मुंगूसाची गोष्ट

मुंगुसाची गोष्ट

एका खेडेगावात एक कष्टकरी दांपत्य राहत होते. त्यांना एक छोटे बाळ होते. बाळाची वडील सकाळी उठून कामावर जात. दिवसभर बाळाला सांभाळणे, घरची कामे करणे यात त्या स्त्रीचा दिवस निघून जायचा. त्या दांपत्याने एक मुंगूस पाडले होते. एकदा बाळाला पाळण्यात झोपवून ती स्त्री नळाचे पाणी आणण्यासाठी बाहेर गेली.

घरी येऊन पाहते तो मुंगूसाचे तोंड रक्ताने माखलेले होते. तिने एकच हंबरडा फोडला. तिला वाटले या मुंगुसाने बाळाचं काही बरे वाईट केले असणार, तिने क्षणाचाही विचार न करता तो पाण्याचा भरलेला हंडा मुंगूसाच्या अंगावर टाकला. त्या माराने मुंगूसाने जागेवरच जीव सोडला.

ती धावतच घरात आली. पाहते तो पाळण्यात बाळ छान खेळत होते, आणि समोरच एक मला मोठा साप मरून पडलेला होता. तिच्या लक्षात आले की या मुंगूसाने सापाला मारून टाकले म्हणून त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते. मुंगूस नसते तर काय झाले असते माझ्या बाळाचे? तिला केल्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. ती रडू लागली. पण आता रडून उपयोग नव्हता. मुंगुसाचे प्राण परत येणार नव्हते. आपल्या लाडक्या बाळाचे प्राण वाचविणाऱ्या मुंगूसाचा तिने अंत केला होता.

तात्पर्य

कोणतीही गोष्ट अविचाराने करून पापाचे धनी होऊ नका. केवळ आततायी पणाने केलेली कृती विनाशाला कारणीभूत ठरू शकते. म्हणून रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

सौ.रेखा देशमुख