेव्हा या मोरपिसाकडे पाहा. श्रीकृष्णाला आठव. नक्कीच तुला लढायचं बळ येईल. नवी उमेद येईल."

आपल्या शाळेच्या वहीत मोरपीस ठेवत चिऊ म्हणाली,

"बाबा... लहान असताना आई मला कडेवर घ्यायची आणि तू खांद्यावर..."

"हो... मग..?"

"ते का? आता मला कळायला लागलंय."

"सांग पाहू..."

"आई कडेवर घ्यायची. कारण, ती जे पाहू शकत होती ते मलाही पाहता येईल म्हणून. पण तू खांद्यावर घ्यायचास. कारण, जे तुला पाहता येत नव्हतं ते मला पाहता येईल म्हणून. हो ना?"

विचारात मग्न झालेल्या श्रीकृष्णरूपी बाबाने चिऊच्या डोक्यावरून हात फिरवला.

"हो गं चिऊ... मलाही कळलं नाही कधी." एवढ्या लहान वयात तिला किती मोठी गोष्ट कळली होती.

        संध्याकाळ झाली होती. डोंगराआड मावळणाऱ्या सूर्याचे दर्शन होत होते. निरोप घ्यायची वेळ आली होती. घराच्या दिशेने दोघांची पावलं पडत होती. चिऊच्या डोळ्यांत आसवं दाटली होती. चेहरा रडवेला झाला होता.

"चिऊ, आपण भेटलेलो कुणालाही सांगायचं नाही. आज मी जे काही बोललो, आपण भेटलो. हेच तुला तुझ्या आयुष्यात उपयोगी पडणार आहे. हि आपली भेट सदैव तुला प्रेरणा देत राहील. तुला आधार देईल."

"हो बाबा..."

"चिऊ... मी सांगितलेलं नेहमी लक्षात ठेव."

"हो बाबा... कधीही हार मानायची नाही. आणि सहजासहजी तर कधीच नाही."

"आणि ती कविता लक्षात आहे ना...??"

"अं...", चिऊ आठवायचा प्रयत्न करू लागली.

बाबाने सुरुवात केली.

"तू थकेगा ना कभी, ", चिऊ साथ देऊ लागली.

"तू रुकेगा ना कभी, तू न मुडेगा कभी,"

"कर शपथ, कर शपथ, कर शपथ,"

"अग्निपथ, अग्निपथ,अग्निपथ"

घर जवळ येऊ लागलं होतं. दोघेही एकाच सुरात कविता  म्हणत होते. चिऊ घरच्या अंगणात पोहोचली होती.

"ए चिऊ.. अगं कुठे होतीस एवढा वेळ?"

आईच्या आवाजाने चिऊ भानावर आली. कावऱ्या बावऱ्या नजरेने आजूबाजूला पाहू लागली. बाबा कुठेच दिसेना. थोडी हिरमुसली, डोळ्यांत टचकन पाणी आलं आणि झटकन आईच्या कुशीत शिरली.

"काय गं...? काय झालं...?"

"काही नाही आई...", चिऊने आईला घट्ट मिठी मारली होती. बाजूला कुंपणाच्या पलीकडे चिऊची नजर गेली. तिचा बाबा तिला टा टा करत होता. नकळत चिऊचा हात वर गेला. अंधार गडद होऊ लागला. अश्रूभरल्या डोळ्यांनी श्रीकृष्णाने चिऊला निरोप दिला.

        कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरूप दाखवून गीतेचं ज्ञान सांगणाऱ्या श्रीकृष्णाला एका लहान मुलीनं जगण्याचा अर्थ सांगितला होता.

"आई आपल्या मुलाला कडेवर घेते. कारण , आई जे पाहू शकते ते मुलही पाहू शकेल म्हणून. पण, बाप जेव्हा मुलाला खांद्यावर घेतो, तेव्हा बाप जे पाहू शकणार नाही, ते  तो मुलगा /मुलगी पाहू शकेल म्हणून."

- धन्यवाद